सवय : एक कम्फर्ट झोन - नीलिमा किराणे

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. एक माणूस घोडीवरून भरधाव जात असतो. त्याची ऐट आणि घाई पाहून एकजण कुतूहलानं ओरडून विचारतो, "एवढ्या घाईनं कुठे चाललात शिलेदार?‘ घोडेस्वार म्हणतो, "माहीत नाही. घोडीला माहितीय, तिलाच विचारा.‘

या गोष्टीला शतकं लोटली. अजूनही आपापल्या "सवय‘ नावाच्या घोडीवर आपण स्वार होतो, तेव्हा, हळूहळू चालणारी, हातातली वाटणारी सवय भरधाव दौडू लागते. तिला आपोआप दौडताना पाहून आपण खुशीत येतो. नंतर कधीतरी कळतं, हातातला लगाम कधीच ढिला पडलाय, स्वार आपण असलो, तरी आता सवय आपल्याला दामटवत नेतेय, आपण अडकलोय. सवय हा बहुआयामी असा अदृश्‍य बॅरीअर आहे. सुरवातीला जाणवतही नाही, इतका हलका आणि नंतर तोडता येत नाही एवढा पक्का.

सवयी जन्मजात नसतात. एखादी गोष्ट करण्याची गरज असते. ती केल्यामुळे बरं वाटतं, म्हणून ती पुन्हापुन्हा केली जाते आणि सवय पक्की होते. स्वयंपाक, मुलं-बाळं, दुखलं-खुपलं ही कामं स्त्रियांची, तर शिकार करणं, बाहेरच्या कटकटींपासून रक्षण करणं ही पुरुषांची अशा श्रमविभागणीची पूर्वी गरज होती. पिढ्यानपिढ्यांच्या सवयीतून आपापल्या कामांत कौशल्य येत गेलं, तशी आपल्या बाईपणा किवा पुरुषपणाच्या सवयीच्या कम्फर्ट झोनमध्ये आपण कधी अडकलो हे कळलंही नाही.

सवयीत सोयही असते. त्यामुळे कम्फर्ट झोन तयार झाला, की त्या गोष्टी गृहीतकं बनतात. "एकट्या पुरुषाच्या जेवणाचे हाल होणारच.‘ "बायकांना सुतार, इलेक्‍ट्रीशियन वगैरे हाताळणं काय जमणार?‘ अशी समर्थनं देणारी विधानंही सवयीची बनतात. खरं तर वेळ आल्यावर सगळं जमतं. पण तोपर्यंत आपल्या सवयीच्या बॅरीअरमध्ये अडकूनही आपण तिला कौतुकानं मिरवत राहतो.

लहानपणी मुलांना वागणं, अभ्यास शिकवता शिकवता, मुलांना सांगत राहण्याची सवय मोठ्यांचा कब्जा करते. मुलं मोठी झालीत हे लक्षातही येत नाही. कधी मुलांची चीडचीड जाणवली, तरी "राहवत नाही म्हणून सांगतो‘ हे स्वत:चं कौतुक असतंच. अनेकांना संवाद करायचा म्हणजे कुणाची तरी टवाळी करायची, अशी सवय असते. टोमणे मारल्याशिवाय किंवा लागट बोलल्याशिवाय त्यांना राहवत नाही. राहवत नाही याचा अर्थ, ती सवयीची घोडीच स्वाराला हाकून नेत असते.

सवय चांगली की वाईट हे तिच्या परिणामावर ठरतं. जोपर्यंत तिच्यातून मिळणारी सोय मोठी असते, परवडत असते तोपर्यंत सवयी त्रासदायक नसतात. सवय बदलणं अनिवार्य झाल्यावर मात्र आपण लगाम खेचायला हवा. सवय बदलताना सुरवातीचा टप्पा थोडा जड जाणारच असतो. कारण जुना कम्फर्ट झोन मोडत असतो. पण निर्धारानं बाहेर पडता येऊ शकतं. हाच नियम सामाजिक सवयींबाबतही लागू पडतो. बहुसंख्येच्या व्यक्तिगत सवयी समान होतात, तेव्हा त्या समाजाच्या सवयी बनतात. त्यामुळे सवयीचं बॅरीअर असणं समजून घेतल्यावर तिला निर्धारानं बदलणं ही वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही परिवर्तनाची संधी असू शकते. इथे महत्त्वाचा ठरतो तो आपला दृष्टिकोन.

एखादी सवय बदलायची वेळ आली तर आपण कुरकुरतो? समर्थनं देतो की विचार करून स्वीकारतो? हे त्यासाठी तपासून पाहायला हवं. उदा. कचऱ्याची समस्या सोडवणं आता अनिवार्यतेपर्यंत पोचलंय. कचरा समूळ संपवण्याचा तर्कशुद्ध मार्ग म्हणजे ओला, सुका कचरा मुळापासून शंभर टक्के वेगळा ठेवायचा. ओल्या कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती आणि सुक्‍या कचऱ्याचा पुनर्वापर करायचा आहे हे माहीत असतं. तरीही स्वत:च्या सवयी बदलणं जड जातं. "महापालिकेने आम्हाला दोन बादल्या दिल्याच नाहीत,‘ "पालिकेच्या गाड्यांमध्ये कचरा एकत्र होतोच‘ "आमच्या सोसायटीतले लोक ऐकत नाहीत‘ अशी समर्थन दिली जातात. "आपल्या देशात स्वच्छता येणं शक्‍य नाही‘, असंही छातीठोकपणे (अभिमानानं?) बोललं जातं. थोडक्‍यात, आपल्या सवयीच्या आणि समर्थनांच्या कम्फर्ट झोनमध्ये रमणं निवडलं जातं.

ही सवय बदलण्यासाठी वस्तुनिष्ठ विचार करून "स्वत:ला‘ प्रश्न विचारावे लागतील. उदा. "रडगाणं महत्त्वाचं की स्वच्छता?‘ मी मरेपर्यंत माझा देश घाणेरडाच असणार, ही खात्री अभिमानास्पद आहे की लज्जास्पद?‘, "लोक, देश असेच आहेत तर मी कोण? माझी भूमिका काय?‘ असे प्रश्न सवयीच्या त्या विचारचक्राला भेदायला मदत करतील. सवयीचं कौतुक किंवा तक्रार दोन्हीही बॅरीअरचंच काम करतात हे उमजेल, तेव्हा मी कचरा समस्येच्या मुळाशी जाऊन वस्तुस्थिती समजून घेईन. ओला कचरा प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवल्याने विघटित होत नाही म्हणून सडतो, दुर्गंधी येते. एकत्र ठेवलेला सुकाही खराब झाल्याने वापरता येत नाही. म्हणून "माझ्याकडून मिश्र कचरा निर्माणच होता कामा नये. लोक काहीही करोत, माझा कचरा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी फक्त माझी आहे,‘ हे मी मान्य करेन, तेव्हा समर्थनं थांबतील आणि सवय बदलेल. कृती घडेल, कृतीतून वैयक्तिक आणि सामाजिक परिवर्तन घडू शकेल. ते जमलं नाही, तर ""अपयशी होणाऱ्या 99 टक्के माणसांना समर्थनं देण्याची "सवय‘ असते,‘‘ हे कार्व्हरचं विधान मान्य करावं लागेल.
________________________________________________________________________________
Reference-www.esakal.com dated 19.09.2015

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण