महाराष्ट्र २०१९-सदानंद मोरे

समूहाची ऐतिहासिकता आणि भविष्यदृष्टी यांचा त्याच्या वर्तमान कृतीवर प्रभाव पडत असतो. काही कृती करण्याऐवजी समूह स्मरणरंजनात व स्वप्नरंजनात दंगून जाण्याचा धोकाही संभवतो. असा समाज निष्क्रिय बनतो किंवा चुकीच्या कृती करतो. आपली अवनती होण्यामागची खरी कारणे शोधण्यासाठी आत्मपरीक्षण करण्याऐवजी तो त्याचे खापर इतरांच्या डोक्यावर फोडण्यातच समाधान मानतो.
इ. स. २०२० पर्यंत भारताने महासत्ता होण्याचे स्वप्न काही धुरीणांनी पाहिले व दाखवलेदेखील आहे; पण तूर्त आपली चर्चा महाराष्ट्रापुरती मर्यादित असल्याने त्याचा विचार नको. असेच स्वप्न चीनसारखे इतर राष्ट्रसमाजही पाहात आहेत. याचा उल्लेख केला म्हणजे पुरे.
या अनुरोधाने महाराष्ट्राची म्हणजे मराठी समाजाची चर्चा करायला हरकत नसावी. मराठय़ांची म्हणजेच मराठी समाजाची प्रकृती काय आहे याची सर्वात चांगली चिकित्सा राजारामशास्त्री भागवत यांनी केली. दुर्दैवाने महाराष्ट्र राजारामशास्त्रींना पूर्णपणे विसरला. राजारामशास्त्री लिहीत होते तो काळ ब्रिटिश पारतंत्र्याचा होता. म्हणजे तेव्हा संपूर्ण भारत देशच गुलामगिरीत खितपत पडला होता. अशा वेळी भागवतांनी मराठी आयडेंटिटीचा विचार केला. महाराष्ट्राच्या इतिहासाने अक्षरश: खोदकाम केले. मराठय़ांचे नेमके वैशिष्टय़ कोणते, त्या वैशिष्टय़ांचा त्याच्यावर काय परिणाम झाला आहे याचे गंभीर चिंतन शास्त्रीबुवांनी संस्कृत प्राकृत ग्रंथाच्या आधारे व विशेषत: व्युत्पत्तीच्या अंगाने केले. ते मराठय़ांचे अनाठायी उदात्तीकरण करतात, असे एखाद्याला वाटू शकेल; पण वस्तुस्थिती तशी नाही. सर्व लोक वंशशुद्धी आणि वंशश्रेष्ठत्वाच्या मागे लागले असताना भागवत, मराठे श्रेष्ठ ठरले याचे कारण आम्ही ब्राह्मणांपासून अंत्यजांपर्यंत संकीर्ण आहोत, असे सांगत होते, किंबहुना या संकीर्णतेमुळेच आम्ही श्रेष्ठ ठरलो, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र म्हणजे यदुक्षेत्र आणि मराठे म्हणजे यादव अशी भूमिका घेऊन त्यांनी इतिहासात मोठी उलथापालथ केली. अशीच उलथापालथ त्यांनी संस्कृत आणि प्राकृत यांच्या संबंधातही केली.
पण भागवत हे काही केवळ भूतकाळात रममाण होणारे गृहस्थ नव्हते. त्यांनी मराठय़ांच्या सद्य:स्थितीचाही विचार केला. त्यांची आणि तेव्हा पुढे असणाऱ्या बंगाली लोकांशी तुलना करून मराठे कसे त्यांची बरोबरी करतात हे दाखवून दिले.
मराठय़ांच्या इतिहासाचा आणि वर्तमानाचा आढावा घेऊन भागवत भविष्यविषयक निष्कर्ष काढायला विसरत नाहीत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ''जरी कितीही विघ्ने आली तरी आमचे देशबांधव त्यांच्या पार नि:संशय जातील व इंग्रजी राज्यात हिंदू लोकांची अग्रेसरता पावतील, असा रंग दिसत आहे. इतकेच की त्यांनी स्वस्थ मात्र बसता कामा नये. पूर्वीच्या त्यांच्या इतिहासावरून पाहता ते स्वस्थ बसणारे नव्हते व स्वस्थ बसलेले नाहीत, हे उघड आहे. जर पूर्वी मराठे कधीही स्वस्थ बसले नाहीत व हल्ली स्वस्थ बसलेले नाहीत, तर पुढे तरी स्वस्थ कसे बसतील?''
भागवत स्वत: मराठे असल्यामुळे त्यांनी असे म्हणणे स्वाभाविक आहे, तो आत्मगौरवाचाच भाग आहे, असे समजून त्याकडे दुर्लक्ष करण्याकडे एखाद्याची प्रवृत्ती होऊ शकेल, पण तसे समजायची गरज नाही. महाराष्ट्रीय नसलेल्या, इतकेच नव्हे तर तेव्हाच्या श्रेष्ठ गणल्या गेलेल्या व आपल्या श्रेष्ठत्वाचा अभिमान मिरवणाऱ्या बंगाली लोकांमधील प्रसिद्ध इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचे मत येथे विचारात घ्यायला हरकत नसावी. शास्त्रीबुवांनी उपरोक्त 'मराठय़ांसंबंधी चार उद्गार' काढल्यानंतर पंचवीसेक वर्षांनी जदुबाबूंनी शिवचरित्र लिहिले. १९१९ च्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या आपल्या ग्रंथात जदुनाथांनी सध्या तरी हिंदुस्थानात मराठे इतर सर्व प्रांतीयांच्या पुढे आहेत हे स्पष्टपणे कबूल केले.
महत्त्वाची गोष्ट अजून शिल्लकच आहे. मराठय़ांच्या हिंदुस्थानातील श्रेष्ठत्वाला अनुमोदन देऊन सरकार थांबले नाहीत. त्यांनी अशीही पुस्ती जोडली की, मराठय़ांची वाटचाल अशीच चालू राहिली आणि त्यांनी आणखी काही गुणवैशिष्टय़े अंगी बाणवली तर आणखी शंभर वर्षांनी ते जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ ठरतील, अग्रेसर होतील.
जदुनाथांच्या भाकिताला २०१९ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होतील, म्हणजे आता फक्त पाचच वर्षे राहिली. महाराष्ट्राची सध्याची स्थिती विचारात घेता त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील व खूप घाईसुद्धा.
पण माझा मुद्दा वेगळा आहे. मराठय़ांची ऐतिहासिकता आणि वर्तमान यांचा विचार करूनच राजारामशास्त्र्यांनी आणि सरकारांनी त्यांच्याविषयीचे भाकीत केले. मराठी समाजाला त्यांनी एक 'युरोपिया' दिला. कृतीला अधिष्ठान दिले. ते एक पोकळ स्वप्न नव्हते. स्वप्नरंजन नव्हते. ती कृतिनिष्ठ अपेक्षा होती. प्रादेशिक अस्मितेचा अतिशयोक्त आविष्कार नव्हता.
राजारामशास्त्री लिहीत होते तेव्हा टिळक, आगरकर सार्वजनिक कामात नुकतेच पुढे येत होते. जदुनाथांनी लिहिले तेव्हा आगरकर या जगात नव्हते; परंतु टिळकांचे नेतृत्व भारतीय पातळीवर तळपून सर्वमान्य झाले होते. त्यामुळे मराठी समाजाच्या भवितव्याविषयी अशा अपेक्षा निर्माण होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे.
राजारामशास्त्री आणि भागवतांच्या काळात मराठय़ांचा हिंदुस्थानी स्पर्धक बंगाल होता; दरम्यान बंगाली लोकांनीच मराठय़ांचे नेतृत्व मान्य केल्यामुळे आता स्पर्धाही राहिली नव्हती. टिळकांच्या मृत्यूनंतरही ही गोष्ट अशीच चालू राहील, असे महाराष्ट्रातील टिळकांच्या अनुयायांना वाटत होते; पण अत्यंत अनपेक्षितपणे गांधीजींचा उदय झाला. राष्ट्रीय स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व गांधींनी टिळकांच्या अनुयायांकडून जणू हिसकावून-हिरावून घेतले. पुढेही राजकर्त्यां काँग्रेस पक्षावर पकड बसवली ती वल्लभभाई पटेलांसारख्यांनी. भरीत भर म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात आधी मुंबई प्रांत आणि नंतर महाद्वैभाषिकाच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातच अंतर्गत चुरस राहिली. तिचे प्रतिबिंब संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पाहायला मिळाले.
१९६० साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्राच्या मानेवरील गुजरातचे जोखड आपोआपच दूर जाऊन महाराष्ट्र आपल्या पद्धतीने आपला विकास करायला मोकळा झाला. सुदैवाने यशवंतराव चव्हाणांसारखा कुशल नेता लाभल्यामुळे महाराष्ट्र खरोखरच पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले.
पण पुढे काय घडले याचे वर्णन करायचे झाल्यास अंधश्रद्धांचा आधार घेणे उपयुक्त ठरेल. महाराष्ट्राला कोणाची तरी दृष्ट लागली. बरोबर २०१४ साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुढे सरकणारा गुजरात विकासावर भर देत महाराष्ट्रावर मात करण्याच्या गोष्टी करू लागला. आकडेशास्त्रज्ञांनी फिरवाफिरव करीत अजूनही महाराष्ट्रच आघाडीवर असल्याचा दावा सोडला नाही; पण महाराष्ट्रातीलच मतदारांना तो पटला नसावा. त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत मोदींना हात दिलाच, परंतु पाठोपाठ विधानसभेतही त्याचीच पुनरावृत्ती केली. आता महाराष्ट्रात सरकार येणार ते मोदींच्याच पक्षाचे, की ज्याची पाळेमुळे सावरकर- गोळवलकरांच्या माध्यमातून महाराष्ट्रातच रुजली आहेत. येणाऱ्या भाजप सरकारसाठी पाच वर्षे आहेत. तोपर्यंत म्हणजे विधानसभेच्या पुढील निवडणुकीपर्यंत जदुनाथांनी दिलेली शंभर वर्षांची मुदत संपणार आहे म्हणजे या सरकारवर मोठाच 'बॅकलॉग' भरून काढायची जबाबदारी आलेली आहे, तेही स्वपक्षीय सरकारांशी निकोप स्पर्धा करीत.
पण येथेही मुद्दा अस्मितेवर आधारित आत्मगौरवाचा नसून व्यावहारिक पातळीवरील वास्तववादी कृतिनिष्ठ अपेक्षांचा आहे. तेव्हा या संदर्भातही जदुनाथांचे मार्गदर्शन घ्यायला हरकत नसावी. कोणत्या गुणसमुच्चयामुळे मराठे देशात अग्रेसर आहेत याची चिकित्सा करताना जदुनाथांनी 'बुद्धीची तीक्ष्णता, दीघरेद्योग, साधी राहणी उच्च विचारसरणी, कोणताही सुविचार आचारात आणण्याची धमक, चारित्र्य, वसुधैवकुटुंबकम् वृत्ती' अशी मोजदाद केली आहे.
यातील कोणत्या गुणांचा किती ऱ्हास झाला याचे कठोर आत्मपरीक्षण करताना जदुनाथांनी तेव्हा सुचवलेले कोणते गुण आत्मसात करायचे आहेत हेही सांगतो. जदुनाथ लिहितात- 
''वरील सद्गुणसमुच्चयात जर मराठय़ांमध्ये संघटनेचे चातुर्य, सहकारिता, आधुनिक यांत्रिक कलेचे ज्ञान आणि आहे त्याहून अधिक दूरदृष्टी इतक्या सद्गुणांची भर पडेल, तर पृथ्वीच्या पाठीवर त्याची बरोबरी कोणीही करू शकणार नाही.''
महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित कारभाऱ्यांना यासाठी शुभेच्छा देण्यापलीकडे माझ्या हातात काय आहे?
___________________________________________________________
*लेखक सदानंद मोरे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत.

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण