सांस्कृतिक राजधानीचं गौडबंगाल(‘साप्ताहिक सकाळ’ दिवाळी अंक-२००६
‘गेल्या दोनशे वर्षात भारतात दोनच शहरात नव्या विचारांना उजाळा मिळत राहिला. एक कोलकाता आणि दुसरं पुणं, ‘ असे उद्गार ख्यातनाम नि चिंतनशील कवी-गीतकार जावेद अख्तर यांनी ‘साप्ताहिक सकाळ’च्या वर्धापनादिनी बोलताना काढले, तेव्हा सभागृहात संमतीच्या टाळ्यांचा गजर झाला. पुणं हे सांस्कृतिक-सामाजिकदृष्ट्या देशातलं अग्रेसर शहर असल्याचा पुणेकरांचा जुना दावा असल्यामुळे पुण्याबाहेरील कुणी असे गौरवोद्गार काढले, की पुणेकरांच्या मनाला गुदगुल्या होतात. पुणं हे आपल्याकडचं थोर शहर आहे, असा समज इतरत्रही पसरलेला आपल्याला दिसतो.
गेली अनेक वर्षं महाराष्ट्रात कोणत्या ना कोणत्या कारणाने पुणं असं चर्चेत राहिलेलं आहे. या चर्चांमधून ओघाओघाने सर्वमान्य झालेला एक सिद्धांत म्हणजे ‘पुणं ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे.’ हे विधान सर्वप्रथम कोणी केलं आणि त्याला पहिली अनुमती कोणी दिली, हे कळायला मार्ग नसला तरी गेल्या पंधरा-वीस वर्षांत पुण्यात आमूलाग्र बदल झाला आहे, त्यामुळे हे विधान तपासण्याची वेळ मात्र आली आहे. आपल्या जुन्या ओळखीतला, रोजच्या बैठकीतला एखादा माणूस आपल्या डोळ्यांपुढे अनोळखी बनावा तसं काहीसं सध्याच्या पुण्याचं झालं आहे. अख्खी हयात ज्या पुण्यात काढली, ते पुणं हेच का असा प्रश्न हल्ली पुणेकरांना रस्तोरस्ती आणि पावलोपावली पडतो आहे. ज्या सदाशिव पेठेत चार बिर्हाडं भाड्याने देऊन निवांत राहणारे पुणेकर होते, तिथे आता मध्यमवर्गीय माणूस जागेचे भाव विचारण्याचीही हिंमत करू शकत नाही, अशी वेळ आली आहे. मुंबईच्या रहदारीकडे आणि गोंगाटाकडे बघून नाकं मुरडणार्या पुणेकरांना ऑफिसातून घरी जाताना अर्धा-अर्धा, पाऊण-पाऊण तास ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडावं लागतंय. जिथे संस्कृतप्रचुर मराठी आणि तबलापेटीचे सूर ऐकायची सवय होती, तिथे इंग्रजी-हिंदी भाषा सर्रास कानावर पडत आहेत. शांततेसाठी प्रसिद्ध पुण्यात गोंगाट हा वातावरणाचा भाग बनला आहे. थंड हवेसाठी ज्या पुण्यात लोक आवर्जून यायचे, तिथे नागपूरशी स्पर्धा करणारा उकाडा होतो आहे. निवृत्तीनंतर हवीशी वाटणारी आध्यामिक शांतता तर पुण्यातून कधीची पसार झाली आहे. कलासक्त माणसांना आकर्षित करणारं साहित्यिक-सांस्कृतिक वातावरण या शहरात कधीकाळी होतं हे नव्याने आलेल्या मंडळींना सांगूनही खरं वाटत नाही. त्यामुळेच पूर्वीचं पुणं ज्यांना माहिती आहे, पूर्वीच्या पुण्याची प्रतिमा ज्यांच्या मनात आहे, त्यांना ‘अरे, हेच का ते पुणं,’ असा प्रश्न स्वाभाविकपणे पडतो आहे. जर पुणंच ते राहिलं नाही तर पुण्याची जुनी वैशिष्ट्यं कशी शिल्लक राहणार? या बदललेल्या पुण्यात, पुण्याच्या सांस्कृतिक नेतृत्त्वाचं काय झालं, या सगळ्या बदलांमध्ये, अतिवेगवान घुसळणीमध्ये पुण्याच्या सांस्कृतिकतेचं नेमकं काय झालं, या प्रश्नांची चर्चा करणं पुणेकरांना आणि पुण्याबाहेरच्यांनाही आता महत्त्वाचं वाटू शकतं.
पुण्याची सांस्कृतिक जडणघडण
‘पुणं ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी उरली आहे का’, या प्रश्नाचा पूर्वप्रश्न ‘पुणं ही नेमक्या कोणत्या काळात सांस्कृतिक राजधानी झाली असावी’ असा आहे. शिवाय, मुळात सांस्कृतिक राजधानी कशाला म्हणायचं असाही एक उपप्रश्न उपस्थित होतोच. ज्याप्रमाणे आर्थिक राजधानी म्हणजे मोठमोठे उद्योगधंदे, प्रचंड व्यापारी उलाढाली, रोजगारनिर्मिती, वित्तीय संस्थांचं जाळं असं काहीसं चित्र डोळ्यांपुढे उभं राहातं किंवा राजकीय राजधानी म्हणजे मंत्रालय, सचिवालय, विविध खात्यांची मुख्यालयं, राजकारण्यांची खलबतं असं काही वर्णन करता येतं, तसं सांस्कृतिक राजधानी म्हणजे काय, याची काही निश्चित व्याख्या नाही. एक मात्र नक्की की, पुण्याचं महाराष्ट्रात आणि देशात महत्त्व निर्माण झालं आणि वाढलं ते ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हणून संबोधलं जाण्याच्या खूपच आधीपासून. जिजाबाईंसमवेत बालशिवाजी पुण्यात आले तो पुण्याच्या इतिहासामधला एक महत्त्वाचा संदर्भ. तेव्हा पुणं म्हणजे पुनवडी ही एक छोटी वाडी होती. त्या भूमीत शिवबांनी सोन्याचा नांगर फिरवला, म्हणजेच धास्तावलेल्या जनतेला पुन्हा शेतीची सुरुवात करून दिली. स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि महत्प्रयासांनी ते साधलंही. शिवशाहीनंतर पेशवाई अवतरल्यानंतर पुणं हे देशाच्या राजकारणामधलं महत्त्वाचं सत्ताकेंद्र बनलं. पेशवाईच्या शंभर वर्षांच्या काळात कोकणातून मोठ्या प्रमाणावर ब्राह्मणवर्ग पुण्यात स्थलांतरित झाला. हा सर्व समाज पेशवाईनंतरही पुण्यातच राहिल्यामुळे या जातीचा प्रभाव पुण्यावर दीर्घकाळ टिकला. पुण्याच्या सामाजिक-राजकीय नेतृत्त्वाला तेज आलं ते ब्रिटिश राजवटीच्या काळात. पुण्यात सुरू झालेलं सामाजिक सुधारणांचं पर्व क्रांतिकारक स्वरूपाचं होतं. या सुधारकांच्या या कामाचा प्रभाव केवळ पुण्यापुरता न राहता संपूर्ण देशावर पडला आणि केवळ त्यांच्या काळापुरता मर्यादित न राहता नंतरच्या शंभराहून अधिक वर्षांपर्यंत टिकून राहिला. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासावर पुण्याची मोहोर पक्की होण्यामध्ये या मंडळींच्या पायाभूत कामाचा मोठा सहभाग दिसतो.
‘पुणं ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी उरली आहे का’, या प्रश्नाचा पूर्वप्रश्न ‘पुणं ही नेमक्या कोणत्या काळात सांस्कृतिक राजधानी झाली असावी’ असा आहे. शिवाय, मुळात सांस्कृतिक राजधानी कशाला म्हणायचं असाही एक उपप्रश्न उपस्थित होतोच. ज्याप्रमाणे आर्थिक राजधानी म्हणजे मोठमोठे उद्योगधंदे, प्रचंड व्यापारी उलाढाली, रोजगारनिर्मिती, वित्तीय संस्थांचं जाळं असं काहीसं चित्र डोळ्यांपुढे उभं राहातं किंवा राजकीय राजधानी म्हणजे मंत्रालय, सचिवालय, विविध खात्यांची मुख्यालयं, राजकारण्यांची खलबतं असं काही वर्णन करता येतं, तसं सांस्कृतिक राजधानी म्हणजे काय, याची काही निश्चित व्याख्या नाही. एक मात्र नक्की की, पुण्याचं महाराष्ट्रात आणि देशात महत्त्व निर्माण झालं आणि वाढलं ते ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हणून संबोधलं जाण्याच्या खूपच आधीपासून. जिजाबाईंसमवेत बालशिवाजी पुण्यात आले तो पुण्याच्या इतिहासामधला एक महत्त्वाचा संदर्भ. तेव्हा पुणं म्हणजे पुनवडी ही एक छोटी वाडी होती. त्या भूमीत शिवबांनी सोन्याचा नांगर फिरवला, म्हणजेच धास्तावलेल्या जनतेला पुन्हा शेतीची सुरुवात करून दिली. स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि महत्प्रयासांनी ते साधलंही. शिवशाहीनंतर पेशवाई अवतरल्यानंतर पुणं हे देशाच्या राजकारणामधलं महत्त्वाचं सत्ताकेंद्र बनलं. पेशवाईच्या शंभर वर्षांच्या काळात कोकणातून मोठ्या प्रमाणावर ब्राह्मणवर्ग पुण्यात स्थलांतरित झाला. हा सर्व समाज पेशवाईनंतरही पुण्यातच राहिल्यामुळे या जातीचा प्रभाव पुण्यावर दीर्घकाळ टिकला. पुण्याच्या सामाजिक-राजकीय नेतृत्त्वाला तेज आलं ते ब्रिटिश राजवटीच्या काळात. पुण्यात सुरू झालेलं सामाजिक सुधारणांचं पर्व क्रांतिकारक स्वरूपाचं होतं. या सुधारकांच्या या कामाचा प्रभाव केवळ पुण्यापुरता न राहता संपूर्ण देशावर पडला आणि केवळ त्यांच्या काळापुरता मर्यादित न राहता नंतरच्या शंभराहून अधिक वर्षांपर्यंत टिकून राहिला. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासावर पुण्याची मोहोर पक्की होण्यामध्ये या मंडळींच्या पायाभूत कामाचा मोठा सहभाग दिसतो.
या नावांमध्ये सर्वांत अग्रणी नाव अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं घ्यावं लागेल. या दोघांनी सांस्कृतिक क्रांतीची पायाभरणी पुण्यातच केली. तत्कालीन अभिजनांच्या विरोधात बंड करून देशाच्या सामाजिक प्रवाहाला नवी दिशा दिली. फुल्यांचे समकालीन गोपाळ गणेश आगरकरांनी सामाजिक विषमतेविरुद्ध परखड लेखन केलं. मुंबई उच्च नायालयाचे न्यायमूर्ती असलेले महादेव गोविंद रानडे हेही त्या काळातील थोर विचारवंत आणि क्रियाशील नेते होते. या प्रबोधन काळावर त्यांच्या विचारांचा सखोल ठसा होता. त्यांचे शिष्योत्तम गोपाळ कृष्ण गोखले हे सुद्धा स्त्री स्वातंत्र्याचे कैवारी आणि वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध होते. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेला संघर्षही प्रभावी होता. पुढे महात्मा गांधींनी त्यांना गुरुस्थानी मानलं एवढी गोखल्यांची थोरवी मोठी होती. पुण्यात स्त्रीशिक्षणाच्या संदर्भात उल्लेखनीय कार्य केलेल्या आणखी दोन व्यक्ती म्हणजे पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे. पंडिता रमाबाई विदुषी होत्या. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा प्रसार त्या काळी पाश्चात्त्य देशातही झाला होता. पुण्यात त्यांनी शारदा निकेतन नावाची संस्था काढून स्त्रियांचं आणि त्यातही विधवा स्त्रियांचं शिक्षण करण्याचं काम केलं. रमाबाई रानडे या न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी. त्यांनी पतीकडूनच प्रेरणा घेऊन स्त्री शिक्षणाच महत्त्वाचं कार्य केलं. विठ्ठल रामजी शिंदे हेही या काळातल्या सुधारकांमधलं एक महत्त्वाचं नाव. त्यांनी अस्पृश्यता निवारणासंबंधी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला. पुण्यामध्ये त्या काळात सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात जी ठळक नावं होती, त्यातली ही काही उदाहरणं झाली. जेधे-जवळकर-कोठारी वगैरे बहुजन समाजातील नेत्यांनी ब्राह्मणेतर चळवळीमार्फत जी घुसळण घडवून आणली, त्यातूनही नवा राजकीय प्रवाह निर्माण झाला. आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा खोलवर परिणाम झाला. म्हणूनच प्रबोधनकाळात देशभरातल्या चळवळीला पुण्याने दिलेलं योगदान अजोड तर होतंच शिवाय विविधांगी होतं. पुण्याचं सामाजिक क्षेत्रातलं नेतृत्व प्रामुख्याने या काळात प्रस्थापित झालं ते त्यामुळेच.
याच काळात सुरू झालेल्या शिक्षणसंस्थादेखील पुढे पुण्याचं वैभव ठरल्या. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात हिंगणे स्त्री शिक्षण संस्था सुरू केली. विधवाविवाह आणि स्त्रीशिक्षण या दोन विषयांत त्यांनी प्रस्थापितांच्या विरोधाची पर्वा न करता कार्य केलं. याशिवाय नूतन मराठी विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, हुजूरपागा मुलींची शाळा यासारख्या शाळांनी दीर्घकाळ आदर्शवत असं विद्यादानाचं कार्य केलं. टिळक-आगरकरांनी सुरू केलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाने तर संपूर्ण देशभर लौकिक मिळवला. अशा शिक्षणसंस्थांबरोबरच अनेक विषयांत मूलभूत संशोधन करणार्या संस्था ही पुण्यात स्थापन होत गेल्या. त्यामध्ये मुख्यत: आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट, भांडारकर प्राच्यविद्या संस्था, गोखले अर्थशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज, भारत इतिहास संशोधक मंडळ अशा देदिप्यमान संस्थांची मालिकाच पुण्यात निर्माण झाली. या शिक्षण-संशोधनसंस्था केवळ व्यापक सामाजिक आणि राष्ट्रीय हित डोळ्यांपुढे ठेवून काढल्या गेल्या होत्या. त्या काढणार्या व्यक्तींच्या मनात व्यक्तिगत स्वार्थाचा लवलेश नव्हता. ज्या दानशूर व्यक्तींच्या देणग्यांमधून या संस्थांसाठी निधी उभा राहिला, त्या व्यक्तीसुद्धा सामाजिक भावनेतून प्रेरित झालेल्या होत्या. त्याचबरोबर ध्येयवादी शिक्षक-प्राध्यापक-संशोधकांची एक संपूर्ण पिढी या संस्थांमधून कार्य करत होती. आदर्श शिक्षण संस्थांचे सर्वच्या सर्व निकष या संस्थांना लागू होत होते. त्याकाळच्या पुण्यात ध्येयवादाने प्रेरित झालेली इतकी मंडळी एकाच वेळेला कार्यरत होती, हे मोठंच आश्चर्य मानावं लागेल. पुणं हे शिक्षणाचं माहेरघर बनलं ते या व्यक्ती-संस्थांच्या प्रयत्नांमुळे.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीलाच पुण्यात सांस्कृतिक परंपरेची सुरुवात झाली. पहिला मान अर्थातच संगीत नाटकांचा होता. अण्णासाहेब किर्लोस्करांनी ‘संगीत शाकुंतल’चा केलेला पहिला प्रयोग ही भारतीय रंगभूमीच्या इतिहासातली महत्त्वाची घटना होती. त्याच काळात कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, गोविंदराव टेंबे, भास्करबुवा बखले, राम गणेश गडकरी, बालगंधर्व अशा कितीतरी दिग्गजांनी संगीत रंगभूमी अक्षरश: गाजवली. लेखन, दिग्दर्शन, संगीत, निर्मिती, अभिनय, गायन अशा सर्वच क्षेत्रांत सरस कामगिरी होत असल्यामुळे पुण्याच्या नाटकमंडळींचं नाव महाराष्ट्रभर गाजू लागलं. नंतरच्या शंभर-सव्वाशे वर्षांत मराठी रंगभूमी हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य ठरलं. त्याचा पाया या काळातल्या पुण्यामध्ये घातला गेला. कलानिर्मितीच्या क्षेत्रात पुण्याने आघाडी घेतली ती या काळात. अर्थात त्या काळात पुण्याची सर्वाधिक चर्चा होती ती राजकारणातील नेतृत्वामुळेच. वासुदेव बळवंत फडके आणि चाफेकर बंधूंसारख्या क्रांतिकारकांच्या सशस्त्र प्रयत्नांपासून लोकमान्य टिळकांपर्यंत सर्व प्रकारच्या राजकीय शैली पुण्यात निर्माण झाल्या व वावरल्या. टिळकांच्या रूपाने तर स्वातंत्र्य चळवळीचं देशव्यापी नेतृत्व पुण्याकडे आलं होतं.
एकोणिसावं व विसावं शतक जोडणारा हा पन्नास वर्षांचा काळ पुण्याचं नाव देशभर करून गेलेला दिसतो. शिक्षण, समाजप्रबोधन, कला आणि राजकारण या सर्वच क्षेत्रात पुण्याने भरभरून योगदान दिलं. परिणामी महाराष्ट्राचं नेतृत्व त्याकाळी आपोआप पुण्याकडे आलं.
‘पुणेरी’ वैभवाचा काळ
स्वातंत्र्याच्या पूर्वीचा हा काळ एका अर्थाने पुण्याच्या घडणीचा होता. स्वातंत्र्यानंतर चित्र थोडंसं बदललं. ब्रिटिशांविरुद्ध लढण्याचं मुख्य उद्दिष्ट आता उरलेलं नव्हतं. आता नवा भारत, नवा महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न खुणावत होतं. आधीच्या पुणेकरांनी उत्तुंग संस्था उभ्या केल्या होत्या, आताच्या पिढीला त्या यशस्वीपणे चालवून त्यांच्या लौकिकात भर घालायची होती. अनेक थोर परंपरा पूर्वजांनी सुरू केल्या होत्या, त्या त्यांच्यातल्या आशयासकट जोपासायच्या होत्या. महात्मा फुले - लोकमान्य टिळकांपासून ते गडकरी- बालगंधर्वांपर्यंत अनेक मोठी नावं पुण्याशी जोडलेली असल्याने, पुण्याच्या नावाला महाराष्ट्रात ग्लॅमर तयार झालेलं होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांतून लोक पुण्यात स्थलांतरित होत होते. पोट भरायचं असेल तर मुंबईत जावं आणि काहीतरी करून दाखवायचं असेल तर पुण्यात जावं, असं सूत्र विदर्भ-मराठवाडा आणि कोकणात पक्कं होत होतं.
स्वातंत्र्यानंतरच्या लगेचच्याच वर्षी महात्मा गांधींची हत्या झाली आणि त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात जाळपोळ झाली. गांधींची मारेकरी व्यक्ती ब्राह्मण असल्यामुळे गावागावात ब्राह्मणांची घरं-दारं जाळली गेली. त्यातून जे वाचले त्यातील बरेचसे पुण्यात आले. हे सगळे घाटावरचे ब्राह्मण म्हणजे देशस्थ होते. याचा अर्थ पेशवाईच्या काळात कोकणस्थ पुण्यात दाखल झाले आणि गांधी हत्येनंतर देशस्थ पुण्यात पोहोचले. या दोन प्रकारच्या ब्राह्मणांप्रमाणेच इतर पोटजातींनीही पुण्याला आपलंसं केलं आणि पाहता पाहता पुणं ब्राह्मणांसाठी ओळखलं जाऊ लागलं. विविध क्षेत्रात या समाजातील मंडळींनी योगदान दिलं नि ब्राह्मण आणि पुणं हे समीकरण पक्क बनत गेलं. पुरोगामी-प्रतिगामी-पारंपरिक-कुंपणावरचे-आक्रमक-मवाळ-तारतम्यवाले-चळवळवाले अशा सर्व छटांमध्ये ब्राह्मण अभिजनांचा भरणा होता. त्यामुळे बराच मोठा काळ सर्व क्षेत्रांचं पुण्याचं नेतृत्व ब्राह्मणांकडे राहिलेलं दिसतं. एरवी महाराष्ट्रात ब्राह्मणांचं एवढं प्रस्थ अन्यत्र कुठेही नव्हतं. पुण्यात मात्र तसं घडलं. पुण्याच्या सांस्कृतिक नेतृत्वाच्या चर्चेचा या घडामोडीशीही महत्त्वाचा संबंध आहे.
सर्व क्षेत्रात दमदार योगदान दिलेली पहिली पिढी काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर तेवढीच दमदार पिढी पुण्यात तयार झाली हे पुण्याचं नशीब. त्यामुळेच आबासाहेब मुजुमदार, रामकृष्णबुवा वझे, मास्टर कृष्णराव, हिराबाई बडोदेकर यांच्यापासून ते पुढे वसंतराव देशपांडे, गजाननराव वाटवे, जितेंद्र अभिषेकी अशी खूप मोठी प्रभावळ पुण्यात झळाळलेली दिसते. पुण्याचं नाव त्रिखंडात गाजवण्यामध्ये सर्वांत अग्रणी राहिले पंडित भीमसेन जोशी. त्यांनी स्वत:च्या गायनाने नवं गंधर्वयुग निर्माण केलंच, पण सवाई गंधर्व महोत्सव सुरू करून एक सशक्त परंपरा पुण्यात रुजवली. गेली पन्नास वर्षं सातत्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरणारा देशातला हा एकमेव महोत्सव आहे. पुण्याचा सवाई गंधर्व महोत्सव ऐकण्यासाठी केवळ भारतातूनच नाही तर परदेशातून रसिक येत असतात. भारतातले दिग्गज गायक-वादक-कलावंत ‘सवाई’मध्ये कला सादर करण्यात धन्यता मानतात.
संगीताच्या बरोबरीनेच मराठी नाटकासाठीही पुणं हे कायम महत्त्वाचं केंद्र राहिलं. पूर्वीच्या काळातली संगीत नाटकांची परंपरा मंदावत असताना गद्य नाटकांनी आपली आशयसंपन्न वाटचाल चालूच ठेवली. महाराष्ट्रीय कलोपासक, प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन, थिएटर अॅकॅडमीसारख्या संस्थांनी पुण्याच्याच नव्हे तर, एकूण मराठी रंगभूमीला नवे आयाम दिले. या काळात पुण्यात निर्माण झालेलं आणि संपूर्ण जगभर गाजलेलं नाटक म्हणजे घाशीराम कोतवाल. राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक अशा अनेक संदर्भाचे समज-गैरसमज झाल्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. या नाटकाचं समर्थन करणारे आणि विरोध करणारे दोन्ही प्रवाद पुण्यातच एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या निमित्ताने पुन्हा एकदा पुणं चर्चेच्या केंद्रस्थानी आलं होतं. प्रोगे्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनने वसंत कानेटकरांची अनेक नाटकं केली तर थिएटर अॅकॅडमीने विजय तेंडुलकर, पु.ल.देशपांडे आणि सतीश आळेकरांची नाटकं केली. ‘घाशीराम’मुळे जब्बार पटेल, मोहन आगाशे, सतीश आळेकर, भास्कर चंदावरकर अशी काही नावं अखिल भारतीय क्षेत्रात पोहोचली आणि कार्यरतही राहिली. त्याशिवाय पुण्यातून डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, चंद्रकांत गोखले, विक्रम गोखले, शरद तळवलकर, वसंत शिंदे, यशवंत दत्त, श्रीकांत मोघे अशी दमदार अभिनेत्यांची भक्कम फळी उभी राहिली. जिने पुढे मराठी रंगभूमीबरोबरच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचंही पोषण केलं.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या घडणीतही पुण्याचा महत्त्वाचा वाटा आहे. इतर अनेक चित्रपट संस्थांबरोबरच एक सर्वांत महत्त्वाचं नाव म्हणजे प्रभात फिल्म कंपनी. पुण्यात जो प्रभात स्टुडिओ उभा राहिला तो त्या काळी संपूर्ण आशिया खंडातला सर्वांत उत्तम स्टुडिओ होता. बाबूराव पेंटर, विष्णूपंत दामले, व्ही. शांताराम, एस.फत्तेलाल, सीतारामपंत कुलकर्णी, केशवराव धायबर अशा मंडळींनी प्रभातच्या माध्यमातून काढलेले चित्रपट केवळ मराठीतच नाही तर हिंदीतही गाजले. नव्या सामाजिक विषयांबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी नीट वापर केल्यामुळे पुण्याचं नाव संपूर्ण भारतात दुमदुमू लागलं. पुढच्या काळात ग. दि. माडगूळकर, राम गबालेंनी निर्माण केलेले चित्रपटही महत्त्वपूर्ण ठरले. आचार्य अत्र्यांनी ‘महात्मा फुले’ आणि ‘श्यामची आई’ हे दोन वेगळ्या विषयांवरचे चित्रपट निर्माण केले. राजा ठाकूर, राजा परांजपे, सुधीर फडके, राम कदम, पु. ल. देशपांडे अशी पुण्याच्या चित्रपटसृष्टीतली दिग्गज नावांची यादी खूपच मोठी आहे.
मान्यवर साहित्यिकांचं गाव अशीही एक पुण्याची ओळख महाराष्ट्राला आहे. ही ओळख खरीही आहे, कारण पुण्यात साहित्यिकांचं वास्तव्य असण्याची परंपरा तशी जुनी आहे. हरी नारायण आपटे, श्री.म.माटे, माधव ज्युलियन, ना.सी.फडके, आचार्य अत्रे, विश्राम बेडेकर, पु.ल.देशपांडे, ग.दि.माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, गो.नी. दांडेकर, ना.सं. इनामदार, शांता शेळके असे आपापला काळ गाजवलेले साहित्यिक आवर्जून पुण्यात राहात होते. ही मंडळी पुण्यात राहिल्यामुळे पुण्याच्या प्रतिष्ठेत भर पडत राहिली. साहित्यिकांच्या वास्तव्यामुळे पुण्यात प्रकाशन व्यवसायही नेहमी जोरात राहिला. देशमुख आणि कंपनी, राजहंस प्रकाशन, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, श्रीविद्या प्रकाशन अशा संस्थांनी पुण्यात राहूनच मराठी साहित्यविश्वात नवनवीन पुस्तकांची भर घातली. पुस्तक प्रकाशनांप्रमाणेच नियतकालिकांचं कार्यही पुण्यात बहराला आलं. किर्लोस्कर-स्त्री-मनोहर या मासिकांनी तर महाराष्ट्रातल्या काही पिढ्यांचं वैचारिक पोषण केलं आहे. त्याबरोबरच माणूस, साधना, सोबत यासारख्या प्रकाशनांची कामगिरीही मोलाची आहे. तसंच अनेक मोठे सांस्कृतिक प्रकल्प पुण्यात आकाराला आले. उदा. बाबासाहेब पुरंदरेंचा ‘राजाशिवछत्रपती’ हा ग्रंथ आणि ‘जाणता राजा’सारखा कार्यक्रम किंवा पंडित महादेवशास्त्री जोशींचा ‘भारतीय संस्कृती कोशा’सारखा पायाभूत प्रकल्प.
फुल्यांनी सुरू केलेली सामाजिक चळवळीची परंपराही पुण्यात दीर्घकाळ टिकून राहिली. त्यामध्ये अलीकडच्या काळातलं सर्वांत महत्त्वाचं नाव म्हणजे डॉ. बाबा आढाव. त्यांनी हमाल, कागद-काच-पत्रा गोळा करणारे आणि रिक्षावाल्यांसारख्या असंघटित कष्टकरी वर्गाचं संघटन केलं. त्यांना संघर्षासाठी तयार केलं आणि त्या संघटनांना रचनात्मक जोडही दिली. त्यांच्या कामातलं सातत्य हे पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरलं आहे. त्याचबरोबरीने कुमार सप्तर्षी, अरुण लिमये, अनिल अवचट यांनी सुरू केलेली युवक क्रांतिदलाची चळवळ असो किंवा विद्या बाळ, नीलम गोर्हे यांनी चालवलेली स्त्री मुक्तीची चळवळ असो; अशा अनेक चळवळींचा जन्म आणि विकास पुण्यातच झाला. अशाप्रकारे गेल्या शंभर सव्वाशे वर्षांच्या वाटचालीत पुण्याने महाराष्ट्राला आणि देशालाही जे योगदान दिलं, त्यामुळे बहुधा पुण्याला ‘सांस्कृतिक राजधानी’ असं संबोधन प्राप्त झालं असावं.
या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरावीस वर्षातील पुण्यावर दृष्टिक्षेप टाकला तर काय दिसतं? आधी औद्योगिकरणाच्या खडखडाटात आणि आता आय.टी.च्या ‘अर्थ’पूर्ण शांततेत पूर्वीचं थोरपण लुप्त झालेलं असलं तरी महाराष्ट्रातल्या इतर शहरांच्या तुलनेत पुणं आजही एक जिवंत शहर आहे, असं म्हणण्यासारखी परिस्थिती दिसते. काही दीर्घपरंपरा पुण्याने निर्धाराने टिकवल्या आहेत. त्यामध्ये शंभराहून अधिक वर्षं चाललेली वसंत व्याख्यानमाला असेल किंवा मराठी रंगभूमीला सतत तरुण ठेवणारी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा असेल. पुण्यात बादल सरकार महोत्सव किंवा विजय तेंडुलकर महोत्सव जोरात साजरे होतात. अशा कार्यक्रमांना प्रेक्षकांचीही भरभरून उपस्थिती असते. महाराष्ट्राच्या इतर शहरात न दिसणारं आणखी एक दृश्य पुण्यात दिसतं, ते म्हणजे योगेंद्र यादव, पी. साईनाथ, डॉ. अभय बंग, वंदना शिवा, सुनीता नारायण यासारख्या गंभीर विचारवंत कार्यकर्त्यांच्या भाषणांनासुद्धा पुणेकर तुडुंब गर्दी करतात. नंतरच्या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमातही उत्स्फूर्त सहभाग देतात. भरतनाट्यम्, कथ्थक या शास्त्रीय नृत्यप्रकारांचे किंवा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या गायकीचे जेवढे वर्ग पुण्यात आज चालतात, तेवढे इतरत्र क्वचितच चालत असतील. आजही पुण्याबाहेर निर्माण होणार्या नाटक किंवा चित्रपटाचा पहिला खेळ ज्यावेळेला पुण्यात होतो तेव्हा ते कलाकार, दिग्दर्शक, लेखक इतकंच काय निर्मातेसुद्धा धास्तावलेले असतात. पुण्याच्या रसिकांची एवढी जरब असूनही टिकून आहे.
आपल्या उपजीविकेबरोबर ज्या व्यक्तीला नाटक, व्याख्यानं, संगीताच्या मैफली, चित्रकलेची प्रदर्शनं, चित्रपटांचे महोत्सव अशा अभिरुचीपूर्ण जगण्याची आस आहे, त्यांच्यासाठी अजूनही पुणे हाच पहिला पर्याय ठरतो. एका बाजूला पुण्यातला गोंगाट खूप वाढला किंवा पुण्याची आता मुंबई होते आहे अशी चर्चा ऐकू येत असतानाच अनेक मान्यवर मंडळी अजूनही आवर्जून पुण्यातच स्थायिक होताना दिसतात. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत पुण्यात आलेल्या मंडळींमध्ये डॉ. श्रीराम लागू, अमोल पालेकर, दिलीप चित्रे, रवी परांजपे, लालन सारंग, प्रभा अत्रे, गो. पु. देशपांडे, वसंत गोवारीकर, जयंत नारळीकर, दिलीप प्रभावळकर अशा अनेक नामवंतांची नावं सांगता येतील. या सगळ्यांनाच मुंबईत राहाणं सहजशक्य असतानाही केवळ पुण्यातल्या वातावरणासाठी त्यांनी पुण्याची निवड आवर्जून केली आहे.
पुण्याचं सांस्कृतिक वैभव अजूनही टिकून असल्याच्या या खुणा म्हणता येतील, परंतु थोडं तपासून पहायला लागलं तर परिस्थिती तेवढीशी आलबेल नसल्याचं लक्षात येऊ शकतं.
पुण्याच्या सांस्कृतिकतेविषयी मतं-मतांतरं
गेल्या शंभर-दीडशे वर्षामध्ये सर्वच क्षेत्रांबाबत पुण्याने जे योगदान दिलं, ती परंपरा आजचं पुणं किती निभावतं आहे, पुण्यामध्ये पूर्वीप्रमाणे महाराष्ट्राला सांस्कृतिक नेतृत्व देण्याची क्षमता उरली आहे का, पुणं अजूनही सांस्कृतिकदृष्ट्या सजग शहर आहे का, वगैरे प्रश्नांचा वेध घेत असताना या शोधलेखाचा एक भाग म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रांतील काही मंडळींशी चर्चा करावी असं आम्ही ठरवलं. स्वत:ला चिकित्सक म्हणवणारे पुणेकर अशा विषयात खरोखरच चिकित्सक उरतात का, याचाही अंदाज त्यामुळे घेता येणार होता. मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर अशा वेगवेगळ्या विभागातल्या व्यक्तींशी आम्ही जाणीवपूर्वक संपर्क साधला. पुणं तुम्हाला आजही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी वाटते का, वाटत असेल तर का किंवा नसेल तर का; असं आम्ही त्यांना विचारलं. शिवाय प्रत्येक व्यक्तीला तिच्या कार्यक्षेत्राप्रमाणे विशिष्ट प्रश्न विचारले. विषय पुण्यावरचा असल्यामुळे कोणत्याच मुद्दयावर एकमत होणार नाही, याची कल्पना होतीच. अपेक्षेप्रमाणे परस्परविरुद्ध टोकाची मतं पुढे आली. पुण्यावरची अशी मतं आणि मतभेद ऐकतच आम्ही या विषयाचा शोध घेत होतो.
पुण्याच्या सांस्कृतिकतेविषयी मतं-मतांतरं
गेल्या शंभर-दीडशे वर्षामध्ये सर्वच क्षेत्रांबाबत पुण्याने जे योगदान दिलं, ती परंपरा आजचं पुणं किती निभावतं आहे, पुण्यामध्ये पूर्वीप्रमाणे महाराष्ट्राला सांस्कृतिक नेतृत्व देण्याची क्षमता उरली आहे का, पुणं अजूनही सांस्कृतिकदृष्ट्या सजग शहर आहे का, वगैरे प्रश्नांचा वेध घेत असताना या शोधलेखाचा एक भाग म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रांतील काही मंडळींशी चर्चा करावी असं आम्ही ठरवलं. स्वत:ला चिकित्सक म्हणवणारे पुणेकर अशा विषयात खरोखरच चिकित्सक उरतात का, याचाही अंदाज त्यामुळे घेता येणार होता. मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर अशा वेगवेगळ्या विभागातल्या व्यक्तींशी आम्ही जाणीवपूर्वक संपर्क साधला. पुणं तुम्हाला आजही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी वाटते का, वाटत असेल तर का किंवा नसेल तर का; असं आम्ही त्यांना विचारलं. शिवाय प्रत्येक व्यक्तीला तिच्या कार्यक्षेत्राप्रमाणे विशिष्ट प्रश्न विचारले. विषय पुण्यावरचा असल्यामुळे कोणत्याच मुद्दयावर एकमत होणार नाही, याची कल्पना होतीच. अपेक्षेप्रमाणे परस्परविरुद्ध टोकाची मतं पुढे आली. पुण्यावरची अशी मतं आणि मतभेद ऐकतच आम्ही या विषयाचा शोध घेत होतो.
‘पुणं ही निश्चितपणाने महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे असं मला वाटतं. माझ्या नावावर अगदी बेलाशक ही प्रतिक्रिया छापा,” ज्येष्ठ नाटककार आणि नागपूरनिवासी महेश एलकुंचवार सांगत होते. आपलं म्हणणं पटवून देताना नाटक, संगीत, साहित्य या विविध सांस्कृतिक आघाड्यांवर पुण्यात सतत काहीतरी नवीन घडत असतं, पुण्यात या क्षेत्रातली जाणकार मंडळी मोठ्या प्रमाणावर आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्यांच्या मते, उर्वरित महाराष्ट्राच्यादृष्टीने पुण्याच्या स्वीकारार्हतेला, मान्यतेला खूप महत्व आहे. पुण्यात नाटक आणि इतर कलांविषयीचं प्रेम पुढच्या पिढ्यांमध्ये प्रवाहित झालेलं दिसतं. यातच पुणं हे सांस्कृतिकदृष्ट्या इतरांच्या पुढे आहे हे आलंच, असं ते म्हणतात. आज इतर शहरांमध्ये संस्थांचं वाटोळं होत असताना त्या तुलनेत पुण्यामध्ये संस्था चालवण्यामध्ये सातत्य आहे असं एलकुंचवारांना वाटतं. बोलता बोलता त्यांनी आपल्या ‘सोनाटा’ या नव्या नाटकाचा संदर्भ दिला. हे अगदी ताजं नाटकही पुण्यातल्या नव्या पिढीच्या मुलांनी सादर केलं आणि पुणेकर प्रेक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला, याचं समाधान त्यांच्या बोलण्यात जाणवत होतं.
अर्थात पुण्याची ही बाजू मांडत असतानाच पुणं आपला मराठी चेहरा हरवत चाललं आहे, याचीही नोंद एलकुंचवारांनी केली. ‘आजच्या अवघड काळात संस्था नीट चालवू शकणार्या पुणेकरांना वाहनं कशी चालवावीत याचा साधा सिविक सेन्स कसा नाही याचं मात्र मला आश्चर्य वाटतं,’ असं त्यांचं म्हणणं. याचा अर्थ एखाद्या शहराच्या सांस्कृतिकतेचा संबंध फक्त कलाजीवनाशी नसतो, तर ते शहर रोजचं जीवन किती नीटनेटकेपणाने जगतं, याच्याशीही असतो. याबाबतीत पुणं हे केवळ मागास शहर नव्हे, तर चक्क नापास शहर ठरतं. बहुतेक पुणेकर या निष्कर्षाशी सहमत होतील.
एरवी नागपूर आणि कोल्हापूर ही दोन्ही अगदी भिन्न प्रकृतीची शहरं. दोन्ही शहरांत राहणार्या माणसांची मानसिकता एकमेकांपेक्षा अगदीच वेगळी! पण जेव्हा पुणं सांस्कृतिक राजधानी आहे का, असा प्रश्न विचारला गेला तेव्हा कोल्हापूरच्या डॉ. शरद भुथाडियांचं मत नागपूरच्या एलकुंचवारांसारखंच होतं. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यामधला सांस्कृतिक दुवा म्हणून पुण्याचं महत्त्व मोठं असल्याचं त्यांनी सांगितलं. संपूर्ण भारतात आणि परदेशातही दबदबा निर्माण करू शकण्याइतकी सशक्त प्रायोगिक नाट्यचळवळ पुण्यात उभी राहिली. प्रस्थापित संकल्पनांना, सरंजामी आणि सदाशिव पेठी विचारपद्धतीला छेद देण्याचं धाडस दाखवून या शहराने एक नवी वाट निर्माण केली. महाराष्ट्राच्या इतर शहरातील प्रायोगिक नाट्यसंस्थांना जोडून घेऊन पुणेकरांनी चळवळीचा पायाही व्यापक केला. अशी पुण्याची थोरवी सांगत असतानाच भुथाडियांनीही आता पुणं बदलत असून, त्याचा नवा चेहरा तितकासा चांगला नसल्याचं म्हटलं. पुण्यात चंगळवाद वाढत असून, प्रत्येक गोष्टीचं व्यापारीकरण होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पूर्वीसारखी सर्जकता आणि नवीन काही करून दाखवण्याची क्षमताही कमी होत असल्याचं त्यांचं निरीक्षण आहे. तरीही भुथाडिया थोडे आशावादी आहेत. आजच्या स्थितीत नवी सांस्कृतिक चळवळ उभी करण्याचा वसा पुणेकरांनी घेतला तर केवळ पुण्याचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचाच सांस्कृतिक वारसा टिकून राहील, अशी आशा ते व्यक्त करतात.
पुण्याबाहेरील दोन मान्यवरांची मतं आजमावल्यानंतर आम्ही पुणेकरांकडे मोर्चा वळवला. गंमत म्हणजे विनोदी लेखक म्हणून ओळख असलेल्या पण गंभीरपणे विचार करणार्या मुकुंद टाकसाळे यांनाही पुणं आजही निर्विवादपणे सांस्कृतिक राजधानी आहे, असं वाटत असल्याचं त्यांच्या म्हणण्यातून स्पष्ट झालं. त्यांच्या मते, पुणेरी संस्कृती म्हणजे ब्राह्मणी संस्कृती असं काहीसं समीकरण लोकांच्या मनात असतं. त्यामुळे ज्यांचा ब्राह्मणांवर राग आहे, त्यांचा पुण्यावरही राग आहे. पण ब्राह्मणांची एक पक्की प्रतिमा डोक्यात ठेवून असा राग करण्यात अर्थ नाही, असं त्यांचं म्हणणं. कारण ब्राह्मण आणि त्यातही पुण्यातले ब्राह्मण ही अतिशय लवचिक जमात आहे. सामाजिक सुधारणा, इंग्रजी शिक्षण, नव्याचा स्वीकार, बदलत्या काळाचा अंदाज घेत अमेरिकेला जाणं हे सगळं पाहता पुण्यातल्या ब्राह्मणांकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहेतच. म्हणून जर उर्वरित महाराष्ट्र ‘पुणेरी मॉडेल’ म्हणून त्याचं अनुकरण करत असेल तर त्यात वावगं काय? असा त्यांचा सवाल आहे. पुणेरी ब्राह्मणांमध्ये जर काही वाईट गुण असतील तर त्याला जरूर विरोध करावा. पण चांगल्या गोष्टींकडे कानाडोळा करणं बरोबर नाही, असा त्यांचा एकूण सूर होता. या मतांमुळे आपल्यावर ‘ब्राह्मणी’ असल्याचा आरोप होणार याचा अंदाज टाकसाळेंना असल्यामुळे ते म्हणतात, “असा आरोप कोणी माझ्यावर केला तर त्याला माझा इलाज नाही. देव त्यांना क्षमा करो. एवढंच मी म्हणू शकतो.”
या संदर्भात नेमकं विरोधी मत मांडलं मराठवाड्यातील डॉ. गंगाधर पानतावणे यांनी. “पुणं हे संस्कृतीचं माहेरघर आहे ही घोषणा पुण्यातल्याच तथाकथित संस्कृतीवाद्यांनी आणि त्यातही विशेषत: ब्राह्मणांनी केली आहे”- ही त्यांची परखड प्रतिक्रिया. त्यांच्या मते, याच मंडळींनी फुले-आगरकरांच्या सुधारणावादी प्रयत्नांची यथेच्छ टिंगलटवाळी केलेली आहे. ‘सामाजिक सुधारणा म्हणजे संस्कृतीवरचा हल्ला,’ असं सूत्र याच मंडळींनी लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. खरंतर आपलं सामाजिक व्यंग लपवण्याचा या मंडळींचा डाव होता. शाहिरी, लावणी, तमाशा हे कलाप्रकारच नाहीत असं सांगत या तथाकथित संस्कृतिवाद्यांनी लावणीला निर्लज्जपणा म्हणत तिचा अधिक्षेप केला होता, हे महाराष्ट्र विसरलेला नाही. मात्र नंतर चोरून शृंंगारिक लावण्यांचा आनंद घेण्यात हीच मंडळी आघाडीवर होती, याचीही ते आठवण करून देतात. ‘पेशवाईनंतर नाटक आणि संगीत या कला पुण्यातच जोपासल्या गेल्या हे मान्यच, पण आपल्याला येतात तेवढ्याच कला आणि तीच संस्कृती असं सांगून या मंडळींनी संस्कृतीच्या किल्ल्या आपल्या कमरेला लावल्या,’ असं त्यांचं म्हणणं. आता संस्कृतीची आणि ज्ञानाची क्षेत्रं बदलली आहेत. ती कधीच पुण्याच्या बाहेर गेली आहेत. पण आपणच खरे शिक्षण-संस्कृतीचे रखवालदार असा या नव्या केंद्रांचा दावा नसल्यामुळे त्यांची ‘पुण्या’सारखी चर्चा रंगत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
मराठवाड्यातलेच आणखी एक समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या पुण्यातल्या शैक्षणिक वातावरणाचं मोठेपण मान्य करत नंतर पुण्याच्या शिक्षणाचा दर्जा किती आणि कशामुळे घसरला यावर मुलाखती दरम्यान नेमकं बोट ठेवलं. “उत्तमरीतीने शिक्षणसंस्था कशा चालवाव्यात हे पुण्याला जाऊन शिका, असा सल्ला महात्मा गांधींनी राजेंद्रबाबूंना दिला होता, इतका पुण्यातल्या शिक्षणसंस्थांचा दर्जा एकेकाळी उच्च होता” - डॉ. सुधीर रसाळ सांगत होते. 1930 सालापर्यंत महाराष्ट्रात बौद्धिक कार्य करणारी पिढी पुण्यात तयार झाली असं सांगून ते म्हणाले की, इतिहासाचार्य राजवाडे आणि ज्ञानकोशकार केतकरांसारखे दिग्गज पुण्यातच ज्ञानसाधना करत होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या ज्ञानक्षेत्राचं नेतृत्व आपसूकच पुण्याकडे आलं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र देशविकासाची प्रेरणाच लोप पावली. समोर कोणतंच ध्येय नसलेल्या शिक्षणसंस्थांमधल्या अध्ययन आणि अध्यापनावरही त्याचा परिणाम झाला. 90% अनुदान शासन देत असल्याने अनुदान घेणं आणि शाळा-महाविद्यालय चालवणं, एवढंच काम उरलं. करिअर आणि उपजीविकेसाठी शिक्षण देणं हाच हेतू उरल्यामुळे बाकी महाराष्ट्र आणि पुण्याच्या शिक्षणात फरकच उरला नाही. 1960 नंतर महाराष्ट्रात विद्वानांची पिढी तयार झालेली दिसत नाही. पुण्याचं शिक्षणातलं नेतृत्व गेल्यामुळे महाराष्ट्रातल्या शिक्षणाच्या दुरवस्थेला सुरुवात झाली, असं त्यांचं म्हणणं!
डॉ. सुधीर रसाळ सांगतात त्याप्रमाणे पुण्यात शिक्षणाची खरोखरच दुरवस्था झाली का, हे विचारण्यासाठी आम्ही गाठलं, पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापन करणारे आणि गोखले अर्थशास्त्र संस्थेत संशोधन करणारे प्रा. प्रदीप आपटे यांना. ‘पुण्याचा शिक्षणामधला लौकिक खूप मोठा आहे. तो लौकिक लक्षात घेऊनच दरवर्षी विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या झुंडीच्या झुंडी पुण्यात दाखल होतात. पण त्या लौकिकाला साजेसं शैक्षणिक वातावरण पुण्यात राहिलेलं नाही,’ असं प्रदीप आपटे सांगतात. त्यांच्यामते विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयं ‘ज्ञानाची तीर्थक्षेत्रं’ न राहता त्यांना ‘आठवडी बाजारा’चं रूप आलं आहे. शिक्षण अधिकाधिक गैरलागू, उथळ, नीरस, संदर्भहीन होण्याला अध्यापक वर्ग मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे. स्वत: शिकवत असलेल्या विषयाबद्दल अनास्था, नेमून दिलेल्या अभ्यासक्रमापलीकडे स्वारस्य नसणं हा महाविद्यालयीन अध्यापनाचा स्थायीभाव झालेला आहे. अशा वातावरणात अध्यापकच विद्यार्थ्यांपेक्षा ‘परीक्षार्थी’ झालेले आहेत. पुण्यातल्या आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेच्या अवनतीला अनुदानपद्धतही जबाबदार असल्याचं आपटे यांना वाटतं. पूर्ण-अनुदान पद्धत आल्यामुळे संस्थाचालक एकतर र्हस्वदृष्टी आणि उदासीन बनले किंवा अधिक पैसे देणार्या विना-अनुदान मार्गाकडे वळले. अनुदानित आणि जुन्या महाविद्यालयांना सरकार, विद्यापीठ आणि संस्थाचालक यांच्या तिहेरी विणीची वेसण बसली आहे, असं त्यांचं निरीक्षण आहे.
पूर्वेकडच्या ऑक्सफर्डची अवस्था पूर्वीसारखी उरलेली नाही, हा थोडक्यात निष्कर्ष. ज्या शिक्षण-कला यांच्या आघाडीच्या जोरावर पुण्याकडे सांस्कृतिक नेतृत्व होतं नि ‘पुणे तिथे काय उणे’ असं म्हटलं जात होतं, त्याचं तरी काय झालं, यासाठी आम्ही मुंबईच्या अवधूत परळकरांना गाठलं. ‘पुणे तिथे काय उणे’ या पुणेकरांच्या आवडत्या प्रश्नाचं उत्तर ‘सौजन्य उणे’ असं देऊन परळकरांनी सांस्कृतिक राजधानीच्या प्रश्नाची पार वासलात लावली. त्यांच्या मते पुणे हे विद्येचं माहेरघर आहे किंवा सांस्कृतिक राजधानी आहे, या अफवा पुणेकरांनीच पिकवल्या आहेत. ज्या पुण्यात आगरकर आणि कर्वेयांना वाईट वागणूक मिळाली, त्या शहराला सुसंस्कृत कसं म्हणणार? डॉ. जयंत नारळीकर, नरहर कुरुंदकर, अनंत भालेराव, ना. धो. महानोर, हिंमतराव बाविस्कर, अभय बंग यांच्यासारखी दिग्गज आणि मूलभूत योगदान देणारी मंडळी पुण्याच्या बाहेर निपजली याकडे सांस्कृतिक राजधानीवाले सोयीस्कर दुर्लक्ष करतात, असा त्यांचा आरोप आहे. संस्कृतीच्या गप्पा मारणार्या पुण्यात एकतरी मोठा चित्रकार झाला का, असा सवाल करून राजा रविवर्मा, बाबूराव पेंटर, हेब्बर, गायतोंडे, एम.एफ. हुसेन यांची कलाकीर्द पुण्याच्या बाहेरची आहे, हे ते लक्षात आणून देतात. पुणेकरांच्या वर्तनावर ताशेरे ओढताना ते म्हणतात की, “शिष्टपणा आणि उद्धटपणा हे (अव) गुण पुणेकर एखाद्या अलंकाराप्रमाणे मिरवतात. आत्मप्रौढी हे सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही, हे पुणेकरांच्या लक्षात कसं येत नाही?” पुणं हे कलासंस्कृतीचं शहर नसून पेशवाईप्रमाणेच ते आता पुन्हा एकदा भोजनभाऊंचं शहर झाल्याचं सांगतात. त्यासाठी ते पुण्यात वाढणार्या हॉटेलांकडे नि चंगळवादाकडे बोट दाखवतात. त्यांच्यामते नाट्य-चित्रपट, साहित्य, शिक्षण, पत्रकारिता या क्षेत्रात चार शहाणी माणसं पुण्यात आहेत, पण त्यांची फार कदर पुणेकरांना आहे, असं दिसत नाही.
अवधूत परळकर हे पक्के मुंबईकर, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मुंबईच्या नजरेतून आहे, असं कुणी म्हणेलही. परंतु अभिनेते विक्रम गोखले यांची स्थिती जरा वेगळी आहे. त्यांचा जन्म आणि शिक्षण दोन्ही पुण्याचंच, पण गेली अनेक वर्षं व्यवसायामुळे ते मुंबईत राहातात. मूळचे पुणेकर असल्यामुळे त्यांना पुणं नीट माहिती आहे आणि आता मुंबईकर झाल्यामुळे ते पुण्याकडे काहीसे तटस्थपणे पाहू शकतात. त्यांच्या मते सांस्कृतिक या शब्दाचा अर्थ संस्कृतीशी असेल तर आज पुण्यात कोणत्या प्रकारची संस्कृती आहे? एकमेकांचा आदर करणं, एकमेकांना मदत करणं, समोरच्याच्या स्वातंत्र्याचा संकोच होणार नाही इतकंच स्वातंत्र्य आपण घेणं, शेजारधर्माचं-सार्वजनिक शिस्तीचं पालन करणं, ही मूल्यं पुण्यात दिसतात का? त्यांच्यामते, शांतता, विश्वास, सहिष्णुता, दुसर्यासाठी थांबण्याची तयारी अशा गोष्टींवर विश्वास असलेले पुणेकर आता तितकेसे दिसत नाहीत. त्यामुळे जिथे या शहराला सांस्कृतिकपणच उरलेलं नाही, ती राजधानी कशी राहील? असा त्यांचा सवाल आहे. मुंबईकडून चांगल्या गोष्टी घ्यायच्या सोडून नेमक्या वाईट गोष्टीच या शहराने उचलल्या आहेत, असाही त्यांचा आरोप आहे. पुण्यात आता सर्वच क्षेत्रांत खुज्या मंडळींचा जमाना सुरू झाल्याचं सांगून ते म्हणतात की, बड्या गोष्टी पुण्यात आता अपवादानेच घडतात. बाकी गोष्टी संस्कृती या शब्दाला आणि या शहराच्या एकेकाळच्या सांस्कृतिक प्रतिमेला लाज आणणार्याच आहेत.
विक्रम गोखलेंइतकीच संतप्त प्रतिक्रिया अभिनेते आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनीही दिली. त्यांच्या मते, ‘आपलं घर, आपलं गाव हा आपल्या जगण्याचा भाग असतो. ज्या पुण्यात माझी आख्खी हयात गेली, ते पुणंच आज मला ओळखायला येत नाही. तुमच्या जगण्याचे संदर्भच हरवले तर माणसाला हवेत तरंगल्यासारखं वाटतं.’ ते म्हणतात, “सध्याची माझी स्थिती पुण्यात उपर्यासारखी झाली आहे. काळाप्रमाणे पुणंही बदलणार हे मी मान्य करतो. पण बाहेरून येणार्या मंडळींनी इथली संस्कृती आधी समजावून घेतली पाहिजे. त्यातल्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण करत आपल्या बाहेरून आणलेल्या काही गोष्टी त्यात मिसळल्या पाहिजेत. मात्र इथे उलटच चाललंय. मी जर कुणाशी जिमखान्यावर बोलत उभा असेन, तर एखादी परदेशी भाषा ऐकावी तसं लोक वळून बघतात. त्यामुळे मला इथे आदिमानव झाल्यासारखं वाटतं. हे असंच चालू राहिलं तर तो दिवस लांब नाही, जेव्हा मूळ पुणेकरांना पुणेरी पोषाख घालून रेड इंडियन्ससारखे बघायला उभे करतील आणि सांगतील हे लोक बोलतायत ना ती इथली मूळ भाषा बरं का!” आगाशे यांच्या मते प्रचंड लोकसंख्या, वाहनं, गोंगाटामुळे पुण्यातली शांतता भंग पावली आणि विद्येच्या माहेरघराचं रूपांतर शिक्षणाच्या बाजारपेठेत झाल्यामुळे पुण्याचं पावित्र्य नष्ट झालं. त्यांच्या मते आजच्या पुण्याची मराठी नाटकं ही एकमेव जमेची बाजू आहे. गेल्या पंधरा वर्षांमध्ये सुदर्शन रंगमंचावर तरुण पोरांची एक पिढीच्या पिढी नवेनवे प्रयोग करते आहे. ते पाहायला गर्दीही तरुण पोरांचीच आहे. पण शहरातल्या वाढत्या कोलाहलात या मुलांचा अभिजात स्वर आता क्षीण ठरतो. बदलत्या वातावरणाचाही प्रभाव आहेच. पूर्वीच्या पुण्यात कोणीही कलावंत पंधरा मिनिटांत सायकलवर नाटकाच्या तालमीला यायचा. म्हणजे खर्च न करता आनंदाची गोष्ट करण्याची संधी त्याला होती. आता पंधरा कि.मी. वरून जर कोणी मोटर सायकलवरून येणार असेल, तर पेट्रोलला पैसे कुठून आणणार? पूर्वीच्या काळी नाटक करणार्या तरुणांना तालमीसाठी शाळांचे वर्ग मिळायचे. आता गावातले सगळेच हॉल लग्नाला भाड्याने दिले जातात. मग उत्पन्न बुडवून कोण तालमींना जागा देणार? नव्या काळाने असे अनेक लहान-मोठे प्रश्न पुण्याच्या सांस्कृतिकतेपुढे उभे केले आहेत.
डॉ. मोहन आगाशे जन्माने, शिक्षणाने आणि स्वभावाने अस्सल पुणेकर आहेत. त्यांनी व्यक्त केलेली वेदना ही खास मूळच्या पुणेकरांची प्रातिनिधिक वेदना मानावी लागेल. आपलं पुणं आपल्या हातून सुटत चाललं आहे, याची हतबलता त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होती.
मराठी नाटकाशी थेटपणे जोडलेले राजकीय विचारवंत गो. पु. देशपांडे मोहन आगाशेंप्रमाणे पुण्याविषयी बोलताना भावनिक होत नाहीत. काहीसे गंभीर होतात आणि पुण्याच्या सांस्कृतिकतेच्या दोन्ही बाजू समतोलपणे मांडण्याचा प्रयत्न करतात. ते करत असलेलं विश्लेषणही पुणेकरांवर अन्याय न करता पुण्याच्या उणिवा दाखवण्याचा प्रयत्न करतं. त्यांच्यामते जे लोक पुण्याला सांस्कृतिक राजधानी मानतात त्यांच्या डोळ्यांपुढे एकच पुणं असतं. ते अर्थातच सदाशिव-नारायण-शनिवार पेठांमधलं आणि डेक्कन जिमखान्यावरचं असतं. पण पुण्याच्या घडणीमध्ये पूर्व पुणं आणि पश्चिम पुणं अशा दोन्हींचा सहभाग आहे. महात्मा फुले आणि गोपाळ गणेश आगरकर हे दोघंही समकालीन होते एवढं जरी लक्षात घेतलं, तरी पुण्याच्या योगदानाचा पट किती व्यापक आहे हे समजू शकेल. फुल्यांच्या काळापासून पुण्यात नवे विचार, नव्या संकल्पना, नवी मांडणी यांचं सर्जन होतं आहे. पुढे तीच परंपरा जेधे आणि गाडगीळांच्या रूपाने चाललेली दिसते. या दोन्ही परंपरांचं सांस्कृतिक एकक एकच आहे. त्या दोन्हींमध्ये असलेला विरोधाभासी संवाद समजून घेतला पाहिजे. नंतरच्या काळात हा संवाद उरला नाही हे पुण्याच्या सांस्कृतिक चेहर्यांच्यादृष्टीने फारसं चांगलं झालं नाही, असं गो. पुं. चं म्हणणं.
गो.पु.नीं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणतात जिथे संपूर्ण महाराष्ट्रातली मराठी सांस्कृतिक व्यवस्थाच कोलमडून पडते आहे. तिथे तिची राजधानी अमक्या गावात की तमक्या गावात या चर्चेला काय अर्थ उरतो? मुळामध्ये भाषेशिवाय संस्कृती शक्य नाही हा पाया मान्य केला, तर जिथे मराठी भाषाच अडचणीत आली आहे, तिथे तिच्यावर आधारलेला डोलारा कसा टिकू शकेल? आता जे नवं औद्योगिकीकरण सुरू झालं आहे त्याची भाषा इंग्रजी आहे, मराठी नाही ही वस्तुस्थिती आहे. या स्थितीत केवळ इंग्रजीला विरोध न करता मराठी भाषेने तिच्याशी जुळवून घेतलं पाहिजे. हा प्रश्न जरा गुंतागुंतीचा आहे, त्यामुळे तो हलक्या हातांनी सोडवला पाहिजे. केवळ इंग्रजी हटाव किंवा मुलांना मराठी माध्यमात शिकवा असं म्हणण्याइतका तो वरवरचा नाही,’ असं त्याचं म्हणणं.
“माझं गेल्या पन्नास वर्षातलं निरीक्षण असं आहे की, मराठी माणसाची प्रवृत्ती भाषा हरवण्याची आहे,” गो. पु. त्यांच्या शैलीत सांगत असतात, “पुण्यासारख्या शहरात सामान्य माणूस पारिभाषिक संज्ञांसाठी इंग्रजी बोलला तर मी समजू शकतो, पण उद्या मी मुंबईला जातो आहे हे सांगायलाही तुम्ही इंग्रजी बोलता तेव्हा काही कळेनासं होतं.” गो.पुं.च्या मते मराठी नाटकाच्या बाबतीत पुण्यात खूपच आशावादी चित्र असलं तर मराठी कथा-कादंबरी-कवितेचं क्षेत्र मात्र आता पुण्याच्या बाहेर गेलं आहे. एकेकाळचं पुण्याचं सांस्कृतिक वैभव आता जाणवत नाही याचं दु:ख जरूर नोंदवा, पण त्याला अतिशयोक्त रूप येणार नाही याचीही काळजी घ्या असं त्यांनी मुलाखतीत आम्हाला सुचवलं.
आपल्याकडे ‘सांस्कृतिक’ शब्दाचा अर्थ फक्त साहित्यकलादि बाबतीत जोडला जातो. परंतु त्याच्याशी राजकीय-सामाजिक संदर्भही जोडलेले असतात, हे विसरलंं जातं. त्यामुळेच एखाद्या शहराच्या सांस्कृतिकतेबद्दल बोलताना त्या शहराच्या राजकारणाची संस्कृती कशी आहे, हेही पहावं लागतं. राज्यशास्त्राचे अभ्यासक आणि पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सुहास पळशीकर यांनी आम्हाला गेल्या शंभर वर्षांतले राजकारणातले बदलते प्रवाह उलगडून दाखवले. त्यांच्यामते शंभर वर्षांपूर्वी संपूर्ण देशाच्या राजकारणावर पुण्याचा ठसा होता. तर आज देशाच्या सोडाच, पण राज्याच्या राजकारणातही पुण्याला फारसं स्थान उरलेलं नाही. ते म्हणतात, “टिळकांच्या विचारांतल्या लोकशाही आशयाकडे पाठ फिरवून इथल्या कर्त्या मंडळींनी ब्राह्मणी तोरा मिरवण्यात धन्यता मानली. गांधीयुगात नाकं मुरडण्यामध्ये पुण्याने आपली शक्ती खर्ची केली. विसावं शतक जसजसं पुढे सरकलं तसतशी राजकीय सूत्रंही पुण्याच्या हातून निसटत गेली. फुले आणि गांधी यांची शक्ती कळली ती विठ्ठल रामजी शिंदे यांना. पण त्यांचं दोलायमान राजकारण पक्ष आणि गटांच्या गदारोळात टिकू शकलं नाही. 1930ची जेधे-गाडगीळ युती हा लोकशाहीच्या बहुजनवादी आशयाचा अविष्कार होता. राज्याच्या राजकारणाची चौकट या युतीतूनच साकारली. 1960 नंतर मात्र राज्याच्या सत्तेच्या राजकारणात पुण्याला स्थान उरलं नाही. राजकारणाची चौकट ठरवण्याच्या वैचारिक विश्वातही पुण्याला स्थान उरलं नाही. 1978 साली काँग्रेसच्या बहुपदरी फाटाफुटीनंतर पु.लो.द आघाडीचं नेतृत्व शरद पवारांकडे देण्याचं श्रेय एस.एम.जोशींकडे जातं, त्या अर्थाने राज्याच्या राजकारणात समर्थपणे वावरणारा अखेरचा पुणेकर म्हणूनच एसेमकडे पहावं लागेल,” असं त्यांचं म्हणणं.
आजच्या राजकीय संस्कृतीबद्दल ते म्हणतात, “गेल्या पाव शतकात मात्र माल आणि मॉल संस्कृतीला साजेसं राजकारण पुण्यात सुरू झालं. चंदेरी नटनट्या, भगभगीत भांडवलदारांची आणि भाडोत्री कार्यकर्त्यांची फौज घेऊन राजकारणावर ताव मारण्याचा काळ आला आहे. तुकडाफेकीच्या राजकारणाची छटेल छबी पुण्यात दिसू लागली आहे.” अशा राजकारणाला नेतृत्व आणि दृष्टी अशा दोन्हीचा अभाव असतो. वैचारिकतेची वानवा असते. राजकारणाला ‘इव्हेन्ट मॅनेजमेंट’ची अवकळा असते. पुण्यातल्या आजच्या ढिम्म राजकारणाचं प्रतिनिधित्व अशा राजकारणातून होतं, असं प्रा. सुहास पळशीकर यांचं मत आहे.
विविध क्षेत्रांतील या मान्यवरांच्या मतमतांतराचा एकत्र हिशेब आपण लावू गेलो, तर पुण्याच्या सांस्कृतिक नेतृत्वाबद्दल मिश्र भावना आपल्या मनात तयार होते. पण एकूणात सुराची दिशा पाहिली तर इतिहासातलं पुण्याचं थोरपण वर्तमानात उरलेलं नाही, या मतापर्यंत आपण येऊन पोहोचतो. पुण्याच्या थोरपणाबद्दल शंका व्यक्त करणार्यांचीही एक बाजू आहे, ती तूर्त बाजूला ठेवली आणि पुणं ही सांस्कृतिक राजधानी होती असं म्हणणार्या मंडळींच्या मतांचा धांडोळा घेतला, तरी पुण्याचं वर्तमान इतिहासाइतकं झळझळीत नाही, हे स्पष्ट होत जातं. पुणं सांस्कृतिकदृष्ट्या जिवंत शहर आहे आणि त्यात अजून धुगधुगी आहे, हे अमान्य करण्याचं कारण नाही. मात्र ही धुगधुगी क्षीण आहे व ती फोफावण्यासारखं वातावरण पुण्याच्या आसमंतात निश्चितपणे उरलेलं नाही, हे या मुलाखतींतून स्पष्ट होतं. या धुगधुगीचं स्वरूप त्यामुळे ‘परंपरा टिकवून ठेवणे’ वगैरे प्रकारात मोडतं. आपआपल्या क्षेत्रांत काही प्रयोगशील करण्याची धडपड करणार्यांमुळे ही धुगधुगी टिकून आहे. मात्र इथलं समाजमन ढवळून काढण्याची आणि महाराष्ट्रभर काय अगदी संपूर्ण पुण्याभरही आवाज घुमवण्याची क्षमता त्यात नाही. एकूणात, पुण्यातील प्रयोगशीलता, नाविन्याचा ध्यास, बंडखोरपणा आणि नेतृत्वाची आस खूपशी आटून गेली आहे. या चारही बाबी पुण्यात अस्तित्वात आहेत; परंतु त्याचा परीघ खूपच आक्रसून गेला आहे. त्यामुळेच पुण्याच्या सांस्कृतिक वातावरणाविषयी भलत्यासलत्या अपेक्षा बाळगून पुण्यात येणार्या माणसाचा पुरता भ्रमनिरास व्हावा, अशी परिस्थिती पुण्यात निर्माण झाली आहे, असं म्हणण्याची पाळी आली आहे.
‘महानगरीकरणाचा ’ संदर्भ
एक काळ असा होता की, नशीब काढण्यासाठी लोक जसे मुंबईला जात तसे कलांच्या आविष्कारासाठी आणि नाव कमावण्यासाठी पुण्यात येत. आज साहित्य-नाट्य-चित्रपट-चित्रकला-शिल्पकला-पत्रकारिता वगैरे विविध क्षेत्रांत पुण्यातील ज्या पाच-दहा लोकांची नावं घेतली जातात, त्यात असे ‘बाहेरून’ आलेले अनेक आहेत. पुण्यात आपल्या कलेला वाव मिळेल, तिथे संधी मिळेल, धुमारे फुटतील आणि आपल्यातील गुणांची कदर होईल, अशा भूमिकेतून पूर्वी पुण्यात लोक येत असत. अजूनही बाहेर संधी नसलेले लोक पुण्याकडे आशेने पाहतात; परंतु आता जमाना बदलला आहे. नव्या ‘कमर्शियल’ जगाचा दाब जसा मुंबईवर पडला, तसा पुण्यावरही पडत आहे. त्यातून ‘मागणीप्रमाणे पुरवठा’ हे तंत्र आकारास येत आहे. ‘मला अमुक एक गोष्ट करायची होती, म्हणून केली’, या स्वच्छंदीपणाला मिळणारा आश्रय आता कमी होत आहे. ‘लोकांना जे हवं आहे ते द्या’, या मागणीचा दाब वाढत आहे, त्यामुळे सर्जन घडून येण्याची शक्यता मावळत आहे. ‘ज्यांना असं काही सर्जन करायचं आहे, त्यांनी दूर कोपर्यात आपलंआपलं करावं’, असा आदेश या शहरातील व्यवहार सर्जनशीलांना देऊ पाहत आहे. हा रेटा पूर्वीपेक्षा बराच जास्त आहे आणि दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यातून त्यांच्यातील घुसमट वाढते; परंतु रेटा फोडून ‘मेनस्ट्रीम’ वर ताबा मिळवावा, इतकी शक्ती या प्रवाहात उरलेली नाही. त्यापेक्षा प्रवाहपतित होऊन जेवढं सर्जन करता येईल, तेवढं करावं, अशी भूमिका त्यांना घ्यावी लागत आहे. ‘अप्लाईड सर्जन’ असा एक नवा प्रकार त्यातून कदाचित रुजत आहे. या प्रक्रियेपासून कुणी म्हणून कुणी दूर नाही. जीवनातल्या सर्व क्षेत्रांना या प्रक्रियेला सामोरं जावं लागत आहे. बदलत्या आर्थिक वातावरणापासून सर्जनशीलतेला सुरक्षितता मिळत नसल्याने कलेच्या क्षेत्रात ‘सर्जन’ कमी आणि ‘व्यवहार’ जास्त, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
एक काळ असा होता की, नशीब काढण्यासाठी लोक जसे मुंबईला जात तसे कलांच्या आविष्कारासाठी आणि नाव कमावण्यासाठी पुण्यात येत. आज साहित्य-नाट्य-चित्रपट-चित्रकला-शिल्पकला-पत्रकारिता वगैरे विविध क्षेत्रांत पुण्यातील ज्या पाच-दहा लोकांची नावं घेतली जातात, त्यात असे ‘बाहेरून’ आलेले अनेक आहेत. पुण्यात आपल्या कलेला वाव मिळेल, तिथे संधी मिळेल, धुमारे फुटतील आणि आपल्यातील गुणांची कदर होईल, अशा भूमिकेतून पूर्वी पुण्यात लोक येत असत. अजूनही बाहेर संधी नसलेले लोक पुण्याकडे आशेने पाहतात; परंतु आता जमाना बदलला आहे. नव्या ‘कमर्शियल’ जगाचा दाब जसा मुंबईवर पडला, तसा पुण्यावरही पडत आहे. त्यातून ‘मागणीप्रमाणे पुरवठा’ हे तंत्र आकारास येत आहे. ‘मला अमुक एक गोष्ट करायची होती, म्हणून केली’, या स्वच्छंदीपणाला मिळणारा आश्रय आता कमी होत आहे. ‘लोकांना जे हवं आहे ते द्या’, या मागणीचा दाब वाढत आहे, त्यामुळे सर्जन घडून येण्याची शक्यता मावळत आहे. ‘ज्यांना असं काही सर्जन करायचं आहे, त्यांनी दूर कोपर्यात आपलंआपलं करावं’, असा आदेश या शहरातील व्यवहार सर्जनशीलांना देऊ पाहत आहे. हा रेटा पूर्वीपेक्षा बराच जास्त आहे आणि दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यातून त्यांच्यातील घुसमट वाढते; परंतु रेटा फोडून ‘मेनस्ट्रीम’ वर ताबा मिळवावा, इतकी शक्ती या प्रवाहात उरलेली नाही. त्यापेक्षा प्रवाहपतित होऊन जेवढं सर्जन करता येईल, तेवढं करावं, अशी भूमिका त्यांना घ्यावी लागत आहे. ‘अप्लाईड सर्जन’ असा एक नवा प्रकार त्यातून कदाचित रुजत आहे. या प्रक्रियेपासून कुणी म्हणून कुणी दूर नाही. जीवनातल्या सर्व क्षेत्रांना या प्रक्रियेला सामोरं जावं लागत आहे. बदलत्या आर्थिक वातावरणापासून सर्जनशीलतेला सुरक्षितता मिळत नसल्याने कलेच्या क्षेत्रात ‘सर्जन’ कमी आणि ‘व्यवहार’ जास्त, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अगदी छोट्याशा उदाहरणातून ही प्रक्रिया स्पष्ट व्हावी. पंधरावीस वर्षांपूर्वीपर्यंत पुण्यात उत्तमोत्तम आणि स्वत:ची अशी खास शैली असणारे चित्रकार होते. ओळीने मोजू लागलो तर आठ-दहा नावं सहज घेता येत. आजच्या घडीला त्यातील बहुतेक चित्रकारांची नावं गायब तर झाली आहेतच, शिवाय नवे दमदार चित्रकार तयार व्हायला तयार नाहीत. याउलट वीस वर्षांपूर्वी पुण्यात जेवढ्या अॅड एजन्सी (जाहिरात संस्था) होत्या, त्यापेक्षा त्यांची संख्या कमालीच्या वेगाने वाढली आहे. त्यांची आर्थिक उलाढालही प्रचंड आहे. आज नव्याने तयार होणारे चित्रकार ‘टेक्नोसॅव्ही’ असतात, त्यामुळे ते चित्रं वगैरे काढण्याच्या भानगडीत न पडता थेट जाहिरात संस्थेत व्हिज्युअलायजरपासून क्रिएटिव्ह आर्टिस्टपर्यंत काही ना काही बनतात. संगणकीय सफाई आणि डिझाइनिंगमधील सॉफ्टवेअरवर पकड असली की त्यांचं बरं चालतं. या भानगडीत त्याच्यातील कला स्वतंत्रपणे व्यक्त होतच नाही. होऊ शकत नाही. चित्रकलेपासून पत्रकारितेपर्यंत आणि लेखनापासून नाटक क्षेत्रापर्यंत जिकडेतिकडे हेच दिसत आहे. मुख्य प्रवाहावर ‘व्यवहारां’चा दाब वाढत आहे, त्यामुळे कलावंतांच्या निर्मितीवर बंधनं येऊ लागली आहेत.
याशिवाय आणखी एक कारण दिसू शकतं. पूर्वी महाराष्ट्रभरातून सर्जनशील लोक पुण्यात येत, कारण पुण्यात एकप्रकारचं गावपण होतं. त्याचा चेहरा शहराचा असला तरी व्यवहारांना गावपणाची डूब होती. कोल्हापूर-सातार्यापासून नागपूर-वर्ध्यापर्यंतच्या लोकांना पुण्यात आल्यानंतर ‘अॅडजस्ट’ व्हायला त्रास होत नसे. कारण पुणं हे त्यांच्या शहरापेक्षा मोठं असलं, तरी मुंबईचा अजस्रपणा आणि घाईगर्दी पुण्यात नव्हती. पुण्यातील लोकांना सुद्धा या निवांतपणाचा अभिमान होता. मात्र गेल्या दहा-पंधरा वर्षांत पुण्याचं गावपण हरवत चाललं आहे. गप्पा, मित्रमंडळं, कट्टा संस्कृती, चर्चा, भाषणं, परिसंवाद वगैरे बाबी इतिहासजमा होत आहेत. पुण्याचं शहरपण वाढत चाललं आहे. पुणं मुंबईप्रमाणे महाशहर बनत आहे. पुण्यातले लोक पैसा मिळवण्याच्या आणि अधिक पैसा मिळवण्याच्या मागावर आहेत. कमीत कमी वेळात अधिकाधिक पैसा मिळवण्याचा प्रयत्न त्यातून वाढतो आहे. त्यामुळे स्वत:च्या आवडीनिवडी, छंद-वाचन, कलास्वाद यापेक्षा आहे तो वेळ पैसा बनवण्यात घालण्याचा पायंडा इथे पडत आहे. महाशहराचे असे सर्व नियम आता पुण्याला लागू होत आहेत. मुंबईप्रमाणेच पुण्यातही पैसे मिळवून देणार्या संधींची मुबलकता निर्माण होत असल्यामुळे ‘पैसा मिळवून देणारं शहर’ अशी पुण्याची नवी ओळख पुढे येत आहे. ‘कलांचं माहेरघर’ ते ‘पैसे मिळवून देणारं शहर’ असा प्रवास झाल्यामुळे पुण्याचा संपूर्ण चेहराच आता बदलून गेला आहे. कलानिर्मितीतला स्वान्तसुखायपणा, सर्जन करण्याचा निवांतपणा, रूढ विचार न करण्यातला स्वच्छंदीपणा या बाबींना या नव्या चेहर्यात जवळपास जागा नाही. उलट ‘तुमच्यातील कला वापरून पैसा मिळवा,’ या वृत्तीची त्सुनामी आलेली आहे. या घडामोडीचा पुण्याच्या सांस्कृतिक जीवनावर मोठा परिणाम झाला आहे.
एखादं शहर कोणत्या प्रश्नावर सार्वजनिक चर्चा करतं, यावर त्या शहराची सांस्कृतिकता तपासून पाहता येते, असं मानलं तर पुण्याच्या गावपणावर महाशहराची छाया कशी पडली आहे, हे कळू शकतं. पुण्याच्या वातावरणात कुण्या लेखकाची कादंबरी, कुण्या चित्रकाराचं पेंटिंग प्रदर्शन, कुण्या नाटककाराचं नाटक, कुण्या पत्रकाराचा लेख वगैरे नसतं. पुणेकरांना चिंता असते ट्रॅफिकची. रस्त्यांवरच्या खड्ड्यांची, बेहिशेबी होणार्या शहराच्या वाढीची. वृत्तपत्रंही याच विषयांनी सजलेली असतात. सर्वस्वी मनोरंजनाला वाहिलेल्या ‘रेडिओ मिर्ची’ला ‘बंपर टू बंपर’ असा गर्दीने वेढलेल्या रस्त्यांवर छोटासा का होईना, आयटेम करावासा वाटतो, यातच सर्व ते आलं. पुण्यातल्या समस्यांनी पुणेकरांना अशा खिंडीत गाठलं आहे की, त्यांच्या मनाचा -बुद्धीचा-दृष्टीचा विकास करणार्या बाबींची त्यांना आठवणच होऊ नये. त्यामुळेच पुण्यातल्या सार्वजनिक कार्यक्रमांना तुरळक उपस्थिती दिसते. व्याख्यानं, सभा, चर्चासत्रं वगैरे बाबी या त्यामुळेच आम पुणेकरांच्या विचारविश्वाबाहेर निघून गेल्या आहेत. परिणामी पस्तीस लाखांच्या पुण्यात राजवाडे सभागृहाच्या शंभर खुर्च्याही भरू शकत नाहीत आणि शंभर वर्षांची परंपरा सांगणार्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचं सभागृह अजूनही पन्नास पंचाहत्तर लोकांनाच सामावून घेणारं आहे. हे सभागृहही संपूर्ण भरत नाही, ही आणखीन वेगळी गोष्ट. पुण्यात कार्यक्रमांसाठी अनेक सभागृहं आहेत, परंतु तिथली उपस्थिती संयोजकांना लाज आणणारी असते. उपचार म्हणून कार्यक्रम ठेवले जातात नि उपचार म्हणून पार पाडले जातात, इतकंच. याला कुणी सांस्कृतिक जिवंतपणा म्हणणार असेल, तर म्हणोत बापडे!
याउलट गृहोपयोगी वस्तूंची प्रदर्शनं, कपडेलत्ते-फॅशनवेअर- किचनवेअर यांची प्रदर्शनं मात्र गर्दीने ओसंडून वाहत असतात. महाराष्ट्रात अन्यत्र कुठे भरत नसतील, एवढी प्रचंड प्रदर्शनं पुण्यात भरतात. या अर्थाने पुणे ही सांस्कृतिक नव्हे तर, ‘ग्राहकांची राजधानी’ बनली आहे. माणसांनी स्वत:चं रूपांतर ग्राहकांमध्ये करून घेतल्यामुळे असं प्रदर्शन लागलं की माणसं तिथे रांगा लावतात नि खरेदीधर्म पाळून खिसे रिकामे करतात. पण गंमत अशी आहे, की इथे खिसे रिकामे करण्यात आनंद मिळवणारे पुणेकर पुस्तक प्रदर्शनांमध्ये जाऊन मात्र पुरते कंजुष होतात. प्रकाशकांवर-विक्रेत्यांवर व लेखकांवर उपकार करण्याच्या भूमिकेतून पुस्तकं विकत घेतली जात असावीत, असा अनुभव सतत येतो. त्यातूनच ‘पुस्तकं ही आपली गरज आहे’ ही सांस्कृतिकता पुणेकरांमधून लुप्त होत आहे, असं वाटून जातं. हॉटेलिंगवर मुक्तहस्ते पैसा उधळणारे पुणेकर पुस्तक प्रदर्शनात आले, की अचानक बदलतात आणि सवलतींची मागणी करू लागतात. पुण्यात कोणतंही नवं हॉटेल सुरू झालं की, त्याच्या दारावर तोबा गर्दी करणारे पुणेकर पुस्तकप्रदर्शनात मात्र सांस्कृतिक भूक कशी विसरून जातात, ही अनाकलनीय गोष्ट आहे. पुण्याबाहेरच्या सर्व साहित्यसंमेलनांचा अनुभव असा आहे, की लोक तिथे येऊन भरभरून पुस्तकं विकत घेतात. भले खिशात पैसे कमी असतील; परंतु पुस्तकं घेतली जातात. पुण्यात मात्र खिशात पैसे असूनही पुस्तकांना ‘बिनगरजेची’ या कॅटेगरीत टाकलं जातं. पस्तीस लाखांच्या पुण्यात एक महिन्याच्या काळात पुस्तकप्रदर्शनाची उलाढाल पन्नास लाखांची झाली, तर वृत्तपत्रांत पहिल्या पानावर बातमी येते. याउलट, याहून जास्त पैसा एकाच संध्याकाळी पुण्यातल्या हॉटेलवाल्यांच्या गल्ल्यांत जमा होत असेल. याअर्थाने पुणे ही सांस्कृतिक राजधानी उरलेली नसून, ‘खवैय्यांची राजधानी’ बनली आहे.
इथे कुणाच्या खाण्यापिण्यावर आणि खाद्यवैविध्याचा आस्वाद घेण्यावर टीका करण्याचा प्रश्न नाही. मात्र एखाद्या शहरात कोणत्या व्यवसायांची चलती आहे, यावर त्या शहराची ओळख कळू शकते. गेल्या पाच-सात वर्षांत पुण्याच्या खाद्यसंस्कृतीने वेगाने कात टाकली आहे आणि महागड्या-चकचकीत नि झगझगीत हॉटेलांची लाट पुण्यात आली आहे. पिझ्झा हट, मॅकडोनॉल्ड, सीसीडी, अशा नावांची पुण्यात चलती आहे आणि देशी-विदेशी पदार्थांचा नुसता महोत्सव भरला आहे. या पार्श्वभूमीवर उत्तम मराठमोळे किंवा पुणेरी पदार्थ देणार्या हॉटेलांची संख्या मात्र कमालीने घटत आहे. ज्या पुणेरी पदार्थांसाठी पुणे एकेकाळी सुप्रसिद्ध होतं, ती दुकानं-हॉटेल्स आज शोधून काढावी लागतात. आपलं वैशिष्ट्य टिकवून ठेवून नव्याची भर घालण्यात अशारीतीने पुणं सपशेल अपयशी झालं आहे. हे फक्त खाद्यसंस्कृतीपुरतं मर्यादित नाही. प्रत्येक बाबतीत पुण्याची वैशिष्ट्यं पायाखाली घेणं आणि नव्या प्रथा डोक्यावर घेणं चालू आहे. त्यामुळे कोणतीही महाशहरं जसा स्वत:चा चेहरा हरवून बसतात, तसंच काहीसं पुण्यात घडत आहे. या प्रक्रियेचं वाईट वाटून घेण्याची फुरसत अर्थातच फार कुणाजवळ नाही आणि बहुतेकतर या नव्या बदलात डुंबून आनंद मिळवू पाहणारेच आहेत.
नव्या अर्थव्यवस्थेमुळे जे नवे बदल होत आहेत, त्याचा हा सारा परिणाम आहे. असा परिणाम प्रत्येक शहरावर झाला आहे, परंतु गंमत अशी आहे की, तो परिणाम स्वत:च्या बाजूने वळवून घेण्याची क्षमता असूनही पुण्याने ती संधी दवडली आहे. ज्या शहरांना फार थोर परंपरा नसते, परंपरेची अभेद्य साखळी नसते, प्रगती-विकास-उन्नती यांचा अनुभवच ज्या गावांनी घेतलेला नसतो, त्या गावात नवे बदल असोशीने स्वीकारले जातात. परंतु इतर शहरांपेक्षा वेगळे असल्याचा टेंभा मिरवणार्या पुणे शहराबाबत वेगळा अनुभव मात्र आला नाही. हा सारा बदल स्वीकारण्यात पश्चिमेकडचं पुणं जे मध्यमवर्गीय -उच्चमध्यमवर्गीयांची राजधानी आहे - तेच अग्रेसर आहे. पुण्याच्या सांस्कृतिक पुढारलेपणावर ज्यांची मक्तेदारी आहे, तेच पलटल्यामुळे पुण्याची सांस्कृतिक नासधूस होणं स्वाभाविक आहे. पुण्याच्या पश्मिमेचं असं पाश्चिमात्यीकरण झालेलं असताना पूर्व पुण्यातील सामाजिक नेतृत्वाची फुले प्रणित परंपराही थंड पडत गेलेली दिसते. या भागातील कष्टकरी वर्ग रोजच्या जगण्याच्या लढाईत पुरता अडकल्यामुळे त्याचाही कष्टकरी संस्कृतीतील सहभाग मंदावलेला दिसतो. मुळात पूर्वीची पूर्व-पश्चिम विभागणी कालबाह्य व्हावी, एवढी प्रचंड पुण्याच्या सीमांवर वाढ हल्ली झाली आहे आणि त्यातून पुण्याचा चेहरा पुरता पालटून गेला आहे.
गेल्या सात-आठ वर्षांत पुणे इतक्या वेगाने विस्तारलं आहे की, त्यामुळे त्याला कोणत्याही अर्थाने कवेत घेणं अवघड होऊन बसलं आहे. तांत्रिक अर्थाने ते एकच शहर असलं, तरी पुणे शहरात अनेक शहरं वसली आहेत आणि त्यांचा एकमेकांशी जवळपास संबंध नाही. त्यामुळे पुण्याविषयी एकच एक विधान करणं अवघड होऊन बसलं आहे. पूर्वी पुण्याचा चेहरा सर्वस्वी ‘मराठी’ होता. आज तो तसा उरलेला नाही. पस्तीस लाखांच्या पुण्यात सात-आठ लाख अमराठी लोक आहेत. त्यातील काही आयटी; बीटीवाले आहेत; तर उरलेले फुटकळ व्यवसाय करणारे सेवाक्षेत्रातील मजूर-कामगार-कारागीर आहेत. त्यांच्या वस्तीची ठिकाणं वेगळी आहेत, त्यांचे-त्यांचे इलाखे वेगळे आहेत. पुण्याच्या सार्वजनिक जीवनात या नव्याने आलेल्या ‘बाहेरच्यां’चा फारसा संबंध नाही. महाराष्ट्रभरातून पोटापाण्यासाठी आलेल्या कष्टकरी मंडळींना सार्वजनिक जीवनात सहभाग घेता यावा, इतका अवसरच नसतो. तर दुसरीकडे, पुण्यात जो विविध उद्योग-व्यवसाय-नोकरी करून दमदार पैसा मिळवणारा वर्ग कमालीने वाढला आहे, तो हाती आलेल्या पैशाने मोहरून गेला आहे आणि मल्टिप्लेक्स, बिगबझार, वीकएंडर, मॉल्स यांच्या विश्वात निघून गेला आहे. कुटुंबातील एक माणूस युरोप-अमेरिका-ऑस्ट्रेलियात नोकरी-धंद्यासाठी स्थायिक झालेली कुटुंबही पुण्यात सर्वाधिक आहेत. तिकडून येणारा डॉलर-युरो यांनी त्यांची दुनिया बदलून टाकली आहे. असे विविध समाजघटक पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेपासून दुरावले आहेत. तुटून गेले आहेत. त्यामुळेच पुण्यात चालणारे प्रयत्न-प्रयोग-उपक्रम या सार्या गदारोळांत हरवून जातात नि निष्प्रभ बनतात. सांस्कृतिक जिवंतपणा असतो, परंतु प्रचंड पुण्याच्या बदललेल्या स्वरूपापुढे तो क्षुल्लक बनतो. शहराच्या व्यवहारांवर तो आरूढ होऊ शकत नाही. त्यामुळे प्रयत्नांमागील ऊर्जा कमी झाली किंवा विविध दाबांमुळे प्रयत्नांमधील सातत्य थांबलं की सारं काही थांबणार, अशी ही अवस्था आहे. पुण्याचं वैशिष्ट्य असलेल्या ज्या गोष्टी अशा संपत गेल्या, त्या संपल्याचं कळतही नाही, इतका या शहराचा वेग वाढला आहे. परंतु नव्या विस्तारत्या पुण्याला त्याचं सोयरसुतकही नाही.
गेल्या पंचवीस वर्षांत अशा संपून गेलेल्या गोष्टीही खूप आहेत. ज्या लेखन, संशोधन, कलानिर्मितीसाठी पुणं प्रसिद्ध होतं, आणि ज्या संस्थांमार्फत त्याचं नियमन होत होतं, त्या संस्थांना आज आलेली कळा देखील खेदजनक आहे. अनेक संस्था बंद पडल्या आहेत, अनेक संस्थांची निव्वळ कलेवरं उरली आहेत, अनेक संस्था सरकारदरबारी नोंद आहे म्हणून कागदावर टिकून आहेत, अनेक संस्था उपचारापुरत्या शिल्लक आहेत, काही संस्था अशा आहेत ज्या चालू आहेत मात्र लोकांपासून तुटलेल्या आहेत. काही संस्था अशा आहेत, ज्यांचं काम आणि ज्यांची थोरवी नव्या पुण्याला कळलेलीच नाही. अनेक संस्था अशा आहेत ज्यांच्याकडे काही डझन हेक्टर जमीन आहे, परंतु ती पडीक आहे. वाढत्या पुण्याच्या गरजा लक्षात घेऊन संस्थेची वाढ करण्याची आंतरिक ऊर्जा त्यांच्यात नाही. ज्ञानसाधनेची दीर्घपरंपरा लाभलेल्या शहराचा असा र्हास होणं ही निश्चितपणे चिंताजनक गोष्ट आहे.
पुण्याच्या शैक्षणिक व संशोधनसंस्थांचा महामेरू म्हणजे पुणे विद्यापीठ. आसपासच्या दोन-चार जिल्ह्यांचा या विद्यापीठाच्या कार्यकक्षेत समावेश असला, तरी स्थापनेपासून पुणे शहराचा व इथल्या ज्ञानवंतांचा त्यावर प्रभाव होता. महाराष्ट्रातील अन्य कोणत्याही विद्यापीठापेक्षा पुणे विद्यापीठाला अजूनही जास्त प्रतिष्ठा असली, तरी मिळालेला अजोड वारसा तितकाच समर्थपणे चालवला जात आहे, असं छातीठोकपणे कुणी म्हणू शकत नाही. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पुण्यात गल्लोगल्ली भाषणं करताना दिसत असले तरी, पुणे शहराच्या वैचारिक विश्वात विद्यापीठाचा काही सहभाग उरलेला नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे.
गेल्या काही वर्षांत पुण्यात भारती विद्यापीठ, सिंबायोसिस सारखी स्वतंत्र विद्यापीठं उदयाला आली, त्यामुळे पुणे विद्यापीठाचं ‘एकमेवाद्वितीयत्व कमी झालं आहे. देश-परदेशांतील विद्यापीठांची सर्टिफिकेटही पुण्यात बसून मिळू लागली आहेत. रस्तोरस्ती चकचकीत इन्स्टिट्यूटस तयार झाल्या आहेत. पुण्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी इंग्लंड-अमेरिकेत शिकायला जाऊ लागले आहेत. त्यामुळे पुण्यात शैक्षणिक संधीच्या बाबतीत प्रचंड उपलब्धता निर्माण झाली. मात्र हे सर्व नवे पर्याय महागडे आणि फक्त श्रीमंत वर्गालाच परवडणारे आहेत. इथे टिकायचं असेल तर हजारो-लाखो रुपये खर्चावे लागतात. त्यामुळे पुणे विद्यापीठ व त्यातील कॉलेजांमध्ये वर्दळ दिसते. अन्यथा हे भाग्य विद्यापीठाला लाभण्याचं कारण उरलेलं नाही.
पुण्यात जशा महागड्या आणि चकचकीत शिक्षणसंस्था तयार झाल्या आहेत, तसाच पुण्याच्या सामाजिक क्षेत्राला ही संपूर्ण नवा झगझगीत चेहरा लाभला आहे. एकेकाळी राष्ट्रसेवादल, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, विद्यार्थी सहाय्यक समिती, स्त्री-आधार केंद्र, हमाल पंचायत अशा सामाजिक प्रबोधन व चळवळी करणार्या संस्था-संघटनांचा पुण्यात बोलबाला होता. महात्मा फुल्यांच्या बदनामीविरोधात पाच-दहा हजारांचा मोर्चा काढण्याची ताकद पुण्याच्या संघटनांमध्ये -सामाजिक पुढार्यांमध्ये होती. आता वाद-चर्चा-मोर्चेजवळपास बाद झाले आहेत आणि पुण्यात एन.जी.ओज् चे दिवस सुरू झाले आहेत. संस्था-संघटनांची जातकुळीच बदलून गेली आहे. देशी-परदेशी संस्थांकडून निधी मिळवून कामं करण्याचे दिवस आले आहेत. इथे काम करणारे कार्यकर्ते मॅनेजमेंट आणि सोशलवर्कची सर्टिफिकेटं मिळवलेले असतात नि गोरगरिबांसाठी काम करणार्या या ‘कार्यकर्त्यां’ना पंधरा-वीस हजार रुपये पगारही असतात. अनेक संस्थाचालकांचा एक पाय विमानात नि एक पाय जमिनीवर असतो. या संस्था ना लोकांना जबाबदार असतात ना लाभार्थींना. या फॉरेनफंडेड स्वयंसेवी संस्थांचा रेटा पुण्यात असा आहे की, त्यामुळे इथली सामाजिक चळवळ जवळपास कोलमडून पडली आहे. कोपर्यात ढकलली गेली आहे. महात्मा फुल्यांनी पायाभरणी केलेल्या पुण्याच्या सामाजिक चळवळीचं असं पुरतं एनजीओकरण झालं आहे. पोटतिडकीने काम करणार्या कार्यकर्त्यांऐवजी पोटभरू ‘स्वयंसेवा’ करणार्यांची आता पुण्यात चलती आहे. त्यामुळे येत्या काळात पुणे हे महाराष्ट्राच्या ‘एनजीओची राजधानी’ बनण्याची शक्यता अधिक आहे.
पुण्यात जशा महागड्या आणि चकचकीत शिक्षणसंस्था तयार झाल्या आहेत, तसाच पुण्याच्या सामाजिक क्षेत्राला ही संपूर्ण नवा झगझगीत चेहरा लाभला आहे. एकेकाळी राष्ट्रसेवादल, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, विद्यार्थी सहाय्यक समिती, स्त्री-आधार केंद्र, हमाल पंचायत अशा सामाजिक प्रबोधन व चळवळी करणार्या संस्था-संघटनांचा पुण्यात बोलबाला होता. महात्मा फुल्यांच्या बदनामीविरोधात पाच-दहा हजारांचा मोर्चा काढण्याची ताकद पुण्याच्या संघटनांमध्ये -सामाजिक पुढार्यांमध्ये होती. आता वाद-चर्चा-मोर्चेजवळपास बाद झाले आहेत आणि पुण्यात एन.जी.ओज् चे दिवस सुरू झाले आहेत. संस्था-संघटनांची जातकुळीच बदलून गेली आहे. देशी-परदेशी संस्थांकडून निधी मिळवून कामं करण्याचे दिवस आले आहेत. इथे काम करणारे कार्यकर्ते मॅनेजमेंट आणि सोशलवर्कची सर्टिफिकेटं मिळवलेले असतात नि गोरगरिबांसाठी काम करणार्या या ‘कार्यकर्त्यां’ना पंधरा-वीस हजार रुपये पगारही असतात. अनेक संस्थाचालकांचा एक पाय विमानात नि एक पाय जमिनीवर असतो. या संस्था ना लोकांना जबाबदार असतात ना लाभार्थींना. या फॉरेनफंडेड स्वयंसेवी संस्थांचा रेटा पुण्यात असा आहे की, त्यामुळे इथली सामाजिक चळवळ जवळपास कोलमडून पडली आहे. कोपर्यात ढकलली गेली आहे. महात्मा फुल्यांनी पायाभरणी केलेल्या पुण्याच्या सामाजिक चळवळीचं असं पुरतं एनजीओकरण झालं आहे. पोटतिडकीने काम करणार्या कार्यकर्त्यांऐवजी पोटभरू ‘स्वयंसेवा’ करणार्यांची आता पुण्यात चलती आहे. त्यामुळे येत्या काळात पुणे हे महाराष्ट्राच्या ‘एनजीओची राजधानी’ बनण्याची शक्यता अधिक आहे.
पुण्याचं सर्वांगीण सपाटीकरण
पुण्याच्या बाबतीत घडत आहे अशी आणखी एक प्रक्रिया आहे, सार्वत्रिक सपाटीकरणाची. सामाजिक-सांस्कृतिक -राजकीय अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांत कमालीचं सपाटीकरण होताना दिसत आहे. सरधोपटपणा हा या सपाटीकरणाचा अंगभूत भाग आहे. पुण्यातील वृत्तपत्रसृष्टी हे याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. सर्व दैनिकांचा सारखा चेहरा आणि सामाजिक प्रश्नांपासून सुरक्षित अंतरावर राहण्याचा पवित्रा याबाबत सार्यांमध्ये कमालीचं साम्य आहे. येऊन-जाऊन पुण्याच्या नागरी सुविधांबाबत आगपाखड करणं एवढंच काय ते करताना दिसतात. केसरी, काळ, दीनबंधू, विजयी मराठा, जागरूक अशा तेजतर्रार वृत्तपत्रांमधून एकेकाळी गाजलेले वाद कुठे नि पुण्याच्या खड्ड्यांमध्ये स्वत:ला बुचकाळून वाढणारी दैनिकं कुठे, असा प्रश्न यामुळे पडतो. वादांपासून आणि चर्चांपासून दूर गेलेली पुण्याची वृत्तपत्रसृष्टी पाहता पाहता ‘वाचका’चा ‘ग्राहक’ करणारी आणि त्याला छोट्या-मोठ्या प्रश्नांबाबत समुपदेशन करणं यावर धन्यता बाळगणारी बनली आहे. त्यामुळेच पुण्याच्या दैनिकांपेक्षा विदर्भ-मराठवाड्यातली छोटी दैनिकंही बरीच जमिनीवर आहेत आणि जमिनीवरील प्रश्नांशी जोडलेली आहेत, असं म्हणावं लागतं. त्यांच्याकडे तांत्रिक सफाई किंवा पायाभूत सुविधांची जोड तेवढीशी नसेलही; परंतु कॉर्पोरेट जाहिरातींसांठी केली जाणारी तडजोड त्यांच्यात दिसत नाही. अंक वाचण्यासाठी वाचक हवेत की, जाहिरातींचा पाऊस पडण्यासाठी वाचक हवेत असा प्रश्न पुण्याच्या दैनिकांना विचारावा, अशी परिस्थिती सध्या तयार झाली आहे. त्यातून वृत्तपत्रांमध्ये एकसारखेपणा आणि तोचतोचपणा आलेला आहे.
पुण्याच्या बाबतीत घडत आहे अशी आणखी एक प्रक्रिया आहे, सार्वत्रिक सपाटीकरणाची. सामाजिक-सांस्कृतिक -राजकीय अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांत कमालीचं सपाटीकरण होताना दिसत आहे. सरधोपटपणा हा या सपाटीकरणाचा अंगभूत भाग आहे. पुण्यातील वृत्तपत्रसृष्टी हे याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. सर्व दैनिकांचा सारखा चेहरा आणि सामाजिक प्रश्नांपासून सुरक्षित अंतरावर राहण्याचा पवित्रा याबाबत सार्यांमध्ये कमालीचं साम्य आहे. येऊन-जाऊन पुण्याच्या नागरी सुविधांबाबत आगपाखड करणं एवढंच काय ते करताना दिसतात. केसरी, काळ, दीनबंधू, विजयी मराठा, जागरूक अशा तेजतर्रार वृत्तपत्रांमधून एकेकाळी गाजलेले वाद कुठे नि पुण्याच्या खड्ड्यांमध्ये स्वत:ला बुचकाळून वाढणारी दैनिकं कुठे, असा प्रश्न यामुळे पडतो. वादांपासून आणि चर्चांपासून दूर गेलेली पुण्याची वृत्तपत्रसृष्टी पाहता पाहता ‘वाचका’चा ‘ग्राहक’ करणारी आणि त्याला छोट्या-मोठ्या प्रश्नांबाबत समुपदेशन करणं यावर धन्यता बाळगणारी बनली आहे. त्यामुळेच पुण्याच्या दैनिकांपेक्षा विदर्भ-मराठवाड्यातली छोटी दैनिकंही बरीच जमिनीवर आहेत आणि जमिनीवरील प्रश्नांशी जोडलेली आहेत, असं म्हणावं लागतं. त्यांच्याकडे तांत्रिक सफाई किंवा पायाभूत सुविधांची जोड तेवढीशी नसेलही; परंतु कॉर्पोरेट जाहिरातींसांठी केली जाणारी तडजोड त्यांच्यात दिसत नाही. अंक वाचण्यासाठी वाचक हवेत की, जाहिरातींचा पाऊस पडण्यासाठी वाचक हवेत असा प्रश्न पुण्याच्या दैनिकांना विचारावा, अशी परिस्थिती सध्या तयार झाली आहे. त्यातून वृत्तपत्रांमध्ये एकसारखेपणा आणि तोचतोचपणा आलेला आहे.
हेतूच उरला नाही की सगळ्या गोष्टी एकाच स्तरावर येतात, या नियमाचं दर्शन पुण्याच्या राजकारणातही होतं. पुण्यातले सर्व पक्ष एकाच चेहर्याचे बनलेले दिसतात ते त्यामुळेच. त्यांचे झेंडे वेगवेगळे आहेत; परंतु ‘व्यवहारा’त ते सर्व एकत्र आहेत. पुण्याचा विकास, पुण्याचे प्रश्न, पुण्याची वाढ वगैरेंबाबतीत कुणाचं स्वतंत्र मत नाही. कारण एक मोठं ‘डिझाईन’राबवण्यात ते सारे एकत्रच आहेत. पक्षाच्या नेतृत्वाला फाट्यावर मारून अन्य पक्षांशी युती-आघाडी करण्याची एक नवीच रीत पुण्यात हल्ली रुजत आहे. एखादा निर्णय घेताना पक्षांमध्ये मतभेद होतात नि पाहता-पाहता फेरजुळणी होऊन निर्णय एकमताने घेतले जातात, ही जादूही पुण्यात पुन: पुन्हा अनुभवायला येते आहे. राजकीय व्यवहारांमध्ये पैशाच्या व्यवहाराला आलेल्या महत्त्वामुळे पक्षांमधील ‘आतला आवाज’ पुरता दबून जाताना दिसतो आहे. ‘मॅनेज’होण्याची किंमत पोहोचती झाली की, विरोध मावळतो आणि सर्व प्रश्न सुटतात, हा प्रकारही पुण्यात पुन्हा पाहायला मिळतो आहे. त्यातून सत्ताधारी व विरोधक या भेदांच्या सीमारेषा पुरत्या पुसल्या जातात आणि लोकशाहीचा विनोद बनवला जातो. गेल्या पाच-सात वर्षांपासून रुजू पाहत असलेल्या या प्रक्रियेमुळे पुणेकरांना कुणी वालीच उरलेला नाही. या राजकीय सपाटीकरणामुळे पुणेकरही सपाट व्हायची वेळ आता आली आहे.
सांस्कृतिक क्षेत्राच्या सपाटीकरणाबद्दल तर बोलायलाच नको. पुण्याचं मेनस्ट्रिम सांस्कृतिक जग ‘नॉस्टेल्जिया’मध्ये आकंठ बुडालेलं आहे. पुण्यातून भावगीतांचा जमाना हटता हटायला तयार नाही. जुन्या जमान्यातल्या या ‘असंबद्ध’वाटणार्या भावगीतांना नव्याने प्रेमगीतांची जोड लाभलेली दिसते. माणसांमाणसांमधील व्यवहार कमालीचे गुंतागुंतीचे होत असताना, पुणेरी प्रेमगीतांना मात्र त्याचा स्पर्शही झालेला दिसत नाही. गोडगुलाबी-भावुकभावुक लिहिलं की लोकप्रियता मिळते, हे ज्यांना ठाऊक आहे ते हाच उद्योग करतात नि वृत्तपत्रांत, जाहिरातींत नि होर्डिंग्जवर मिरवले जातात. पुणेकरही या मंडळींना डोक्यावर घेतात. संगीत नाटकांच्या आठवणी आळवणं, कौटुंबिक नाटकांची दळणं दळणं वगैरे कार्यक्रम एका बाजूला नि लावण्यांचे तेच ते कार्यक्रम व स्पॉन्सर्ड प्रकारचे स्टेज शो दुसर्या बाजूला असा पुणेरी सांस्कृतिक कार्यक्रमांचा एकूण पट आहे. कलेचा संबंध मनोरंजनाशी आणि मनोरंजनाचा भावनांशी जास्त असतो, तसाच बुद्धीशी आणि विचारप्रक्रियेशी असतो, याचा पुरता विसर पुण्याला पडलेला दिसतो आहे. मूठभर प्रयोगशील माणसं आपापल्या अभिव्यक्तीसाठी जे काही प्रयत्न करतात, तेवढंच काय ते वेगळेपण उरलं आहे. अन्यथा सारं काही सपाटच सपाट!
पुण्याची ही सारी सांस्कृतिक घसरगुंडी खरंतर पुणेकरांना जाणवायला हवी. डोळ्यांत खुपायला हवी. परंतु सांस्कृतिक राजधानी असल्याचा अमरपट्टा पुण्याच्या कंबरेला कायमस्वरूपी बांधलेला आहे, असा समज करून घेतलेला असल्याने पुण्याच्या घसरगुंडीची जाणीव कदाचित होत नसावी. शिवाय सांस्कृतिक राजधानी असण्यात इथल्या धावपळीच्या जगण्यात कुणाला का रस असावा? खरं पाहता, पुण्याच्या पांढरपेशा नवमध्यमवर्गाकडे एवढं आर्थिक स्वास्थ्य नेहमी राहिलेलं आहे की, त्याने महाराष्ट्राचं सांस्कृतिक नेतृत्व करावं. परंतु पुणेकरांना आता असं आर्थिक स्वास्थ्य पुरेसं वाटत नसून, आर्थिक भरारीसाठी स्वत:चं सर्व काही सोडून देश-विदेशातली भिरभिर त्याला हवीहवीशी वाटते आहे. त्यातून येणार्या ताणापासून मुक्त मिळवण्यासाठी मग तो टीव्ही फेम बाबा नाहीतर श्रीश्री प्रकारच्या लोकांना बिनदिक्कत जवळ करतो आहे. थोडक्यात, सांस्कृतिक श्रीमंतीतून मिळणारी मन:शांती गमवायची नि आर्थिक श्रीमंतीसाठी करावी लागणारी उलघाल स्वीकारून कृत्रिम मन:शांंतीमागे पळायचं, असा काहीसा उद्योग पुण्यातील मोठा वर्ग करत आहे. सांस्कृतिक वैभव नसलं तरी त्यांना चालणार असल्यामुळे सांस्कृतिक सतर्कता नि नव्या सर्जनाची कुणाला गरजच वाटत नाही. परिणामी पूर्वस्मृतींमध्ये डुंबावं नि अंग पुसून पैशाच्या मागे धावावं, हा पुणेरी संस्कृतीचा आधारस्तंभ असलेल्या मध्यमवर्गाचा जीवनमंत्र बनतो आहे. एखाद्या अळीप्रमाणे खेचत सरपटत माणसं जगत राहतात, मात्र त्या अळीचं फुलपाखरामध्ये रूपांतरच होत नाही. पण त्याचं दु:ख इथे कुणाला दिसत नाही. कारण फुलपाखरू होण्यात नि फुलपाखराच्या रंगाच्या उधळणीचा आनंद मिळवण्यात इथे रस आहे कुणाला?
पुणेकरांच्या आनंदाच्या, मन:शांतीच्या, मनोरंजनाच्या कल्पना जगण्याच्या नव्या रेट्यात बदलून गेल्या आहेत. त्यामुळेच पुणं ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी उरली आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. खरं पाहता, एकेकाळी पुणं ही महाराष्ट्राची राजधानी असेल तर, पन्नास-शंभर वर्षांत तिने देशाच्या सांस्कृतिक राजधानीचा मान मिळवायला हवा होता. प्रत्यक्षात पूर्वजांनी मिळवून दिलेला मान, प्रतिष्ठा नि त्यातून येणारा दरारा याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. ‘पुणे तिथे सारेच उणे’ असं म्हणण्याची वेळ येत्या काळात पुण्यावर येऊ नये म्हणजे मिळवली!
________________________________________________________________________
संदर्भ : (‘साप्ताहिक सकाळ’, दिवाळी २००६)
________________________________________________________________________
संदर्भ : (‘साप्ताहिक सकाळ’, दिवाळी २००६)
(मुलाखती, माहिती संकलन व लेखन :आनंद अवधानी, सुहास कुलकर्णी, मनोहर सोनवणे, रवींद्र कोल्हे, अमृता वाळिंबे)
Comments
Post a Comment