तोचि धर्म ओळखावा-डॉ. अनघा लवळेकर

‘धर्म’ आणि ‘धार्मिकता’ या गोष्टीची अशी काय खासियत आहे, की ज्यामुळे लोकांना त्याचे आयुष्यात असणे इतके गरजेचे वाटते? ते म्हणजे फक्त काही नियम/जपजाप्य प्रार्थना आणि कर्मकाण्डच आहे का? बहुसंख्य लोक जरी धर्माचरण म्हणून हे करत असले तरी जेव्हा खोलात जाऊन संशोधकांनी अभ्यासले तेव्हा दिसले, की धर्म त्यांच्या दृष्टीने अशा काही धारणांचा, श्रद्धांचा विषय असतो की ज्यामुळे जगण्यातील काही सनातन प्रश्नांना उत्तरे मिळतात, असे त्यांना वाटत असते.

आजोबा आता थकले होते. ऐंशी वर्षे उलटून गेली होती. तसे ते पूर्णपणे निरीश्वरवादी. थिऑसॉफिस्ट सोसायटीचे तरुणपणापासून सदस्य. विश्वरचनेचे प्रतीक असलेला ‘तारा’फक्त भिंतीवर लटकलेला असायचा. कधी देवपूजा केली नाही की कधी कुठले धर्माशी संबधित पूजाअर्चाचे सोपस्कार पाळले नाहीत. पण गेल्या काही दिवसांत त्यांनी नातीकडे आग्रह धरला होता की मला ‘दासबोध’ आणून दे. काल तर म्हणाले की मला ‘रामायण, महाभारताचे मूळ खंड ऐकायचेत. त्यातील ईश्वरी तत्त्व समजून घ्यायचय!’ नातीला कळेच ना की लहानपणापासून देवपूजा-पुराण, कर्मकाण्ड यांना उडवून लावणारे आजोबा खरे, की हे दासबोध, रामायण, महाभारत ऐकायचा हट्ट धरणारे?
मुळात माणसाच्या जाणिवेतल्या धर्माचे रूप कसे असते आणि खरंच, काय असते आयुष्यात धर्म नावाच्या गोष्टीचे स्थान? त्याचा आपल्या शरीरावर-मनावर अनुकूल प्रभाव असतो का प्रतिकूल? असे अनेक प्रश्न आपल्यापकी अनेकांच्या मनता घोंघावत असतात. त्याला काहीसं सामोरं जाण्याचे प्रयत्न ‘आश्वासक मानसशास्त्राचे’ अभ्यासक करत आहेत. मुळात ‘धर्म’ हा एक नाजूक विषय. राजकीयदृष्टय़ा, सामाजिकदृष्टय़ा अतिज्वालाग्राही! पण सध्या या लेखापुरता तरी तो अगदी वैयक्तिक पातळीवरची एखाद्याची श्रद्धा किंवा विशिष्ट धर्मतत्त्वांवरचा आणि परंपरा-कृतींवरचा विश्वास या दृष्टीनेच घेतलेला आहे.
‘धार्मिकता’ कशाला म्हणायचे यावर लोकांमध्ये खूप वेगवेगळी मते असतात. एका अभ्यासात १०० लोकांना ‘धार्मिक’तेच्या बद्दल त्यांची उदाहरणे नोंदवायला सांगितली. यामध्ये काही विद्यार्थी होते काही चर्चशी संबंधित लोक होते. त्यातून-धर्मस्थळाला नियमित जाणे, प्रार्थना, ‘देव’ मानणे, नियमितपणे दान करणे, व्यक्तिगत फायद्यासाठी ‘देव’ मानणे, नतिकता जपणे अशा गोष्टींमध्ये धार्मिकता असल्याचे मुद्दे समोर आले. पण दोन्ही गटांमध्ये ‘महत्त्वाच्या’ मानलेल्या गोष्टींमध्ये बराच फरक होता. विद्यार्थ्यांना ‘वैयक्तिक फायद्यासाठी देव मानणे’ सोयीचे वाटत होते तर दुसऱ्या गटाला ‘चर्चला नियमित जाणे’ म्हणजेच धार्मिकता असे वाटत होते.
बऱ्याच ऊहापोहानंतर असे लक्षात येते की धार्मिकतेचे दोन प्रवाह आहेत. उदाहरणार्थ- विजयची धार्मिकता! दरवर्षी देवळाला भेट दिली तरच त्याला ‘धर्म’ पाळल्याचे समाधान मिळते. ही झाली ‘रचनांमध्ये’ व्यक्त होणारी धार्मिकता. ती देवळं, कर्मकाण्डं/ परंपरागत आचार, देवाबद्दलच्या ठाशीव कल्पना यांनी बांधली आहे. त्याउलट स्वरूपच्या मते देवळात जाणे किंवा जप करणे यापेक्षा ध्यानामधून परमेश्वराचे स्मरण करणे म्हणजे धार्मिकता आहे. त्या चिंतनातून तिला जो अनुभव येतो तो तिला जास्त आवडतो. ही झाली व्यक्तिगत अर्थ शोधणारी धार्मिकता. कुठल्याही ‘लेबल्ड’धर्म पंथामध्ये या दोन्ही वृत्ती दिसतात. एक वेगळ्या प्रकारचा ट्रेंड गेली काही काळ प्रचलित होतोय. तो म्हणजे, ‘आम्ही धर्म मानत नाही पण ‘अध्यात्म’ मानतो! अशा व्यक्तींना ‘धर्म’ ही गोष्ट ‘अंधश्रद्धा’ किंवा ‘चौकटबद्ध’ विचारांशी जोडलेली वाटते. प्रख्यात मानसशास्त्र अब्राहम मॅस्लो म्हणत असत, की ‘कुठल्याही पारंपरिक धर्मविचारांच्या पलीकडे जाऊनही आत्मिक अनुभवांशी जोडले जाणे सहजशक्य आहे.’ ‘योगशास्त्र’ हे एक असे साधन मानलेले आहे की जे अशा कुंपणाच्या बाहेर जाऊन अनेकांना ‘द्वय-रूप’ परिचय करून देऊ शकते. (पण दुर्दैवानं काही लोकांनी ते एकाच विशिष्ट धर्माच्या दावणीला बांधण्याचा प्रचार आणि अट्टहास केलाय!) पण खरंच ‘पारंपरिक अर्थाने पुढच्या पिढय़ांपर्यंत पोचलेला धर्म म्हणजे काहीतरी भयंकर’ आणि ‘पद्धतीमुक्त अध्यात्म हे अत्यंत उदात्त’ अशी काळीपांढरी विभागणी असते का? संशोधन असे सांगते की बहुतांश लोकांना ‘धार्मिक’ आणि ‘आध्यात्मिक’ दोन्ही असावेसे वाटते. यातली वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी एक मजेदार प्रयोग केला गेला.
काहीशे लोकांना धर्माविषयी कागदावर चार विधाने दिली गेली. मी कसा आहे? १) धार्मिक पण आध्यात्मिक नव्हे. २) धार्मिक नाही पण आध्यात्मिक ३) धार्मिक आणि आध्यात्मिक दोन्ही ४) दोन्ही नाही. त्यात गट तीन ही ७४ टक्के लोकांची निवड होती. गट १ -४ टक्के व गट २ -१९ टक्के लोकांनी निवडला तर गट ३ फक्त ३ टक्के लोकांची निवड होती. जे लोक गट १ मध्ये होते त्यांच्यावर पालकांचा, एकूण लहान वयातल्या कौटुंबिक वातावरणाचा परिणाम खूप जास्त होता असे आढळून आले. अनेकांना धर्म अंतर्मुख व्हायला प्रवृत्त करतो इतकंच नाही तर मानसिक शक्ती वापरायला उद्युक्त करतो, असेही दिसले.
‘धर्म’ आणि ‘धार्मिकता’ या गोष्टीची अशी काय खासियत आहे, की ज्यामुळे लोकांना त्याचे आयुष्यात असणे इतके गरजेचे वाटतं? ते म्हणजे फक्त काही नियम/जपजाप्य प्रार्थना आणि कर्मकाण्डच आहे का? बहुसंख्य लोक जरी धर्माचरण म्हणून हे करत असले तरी जेव्हा खोलात जाऊन संशोधकांनी अभ्यासले तेव्हा दिसले, की धर्म त्यांच्या दृष्टीने अशा काही धारणांचा, श्रद्धांचा विषय असतो की ज्यामुळे जगण्यातील काही सनातन प्रश्नांना उत्तरे मिळतात असे त्यांना वाटत असते. (धर्माच्या लौकिक अर्थातील मर्यादा गृहीत धरल्या तरी सर्वसामान्य माणसाला तो एक महत्त्वाचा नांगर वाटतो, स्वत:च्या आयुष्याला धरून ठेवणारा! भरकटू न देणारा!)
नचिकेत पुष्कळ र्वष नियमितपणे दर मंगळवारी गणपतीच्या दर्शनाला जातो (इथे कुठल्याही धर्माची व्यक्ती असू शकते!) त्याला त्यामागचे कारण विचारले तर तो म्हणतो, की ‘तिथे गेल्यानं मला खूप शांत वाटतं. बाहेरच्या कोलाहलापासून लांब आल्यासारखं वाटतं.’ जस्मिन जेव्हा वजू करते तेव्हा तिला वाटतं की, ‘अल्लाहचं आपल्याकडे लक्ष आहे. आपण नीट वागतोय ना याकडे तो पाहत आहे.!’ लिलियन सब्बाथला जाते तेव्हा तिला वाटतं की माझ्या जगण्याला काहीतरी अर्थ मिळतो आहे. समीराला इतरांच्या आवाजात आवाज मिसळून चर्च कॅरोल्स गाताना इतरांच्याबद्दल एक अननुभूत आपुलकी वाटते. विराजला आयुष्यात इतके दु:खद प्रसंग सामोरे आले की एका क्षणी तो पूर्ण खचला. त्यावेळी योगायोगाने त्याच्या एका मित्राने त्याला एका धार्मिक प्रवचनाला नेले. त्यातला आशय ऐकताना विराजला जणू स्वत:च्याच प्रश्नाचे उत्तर मिळाले. त्यातून त्याची जगण्याची दिशाच बदलली असे त्याला वाटते. थोडक्यात- ‘धर्म’ माणसाच्या अनेक भावनिक-मानसिक गरजा पुरवतो, असे दिसते. त्यात जवळीक, आधार, जीवनधारणा, मन:शांती, स्वनियंत्रण अशा अनेक गोष्टी आहेत. या सगळ्या मनोव्यापारांमुळे एरवी कुठलीही धार्मिक पाश्र्वभूमी नसणाऱ्या (न्यूट्रल) गोष्टी त्या त्या विशिष्ट प्रसंगात एकदम ‘पवित्र’/ ‘धार्मिक’ बनून जातात. नळातून वाहणारं पाणी कमंडलूत/तांब्याच्या पूजापात्रात गेलं की तीर्थ बनून जाते. गॅसची जळती ज्योत जेव्हा निरांजनात तेवते तेव्हा ती ‘विझू’ द्यायची नसते. नाश्त्याला खायचा शिरा पूजेत ठेवला की ‘प्रसाद’ होऊन जातो. रोजच्या व्यवहारातल्या अशा कितीतरी गोष्टींपासून ते नातेसंबंधांपर्यंत धर्म आपल्या संकल्पना घडवत असतो. विशेषत: भारतासारख्या अतिप्राचीन संस्कृतीतील बहुतेक लोकांच्या रक्तातच धर्म भिनला आहे. (अलंकारिक अर्थानं हं!) असे दिसते.
या संदर्भातील एका संशोधनामध्ये असंही दिसून आलं की जी जोडपी विवाहाला ‘धर्मबंधन’ म्हणून पाहतात ती विवाहांतर्गत समाधान जास्त दर्शवतात आणि अधिक रचनात्मक पद्धतीने प्रश्न सोडवतात. (अर्थात या सर्वाची दुसरी समाजशास्त्रीय बाजू आहे हे नाकारण्याचा इथे प्रयत्न नाही, पण सर्वसामान्यपणे नातेसंबंधांना एक भक्कम टेकू देण्यासाठी लोक जाणता-अजाणता धर्म नक्कीच वापरतात असे दिसते.!)
धार्मिकता किंवा आध्यात्मिकतेच्या काळ्या बाजूही आपल्या डोळ्यासमोर आहेतच. शेवटी ही जर ‘मूल्यं’ आहेत असे मानले तर ती कशी व्यक्त होतात यावरच त्याचे महत्त्व आणि परिणाम ठरणार हे उघड आहे. पण तरीही या संकल्पनांचा लोकमनावर जो पगडा आहे त्याचा शरीर-मन:स्वास्थ्यावर होणारा परिणाम अभ्यासकांचा आवडता विषय बनला आहे.
साधारणपणे असे दिसते की ‘धार्मिक’ व्यक्ती आयुष्याबद्दल अधिक समाधानी संतुष्ट असतात. (ठेविले अनंते-तसेचि रहावे!) त्यांची कमिटमेंट-वचन पाळायची वृत्ती जास्त असते. (वचन मोडलं तर परमेश्वराला कसं तोंड दाखवू?) विशेषत: आधी फारशा धार्मिक नसणाऱ्या व्यक्ती उतारवयात/ प्रौढवयात तिकडे जास्त वळतात आणि ‘पूर्वीपेक्षा जास्त समाधान मिळतं’ असे व्यक्त करताना दिसतात. जी लहान व किशोरवयीन मुलं ही धार्मिकतेच्या वातावरणात वाढतात, त्यांच्यामध्ये बालगुन्हेगारी, व्यसनाधीनता, लंगिक कृतींमधला अपरिपक्व वयातला सहभाग हे तुलनेने इतर मुलांपेक्षा खूप कमी आढळते असे निरीक्षण आहे. बऱ्याचदा धर्मामुळे जे विपरीत घडतं त्याकडे निर्देश केला जातो तो त्या त्या वेळी योग्यही असतो, पण त्याचवेळी धर्माच्या अनामिक बंधनामुळे माणसं इतरांशी चांगला व्यवहार करतात. अनेक चुकीच्या गोष्टींना आळाही बसतो, सत्कार्याची प्रेरणाही मिळते ही पण एक खरी बाजू आहे. पाण्याची जशी सृष्टीला बहरण्यासाठी गरज असतेच, पण तेच पाणी जेव्हा रौद्र रूप धारण करते, प्रदूषित होते तेव्हा ते ‘जीवन’ राहत नाही, तसंच काहीसे हे आहे असे वाटते. कोिनग, मॅकलो आणि लार्सन (२००१) याच्या ‘धर्म व आरोग्य’ यावरील हस्तपुस्तिकेत असे अनेक अभ्यास संदर्भ दिलेले आहेत. त्यात सर्वसाधारण आरोग्याबद्दलचे निष्कर्षही मोठे मजेदार आहेत. खासकरून नियमितपणे धर्मस्थळांना भेटी देणाऱ्या लोकांमध्ये शरीर मनाचं स्वास्थ्य, दीर्घायुषीपण, आजारातून झटकन् बरे होण्याची प्रक्रिया या गोष्टी जास्त प्रमाणात दिसून आल्या आहेत. तरुणपणातच नयनला जेव्हा संधिवात जडला तेव्हा ती खूपच निराश झाली. नुसत्या उपचारांनी फरक पडेना. मग कुणीतरी तिला ब्रह्मविद्या शिक असे सांगितले. त्या निमित्ताने ती त्या केंद्रात जाऊ लागली. तेथील पूजा-साधना आदीमध्ये सहभागी होऊ लागली. हळूहळू तिच्या मनाची उभारी परत आली आणि संधिवाताशी दोन हात करत ती रूटीन चालू ठेवू लागली. तिच्या मते, ‘जेव्हा मला कळले की दु:ख हा जगण्याचा अपरिहार्य भाग आहे तेव्हा मला पटले आणि त्यात बुडण्यापेक्षा चार पुण्याच्या गोष्टी हातानं घडाव्यात म्हणून मी तिथे जात राहिले. त्यानंच माझे दुखणं निम्म बरं झालं.’ हे झाले फारच खासगी मत. पण खरंच असं घडतं का- ते बघायला एकदा पाच हजार प्रौढांचा सुमारे २८ र्वष अभ्यास केला गेला. आरोग्यावर परिणाम करणारे इतर मुख्य घटक (म्हणजे जुने आजार, व्यसने, आहार आदी) नियंत्रित केलेल्या अभ्यासात या लोकांच्या शरीरस्वास्थ्यतेचा अभ्यास केला तेव्हा नियमितपणे धर्मस्थळांना जाणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचा दर लक्षणीयरीत्या
कमी आढळला.
ही सर्व संशोधने काय दर्शवतात? तर ‘धार्मिक’ असण्याचा आणि सर्वसाधारण स्वास्थ्याचा खूप जवळचा संबंध आहे. (आधी मलाही याबद्दल खूप शंका होत्या, पण इतके संशोधन दाखले वाचल्यावर मी ‘वस्तुस्थिती’ अशी असू शकते हे तूर्त मान्य केलंय) पण मग ‘याची कारणमीमांसा काय असेल? तर अभ्यासकांच्या मते धर्मशिकवणुकीतून मिळणाऱ्या काही गोष्टी याचा आधार आहेत.
आरोग्यकारक सवयी : धर्मविचारात आरोग्य-अनारोग्याबद्दलचे स्पष्ट दाखले दिलेले असतात. (उदा. ‘देह देवाचे मंदिर’ किंवा वारकरी पंथातील ‘माळा घालणे’, संयमाची शिकवण, विशिष्ट व्रते, पदार्थ वज्र्यता किंवा समावेश इ.)
सामाजिक पाठबळ : समविचारी, समश्रद्ध लोकांशी एक भावनिक नातं जोडलं गेल्यानं येणारी उबेची, सुरक्षिततेची भावना असते. गरजेच्या वेळी मदत मिळण्याची शाश्वती असते. (असं प्रत्यक्षात घडतंही!) संकटाच्या वेळी धक्का पचवण्यासाठीची एक िभत (इ४ऋऋी१) म्हणून अशा स्नेही जनांचा आधार वाटतो (आजारी आहे त्याला बरे वाटावे म्हणून प्रार्थना करणे वगरेमुळे त्या माणसाला फिलींग गुडची जाणीव येते.)
मनोसामाजिक ऊर्जा किंवा अर्थपूर्णता मिळणे : धार्मिक किंवा आध्यात्मिकतेततून सकारात्मक ऊर्जा मिळण्याचा अनुभव अनेकजण नोंदवतात. चित्ताची स्थिरता मिळणे, अस्तित्वाच्या प्रश्नांना उत्तरे मिळणे यामुळेही मन:स्वास्थ्यावर अनुकूल परिणाम होतो.
असं सगळं असलं तरी ‘धार्मिकता’ काही जणांसाठी आधारवड ठरते तर काहींसाठी नरकयातना (पुन्हा धार्मिक कल्पना!) का ठरते? त्याचं उत्तर देताना मानसतज्ज्ञ धार्मिकतेची दोन प्रकारांमध्ये विभागणी करतात. एक म्हणजे बाह्य़ धर्मप्रेरणा आणि दुसरी आंतरिक धर्मप्रेरणा. जे लोक धर्मश्रद्धेची जोड रोजच्या व्यवहारातल्या गोष्टींशी घालतात (सुरक्षा, सोयी, सुखदपणा, प्रतिष्ठा आदी) असे लोक हे ‘उपयुक्ततावादी श्रद्धाळू’ असतात. ते धर्मतत्वांशी जोडलेले नसून केवळ बाह्य़रूपाला आपलेसे करणारे असतात. त्यांच्याकडून ‘धार्मिकतेचा’ वापर हा इतरांना त्रास देण्यासाठी, स्वार्थासाठी, शोषण करण्यासाठी होऊ शकतो. धार्मिकता ही त्यांच्या दृष्टीनं ‘मूल्य’ नसते तर ती इतर गरजा भागवण्याचे फक्त साधन असते. या उलट जे लोक ‘धर्म’ खऱ्या अर्थाने जगतात -( साधन म्हणून नाही किंवा ‘अफूची गोळी’ म्हणून नाही) ते खऱ्या जीवनमूल्यांचे दर्शन घडवतात. धर्म हे त्यांच्यासाठी आयुष्य समजून घेण्याचे साधन असते. त्यात तुच्छतेला, पूर्वग्रहाला, तिटकाऱ्याला किवा लालसेला स्थान नसते. (अर्थात मूळ धर्म विचारातही जेव्हा पूर्वग्रहांना आणि दुजाभाव करण्याला स्थान नसते तेव्हा) अशा माणसांची आंतरिक धर्म प्रेरणा त्यांना शरीर मनाच्या स्वास्थ्याकडे नेते. असे लोक हे अंधश्रद्धांच्या किंवा कर्मकाण्डाच्या पलिकडे पोचलेले असतात. ते काही फार त्यागी, संत-महंत, अवलियेच असले पाहिजेत असे नाही, तर ते तुमच्या-माझ्या-आपल्यातही असतात. ती प्रेरणा ओळखून काढता यायला हवी. योग साधना, मधुराभक्ती, संगीतातून ईश्वरस्मरण हे अशासाठीचे काही मार्ग आहेत पण प्रत्येकाला आपला मार्ग शोधता येणे शक्य आहे.
‘धर्माचा’ खोलातला अर्थ समजून घेणे, आवश्यक वाटले तर काही उपचारांचा अवलंब करणे (किंवा न करणं), मूळ जीवन तत्त्वज्ञानाशी त्याला जोडणे यातून मनाची (आणि शरीराचीही) स्वस्थता मिळवायला मदत होऊ शकते, इतकंच तथ्य ध्यानी घ्यावे असे वाटते!
हा विषय खूप व्यापक आहे. मर्यादित जागेत मांडणे अशक्य आहे. दांभिक धार्मिकतेची हिडीस रूपे आपल्यासमोर येत आहेत आणि ती िनदनीयच आहेत. पण मानसशास्त्रात याचा जो वस्तुनिष्ठ अभ्यास झाला आहे. त्याचाही थोडा परिचय व्हावा म्हणून ही बाजू नोंदवली आहे. वाचकांनी सरसकट अर्थ न काढता विचारांना चालना म्हणूनच याकडे बघावं ही विनंती. शेवटी धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां, महाजनो येन गत: स पन्थ:- (धर्माचे रूप खूप गूढ आहे, प्रत्येकाला ते संपूर्णपणे कळणे शक्य नाही, पण धर्माचा साक्षेपाने- जीवन धारणा म्हणून अवलंब करणाऱ्या साधकांच्या मार्गानं जाण्याचा प्रयत्न करणं शक्य आहे!)
डॉ. अनघा लवळेकर – anagha.lavalekar@jnanaprabodhini.org
___________________________________________________________________
संदर्भ :http://www.loksatta.com/aajchepasaydan-news/religiousness-1143891/


Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण