निळासावळा नाद | पांडुरंग कांती:विवेक दिगंबर वैद्य
भागवत धर्म-वारकरी म्हणजे नेमके काय -पंढरपुरात नेमके असे काय आहे की जिथे लाखो भक्त अतीव श्रद्धेने आषाढी/कार्तिकी सोबतच आपल्या आयुष्यात वेळ मिळेल तेव्हा जात असतात असे अनेक प्रश्न मला पडत होते त्यांचे उत्तर अजूनहि शोधतो आहेच पण त्यांचे उत्तर बहुधा मिळू शकेल असे हा निळासावळा नाद पांडुरंग कांती(लेखक विवेक दिगंबर वैद्य )वाचण्याचा योग आला. काय अलौकिक लेख आहे हो हाअगदी शब्दातीतच!प्रत्यक्ष ही अलौकिक वाचनानुभूती घ्या एकदा. बहुतेक त्या पांडुरंगाचा वरदहस्त असावा विवेक वैद्य साहेबांना असो!
____________________________________________________________________________________________________
आषाढ शुक्ल दशमी
दूरवर कसलेसे टोले पडले आणि राऊळाची कवाडं धाडदिशी बंद झाली. बाहेर अव्याहतपणे सुरू असलेला गलका एकाएकी सुन्न करणाऱ्या शांततेत जसा मिसळून गेला तसा तो भानावर आला. एव्हाना िदडीदरवाजाही बंद झाला होता. एकाएकी आलेल्या त्या नीरव शांततेमुळे तो क्षणभर सैलावला. दिवसभर त्याला ना विश्रांती मिळाली होती ना फुरसत. उभं राहून राहून त्याचे पाय जडावले होते. अर्थात, हे त्याच्यासाठी तसं नेहमीचंच होतं. आपल्यातील देवत्वाचं ओझं विटेवर तोलत गेली अठ्ठावीस युगे तो उभाच होता.
आज घटकाभरासाठी का होईना, आपल्या खांद्यावरचं ते देवत्वाचं ओझं बाजूला ठेवावं, अशी विचित्र इच्छा त्याच्या मनात दाटून आली. आज तो खरोखरच थकून गेला होता. उद्या आषाढी एकादशीचा दिवस. लांबलांबून येणाऱ्या भक्तांची गळाभेट घ्यायला तो आतुर झाला होता. आजची रात्र त्याच्यासाठी वेगळीच होती. नेहमीच्या, इतर रात्रींइतकी शांत आणि निवांत तर अजिबातच नव्हती. एरव्ही, एकदा का राऊळाची कवाडं बंद झाली

आणि दिवे मालवले गेले की त्याचा वेळ दीनदुबळ्या भक्तांच्या दुखांचा विचार करीत, गाभाऱ्यातील काळोखात विरून जात असे. आजचं वातावरण वेगळं होतं. आज राऊळाचा दरवाजा बंद झाला असला तरी दिवे मालविले जाणार नव्हते. उलट आज नव्या उत्साहाने गाभारा आपली कात टाकू पाहात होता, थोडय़ाच वेळात हंडय़ा आणि झुंबर आणखी तेजानं तळपू लागतील. दिव्यांच्या लखलखाटात सोळखांबी मंडप उजळून निघेल. एरव्ही मंदगतीने तेवणाऱ्या समया भगभगीत उजेड पसरवतील आणि आपण अधिकाधिक अस्वस्थ होत जाऊ, या जाणिवेने तो विलक्षण कंटाळून गेला. कटीवर ठेवून आळसावलेल्या आपल्या हातांनी त्याने आळोखे-पिळोखे दिले आणि एक दीर्घ जांभई देऊन पुढे येणाऱ्या प्रसंगाला सामोरं जाण्याची तयारी करू लागला.
कारभाऱ्यांची लगबग सुरू झाली. आता पूजेचं सामान आत येणार. ते हारतुरे, ती निरांजनं आणि ते तुळशीचे भलेथोरले हार. पूजेचा क्रमही अगदी शिस्तबद्ध. वहिवाटीनुसार चालणारा. आधी खाजगीवाले, मग बडवे, आणि त्यानंतर शासनाचे कर्तेधर्ते. या सर्वाच्या मानाच्या पूजा आटोपल्या की मग मंदिराचे दरवाजे खुले होणार ते इतरेजनांसाठी. दरवर्षी तेच ते आणि तेच ते.
सवयीनेच त्याने कमरेवर हात ठेवले आणि उभ्या उभ्याच तो विचार करू लागला की, आजची रात्र आपण या राऊळाच्या गाभाऱ्यात घालविण्यापेक्षा जरा बाहेर फिरून यावं, पाय मोकळे करावेत. तसं पाहिलं तर मंदिराच्या बाहेरील जगात जे काही चाललं होतं ते पाहता तिथं दिवसाउजेडी जाण्याची िहमत त्याच्याकडे नव्हती, तो स्वत: जरी परमेश्वर असला तरी बाहेरच्या जगातील स्वयंभू परमेश्वर आपल्याला सहज विकून खातील किंवा प्रसंगी आपला बाजारदेखील मांडतील; याचीच धास्ती त्याला वाटून राहिली होती. त्यामुळे रात्रीच्या वेळी बाहेर जाणे त्याच्या दृष्टीने त्याला कमी धोक्याचं वाटलं. अशा आडनिडय़ा वेळेत आपल्याला कुणी भेटणारही नाही आणि भेटलंच तर ओळखणार देखील नाही. बाहेर आकाशात लुकलुक चांदणं अधूनमधून उगवलं असलं तरी किट्ट काळोखात आपला निभाव सहज लागेल हे त्याला चांगलंच माहीत होतं. आज प्रथमच त्याला आपल्या काळ्या-सावळ्या रंगाचा अभिमान वाटला आणि तो बेहद्द खूश झाला.
इथे मंदिरातील लगबग वाढली तसा उत्साही आणि उत्सवी मंडळींचा राबताही वाढला. चमचमणाऱ्या सोनेरी प्रकाशाने गाभारा उजळून निघाला. कनौजी अत्तराच्या थेंबाने वातावरण सुगंधित झाले होते. गोमूत्राच्या दोन-पाच थेंबाने इंच इंच जागा शुचिर्भूत होऊ लागली. तुळशीचे हार आणि कमलदलांनी वातावरणाला सात्त्विक रंग चढला. अधूनमधून ‘जय जय रामकृष्ण हरी’चा नामगजर मंडपाच्या कानाकोपऱ्यातून झाला आणि वातावरणात जान आली. पाहता पाहता सर्व काही बदलून गेले. ऊन ऊन पाण्याच्या घागरी त्याच्या मस्तकावर रिकाम्या होऊ लागल्या. अधून मधून दुधा-तुपाचे ओघळ आणि चंदनाचा लेप त्याच्या शरीरावर चढू लागला. न्हाऊ माखू घातलेल्या त्या साडेतीन हाताच्या देहावर पुन्हा पुन्हा उन्हाळ पाण्याची घागर रिती झाली आणि पत्थरातून घडविलेलं आपलं काळंशार कातीव शरीर पार मऊसूत होऊन गेलंय या जाणिवेनं तो सुखावला. सुखाच्या त्या अत्युच्च क्षणी देखील त्याच्या मनात तो मघाचाच विचार पुन्हा एकदा फेर धरून नाचू लागला. आता काहीही झालं तरी शेवटी आपण आपल्या ‘मनीची हाक’च ऐकायची हा त्याचा निर्धार पक्का झाला. पापणीवर थिजलेला दुधाचा कोवळा थेंब त्याने भरजरी शेल्याने टिपला. तुळशीच्या माळांमध्ये गुरफटलेला आपला हात त्याने सोडवला आणि आपल्यातील दैवी चैतन्य त्या काळ्याशार कातीव दगडाच्या कुडीत ठेवून तो तिथून निघाला. मागे-पुढे, वर-खाली कुठेही न पाहता त्याने थेट राऊळाची िभत पार केली आणि तो मंदिराच्या वेशीपाशी आला.
कित्येक युगे उलटली. बाहेरचं जग त्याने तसं पाहिलंच नव्हतं. आवेशाच्या भरात आपण बाहेर आलो खरे, पण जायचे कुठे आणि कसे? त्याला काहीच ठाऊक नव्हते. असं असलं तरीही बाहेरचा घनगर्द काळोख त्याला जुन्या जाणत्या मित्राप्रमाणे बिलगला. विस्तीर्ण आकाशात टपोऱ्या चांदण्या लखलखत असल्या तरी रात्र मंदावली होती. वाऱ्याचे चुकार झोत अधूनमधून इतस्तत: रेंगाळत होते. ना त्यांच्या येण्यात जान होती ना त्यांच्या जाण्यात शान होती. चंद्रभागेचं पाणीही संथ, निश्चल होऊन राहिलं होतं. एकूणच वातावरण काही फारसं उत्साही नव्हतं. असं असलं तरीही त्याला, तेवढय़ातच कुठून तरी अबीर-बुक्क्याचा मंद गंध दरवळल्याचे जाणवले. तो चिरपरिचित गंध त्यानं आपल्या छातीत अधाश्यासारखा भरून घेतला. त्याची पावलं काळ्या मातीतून निर्थकपणे भटकू लागली. मनात कसलेही विचार नव्हते आणि पावलांना कसलीही ओढ नव्हती. अंग अंग स्वच्छंद झाले होते. अशा त्या गंध-भारल्या वातावरणातून पुढे जात असताना त्याला आपला शेला कशात तरी गुरफटल्याचे जाणवले. तरटीच्या झाडाच्या फांदीला त्याच्या शेल्याचे टोक अडकले होते. तो मागे वळला. हलक्या हाताने तो शेल्याचे टोक सोडवू लागला. त्याचा स्पर्श त्या झाडाला अगदी अहेतुकपणे झाला तशी त्याला तरटीच्या पानांमध्ये सळसळ झाल्याचे जाणवले. त्याला आश्चर्य वाटले. त्याला ते झाड ओळखीचे वाटू लागले. विलक्षण मायेने त्याने फांद्या आणि पानांना आंजारले, गोंजारले.
क्षणभरासाठी त्यालाही असेच जाणवले की ते झाड त्याला स्पर्श करू पाहतंय, त्याचे हात आपल्या उराशी कवटाळतंय. त्याला त्या झाडाचा स्पर्श ओळखीचा वाटला. तेवढय़ात त्याच्या तळव्यावर अश्रूंचे दोन कढत थेंब पडले तसा तो लागलीच सावरला. त्या तरटीच्या झाडामध्ये त्याला कान्होपात्रेचे रूप दिसले. थिजलेल्या नेत्रांनी तो त्या झाडाकडे पाहातच राहिला. त्याच्या मनात कान्होपात्रेच्या आठवणी रुंजी घालू लागल्या.
कान्होपात्रा ही मंगळवेढय़ातील श्यामा नावाच्या वेश्येची लावण्यवती पोर. निसर्गानं दान म्हणून दिलेला नितळ आणि सुस्वरूप देह आणि लाभलेली सुमधुर स्वरांची उपजत देणगी; या दोन्ही गोष्टी कुण्या धनदांडग्याची शय्यासोबत करण्यासाठी नाही हे कान्होपात्रेने वयात येताक्षणीच ठरवलं होतं. व्रतस्थ राहून तिनं आपली भक्ती केली होती. असं असलं तरी कुळाची साथ तिला करावीच लागली. गणिकेचे सारे भोग तिच्या वाटेला आले. ते तिने निमूटपणे सोसले देखील. वासनेने बरबटलेल्या जगातील उघडय़ा बुभूक्षित नजरांनी तिचं अंग अंग टिपलं असलं तरी मनाचा प्रत्येक कण आणि कण तिनं फक्त आपल्या चरणी वाहिला होता हे त्याला आठवलं तेव्हा तिच्या आठवणींनी व्याकूळ होऊन त्याच्या डोळ्यांतून आसवांची रेघ ओघळली.
बिदरच्या राजाला कान्होपात्रेच्या बावनकशी लावण्यानं वेड लावलं होतं. तिच्या प्राप्तीसाठी त्याने आपले खासे दांडगे आणिखंदे शिपाई पाठविले. राजाचा हुकूम, मोडणार कोण? कान्होपात्रा त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार झाली; मात्र जाण्याआधी आपलं शेवटचं दर्शन घेण्यासाठी राऊळात आली. तिला पाहून आपल्यामध्ये वात्सल्याची भावना दाटून आली होती याची आठवण त्याला आली. आपल्या चरणांवर वाहिलेला तिचा राजस देह बिदरच्या राजाच्या हवाली करण्यापेक्षा आपल्या चरणांशी समर्पित करणे तिला जास्त सुखाचे वाटले. तिचा राजस, सुकुमार देह पाहिला तो शेवटचाच. आठवणींचा कढ पुन्हा एकदा त्याचा शेला भिजवून गेला. आपल्या डोळ्यादेखत झालेली त्या सुकुमार देहाची माती त्याने पाहिली होती.
त्याच्या मनात अपराधीपणाचे थारोळे साचले. ‘तिच्या माता-पित्यांची छबी तिनं माझ्या समचरणांमध्ये शोधली. परंतु ‘माय-बाप’ म्हणून ‘वात्सल्याचा’ पान्हा फुटण्याआधीच मी तिला अंतरलो. मला, माझ्यातील देवत्व सिद्ध करू देण्याआधीच तिने महानतेची पायरी गाठली. ज्या हाताने मी तिचा देह घडविला त्याच हातानं तिचं कलेवर उचलण्याचा प्रसंग तिनं माझ्यावर आणला. ‘कान्हे, मी तुझा अनंत जन्माचा अपराधी आहे. तू मला क्षमा कर. पिता आणि परमेश्वर म्हणूनही मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. विश्वासाच्या एका नाजूक धाग्यावर नात्याचं जे विश्व तू उभारलंस ते विश्वासाचं नातं दृढ करण्याच्या प्रयत्नात हे कटीवर ठेवलेले हात निर्थक ठरले. ज्या मातीत तुझा देह मिसळला, तिथेच तू तरटीच्या झाडाच्या रूपाने बहरून आलीस, फुलून आलीस. मी मात्र तुझ्या एकेका आठवणीने कोमेजत गेलो. आजही भोवतालच्या या जगात तुझ्यासारख्या अनेक कान्होपात्रा आपल्या नशिबाचे भोग भोगताहेत. स्वत: उघडय़ा डोळ्याने आपल्या नशिबाचे िधडवडे निघालेले पाहताहेत. गणिकांच्या वाटय़ाला येणारं ‘जिणं’ निमूटपणे जगताहेत आणि मी, त्यांचा बाप, त्यांचा रक्षणकर्ता इथे कटीवर हात ठेवून निश्चलपणे उभा आहे.’
प्रत्येक विचारासरशी त्याच्या मनात अपराधीपणा दाटून येत होता. त्याने तरटी झाडाला पित्याच्या मायेने कवटाळलं. त्याच्या स्पर्शाने क्षणभर ते झाड पुन्हा एकदा सळसळलं. मुलीला आपल्या पित्याबद्दल कसलाही आकस नव्हता, होतं ते निखळ प्रेम आणि असलाच तर तो देखील अभिमानच. अवचितपणे आलेल्या वाऱ्याच्या झुळकेने ते तरटीचं झाड हेलकावे घेत पुन्हा एकदा तटस्थ झालं, अगदी नम्रपणे. त्याने अलगद त्या झाडाला थोपटलं आणि आपल्या कुशीत घेतलं. त्याच्या सर्वागातून वात्सल्य पाझरत होतं. एवढय़ात दूरवर कुठंतरी कुणीतरी अलगूज छेडलं असावं. वाऱ्याची लकेर त्या सुरावटींना घेऊन त्याच्या कानात रुंजी घालून गेली तसा तो भानावर आला. बुंध्याशी अडकलेलं शेल्याचे टोक काढून घेत जड पावलाने पुढे सरला.
धाव घाली विठू आता चालू नको मंद
चोख्याचे शब्द त्याला आठवू लागले. मंदिराच्या त्या परिसरात त्याला धड चालता येईना की पुढे जाता येईना. राऊळासमोरच्या काळ्याशार मातीत टिपूर चांदण्याच्या स्वच्छ प्रकाशात त्याला ज्ञानू, तुक्या, एकू, सोयरा, गोरोबा, विठा, नामा, जनी अशा कितीतरीजणांच्या पाऊलखुणा दिसू लागल्या. विसोबा, कान्होबा, सोपान्या, निवृत्तीनाथ या सर्वाचीच सय दाटून आली आणि क्षणभरासाठी का होईना तो कातरला. आपल्याला उराउरी भेटायला येणारा तो संतमेळा आणि त्यांच्या त्या िदडय़ा, पताका, सगळं काही त्याला लख्खपणे स्मरत होतं. आठवणींची पिलावळ त्याच्या भोवती बागडू लागली. फार पूर्वी अशाच एका संतमेळ्यामध्ये आपण बेभान होऊन नाचलो होतो, तेव्हा आनंदाच्या भरात आपला कासोटा सुटला आणि पितांबर कमरेखाली घसरल्याची आठवण जनाबाईने करून दिल्याचे त्याला स्मरले तसा तो शरिमदा झाला, वरमला. संतश्रेष्ठ म्हणून गौरविल्या गेलेल्या आपल्या एका-एका पोराची आठवण त्याला झाली. त्यांच्या आठवणींचा आवेगात तो इतका नादावला की त्याने भीमातीरावरची ती पुण्यप्रद माती आपल्या कपाळाला फासली. ज्या मातीत त्याचा लाडका ज्ञानोबा नाचला होता, ज्या मातीला तुक्याने संपन्न केले होते, ज्या मातीवर निवृत्तीनाथाने कैवल्याचे िशपण केले ती माती त्याने आपल्या ललाटावर फासली. त्या मातीला एक वेगळाच अलौकिक असा सुगंध येत होता. अगदी कस्तुरीलाही मागे काढणारा एक अनामिक सुगंध.
हे नेमकं काय आहे तेच त्याला समजेना. हा रोजचाच चिरपरिचित सुवास. असं असलं तरीही आज तो इतका वेगळा का वाटतोय? त्याला राहवेना. तो वेडय़ागत माती चाचपत राहिला. दोन्ही हात मातीत खुपसून त्याने काला केला तेव्हा त्याला त्याचे उत्तर सापडले. त्या मातीला अलौकिक सुगंध देण्याचे कार्य दुसरे कुणी नाही तर तुळशीचे एक बीज करीत होते. अवचितपणे हाती आलेल्या तुळशीच्या मंजिऱ्या पाहून तो हरखला आणि खुद्कन हसला. त्याला एकाएकी रखुमाईची आठवण झाली.
तसं तुळशीचं आणि त्याचं सख्य रोजचंच होतं. दररोज गळ्यात पडणारा तुळशीचा हार त्याच्या नित्य परिचयाचा होता. मात्र इथे त्याला तीच तुळस वेगळी वाटली; कारण ती भूमितत्वाचं बीज लेवून आली होती. मृद्गंधामध्ये माखूनही तुळशीनं आपल्या गंधभऱ्या अस्तित्वानं त्याला नादावलं होतं, खुळावलं होतं, एका जुन्या संबंधांची तिने आठवण करून दिली होती.
पूर्वजन्मात एका गरीब ब्राह्मणाच्या घरी निपजलेली ही तुळस दारिद्रय़ पदराला बांधूनच जन्म घेती झाली. दरिद्री ब्राह्मणाची ही काळी पोर वयात आली तरी उजवली जाईना. रूपही नाही आणि पैसाही नाही. अशा या पोरीची जबाबदारी घेणार तरी कोण? शेवटी त्या असहाय्य बापाने त्या दुर्दैवी पोरीला एकदाचं त्यागलं. जगाच्या हवाली केलं. अशा अवस्थेत त्या हतभागी पोरीचा हात आपण धरला, ह्याचा रखुमाईला भारीच राग आला होता. आपली पाठ वळली की तुळशीला घालून पाडून बोलणे, तिचा छळ करणे, शिव्याशाप देणे; हे जणू तिचे आद्यकर्तव्यच बनले होते. आपण शक्य ते सर्व सहाय्य करून त्या वेडय़ा गबाळ्या पोरीचं संरक्षण करत होतो आणि इथं रखुमाई मात्र संधी मिळेल तसं तिचं खच्चीकरण करू लागली.
तुळशीला योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी तिच्याशी विवाह करणे हे आपलं धर्मकर्तव्य होते. तिला तिच्या हक्काचं माणूस मिळालं की आपोआपच तिच्या मागचं दुर्दैवाचं ओझं नाहीसं होणार होतं; या एकाच भावनेने आपण तिला स्वीकारलं होतं. मात्र मत्सराने होरपळून निघालेल्या रखमेनं ना मला समजून घेतलं, ना तुळशीला. एके दिवशी तिच्या सहनशक्तीचा अंत झाला. दुर्दैवी असली तरीही मानी असलेल्या त्या मुलीने आपल्या सर्वस्वाची होळी करण्याचे ठरविले. माझ्या डोळ्यादेखत तिने भूमातेला आपलेसे केले. मी जमिनीत खोलवर हात खुपसून तिला बाहेर ओढून काढले, परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही. तिचे केस माझ्या हाताशी लागले. त्याच्या मंजिऱ्या झाल्या आणि तिच्या सावळ्या देहाचे झाड बनले. शेवटी त्या तुळशीच्या झाडाशी माझे लग्न लागले आणि माझा शब्द खरा करून दाखविला. मी माझ्या शब्दाला जागलो, पण तिच्या मनाचं काय. तिच्या जित्याजागत्या देहाला मी नैतिकतेचं नातं देऊ शकलो नाही की तिच्या स्वप्नभरल्या डोळ्यांमध्ये प्राण ओतू शकलो नाही. तिनं माझ्यावर निस्सीम प्रेम केलं असलं तरी तिच्या प्रेमाची उतराई करण्यात मीच कुठंतरी कमी पडलो. तिला मी माझ्या छातीवर विराजमान केले असले तरी आपल्या हृदयात स्थान मिळवून देण्यात मी पूर्णपणे अपयशी ठरलो. मोठय़ा गौरवाने आणि अभिमानाने अनाथांचा नाथ अशी बिरुदावली मिरवीत असलो तरी शेवटी मी अनाथच राहिलो. मी ना राधेचा होऊ शकलो, ना तुळशीचा होऊ शकलो आणि पदुबाईचाही होऊ शकलो नाही. मी पूर्णपणे जिला अंकित होतो, जिच्या हृदयीचा स्वामी होतो त्या रखुमाईच्या हृदयात स्थान मिळवण्यासही मी असमर्थ ठरलो. असं असलं तरी सर्वजण मला परमेश्वराच्या रूपात पाहतात तेव्हा खरं तर स्वत:चीच कीव करावीशी वाटते.
शरमेनं त्याच्या सावळ्या चेहऱ्यावर काजळी चढली. तुळशी मंजिऱ्यांचा सुवासिक गंधदेखील त्याला अस्वस्थ करू लागला. स्वत:विषयीच्या शंकेने त्याचं मन त्याला पोखरू लागले. टिपूर चांदण्यात लांबवर दिसणारा राऊळाचा स्वच्छ परिसरदेखील त्याला काटय़ाकुटय़ांनी भरल्यागत दिसू लागला. अशा कितीतरी ‘तुळशी’ भूमातेच्या उदरामध्ये गडप होऊन जात असतील, स्वत:चं अस्तित्व गमावून बसत असतील; याचा सल त्याला टोचू लागला. असे अनेक चेहरे त्याच्या नजरेसमोरून सरकत गेले. जाती व वर्ण व्यवस्थेमुळे जिला जन्मात कधी आपलं दर्शन घेता आलं नाही त्या भागू महारणीचे डोळे आपल्याकडे रोखून पाहत असल्याचे त्याला जाणवले. इतकंच नाही तर ‘भक्त’ म्हणून आपला दर्शनाचा हक्क हिरावून घेतल्याचा जाब ते त्याला विचारत आहेत असा भास त्याला झाला. निर्मळा, सोयराबाई, मुक्ताई हातात बंडाचे निशाण फडकवत आपल्या दिशेने येताना त्याला दिसल्या. तो कावरा बावरा झाला. भयचकित झाला. पावलं नेतील तसा त्यांच्यामागून तो चालू लागला. ऊर फुटेपर्यंत धावू लागला. राऊळाचा परिसर होता दीड-दोन योजन अंतराचा; परंतु त्या वेळी मात्र त्याला तो युगायुगांपेक्षाही प्रदीर्घ वाटला. डोक्यात विचारांची गर्दी साठली होती, मनात वैफल्याची भावना साचू लागली होती. असहायतेची टोचणी त्याला जाळू लागली. अठ्ठावीस युगे तो निव्वळ उभा आणि उभाच राहिला होता. चालण्याचा नी धावण्याचा प्रसंग त्याच्यावर कधी आलाच नव्हता. त्यामुळे पायात पाय अडखळू लागले. माया की ममता? मोह की लोभ? वासना की विकार? देवत्व की मनुष्यत्व? आपणच निर्माण केलेल्या जाळ्यात तो गुंतत गेला. आपल्या देहाचा, रूपाचा त्याला विसर पडला. कोहम्, सोहम्च्या ध्वनी-प्रतिध्वनींनी तो भयचकित झाला आणि ग्लानी येऊन उभ्या उभ्या खाली कोसळला.
अंगावरून मायेनं फिरणाऱ्या उबदार हातांच्या स्पर्शाने त्याची मती गुंग झाली. विचारांचा गदारोळ शांत झाला असला तरी मनाचा हलकल्लोळ आवरण्यासाठी थोडा वेळ जाणे आवश्यक होते. आपण कोण आहोत, कुठे आहोत, काय करीत आहोत, या विषयीचे भान पूर्णपणे हरपले होते. आपल्या मनाची अवस्था, घालमेल आपण कुणासमोर तरी मोकळी करीत आहोत, आपल्या प्रत्येक कृतीचा लेखाजोखा कुणासमोर तरी मांडत आहोत. आपल्या मनीचे हितगुज कुणा जिवलगासमोर उलगडत आहोत याचे भानही हरपले होते.
त्याच्या कुरळ्या केसांच्या लडिवाळ बटांमधून ती प्रेमळ रखरखीत बोटे मायेनं, ममतेनं फिरू लागली. पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभं राहून मौन राग आळवणाऱ्या त्या साडेतीन हात लांबीच्या देहास आज गुजगोष्टी सांगाव्यात असं हक्काचं माणूस भेटलं होतं. अशा या रम्य वातावरणात त्याचे डोळे मिटले नसतील तर नवलच.
एके रात्रीचे समयी। देव आले लवलाही।।
सुख शेजे पहुडले। जनी सवे गुज बोले।।
गुज बोलता बोलता। निद्रा आली अवचिता।।
उठा उठा चक्रपाणी। उजाडले म्हणे जनी।।
त्याच्या कानावर मंजूळ स्वरात हे शब्द येऊ लागले. त्यासरशी, ममतेची आर्जवे करणारा, दुलईत लपेटलेल्या आपल्या देहावरून वात्सल्याने फिरणारा हा हात जनाबाईशिवाय दुसऱ्या कुणाचा असूच शकत नाही हे त्याला तात्काळ उमगले आणि तो उठून बसला. तिच्या प्रेमाखातर हलक्यासलक्या कामातही तिला मदत करणारा तिचा सखा आज तिच्यासमोरच बसला होता. स्वत:स नामयाची जनी असं म्हणवून घेणारी, आपल्यावर जिवापाड प्रेम करणारी, जिच्यावरील मायेपोटी आपण तिचे प्रेमपिसे झालो होतो, ती जनाबाई आपल्या समोर बसली आहे हे पाहून तो हरखून गेला. वैखरीचे काम संपले होते; त्यामुळे एकमेकांना समोरासमोर पाहून त्याने आपल्या अश्रूंचा बांध मोकळा केला. हृदयाला न पेलणारे ते प्रेमाचे भरते अश्रू होऊन पापण्या भिजवून गेले. अंत:करणाच्या तारा इतक्या घट्टपणे जुळल्या की शब्दाचं महत्त्व गौण ठरलं.
तिनं एकदा त्याची,
अरे विठय़ा अरे विठय़ा।
मूळ मायेच्या कारटय़ा..
तुझे गेले मढे।
तुला पाहून काळ रडे।।
अशी शेलक्या शब्दात संभावना केली होती त्याचं त्याला स्मरण झाले. त्याने लटक्या रागाने तिचा कान धरला. तसा त्याला अधिकारच होता. तो तिच्यासाठी आई होता, बाप होता, बहीण होता, भाऊही होता, तो तिच्यासाठी चालकही होता, पालकही होता, बालकही होता आणि मालकही होता. तो तिचं सर्वस्व होता. लटक्या रागाने त्याने ज्या हाताने तिचे कान खेचले त्याच हाताला तिने हृदयाशी घट्ट धरले. तेव्हा त्याला जनीचीच काय, तर त्याच्या सर्वच पोरासोरांची प्रकर्षांने आठवण झाली. तो सर्व देवांमध्ये एकमेव असा भाग्यशाली देवत्व लाभलेला होता की त्याच्या प्राप्तीची आस कुणीही बाळगली नाही. उलट सर्वानी त्याच्यावर प्रीती केली. प्रेम केले. संसारसुखाला पारख्या झालेल्या या आपल्या बापाकडे सर्वानी याचना केली ती केवळ निखळ प्रेमाची. त्यांनी भरभरून मागितलं आणि यानेही आपलं सगळं वैभव हातचं काही न राखता त्यांच्यावर लुटवलं.
पहाटेच्या पहिल्या प्रहराला अद्यापि वेळ असला तरी प्रकाशाचे दूत क्षितीजाच्या सीमेवर आपलं तेज, सामथ्र्य घेऊन जमा होऊ लागले होते. जनीचा निरोप घेऊन तो निघाला. नामदेवाच्या पायरीवर दोन क्षण थांबून, गोरोबांच्या समाधीकडे डोळे भरून पाहात तो मंदिरात शिरला. खांबांचे आणि कोनाडय़ांचे अडसर पार करून तो रखुमाईच्या मंदिरात गेला आणि तिच्या समोर उभा ठाकला.
अवचितपणे त्याला समोर आलेलं पाहून रखुमाईला देखील आश्चर्य वाटले. दगडी िभतींचा अडसर दूर करून, अठ्ठावीस युगांचं अंतर लांघून पतीराज आपल्या घुमटीत आले आहेत हे स्वप्न समजावं की सत्य याचा गोंधळ तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आला. त्याच्या येण्यावर तिची प्रतिक्रिया हीच असणार हे त्यालादेखील माहीत होतं. अनेक वर्षांचा हा अबोला होता. वर्षांनुवर्षे न सुटणारा हा तिढा होता. आपल्यासोबत रखुमाईसुद्धा अठ्ठावीस युगे तिष्ठत उभी राहिली होती हे तोदेखील जाणून होता. कित्येक वर्षे लोटल्यानंतर आज तो तिला प्रथमच सदेहावस्थेत पाहात होता.
आज काही झालं तरी वर्षांनुवर्षे चाललेला हा अबोला संपवायचाच. नामुष्की झाली तरी चालेल पण पुढाकार आपणच घ्यायचा असं त्यानं ठामपणे ठरविलं होतं. रखुमाईवर नकळत का होईना आपल्या हातून अन्याय झाला होता, हे तो पूर्णपणे जाणून होता. युगानुयुगे एकाच छताखाली तरीही एकमेकांना न भेटता असं किती काळ राहायचं. तो बेचैन झाला. त्याच्यातल्या देवत्वाला तो आज खऱ्या अर्थाने जागणार होता. झालं गेलं ते चंद्रभागेला मिळालं. त्यानं हात पुढे केला. रखुमाईला हे सर्व काही नवीन होतं, हे काय चाललंय तेच तिला कळेना. तिचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यानं पुढं केलेला हात तिनं स्वीकारला. गैरसमजाचे काळे ढग क्षणार्धात पांगले. एका अनामिक अशा ओढीने तो तिच्याजवळ आला आणि त्याने, विलक्षण आवेगाने तिला जवळ घेतले. त्या प्रेमळ, उबदार स्पर्शामध्ये अबोला, रुसव्या-फुगव्यांचे निर्थक क्षण पार विरघळून गेले. संशयाचे धुके आता विरून गेले होते. अठ्ठावीस युगांची पुण्याई अखेर फळाला आली. गैरसमजातून रुंदावलेली दरी त्यानं स्वत: पुढे होऊन मिटवून टाकली. इतरांना विनासायास घडणारं त्यांचं मुखदर्शन त्यांना प्रत्यक्षात रोमांचित करून गेलं.
युगामागून युगं गेली, लाखो वर्षे काळाच्या पडद्याआड लुप्त झाली, थोरा-मोठय़ांची योग्यता कामी आली, विश्वाच्या जडणघडणीमध्ये अनेक बदल घडून आले. असं काही घडलं असलं तरीही आकर्षून घेणारं त्याचं ते मनमोहक निळं-सावळं रूप तेव्हाही तसंच होतं आणि आजही तेच आहे. हे स्वप्न आहे की भास याची खात्री करून घ्यावी असं तिचं स्त्रीसुलभ मन तिला वारंवार समजावून सांगत होतं. मात्र जे घडतंय ते सत्य आणि केवळ सत्य आहे याची खूणगाठ तिला एव्हाना पटली होती. तेच रूप, तोच गंध, तेच लाघवी हास्य आणि त्या विशाल डोळ्यात पसरलेलं ते अथांग कारुण्य. तरीही खातरजमा करण्यासाठी तिनं त्याच्या विशाल छातीवर आपलं मस्तक ठेवलं. तेव्हा तिला चिरपरिचित, मन कातर करणारा बासरीचा स्वर ऐकू आला. बासरीच्या त्या मुग्ध ताना त्याच्या सर्वागांतून झिरपू लागल्या आणि जिवाचा कान करून ती त्याच्यात गुंतून गेली. त्यानं तिच्या हनुवटीस धरलं त्यासरशी ती त्या निळ्या जादुभऱ्या आसमंतातून वास्तवात आली. स्वप्नाच्या दुनियेतून परत वास्तवात आणणारा तिचा निळासावळा नाथ तिच्या निकट उभा होतो. ती हरखली, मोहरली आणि आनंदून गेली.
भारावलेल्या अवस्थेतून भानावर आल्यावर तिला सर्वप्रथम जर काही दिसलं असेल तर त्याच्या विशाल छातीवरील दाट केसांमध्ये अडकलेल्या तुळशी मंजिऱ्या. क्षणभरासाठी ती स्तब्ध झाली. इथे हाही भांबावला. स्त्रीसुलभ चौकस नजरेनं तिनं त्याचं सर्वाग न्याहाळलं. त्याच्या मनगटात अडकलेला जनीचा लांबसडक केस, नखांवर चिकटलेला तरटीच्या फांदीचा चिक पाहून तिनं शांतपणे मान खाली घातली आणि ती त्याच्यापासून विलग झाली.
तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो विमनस्कपणे बसला. त्याचे डोळे पाण्याने भरून आले. आपण पुढाकार घेऊन तिचं मन वळविण्यास आलो होतो. मात्र संशयपिशाच्च आपला माग काही सोडणार नाही याची खात्री त्याला एव्हाना पटलेली होती.सुखाचा प्रत्येक क्षण हिरावून घेणारे दुर्दैवी क्षण आपल्याच नशिबी यावेत याचं त्याला दु:ख झाले. आपण रखुमाईला तिच्या हक्काचे असे सुखाचे चार क्षण देऊ शकलो नाही याची खंत त्याला छळू लागली.
देवत्वाशी संग घडल्यामुळे रखुमाईमध्येही थोडेफार दैवी गुण आपसूकच उमटले होते. त्याच्या भाबडय़ा, सत्शील मनात काय चालले आहे हे तिने आपल्या अंत:चक्षूने जाणले. ती त्याच्या समोर येऊन बसली. त्याच्या हनुवटीला धरून तिने त्याचे लक्ष आपल्याकडे वळविले. तिच्या डोळ्याला डोळे भिडवण्याचे धैर्य त्याच्यापाशी नव्हते. तो तिची नजर चुकवू लागला. शेवटी तिनेच पुढाकार घेतला आणि आपल्या ओंजळीत त्याचा चेहरा धरला. तो धीर एकवटून तिच्याकडे पाहू लागला. तिच्या डोळ्यात क्रोध वा अंगार दिसावा अशी त्याची अपेक्षा होती मात्र जे घडले ते निराळेच होते.
रखुमाई त्याच्याकडे मिस्कीलपणे एकटक पाहात होती. सर्व विश्वाचा कैवारी असल्याच्या थाटात वावरणारा हा भक्तप्रतिपालक आपल्याकडे असा वेंधळ्यागत पाहत असल्याचे दृश्य पाहून तिला हसू फुटले. कुणाचा सखा तर कुणाचा भ्राता, कुणाचा गुरू तर कुणाचा स्वामी, कुणाची माऊली तर कुणाचा नाथ, असणारा हा जगन्नाथ आपल्यासमोर अनाथासारखा बसलेला पाहून तिने हसून गडाबडा लोळण्याचेच काय ते बाकी ठेवले होते. तिचे ते रूप पाहून तोही भांबावला. त्याला काहीच कळेनासे झाले. सबाह्य अभ्यंतरी दगडी मूर्तीप्रमाणेच आपल्या बुद्धीलाही जडत्व आले की काय अशी शंका त्याला भेडसावत होती आणि इथे रखुमाईची हसून हसून पुरेवाट झाली होती.
तिनं त्याला कधीच माफ केलं होतं. आपण त्याच्यातील देवत्व विसरून त्यामध्ये फक्त स्वत:चंच अस्तित्व शोधत राहिलो ही आपली अक्षम्य चूक होती; हे तिनं त्याच्यापाशी आपणहून कबूल केलं होतं. आपला ‘नाथ’ हा निव्वळ हाडामासाच्या देहापासून बनलेला नाही तर ते एक परब्रह्मतत्व आहे हे आपण विसरून गेलो याची प्रांजळ कबुलीही तिने त्याच्यापाशी दिली. विठ्ठल हा कुणा एकाचा नाही तर तो सर्वव्यापी, सर्वाभूती, सर्वाचाच आहे हेही तिच्या लक्षात आलं होतं. प्रत्येक प्राणिमात्र त्याच्याकडे सहजभावाने बघतो. कुणी त्याच्याकडे पिता म्हणून, कुणी माता म्हणून, कुणी सखा म्हणून, कुणी भ्राता म्हणून तर कुणी त्राता म्हणून त्याला संबोधतो. निर्मळ अंत:करणाने ज्या कुणी त्याला ज्या नजरेने पाहिले त्याला तो त्याच स्वरूपात दिसला हे एव्हाना तिला उमगून चुकलं होतं. विठ्ठल हे निव्वळ ‘शरीर’ नसून ते अशारीर तत्त्व आहे. तो देहातीत आहे. देहभावनेच्या पलीकडचा आहे आणि हे तत्त्व ज्याला कळले त्यालाच तो गवसला हे ही तिला जाणवलं होतं.
विठ्ठल हे एक असे सुख आहे की ज्यास चिमटीत पकडू पाहता ते हाती येत नाही आणि त्याची अभिलाषा न बाळगल्यास ते आपल्या समोर येऊन उभे ठाकते. विठ्ठल हे ‘शाश्वत सुख’ आहे; आपण मात्र वेडाच्या भरात ‘अशाश्वत सुखा’च्या मागे धावत राहिलो. क्षणभंगुर प्रीतीच्या मृगजळाचा शोध घेत राहिलो आणि इतरांच्या शाश्वत सुखाच्या मार्गात काटे पेरत राहिलो हे चुकीचे होते. त्यांना विठ्ठलाच्या कृपामृतापासून वंचित ठेवू पाहिले आणि त्यामुळेच आपले नुकसान झाले. ज्याचा त्याचा विठोबा ज्याला त्याला गवसला आणि आपल्या नशिबी मात्र राऊळाच्या दगडी िभतीच आल्या हे सत्य तिला चांगलेच उमजले होते.
त्याचा हात तिनं आपल्या हाती विश्वासाने धरला. गेल्या अठ्ठावीस युगांची असोशी तिला भरून काढावयाची होती आणि त्यासाठी तिच्यापुढे केवळ एकच पर्याय होता तो म्हणजे त्याची प्रेयसी, पत्नी आणि अर्धागिनी अशाच भूमिकेत अडकून न राहता त्याला समजून घेण्याची, त्याच्या बरोबरीने पुढे जाण्याची आणि प्रसंगी त्याच्यात एकरूप होण्याची. एक नवी आणि सर्वस्वी वेगळी भूमिका वठविण्याची जबाबदारी तिनं आपल्या खांद्यावर घेतली. आता तो पूर्वीचा ‘निळासावळा नाथ’ राहिला नसून ‘लोकनाथ’ झाला आहे, ‘जनसामान्यांचा नाथ’ झाला आहे. ‘दिनानाथ’ झाला आहे हे तिने मान्य केले होतं. त्याच्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजे वाऱ्याच्या वेगाला मुठीत पकडून ठेवण्याजोगे होते, पावसाचे पाणी ओंजळीत साठवण्याजोगे होते. आकाशाला गवसणी घालण्याजोगे होते, अग्नीला बांधून ठेवण्याजोगे होते आणि प्रखर तेजाला नजरेत साठवून ठेवण्याजोगे होते. विठ्ठल खऱ्या अर्थाने पंचतत्त्वापासून निर्मिलेला आणि त्यांच्यातच सामावलेला आहे. तो समोर उभा ठाकतो तेव्हाच त्याच्या अस्तित्वाची दखल घेतली पाहिजे कारण तो समोर नसला की आपल्या अस्तित्वाला देखील अर्थ उरत नाही.
एका अवचित क्षणी तिनं आपलं मन त्याच्यापाशी मोकळं केलं आणि अठ्ठावीस युगांचा दुरावा क्षणभरातच विरून गेला. अपेक्षांचं ओझं उतरलं तसं मन देखील हलकं झालं. शरीराने ती दोघं वेगळी असली तरी मनाने एकरूप झाली. त्याच्या एका हाकेला तिनं प्रतिसाद दिला आणि ती त्याच्यामध्येच एकरूप झाली. त्या दोघांनाही परस्परांची ओळख अगदी नव्याने पटली होती. स्नेहबंध जुळले तसे मैत्रही जुळून आले.
तेवढय़ात तिथे एक प्रकाशदूत अभावितपणे शिरला. गैरसमजाचा अंधार चिरत त्याने तिथे एक स्वच्छ-सतेज प्रकाशरेघ उमटवली. पाहता पाहता काळोख दूर झाला आणि नजरेला सर्व काही स्वच्छ स्वच्छ दिसू लागले. तो खुळ्यागत तिच्याकडे पाहतच उभा होता. त्या हुशार स्त्रीने प्रसंगावधान राखून त्याला जागं केलं. त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. लक्ष लक्ष योजने दूर अंतरावरून त्याचे लाखो भक्त त्याच्यासाठी बाहेर ताटकळत उभे आहेत याची जाणीव करून दिली तसा तो भानावर आला, गडबडला, भांबावला. काय करावे हेच त्याला सुचलं नाही. ती हलकेच त्याच्या कानात कुजबुजली. त्यासरशी तो गोंधळलेल्या अवस्थेत अंतर्धान पावला. जाताना तिचा निरोप घेण्याचं सौजन्यसुद्धा त्यानं दाखवलं नाही. एरव्ही ती रागावली असती, करवादली असती पण आता तसं घडलं नाही कारण..
तो जसा आहे तसा आणि त्या रूपात तिनं त्याला आपलंसं केलं होतं.
रखुमाईच्या मंदिरातून तो निघाला तो थेट मंदिराच्या कळसावर जाऊन बसला. क्षितीजाच्या धूसर कडांवर पिवळा, तांबूस ठिपका उगवल्याची जाणीव होताच तो अंतर्बाह्य थरारून गेला होता. ज्याची आपण आतुरतेने वाट पहात होतो तो आनंदाचा दिवस अखेर उजाडला होता. गेले वर्षभर आपण ज्यांची वाट पाहत होतो ती आपली पोरं-टोरं उराशी कवटाळून घेण्यासाठी तो आता अधीर झाला होता, आतुर झाला होता आणि.. बेभान झाला होता.
सूर्यकिरणांनी आपलं काम केलं होतं. अवघ्या पळभरात त्यांनी सर्व आसमंत आपल्या तेजाने झळाळून टाकला. डोळे उघडून त्यानं समोर पाहिलं तर उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून त्याची भाबडी पोरं त्याला भेटायला आलेली त्याला दिसली. त्याच्याच नामाचा गजर करीत होती ती. करोडोंना सामावून घेणारं त्याचं काळीज लकाकलं. पापण्या ओलावल्या, कंठ दाटून आला, घशात आवंढा आला. एवढय़ातच कुठून तरी जयघोष ऐकू आला ‘पुंडलिक वरदाऽऽऽ’ भान हरपून तो चटदिशी म्हणाला, ‘हरीऽऽऽ विठ्ठल’. शरमून त्यानं स्वत:चीच जीभ चावली.
त्याचा तो बालिशपणा पाहून रखुमाईनं कपाळाला हात लावला. तिला पुन्हा पुन्हा एकच प्रश्न छळू लागला..
‘ह्या वेडय़ाचं करायचं तरी काय?’
_________________________________________________________________________________

(Ref. Lokprabha Article by विवेक दिगंबर वैद्य)
Comments
Post a Comment