कालाय तस्मे नमः

आपण सर्वांनीच कधी ना कधी गारुडी आणि त्याचे नाग-साप आणि मुंगुसाचे खेळ किंवा डोंबारी-मदारी यांचे खेळ पाहिलेले असतील. विशेषत: ग्रामीण भागात ज्यांचे बालपण गेलेले आहे त्यांनी तर हमखासच आठवडी बाजार किंवा गाव-जत्रेत हे गारुड नक्कीच अनुभवले असेल. ज्या काळात करमणूकीची साधने मर्यादित होती, टी . व्ही . संगणक मोबाईल फोन वगैरे काही नव्हते तेव्हा   गारूड्याचे खेळ बघायला तुफान गर्दी जमत असे आणि ती गर्दी पाहून गारुड्याला  जास्तच चेव चढून त्या खेळामध्ये छान रंगत येत असे. नेहमीप्रमाणे खेळ सुरु करण्यापूर्वी गर्दी गोळा करण्यासाठी ढोल किंवा टिपीकल फिल्मी स्टाईलमध्ये बीन वगैरे वाजवून आणि  आपला एखादा सवंगडी आम जनतेमध्ये पूर्व नियोजितपणे पेरून /सोडून लोकांचे लक्ष आकर्षित करण्याची कला त्या गारुड्याला  अवगत असे.
पण कालाय तस्मे नमः म्हटल्याप्रमाणे आता हल्ली या करमणूक प्रकाराकडे जनता साफ दुर्लक्ष करत असल्यामुळे किंवा एकुणातच आताच्या वेगवान जीवन शैलीमुळे म्हणा किंवा करमणुकीसाठी अधिक चांगले पर्याय उपलब्ध असल्यामुळे म्हणा हवे तर; गारुडी, डोंबारी-मदारी ह्यांच्यावर नक्कीच उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांच्यासाठी आपल्या माय-बाप सरकारने  आता विविध महामंडळ /विकास योजना सुरु केल्या आहेत त्यामुळे म्हणा बहुधा किंवा या पारंपारिक पेशा /व्यवसाय/कलेमुळे उपजीविका मिळविता येणे अशक्य आहे हे अटळ सत्य स्वीकारून /ओळखून त्यांच्या नवीन पिढीनेही हे  तो पेशा /व्यवसाय/कला  बहुधा पुढे न चालवता पोट -पाण्यासाठी वेगळे पर्याय स्वीकारले आहेत. पण कधी तरी अवचित एखादा अगतिक  गारुडी,डोंबारी,मदारी नाइलाजाने का होईना पण आपला खेळ रस्त्यावर मांडून जनतेचे लक्ष आकर्षित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो आणि कोणी काही रुपये- पैसे देईल का याची चाचपणी करतो तेव्हा त्याच्या डोळ्यातले असहाय भाव आपण वाचूनही फार काही करू शकत नाही या हतबल भावनेने तेथून काढता पाय घेतो. माहिती नाही त्यांचे पोट-पाणी आताशा कसे चालते ते पण त्यांच्या बरोबरच आपल्या मनातही एक अस्वस्थतेचे चक्र फिरत राहते.
ढोबळ मानाने अगदी  जशीच्या तशी नाही पण शेतकरी राजा(?)ची   परिस्थिती तरी काय वेगळी  आहे पिढीजात शेती एके शेती तीही अगदी पारंपारिक पद्धतीने सुरु आहे ज्यामुळे  शान-शौकात मानाने तर नाहीच नाही पण स्वाभिमानाने सुद्धा जगता येणार नाही अशी हतबल अवस्था, पिढीगणिक होणाऱ्या वाटणीमुळे कमी होत जाणारे प्रतिव्यक्ती शेतीचे क्षेत्र, वाढती नापिकी ,कर्ज आणि हे सर्व कमी आहे म्हणून की  काय जणू  त्यात आता जागतिक हवामान बदलांचे दुष्ट चक्र. या सर्वातून तरून जायचे तरी कसे ? 

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण