उपमा-डॉ. अंकुर रविकांत देशपांडे

उपम्यावरील एक खुसखुशीत आणि अभ्यासपूर्ण लेख
__________________________________________________________ 

पोहे आणि उपमा हे महाराष्ट्रात घरोघरी हमखास केले जाणारे आणि सहसा सगळ्यांना आवडणारे पदार्थ. त्यातल्या उपम्याचा महिमा-
उपमा हा खरेतर सर्वकालीन महान खाद्य पदार्थ. पश्चिम महाराष्ट्राचे राष्ट्रीय खाद्य असलेल्या 'कांदेपोह्य़ां'नंतर सबंध महाराष्ट्राने ज्या खाद्यपदार्थावर मनापासून प्रेम केले असा हा पदार्थ. सध्या 'चेंज' म्हणून लाल ड्रॅगनसह अ‍ॅल्युमिनियमचे स्वच्छ घासलेले, पण झाकण लावायच्या खोबणीत कोणाची दृष्ट लागू नये इतपतच काळ्या रंगाची रेघ असलेले मोठ्ठे कुकर रस्तोरस्ती दिसून येतात. हरकत नाही.. लपंडाव खेळताना एखादा पोट्टा त्यात जाऊन लपला तर दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत सापडणार नाही याची खात्री.. महाराष्ट्रीय माणूस दिवसभर दाक्षिणात्य इडली- वडे-डोसे (पचायला हलके असते. यू नो अँड इट हॅज लेस कॅलरीज कम्पेअर्ड टू आऊटडेटेड शिरा अँड सांजा.. समोर असतो 'चीज डोसा'. असो) खातो. उत्तर भारतीयाने सामोसा असे न म्हणता 'समोसा' म्हणून समोर आणून ठेवलेला त्रिकोण. ज्या त्रिकोणातला नक्की कोणता कोन 'सामोसा'पेक्षा निराळा आहे म्हणून आमच्या दोन नंबर शाळेच्या बाहेर गेली २० वर्षे त्याच गाडय़ा अन् प्लेट-कपडय़ासह सामोसे विकणारा राजू घाटमोडे गेली काही वर्षे 'साहेब समोसे' म्हणून प्लेट सारतोय हे कळेनासे होते. असो. काल रात्री दहा वाजता २५ रुपयांनी किलो घेतलेला बटाटा आज सकाळी सहा वाजता ३० रुपये किलो कसा होतो या प्रश्नासारखा 'संशोधनाचा' विषय आहे हा. बाकी हैदराबादी, बंगाली, मोगली, राजस्थानी, आगरी, पंजाबी हे मूलनिवासी तर फ्रेंच, मेक्सिकन, नायजेरियन, स्पॅनिश, इटालिअन वगैरे बाहेरून आलेल्या पण घराघरात आढळणाऱ्या 'कायम चूर्ण'सारखा जीवनशैलीच्या भागच झालेल्या पदार्थानी धुडगूस घातला आहे. पण मराठी माणसाला सकाळी उठल्यावर काही गोष्टी लागतातच. म्हणजे परस आणि परसापर्यंत घमघमाट सुटलेला फोडणीचा तडका.
..मराठी माणसाची मराठी म्हणून जगायला सुरुवात झाल्यापासून त्याला सकाळी पांढरा किंवा पिवळा या दोन रंगांचे दर्शन घ्यायची सवय त्याच्या गुणासूत्रातून आजच्या पिढीत संक्रमित झालेली असावी.. पूर्वी सोनेरी नामक रंग चहाच्या प्याल्यात दिसायचा पण आमच्या समस्त गायी-म्हशींच्या आचळातून दूधच ४४ रुपये लिटर या हिशेबाने स्रवू लागल्याने आताशी चहापण पांढुरकाच दिसतो. त्यामुळे विविध रंगांतील आणि देशांतील पदार्थ उपलब्ध असले तरी मराठी माणसाच्या दिवसाची सुरुवात आजही पांढऱ्या रंगाचा शिरा, खीर, दूध-पोहे, दही-पोहे इत्यादी, तर पिवळसर रंगाशी हातमिळवणी करणाऱ्या शिरा, सांजा, उप्पीट, उपमा इत्यादी पदार्थापासून होते.. आधुनिकीकरणाच्या लाटेत मराठी माणसाने पकडून ठेवलेला हा जिभेचा थांबा आहे.. कोणताही मराठी माणूस या थांब्यावर आपुलकीने थांबतो.. आपल्या आईने पाच मिनिटांत करून खाऊ घातलेला नाष्टा, सुरुवातीच्या दिवसातील स्वप्नांना कांदा-पोह्यने पुरवलेले इंधन, टपरीच्या कोनाडय़ात पांढरे खडू फुंकताना चहासोबत संपवलेल्या अनेक प्लेटी आणि गप्पांचा धबधबा, दाखवायचे कार्यक्रम जेव्हा 'घरी' व्हायचे तेव्हा 'हिच्या' हातची पहिल्यांदा चाखलेली चव.. पोरीने कौतुकाने करून घातलेले दूध-पोहे अन्.. शेवटी एकही घास न खाता दृष्टीपल्याड गेलेले कोणी सगेसोयरे.. प्रत्येक भावनांची इथे उजळणी होते.. कुस्करलेल्या बेजान लिंबातून इतके पाणी कसे काय पडले? याचे उत्तरही नकळत मिळते.. आणि पाय वळतात.. पंचतारांकित मल्टी कुझीन हॉटेलात.. जेवण करायला!!
काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत एक सरळ रेघ मारली तर तीन 'अ' दिसून येतात. हे तीन अ त्या त्या प्रदेशांच्या मानसिक मक्तेदारीचे वर्णन करतात. उत्तर भारताचा अहंकार, मध्य भारताचा अभिमान, दक्षिण भारताची अस्मिता. या तीन 'अ'ची एकमेकात सरमिसळ होऊनही त्यांचे 'अस्तित्व अजूनही टिकून आहे. महाराष्ट्रात जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाला कोणत्या न कोणत्या गोष्टीचा अभिमान असणे अत्यावश्यक आहे. ज्यांची मनगटे मजबूत असतात ते जन्मजात शिवरायांचे मावळे बनून येतात. अलौकिक कार्य करून नावारूपाला येतात. ज्यांची मनगटे बऱ्यापैकी मजबूत असतात, पण शस्त्रापेक्षा शब्दांशी सलगी अधिक करणारे आमच्यासारखे योद्धे स्वत:स स्वत:च्याच कार्याचे 'शाहीर' म्हणवून घेत जगतात. आधी आपल्या कुटुंबाच्या स्मरणपत्रिकेमधून आणि नंतर आठवणीतून लुप्त होऊन पुन्हा कारकुनाचा जन्म घेण्यास सज्ज होतात. पण सैनिक आणि कारकून होण्यासाठी अभिमानाची आवश्यकता असतेच. 'वहिनी. चहा एकदम फक्कड झालाय हो' या प्रतिक्रियेस 'अहो होणारच.. नातवाने फ्रान्समधून पाठवलाय हो! हल्ली तिकडेच असतो तो.. कंपनीने पाठवलाय.. गोऱ्यांवर लक्ष ठेवायला. तुम्हाला सांगतो, काळे पाणी फक्त दोघांनी सोसले हो. एक ते तात्याराव सावरकर अन् दुसरा मी.'' मित्र बावचळून ''माधवराव.. तुम्ही अंदमानास होता?'' ''गेलो असतो हो.. तेथेही गेलो असतो, पण त्या सी. शिवरामकृष्णनने रजा कोठे दिली. स्वातंत्र्य काय हो ते मिळवतील, पण बँकेतली नोकरी कोण टिकवणार? आमचे तीर्थरूप? त्याच 'संकुचित' विचारांची शिक्षा म्हणून गेली ७०वर्षे चहाच्या कपातून 'काळे पाणी' पितोय.. आज चहा पिल्यासारखे वाटले. अभिमान वाटतो नातवाचा. काय?'' माधवरावांना गेली ३०वर्षे आठवडय़ातून तीन वेळा चहा पाजणारा दोस्त अशा प्रसंगी काय बोलणार? आपल्या घरातील चहा साक्षात काळे पाणी असतो ते ऐकून काळाठिक्कर पडलेला तो आपण चहा पीत नसून कोमट एरंडेल फुंकून पीत आहोत असे भाव जमा करत पुटपुटतो, ''होय.. अभिमान वाटतो. नाही तर आम्हाला कोठून मिळणार फ्रेंच चहा? आम्ही आपले काळे पाणीच पिणार आणि पाजणार..'' हे ऐकून माधवराव, सवाई माधवराव जसे गुलाबाचे फूल हुंगतात तसा चहाचा कप नाकाखाली घालून सैल झालेल्या गळ्यातून ''वाऽऽ'' म्हणतात.. त्या खोलीत चहाच्या वासासह 'अभिमानाचे' पोवाडे अनेक काळ दरवळत राहतात. तर अभिमानही बाळगण्यासोबत मिरवण्याची सुद्धा गोष्ट आहे.
ज्या गृहिणीला 'उपमा' हा पदार्थ जमतो अशा घराशी संबंधित प्रत्येक बाबा, काका, मामा, आजोबा, बंडय़ा, पिंटय़ा, छोटी, पिंकी यांनी जरूर अभिमान बाळगावा आणि मिरवावा. त्यांनी तो मिरवलाच पाहिजे. उपमा करताना मन पोह्यप्रमाणे मोकळे असायला हवे. साबुदाण्याच्या खिचडीप्रमाणे गच्च आणि गिच्च असेल तर घोटाळा होतो. करता हात हा एकाचवेळी उकडीचे मोदक करणाऱ्या हाताइतका नाजूक तर उखळात शेंगदाणे कुटणाऱ्या हातासम कठोर असला पाहिजे. उपम्यासाठी रवा आणि लाडवासाठी बेसन भाजणे यासम 'रिस्की' कोणते काम असेल असे मला वाटत नाही. रवा हा जरी 'तो' असला तरी गुण मात्र 'तिचे' राखतो. एखाद्या गोष्टीस नकार दिला तर यमीपेक्षा सहापट अधिक गोरी असलेल्या रमणीपासून ते 'आप फेअर होंगे. आप कतार में है. कृपया क्रीम लगाते रहिये' यापर्यंतच्या कोणत्याही स्त्रीच्या नाकाचा शेंडा जसा लालबुंद होतो आणि आपल्या रात्रीच्या जेवणाची सोय करपते तसे या रव्याचे आहे. 'घेऊ या हं बबडय़ा / बेबी/ राणी/ स्वीटी' म्हणत त्यास गोंजारत आणि घोळवत ठेवावे लागते. हा.. पण अधिक मस्का (तेल) मारायचा प्रयत्न करू नये. केल्यास 'वाटीभर साखरेचा पाक घातला तर लाडू काय मस्त होतील नाही? रवा आणि खोबरे आहेच.. काय?' अशी प्रतिक्रिया हमखास मिळू शकते. त्यामुळे प्रेमात पडलेले हजार रुपयांच्या पॉकेटमनीवर पाच हजारांची चैन जशी 'मॅनेज' करतात तसेच 'किमान' तुपात 'कमाल' रवा खमंग भाजता येणे ही 'अभिमान' बाळगण्यासारखीच गोष्ट आहे.
लालसर/काळपट रव्याचा उपमा खाणे सोयीसाठी कामचलाऊ असले तरी चवीसाठी कुचकामी असते. हल्ली अनेक जणी रवा 'मायक्रोवेव'मध्ये गरम करतात. कामाच्या व्यापाचे अन् हातात असलेल्या वेळेचे गणित जमवता ते योग्य म्हटले पाहिजे. पण रवा भाजून झाला आहे हे मशीन 'टिक टिक' करून सांगते. पण घरात कढईत लयबद्ध रीतीने फिरणारं उलथणं ''आई, अगं रवा भाजलाय गं. मस्त वास सुटलाय. भूक लागली पटकन् खायला दे'' अशा पोचपावतीने थांबते तेव्हा कढईतला रवा आणि गॅससमोर नॅपकिनने कपाळावर जमा झालेले घामाचे लहान लहान थेंब पुसणारी गृहिणी यांच्या चेहऱ्यावर एकच भाव असतात.. 'समाधानाचे'! ते कधी तरी अनुभवायला 'हवेतच' असे!!
विसावे शतक हे प्रत्यक्ष खाण्याचे होते. एकविसावे शतक हे बोलण्याचे अन् झुरण्याचे आहे. या शतकातील लोक शेअर मार्केटसोबत कॅलरी, फॅट्स, काबरेहायड्रेट्स, ट्रायगलीसराइड्स वगैरे जड जड शब्दांच्या मूल्यांचे तक्ते आपल्या स्मरणात कसे ठेवतात तेच जाणे. पण एकविसाव्या शतकात जे 'लो' आहे त्यास 'हाय' डिमांड आहे. आठवून बघा, विसाव्या शतकात कोणाच्या घरी जेवायला गेले तर न सांगता पानात शिरा पोळी, गूळपोळी, सांजापोळी, पुरणपोळी अशा पोळ्या मुक्त हस्ते पडायच्या. कोणतीही भीडभाड न पाळता स्वाहा व्हायच्या. त्या पोळ्यांवर अलगद फिरणारा तुपाचा तो मोठ्ठा गोळा मनाला गोंजारून जायचा.. आता सांजा/शिरा/गूळ/पुरण असे 'हाय कॅलरी' पदार्थ पानातून हद्दपार झालेत. त्याची आताशी 'ऑर्डर' द्यावी लागते. पोळीसुद्धा आता 'आऊटडेटेड' झाली आहे. फुलके नामक काही तरी 'पचायला हलके' नावाचे बिरूद मिरवणारा हातरुमाल डिशमध्ये येऊन विसावतो. त्या हातरुमालाने उजवीकडे, डावीकडे न पाहता मध्यात जो उकडलेल्या मोडांचा किंवा पालेभाज्यांचा डोंगर स्थानापन्न झालेला असतो त्यास स्वच्छ करायचे. मी जेवलो. माझे पोट भरले अशी भरल्या मनाने मोकळ्या पोटाची समजूत घालून डिशवरून उठायचे. चुकून चवीपुरते तूप साखर, मोरंबा, साखरांबा घेतला तर शेजारून जाणारी गाडी पांढऱ्या शर्टच्या शुभ्र चारित्र्यावर शिंतोडे उडवून पुढे गेल्यावर भर पावसात जसे 'पेटायला' होते. त्याच पेटलेल्या कशाचे तरी अजूनही धगधगते निखारे आईच्या/ बायकोच्या/ गर्लफ्रेंडच्या किंवा ई-साक्षर पोरीच्या (यास वयाचे बंधन नाही) डोळ्यात दिसतात.. त्या निखाऱ्यांवर आपली रसना एकदा खरपूस भाजून घ्यायची.. म्हणजे पुढचे काही दिवस 'टेस्ट कहाँ है?' यासारखा वाह्यत प्रश्न ती विचारणार नाही. अन् चारचौघांपुढे 'अरे आमची आई/वहिनी किंवा आमच्या लहानपणी..' अशा 'चवदार' आठवणी काढून कौटुंबिक स्वास्थ्य बिघडवायची 'गुस्ताखी' करणार नाही.
तर उपमा हा पदार्थ कोणालाही अन कोणत्याही वेळी चालू शकतो.. प्लेटभर खाल्ले तर 'लो' आणि दोन-चार प्लेट हाणले तर 'हाय' अशा लवचीक पिंडामुळे गरोदर स्त्रीपासून ते कडवट तोंडाच्या मधुमेही 'गोळ्या पाचका'पर्यंत कोणीही आणि महत्त्वाचे म्हणजे कितीही खाऊ शकतो. काही पचत नाहीये तर 'लापशीसारखे करा.. ताप येऊन गेलाय तोंडाला चव नाही. लसूण जरा जास्त घाला अन् सोबत एक लिंबाच्या लोणच्याची फोड ठेवून द्या.. आमची जेनी (मूळ नाव जानकी /जान्हवी. सध्या ज्या नावांचा अपभ्रंश साहेबांच्या नावासारखा होऊ शकतो अशी रेट्रो नावे यूज करायची स्टाइल 'इन' आहे) ना काही खातच नाही.. यू नो (हे वर ठेवून दिले की बरे असते).. आय डोंट नो व्हाट शूड आय डू फॉर हर नरिशमेंट अँड प्रॉपर डाएट.!! आतापर्यंत श्रोतावर्ग असलेला आता वक्त्याच्या भूमिकेत जातो/जाते.. ''यू नो (साभार परत), किड्स दीज डेज आर व्हेरी सिलेक्टिव.. ट्राय समथिंग न्यू.. अगं ब्रेकफास्टवर मूठभर ड्राय फ्रुट्स घालायचे.. अँड यू आर डन.'' अशा समस्यांना आणि सल्ल्यांना कोणी 'इम्प्लिमेंट' करायची मोकळीक देत असेल तर तो उपमा.. त्यामुळे उपमा या तीन अक्षरांत तुम्हास ड्राय फ्रुट्स, चॉकलेट सॉस, ढोबळी मिरची, बिन्स, उकडलेली कडधान्ये, वरून पेरलेले कॉर्नफ्लेक्स असे काहीही सापडू शकते. कल्पनाशक्तीला वाव देणारे उपमा हे एक उपमा न देता येण्यासारखे व्यासपीठ आहे.
उपमा करावा तर 'कर्नाटकी' अन्नपूर्णेने. महाराष्ट्रीय आणि अण्णा लोक याबाबत फारच मागास. कर्नाटकी लोक कढईमध्ये रवा आणि तुपासोबत आणखी कोणती अदृश्य गोष्ट घालतात की त्यामुळे रवा इतका खमंग भाजला जातो अन् उपमा इतका मोकळा होतो हे मला न उलगडलेले कोडे आहे. महाराष्ट्रीय लोकांची केशर, कोथिंबीर आणि खोबरे हे तीन पदार्थ घालायचे नसून केवळ 'वासापुरते वापरायचे' असतात अशी समजूत आहे. तो अनुशेष 'कढीपत्त्या'च्या रूपाने भरून काढला जातो. त्यात दारासमोर कढीपत्त्याचे झाड असेल तर अतिथीने ''आहा.. कढीपत्ता घरचा वाटतं.. मस्त वास आहे हो.. देशी आहे काय?'' असे म्हणण्यापासून ''एखादे रोपटे आहे का?'' असे विचारेपर्यंत त्यावर कढीपत्त्याचा 'औषधी' मारा करण्यात येतो. आपल्या लोकांना उपमा जमतो, पण कर्नाटकी लोकांप्रमाणे जमून येत नाही. कर्नाटकी लोक उपम्यात 'आल्याचा' फारच योजक वापर करतात.. भरपूर कोथिंबीर, ताज्या फोडलेल्या नारळाचे ताजे खोबरे, लसूण, आले आणि डिशच्या कोपऱ्यात राखून ठेवलेल्या जागेत ठेवलेले मूठभर शेंगदाणे.. हे समीकरण उकल करायच्या भानगडीत पडू नये.. त्यास सरळ पोटाचा रस्ता दाखवावा. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून अण्णा लोकांचा पाहुणचार स्वीकारायला गेला की 'पोंगल' नावाचा पदार्थ अंगावर येतो. मी तो पहिल्यांदा खाल्ला तेव्हा ताज्या उडदाच्या पिठाचे पहिल्या दिवशी डोसे, दुसऱ्या दिवशी उत्तपे, तिसऱ्या दिवशी आप्पे तर चौथ्या दिवशी पोंगल बनत असावे असे सहजच वाटून गेले. कारण तिकडे 'सांबार' ही जशी सर्वसमा(चव)वेशक संज्ञा आहे तशीच उडीद हीसुद्धा असावी.. सदर पदार्थ 'पोंगल' म्हणूनच खावा.. तरच त्यात 'पृथ्वीवर हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या रवा नामक जिन्नसाचे अवशेष सापडतात.' तो पदार्थ कदाचित मी ज्या हॉटेलात गेलो त्या अण्णाला जमला नसावा किंवा मला झेपला नसावा.. असो.
उपम्याचे अनेक प्रकार आहेत. साधा रव्याचा म्हटला तरी त्याचे हात बदलला की प्रकार बदलतो इतके प्रकार. सोबत शेवया, सांज्याचा रवा यांचे खमंग उपमे आहेतच मदतीला. कोणी त्यात 'फ्लेवर' म्हणून पालकाची/ टोमॅटोची प्युरी घालतं तर कोणी बिर्याणीवर जसा वरून फ्राय केलेला कांदा घालतात तसा खुसखुशीत कांदा पेरतं. कोणी त्यास हळद वापरून नटवतं, तर कोणी 'सफेदी तुजे सलाम' म्हणत बाळाच्या गालावर तीट लावल्यावर त्याचे रुपडे किती लोभस दिसते याची आठवण करून देणारा शुभ्र उपमा आणि मधूनच डोकावणारी मोहरी असे गोंडस रुपडे मोहात पाडते. कोणी त्यात डाळ घालते तर कोणी वरून खारी डाळ घालते. शेव, पापडी, फाफडा, खारी बुंदी अशा समस्त तामसिक किंवा राजसिक जिन्नसांना जर सात्त्विक बेस हवा असेल तर उपम्याइतका उत्तम बेस नाही.
हा बेस 'असाच' तयार होत नाही. किंबहुना उपमा हे प्रकरण वाटते तितके सोपेसुद्धा नाही. त्यात काय रवा भाजायचा आणि पाणी ओतायचे काय डोंबलाचे कष्ट आहेत म्हणून खिल्ली उडवण्याइतका किरकोळ तर नक्कीच नाही. कढईत तो हलत असताना करणाऱ्या स्त्रीचे मनदेखील त्यासोबत असंख्य भावनांच्या हिंदोळ्यावर हलत असते.. कालची चिंता, उद्याची काळजी अन् आजच्या कामाचे नियोजन अशा तिन्ही काळांची मोट बांधून पुढे जायचे नियोजन आपण 'पेपर' वाचत असताना होत असते.. 'नाष्टा' म्हणून ऑर्डर देणे वेगळे अन् कधी तरी 'हा घे नाष्टा' म्हणून हातात डिश ठेवणे वेगळे.. इथे 'जमणे' यास फार महत्त्व नसते तर 'वाटणे' यास महत्त्व आहे.. ''तुला दुसरे काही येत/सुचत नाही का? काय सारखा तोच तोच नाष्टा?'' म्हणून डाफरणे सवयीचे आहे, पण ''छान झालाय हो उपमा'' ही प्रतिक्रिया देणे अनं स्वीकारणे कितपत सवयीचे आहे. देव्हाऱ्यात अन्नपूर्णा पुजायची अन् घरातल्या अन्नपूर्णेच्या पोटात भीतीचा गोळा आणायचा हे कितपत सयुक्तिक आहे?
समोर आलेला पदार्थ आपल्या कितीही सवयीचा आणि करणाऱ्या माणसाच्या कितीही सोयीचा असला तरी तो मिळून खायचा की भांडून, हे प्रत्येकाच्या निर्णयावर अवलंबून आहे.. सध्या 'इन्स्टन्ट' उपमे, पोहे इत्यादी मिळतात. पाण्यात घातला की तय्यार.. समजा विकेंड २४ तासांवर आलाय.. दोन दिवस धुडगूस घालायच्या आधी पाच मिनिटे वेळ काढून जर घरात लक्ष दिले तर घराला घरपण येणार नाही का? ''अगं बाई.. कशी झोप लागली समजलीच नाही.. उशीर झाला. आता नाष्टा..'' म्हणून सैरभैर झालेल्या काळजीच्या हातात चहा/कॉफीचा वाफाळता कप आणि उपम्याची डिश ठेवली तर बाहेर पडणाऱ्या पावसाला एक आपुलकीचा ओलावा येईल.. जे काही जसे काही झाले असेल ते आनंदाने अन कौतुकाने खाल्ले जाईल.. शेवटचा चमचा जेव्हा संपेल तेव्हा चहा/कॉफीच्या घोटासोबत एक आनंदाचा आवंढासुद्धा गिळला जाईल.. सुटका ही कधी होत नसते.. कोणी तरी कोणाची तरी करावी लागते.. रोज आपल्या दिमतीला असतातच आई, बायको, बहीण, वहिनी वगैरे.. कधी तरी त्यांची कट्टय़ापासून 'सुटका' करायला काय हरकत आहे?
तुम्ही केलेल्या उपम्याच्या पहिल्या घासापासून ते शेवटच्या घासापर्यंत मानवी भावनांचे एक अनोखे विश्व उलगडेल. मोकळे होऊन बोलणे म्हणजे काय ते अनुभवता येईल.. चेहऱ्यावर उमटलेले भाव बरेच काही बोलून जातील.. आपण फक्त अनुभवायचे आणि आठवणीत एक एक पान जोडत राहायचे.. काही काळाने डिश संपते पण मन मात्र भरलेले असते.. खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या मेघासारखे!!

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण