गरज पाणी साठवण्याची - अ. पां. देशपांडे (कार्यवाह मराठी विज्ञान परिषद ) [Garaj Pani Sathvanyachi- A.P. Deshpande )

गेली 20 वर्षे तरी आपल्याला फेब्रुवारीपासून जूनमध्ये पावसाळा सुरू होईपर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवते आहे. याला लोकसंख्येतील वाढ, प्रत्येक माणसाची पूर्वीच्या तुलनेत वाढलेली पाण्याची गरज, वाढते औद्योगीकरण आणि बदलते हवामान ही प्रमुख कारणे आहेत. 1947 मध्ये देशाची लोकसंख्या 40 कोटींच्या घरात होती, ती आता 2015 मध्ये 125 कोटी झाली आहे. ही वाढ तिपटीने झाल्याने आपली पाण्याची गरज तितकी वाढली. पूर्वी माणूस विहिरीचे किंवा नदीचे पाणी आणून वापरत असल्याने त्याचा वापर काटकसरीने होई. आता नळाची चावी फिरवली की पाणी येत असल्याने पाण्याचा वापर (की गैरवापर) खूप वाढला आहे. शिवाय वॉशिंग मशिनसारखी उपकरणे जास्त पाणी वापरतात. 1947 मध्ये संपूर्ण राज्यात मिळून 5-10 कारखाने होते. आता प्रत्येक शहरात आणि गावात मोजता न येण्याएवढे कारखाने झाले आहेत आणि शेवटी बदलते हवामान आहेच, पण ते पूर्वीही होतेच की ! या सर्व कारणांमुळे पूर्वीचे पाणीसाठे अपुरे पडत आहेत. कारण त्यात आपण विशेष लक्षणीय अशी वाढ केलेली नाही. 

यातील पहिले कारण वाढत्या लोकसंख्येचे आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कुटुंब नियोजनाच्या योजना आणल्या. जास्त मुले असणाऱ्यांना बढती नाही, तसेच निवडणुकीस उभे राहण्यास मनाई अशी बंधने आणली. त्यामुळे लोकसंख्येवर नियंत्रण तर नक्की आलेच. पन्नास वर्षांपूर्वी प्रत्येक कुटुंबात 6-8 मुले असत, ती संख्या आता एक- दोनवर येऊन ठेपली आहे. म्हणजे एरवी लोकसंख्या 200 कोटी झाली असती, ती 125 कोटींवर निभावली असे म्हणायचे काय? आधुनिक जीवन पध्दतीमुळे गरज वाढणार आणि औद्योगीकरण केल्याशिवाय एवढ्या लोकसंख्येच्या गरजा भागवता येणे केवळ अशक्‍य आहे. पूर्वी शेतात पिकवलेला कापूस लोकांच्या कपड्यांसाठी पुरा पडे. पण तिपटीने वाढलेल्या लोकसंख्येच्या कापडाची गरज भागविण्यासाठी कापूस अपुरा पडू लागल्याने शास्त्रज्ञांनी विविध कृत्रिम धाग्यांचे शोध लावले. त्यातून मग नायलॉन, टेट्रान, डेक्रोन, टेरीलीन असे धागे मिळाले. मग प्रयोगशाळेत झालेल्या या संशोधनाच्या आधारे कारखान्यात त्याचे उत्पादन होऊन लोकांना पुरेसे कपडे मिळाले. पूर्वी लोक घरात कल्हई लावलेली पितळेची ताट-वाटी जेवणासाठी आणि पितळेचीच भांडी स्वयंपाकासाठी वापरत. घरात पाणी साठवण्यासाठी पितळेच्या अथवा तांब्याच्या घागरी असत. अंघोळीसाठी तांब्याचे घंगाळ अथवा पितळेची बादली असे. आता हे धातू वाढत्या लोकसंख्येला पुरे पडेनासे झाल्याने त्याची जागा प्लॅस्टिकने घेतली. अशा तऱ्हेने लोकांच्या गरजा भागविण्यासाठी कारखान्यांची संख्या वाढली आणि पाण्याची गरजही वाढली. मग यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे पाणीसाठे वाढवणे. पाणीसाठे वाढवायचे तर मग तसा पाऊसही आला पाहिजे, असा युक्तिवाद काहीजण करतात. 

आपल्याकडे दरवर्षी पडणारा पाऊस हा सरासरीच्या 75 टक्‍क्‍यांपासून 105 टक्‍क्‍यांपर्यंत पडतो. कडक दुष्काळ असतो, तेव्हाही तो 75 टक्‍क्‍यांच्या खाली जात नाही आणि भरपूर पाऊस होतो, तेव्हा तो 105 टक्के असतो. पण 75 टक्के पाऊसच आपल्याला उत्तरोत्तर मिळणार असे धरून आता नगरपालिकांनी हिशेब करायला हवेत. ज्यावर्षी त्यापेक्षा जास्त पाऊस पडेल ते बोनस वर्ष धरायचे. मुळात हा 75 टक्के पाऊस साठवण्याची पात्रता आपल्याकडे नाहीच मुळी. या पात्रतेतील "पात्र‘ हा शब्द महत्वाचा. आपले पात्रच मुळी अपुरे आहे. पूर्वी आपण विहिरी आणि नदीतून पाणी घ्यायचो. एकदा नळाने पाणी येऊ लागल्यावर आपण विहिरी आणि नद्या वापरेनासे झालो. विहिरी बुजवल्या आणि नदीत नगरपालिका आणि कारखाने त्यांचे सांडपाणी टाकतात, त्यामुळे ते कोणत्याही कारणासाठी वापराच्या राहिल्या नाहीत. म्हणजे येथे पात्रे उपलब्ध आहेत, पाऊसही पडतो आहे, पण आपण ते वापरत नाही. या करंटेपणाला काय म्हणायचे? चला, या बुजवलेल्या विहिरींचे उत्खनन करून त्या वापरात आणूया आणि नद्या साफ करून त्यांचा वापर सुरू करूया. मग आजची जाणवणारी टंचाई संपते की नाही पाहा. 

औद्योगीकरणामुळे हवेत कार्बनचे कण जातात, पाण्याची वाफ आणि रसायनाच्या वाफा व धूर जातो, हे आपल्या सर्वांचेच निरीक्षण आहे. औद्योगीकरण होऊन आता 40-50 वर्षे झाली. सुरवातीला निर्मितीमधून बाहेर पडणाऱ्या या गोष्टींना आवर कसा घालायचा याचे तंत्र विकसित झाले नव्हते, त्यामुळे तेव्हा ते क्षम्य होते, पण आज ते नाही. आज सर्व प्रकारचे तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, पैसा उपलब्ध आहे. मात्र हे करण्याची मनोवृत्ती आणि ते करणाऱ्यांना नियमांची अंमलबजावणी करून दाखविण्याची मानसिकता राज्यकर्त्यांमध्ये हवी, तर या गोष्टी अवघड नाहीत. अशा या आदर्श गोष्टी केवळ परदेशातच घडतात, असे नसून येथील काही कारखाने आदर्शवत वर्तणूक ठेवणारेही आहेत. 

या सर्वांबाहेर जाऊन आणखी एका गोष्ट करायला हवी. नवी तळी निर्माण करणे, छोटी-मोठी धरणे बांधणे, याबरोबरच आहे त्या धरणांतील, तळ्यांतील, नद्यांतील गाळ काढून शिवाय पात्र रुंद आणि खोल करण्याने पाण्याची साठवण क्षमता वाढवता येते. याचे एक छान मॉडेल धुळे जिल्ह्याच्या शिरपूर गावात सुरेश खानापूरकरांनी सरकारी पैसाच वापरून (आमदार निधी) उभे केले आहे. त्याचे अनुकरण जागोजागी झाले तर पुढील 25 वर्षांत आणखी लोकसंख्या वाढली तरी सर्वांनाच पुरेसे पाणी मिळेल. 
____________________________________________________________________________
साभार :http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण