वाक्युद्ध जिंकण्याच्या लोकप्रिय पद्धती-सलील अनप्लग्ड

'हो, मला तुझं म्हणणं पटलं..' हे वाक्य ऐकणं म्हणजे 'तू महान आहेस,' 'माझे तुझ्यावर प्रेम आहे', 'तू सर्वोत्तम आहेस' या सगळ्यापेक्षा 'मोठी' वाटणारी मिळकत!! मेंदूमध्ये विविध प्रकारची जुळवाजुळव करून दुसऱ्याला आपलं 'म्हणणं' पटवून देणं, यात मनुष्यप्राणी सगळ्यात जास्त रमतो. सर्वाधिक मानसिक शक्तीचा खर्च होणारी जागा.. 'दुसऱ्याला समजावून सांगणं'! सतत दुसऱ्याला समजून घेणं आणि आपलं म्हणणं दुसऱ्याच्या मनी आणि गळी उतरवणं यामध्ये नव्वद टक्के लोकांची शंभर टक्के शक्ती संपून जाते. मग कुठून येणार सर्जनशीलता..? वगैरे!
या शब्दांच्या चढाओढीत अनेक खेळी खेळल्या जातात. प्रत्येकजण आपापली उपलब्ध शस्त्रसामग्री घेऊन या वाक्युद्धात उतरतो ते विजय मिळवण्यासाठीच! 
बावीस वर्षांच्या एका मुलीने स्वत: लग्नाचा घेतलेला निर्णय अमान्य असणाऱ्या वडिलांचे मुलीशी वाक् युद्ध.. आणि सर्वमान्य लोकप्रिय पद्धती :
१) शक्तिमार्ग- 'सांगा तिला- म्हणावं, असलं चालणार नाही.. आमची पत आहे म्हणावं.' माननीय श्री. दादा, भाऊ, अण्णा हे मुलीशी थेट बोलतसुद्धा नाहीत. असल्या महत्त्वाच्या वेळी ते मुद्दाम फाईलमध्ये डोकं खुपसून मुलीला ऐकू येईल असं बघून बायकोशी बोलतात. शक्तीचा हा मार्ग सर्वात सोपा, कमी वेळ खर्च होणारा आणि कमीत कमी वेळात युद्ध जिंकण्याचा! कारण यात समोरच्या पार्टीने फक्त ऐकायचं असतं.
वय, पैसा आणि सत्ता यांचा वापर करून या पद्धतीने वाक् युद्ध जिंकलं जातं. वयाचा दाखला देऊन 'आता मला शहाणपणा शिकवणार का?' किंवा 'बापाकडे तोंड वर करून बघतोस?' अशी पद्धत! यालाच सरकारी व अन्य ऑफिसमध्ये 'बॉस इज ऑलवेज राइट!' असं म्हटलं जातं. मोठमोठे डॉक्टर, कलाकार हेसुद्धा ही पद्धत सर्रासपणे वापरतात. समाजकारण, राजकारण यांत ही पद्धत सर्वात जास्त वापरली जाते. मोठय़ा साहेबांनी 'यंदा बापूंनी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी असं सर्वाचं (?!!) म्हणणं आहे. कोणाला काही प्रश्न.. शंका? चला- पुढचा विषय..!' या संभाषणात प्रश्न, शंका विचारायच्या नाहीत, हे गृहीत आहे.
शक्तीचा मार्ग हा सर्वात एकतर्फी मार्ग असला तरी मोठमोठे राजे, बादशहांपासून आजच्या फलकव्यापी नेतेमंडळींमध्ये तो सर्वात जास्त रुळलेला आहे.
२) भावनेला हात : जगभरात, आणि विशेषत:भारतात सर्वात जास्त वापरला जाणारा मार्ग म्हणजे 'भावनेला हात' घालण्याचा! धर्म, पोटधर्म, जात, पोटजात, आडनाव, नाती, महापुरुष, देव.. या सगळ्यांचा यथायोग्य वापर या पद्धतीत केला जातो. 
आई-वडील व मुलं, आजी-आजोबा व नातवंडं, नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी यांच्या चर्चेत जेव्हा आपली बाजू कदाचित थोडी कमकुवत पडू शकते याचा अंदाज येताच 'आईला असं बोलतोस?' किंवा 'बाबा, तुमच्या पोटच्या पोराला मारलं तुम्ही?' किंवा 'राजा, हेच का तुझं प्रेम? एकदा माझ्या डोळ्यांत बघून सांग..' या वाक्यानंतर कोणत्याही प्रकारचं तर्कशुद्ध वाक्य उपयोगी पडू शकत नाही.
'आई-वडिलांनी एवढं केलं तरी आज तू त्यांना अंधारात ठेवून सगळ्यात मोठा निर्णय घेतलास?' अशा तीक्ष्ण बाणाला- 'मी तुमच्या शब्दाबाहेर नाही..' अशी शरणागती तरी पत्करावी लागते, किंवा 'तुमचं आजपर्यंत सगळं ऐकलं मी- एवढं माझं ऐका. मला माहितीय- तुमच्या मुलीचं सुख हेच तुमचं सुख मानता तुम्ही, आऽऽई..बाऽऽबा!' अशी तुल्यबळ लढत तरी होते. या प्रकारात अश्रूंचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. 'एरवी डोंगरासारखा ताठ उभा असणारा तुझा बाबा डोळ्यांत पाणी आणून तुला सांगतोय-' हा तर इस्पिक एक्का ठरू शकतो. मराठी दैनंदिन मालिकांमुळे हा मार्ग जास्तच लोकप्रिय होताना दिसतोय. कलाकार मंडळींमध्येसुद्धा हा मार्ग 'ज्याची गाणी आपण रोज ऐकतो त्याला तुम्ही मदत नाही करणार?' किंवा कवी-साहित्यिक मंडळी तर एकमेकांमध्येच हे शस्त्र वापरतात. 'आमची अस्सल कविता सोडून निघालास ना शब्द विकायला?' असा सवाल भल्याभल्यांना हेलावून टाकतो.
सामाजिक स्तरावर 'आपल्यातला माणूस' हा परवलीचा शब्द ठरतो. ऑफिसला निघालेल्या माणसाला 'भारताची क्रिकेट मॅच असताना निघालास? हेच का तुझं देशप्रेम?' अशी भावनिक हाक पुन्हा घरी आणते.
'बास का? हीच का मैत्री?' हे या पद्धतीतील सर्वात लोकप्रिय वाक्य! समोरचा माणूस कितीही नेमकं, खरं, योग्य बोलत असला तरीही तुम्ही या वाक्यांनी तुमचा मुद्दा पुढे करून वाक् युद्ध जिंकू शकता.
३) गूढ गोंधळचक्र :
'हे पाहा, तू लग्न ठरवल्याचं सांगितलंस. मी ते ऐकलं, वाऱ्यानी ऐकलं, आभाळाने ऐकलं! आता माझ्यातला ईश्वर तुझ्यामधल्या ईश्वराशी बोलेल तेव्हाच तुला आणि मला कळेल, की आपल्या नशिबाच्या झोळीत प्राक्तनाच्या ओंजळीतून नक्की काय पडणार? आणि या जांभळ्या आभाळाकडे पाहून तुझ्या बाललीला आठवत मी तुझी तुलाच पैंजणं देऊन टाकीन..' अशा प्रकारच्या गूढ संवादाने समोरचा माणूस घाबरून, गुदमरून आणि कंटाळून शेवटी म्हणतो की, 'खरं आहे तुझं.'
या प्रकाराने युद्ध जिंकण्यासाठी मुळात भाषेवर प्रभुत्व, दांडगी शब्दसंपदा आणि पूर्णविराम न देता सातत्याने स्वल्पविराम देत सतत आणि खूप बोलण्याची तयारी हवी. शाळा, कॉलेज, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, आध्यात्मिक गुरू यांना हा मार्ग सर्वात जास्त आवडतो.
'तू दारू सोड आणि बायका-मुलांना नीट सांभाळ..' एवढाच निरोप असतो; पण तो 'बेटा, या सृष्टीमध्ये प्रत्येक जीव एक कर्म करायला येतो आणि त्या कर्माचं फळ त्याला या वा पुढच्या जन्मात मिळतंच. तंद्री लागते तेव्हा सैतानाची नजर तुझ्याकडे जाते आणि मग तूच एक सैतान होतोस. तुझा श्वास नियमित कर. त्यावर लक्ष केंद्रित कर. तुझ्या कर्माचे भागीदार तुझी वाट पाहत आहेत..' असा येऊन आदळतो. 
यामुळे दोन शक्यता संभवतात. पहिली म्हणजे- 'खरंय बाबा. मी आजपासून तुमच्या चरणाशी राहीन. संसार नीट करीन.' आणि या अवघड आणि गूढ संभाषणातलं काहीच समजलं नाही तर मात्र- 'ओ. के. बाबा, मग मी कमी करू का दारू?' असाही उलटा फासा पडू शकतो. 
ज्याला सातत्याने आणि समूहाला काहीतरी पटवून द्यायचंय, त्याला हा मार्ग सोपा वाटतो. यात आपल्याला नक्की काहीच न कळता सगळंच्या सगळं कळल्याचा आनंद मिळू शकतो. अशा पद्धतीने वाक् युद्ध जिंकणारे विजयाचा आनंद जाहीरपणे व्यक्त करीत नाहीत. कारण आपला मुद्दा समोरच्याला समजलाय की नाही, हे सांगणाऱ्यालाच पुष्कळदा समजत नाही.
४) शरणागती : 
आता शाब्दिक चकमक होऊ शकते याचा अंदाज आल्यावर लगेचच 'मी मूर्खच आहे.. मला काहीही समजत नाही.. तूच सांग ना मला!' अशा वाक्यांमुळे समोरच्याचा जोर आणि वाक् युद्धाचं अवसान अचानक  गळून जाऊ शकतं. याचा वापर प्रियकर आणि नवरे यांच्याकडून मोठय़ा प्रमाणावर केला जातो. शाळा-कॉलेजमध्येसुद्धा 'तुम्ही सर आहात, तुम्ही मला माफ करायला हवं ना?' अशी मुजोर शरणागती व्यक्त होते.
'तुमचं लेकरू समजून सोडून द्या..', 'ही घ्या चप्पल, मारा मला-' अशा वाक्यांनी अचानक युद्धाचं पारडं फिरू शकतं. अगदी दोन चेंडूंवर बावन्न रन्स हवेत अशा बिकट परिस्थितीतही सामना फिरवण्याची ताकद शरणागतीच्या वाक्बाणामध्ये असते.
हा मार्ग सातत्याने वापरता येत नाही. शरणागतीच्या वाक्याचं टायमिंग फार महत्त्वाचं! ही कवचकुंडलं एकदा देऊन टाकल्यावर मग दुसरा मार्ग शोधावा लागेल.
५) सूक्ष्म ज्ञान, दाखले, मांडणी :
कॉपरेरेट मंडळींमध्ये लोकप्रिय असलेली ही वाक् युद्धाची पद्धत! स्लाइड्स प्रेझेंटेशन, दाखले, उदाहरणे यांतून समोरच्याला मुद्दा कळला नाही तरी पटवून देणारी ही पद्धत. अठराव्या शतकातले ग्रीक तत्त्वज्ञ, विचारवंत, संत यांची भारी भारी वाक्ये आणि विचार पेरून समोरच्याला थक्क करून गप्प बसविण्याची ही पद्धत आहे. आपण कितीही म्हटलं की, 'मला अमुक अमुक गोष्ट करायला आवडत नाही,' तरीही 'आजपर्यंत ऐंशी र्वष या गोष्टीचा अभ्यास केल्यावर ज्यांना विशिष्ट वयात ही गोष्ट आवडत नाही त्यांना ती मुळात आवडत असते..' असं सिद्ध करून तुम्हाला ती अवाक्  करते.
'हे पाहा बाळा, तू लग्नाचा निर्णय घेतलास.. मला कौतुक वाटलं. पण कागदावर मांड, प्रत्येक मुद्दय़ावर चर्चा कर आणि मगच निर्णय घे,' असं म्हटल्यावर कागदावर 'प्रेम' कधीच मांडलं न जाता निर्णय आपोआपच त्यांच्या मनासारखा होतो. आणि तोही कोणताही संघर्ष न करता!
याशिवाय अचानक धक्का देऊन शाब्दिक युद्ध जिंकणं, दुर्लक्ष करून आपणच जिंकलो असं मानून पुढे जगायला लागणं, आपल्या मताशी सहमत मंडळी गोळा करून केवळ संख्याबळावर वाक् युद्ध जिंकणं- असे अनेक प्रकार व पद्धतीही वापरल्या जातात.
हा लेख वाचून एखादा स्वयंघोषित सर्वज्ञानी परीक्षक मला म्हणेल, हा काय विषय आहे लेखाचा? तेव्हा त्याचं वय, रूप, शिक्षण, वाचन, अधिकार सगळ्याचा नीट विचार करूनच मला ठरवावं लागेल, की याचा सामना कसा करायचा? भावनेला हात.. शरणागती.. दाखले.. उदाहरणं.. की दुर्लक्ष? 

------------------------------------------------------------------------------------     
(Reference:http://www.loksatta.com/lokrang-news/popular-ways-to-win-debate-1079001/?nopagi=1)                                 

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण