बोली भाषांच्या संवर्धनासाठी...इरगोंडा पाटील
भाषेचा जन्म बोलण्यासाठी झालेला असल्याने त्याचे मूळ स्वरूप हे बोली असेच असते. त्यामुळे सर्वच भाषा या प्रथम बोली आहेत. भाषा ही भाषाच असते, ती शुद्ध अगर अशुद्ध असत नाही. तरीही भाषेच्या प्रमाणीकरणाची गरज शिक्षण आणि व्यवहारासाठी आवश्यक असते. जगभर ज्ञानाचा व्यवहार करणारा एक अभिजात वर्ग आहे. हा संख्येने कमी असला, तरी सत्ताधारी असतो. त्यामुळे ज्ञानाचा व्यवहार करणाऱ्या अभिजनांची बोली हीच त्यांनी प्रमाण भाषा बनवली. त्याच भाषेची जी विविध रूपे असतात, त्यांना ज्ञानाच्या व्यवहाराची भाषा म्हणून स्थान मिळाले नाही. या सर्व बहुजनांच्या बोली आहेत.
मराठीतील प्रमाण भाषा ही अभिजनांची बोली आहे. तीच आज शिष्ट भाषा म्हणून शिक्षणाची भाषा म्हणून मान्य आहे. मराठीच्या विविध बोली या मराठीची विविध रूपे आहेत. बहुजन दैनंदिन व्यवहार याच बोलीतून करतो. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे जगभरच्या बोली भाषा मृत्यूपंथाला लागतील, असे भाषावैज्ञानिक सांगत आहेत. या बोलीभाषांच्या संवर्धनासाठी ‘युनेस्को’ने योजना तयार केली आहे. केंद्र सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत. या मलमपट्ट्या आहेत. प्रत्येक भाषेच्या अस्तित्वासाठी तिला प्रथम शिक्षणाची आणि राज्यकारभाराची भाषा बनावी लागते. प्रत्येक भाषेत ही क्षमता असते. त्यासाठी भाषेचा विकास करावा लागतो. भाषेची समृद्धी ही तिच्या शब्दसंपत्तीवर अवलंबून असते. मराठीने अनेक परकी भाषांतून शब्दसंपत्ती घेतली आहे. त्याच वेळी आपल्याच भाषेची वेगवेगळी रूपे असलेल्या बोलीतून शब्द आला, की त्याला अशुद्ध रूप ठरविले आहे.
मराठीचा विकास करण्यासाठी प्रथम प्रमाण भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल, त्यासाठी आज जे ‘बोली भाषेकडून प्रमाण भाषेकडे’ असे ठोकून घोळून घेतले जात आहे, यातून मराठीचे संवर्धन होणार नाही. मराठी संकुचित बनण्याचाही मोठा धोका आहे.
प्रमाण भाषा ही अभिजनांचीच भाषा न बनता ती बहुजनांच्या बोलीतील शब्द स्वीकारून भाषेचे प्रमाणीकरण केले पाहिजे. ज्ञानाच्या व्यवहारासाठी प्रमाणीकरणाची गरज असते. ही प्रक्रिया मराठीत झाली नाही. बोलीतून ललित साहित्याची निर्मिती झाली. कारण कलाकाराला उत्स्फूर्त कलाविष्कारासाठी त्याखेरीज पर्याय असत नाही. कलाकार हा बंडखोर असतो. त्यामुळेच रवींद्रनाथ टागोरांना व्याकरणाचे नियम ठाऊक नाहीत, असे विद्वान म्हणू लागले, तेव्हा टागोरांनी सांगितले, ‘लोक जसे बोलतात तसे मी लिहितो’ आपल्या संतांनीही हेच केले. त्यामुळे संतांचे साहित्य निरक्षरांनाही मुखोद्गत असते. कारण लोकांच्या जगण्याची भाषा त्यांनी वापरली. मराठी भाषा, तिच्या विविध बोलीभाषा आणि आदिवासी भाषेच्या संवर्धनासाठी काही उपाय सुचविले गेले आहेत. एक तर शिक्षणाची भाषा म्हणून ज्ञान भाषा म्हणून स्थान मिळाल्याखेरीज कोणत्याही भाषेचे संवर्धन होणार नाही. एकतर बोलीकडून प्रमाण भाषेकडे हा प्रचार आहे, तो तातडीने थांबवावा लागेल. यातून बोली मारल्या जाणार आहेत. बोली याही भाषाच आहेत, त्यांना जिवंत ठेवायचे आहे.
भाषेच्या विकासासाठी शासकीय पातळीवर काही प्रयत्न सुरू आहेत. जनतेतील जागृती हीही महत्त्वाची आहे. आदिवासींच्या ज्या बोली आहेत, त्या मराठीच्या रूपाप्रमाणे नाहीत, तरी मराठीचे तिच्यावर काही संस्कार आहेत. कोरकूसारख्या बोलीत फारच कमी शब्दसंख्या आहे. आपल्या आविष्कारासाठी त्यांना कमी शब्दांचीच गरज वाटते. आदिवासी मुलांना आदिवासी बोलीतूनच शिक्षण द्यावे, असा विचार मांडणारे काही आहेत. त्यामुळे आपण मागे पडू ही भीती आदिवासींनाही वाटते. त्यामुळे आदिवासीतून शिक्षणाला आदिवासींमधीलच काहींचा विरोध आहे. मराठीच्या जवळजवळ पन्नास बोली भाषा आहेत. त्यात प्रादेशिक छटाही आहेत. त्यामुळे या वेगवेगळ्या प्रादेशिक छटांकडे भाषेचे सौंदर्य म्हणूनच पाहिले पाहिजे. कारण त्यात नैसर्गिकता आहे.
काही महत्त्वाच्या बोली आणि आदिवासी बोलीच्या संवर्धनासाठी, या भाषांना ज्ञानाच्या व्यवहाराची भाषा बनविण्यासाठी या भाषांचे अभ्यासक्रम विद्यापीठांना विकसित करता येतील. केवळ त्या बोलीतील त्याच भाषेतून शिक्षण घ्यावे, यातून त्यांच्यात भाषिक न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. यामुळे आपण मुख्य प्रवाहापासून दूर राहू ही भीती वाटू शकते. तसे घडलेही आहे. या बोलीचा प्रसार हा व्यापक रीतीने झाल्यास त्यांना प्रतिष्ठा मिळेल. आता शिक्षण लवचिक झाले आहे. वेगवेगळ्या भाषा शिकण्याकडे कल वाढत आहे. यामागे व्यावहारिक हेतू असला, तरी आवड आणि छंद म्हणूनही भाषा शिकणारा मोठा वर्ग आहे. इंग्रजीमुळे मराठी भाषा धोक्यात आली आहे, हा विचार सोडून मराठीतून सर्व ज्ञानशाखांतून अभ्यासक्रम विकसित करून, त्यातून कौशल्य प्राप्त केले पाहिजे. आपण आधुनिक कौशल्य प्राप्त केले आहे काय हा मूलभूत प्रश्न आहे. त्यासाठी कोणत्याही भाषेची क्षमता ही विज्ञान-तंत्रज्ञानाची भाषा बनण्याची असते. त्यासाठी भाषा लवचिक असावी लागते. आपल्या भाषेत सामावून घेण्यासाठी मानसिकताही ठेवली पाहिजे. आपल्या भाषेत तो शब्द येताना जसाच्या तसा आला पाहिजे, असे नाही, तर आपल्या भाषेच्या प्रकृतीप्रमाणे तो आला पाहिजे. ‘मॅंचेस्टर कॉटन’ हा शब्द आपल्या ग्रामीण जनतेने ‘मांजरपाट’ असा करूनच भाषिक व्यवहारात सामावून घेतला.
मराठी ही जगातील एक प्रमुख भाषा आहे. तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तिला ज्ञान-विज्ञानाची भाषा बनवताना, बोलींनाही जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या विकासाचा कार्यक्रमही आखला पाहिजे. ‘बोलीकडून प्रमाण भाषेकडे’ या दृष्टिकोनामुळे बोली नष्ट होणार आहे. तेव्हा बोली नष्ट न करता मराठी समृद्ध बनली पाहिजे.
____________________________________________________________________________
संदर्भ :http://www.esakal.com शनिवार, 23 मे 2015 - 12:30 AM IST
Comments
Post a Comment