सांस्कृतिक राजधानीचं गौडबंगाल(‘साप्ताहिक सकाळ’ दिवाळी अंक-२००६
‘गेल्या दोनशे वर्षात भारतात दोनच शहरात नव्या विचारांना उजाळा मिळत राहिला. एक कोलकाता आणि दुसरं पुणं, ‘ असे उद्गार ख्यातनाम नि चिंतनशील कवी-गीतकार जावेद अख्तर यांनी ‘साप्ताहिक सकाळ’च्या वर्धापनादिनी बोलताना काढले, तेव्हा सभागृहात संमतीच्या टाळ्यांचा गजर झाला. पुणं हे सांस्कृतिक-सामाजिकदृष्ट्या देशातलं अग्रेसर शहर असल्याचा पुणेकरांचा जुना दावा असल्यामुळे पुण्याबाहेरील कुणी असे गौरवोद्गार काढले, की पुणेकरांच्या मनाला गुदगुल्या होतात. पुणं हे आपल्याकडचं थोर शहर आहे, असा समज इतरत्रही पसरलेला आपल्याला दिसतो. गेली अनेक वर्षं महाराष्ट्रात कोणत्या ना कोणत्या कारणाने पुणं असं चर्चेत राहिलेलं आहे. या चर्चांमधून ओघाओघाने सर्वमान्य झालेला एक सिद्धांत म्हणजे ‘पुणं ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे.’ हे विधान सर्वप्रथम कोणी केलं आणि त्याला पहिली अनुमती कोणी दिली, हे कळायला मार्ग नसला तरी गेल्या पंधरा-वीस वर्षांत पुण्यात आमूलाग्र बदल झाला आहे, त्यामुळे हे विधान तपासण्याची वेळ मात्र आली आहे. आपल्या जुन्या ओळखीतला, रोजच्या बैठकीतला एखादा माणूस आपल्या डोळ्यांपुढे अनोळखी बनावा तसं काहीसं सध्याच्...