नावात काय नाही?- निखिल रत्नपारखी
शेक्सपीअर म्हणून
गेला आहे की, ‘नावात काय आहे’? मला काही हे सहजासहजी मान्य होणारं नाही. मान्य होणार नाही म्हणजे आपण
काही थोरामोठय़ांविषयी सवंग किंवा उगाच वादग्रस्त विधानं करून लोकप्रियता
मिळवणाऱ्यांपैकी नाही. पण मी म्हणतो- नावात काय नाही? हेच मत
माझ्या एका क्रांतिकारी मित्राचं पण आहे. (स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पुणे शहरात ‘क्रांतिकारी’ या शब्दाचा अर्थ कुठलीही भीडभाड न
बाळगता आपलं मत स्पष्टपणे मांडणारा- एवढाच मर्यादित आहे. याला विषय, वय, हुद्दा याचं बंधन नाही. फक्त आपलं मत
चारचौघांच्या कानावर जाईल आणि एखादी छोटीशी का होईना, आपली
बातमी कुठेतरी छापून येईल याची खबरदारी घेतली म्हणजे क्रांतिकारी असण्यामागचा आपला
हेतू सफल झाला असं म्हणायला हरकत नाही.) तर नावांच्या बाबतीत माझ्या मित्राचं
म्हणणं इतकं विचित्र आहे! हा मित्र म्हणतो, ‘नावात काही नसेल
तर मी माझ्या मुलांना नंबराने संबोधलं तर चालेल का? ए १७२,
डुकरासारखा लोळत काय पडलायस? ३४० तू जर १७२
च्या नादी लागलास तर तूही त्याच्यासारखा आळशी होशील. तो शेजारचा ४२० बघ कसा गुणी
मुलगा आहे! तो आणि त्याचा भाऊ ५६० परीक्षेत कसे मार्कस् मिळवतात बघा. त्या १२१२ शी
मैत्री करून तुम्ही दोघंही बाराचे होणार आहात..’ असं
साधारणत: बाप आणि मुलांचं संभाषण होईल. किंवा एखाद्या षोडशवर्षीय कन्येने- ‘आई, २१०५ आणि मी १४३३ बरोबर ३४७७ च्या घरी अभ्यासाला
जात आहोत. १६४७ आली तर तिला आम्ही २३४६ च्या घरी गेलोय असं खोटं सांग. नाहीतर ती
१३५२ ला बरोबर घेऊन येईल आणि आमचा अभ्यास होणार नाही.’ आता
त्या पालकांनी काय करायचं? एखादा जरी आकडा चुकला तरी आपली
कन्या कुणाबरोबर कुणाच्या घरी गेलीये आणि त्याबद्दल कुणाला काय सांगायचंय हे कळेल
का? माणसाची नावं हे जर आकडे असतील तर सदरहू आरोपी ३०२,
४०६ आणि ४७८ यांना कलम ३०२, ४०६ आणि ४८७ या
कलमांखाली अमुकतमुक शिक्षा सुनावली जात आहे. असं जर झालं तर आरोपी कुठले, शिक्षेची कलमं कुठली, याचा किती गोंधळ होईल. शिक्षा
सुनावणाऱ्या जज्जलासुद्धा शिक्षा सुनावणे हीच एक शिक्षा वाटेल. अशा कितीतरी
गोष्टींचं स्वरूप नुसत्या नावाच्या बदलाने पालटू शकेल. याची कल्पना करावी तेवढी
थोडीच आहे.
माझी एक मैत्रीण आहे. एकदा आमच्या
गप्पांच्या ओघात घरोघरी स्वयंपाक करणाऱ्या बायकांचा विषय निघाला. ‘माझ्या घरी स्वयंपाक करायला एक बाई येते, तिचं नाव काय असेल सांगा बरं? तीन चान्स..’ असा कोडय़ात टाकणारा प्रश्न तिने मला विचारला. आता या प्रश्नात फार काही
उत्सुकता ताणली जावी असं काहीही नव्हतं. किंवा नाही नाव सांगता आलं, तर अगदी स्वत:च्या अज्ञानाबद्दल फार शरम वाटावी असंसुद्धा काही नव्हतं.
त्यामुळे पहिल्यांदा मी दुर्लक्षच केलं. पण तिने परत एकदा जोर देऊन हाच प्रश्न
विचारला. आता स्वयंपाकीण बायकांची नावं मला माहीत असायचं काय कारण होतं? तरी मी आपलं आजूबाजूला ऐकलेली पुष्पा, हेमलता,
वनमाला, संध्या अशी एक दोन-चार नावं
तिच्यासमोर फेकली. अशापैकीच एखादं नाव असेल अशी मी अपेक्षा करायला लागलो. पण एक
चान्स गेला. मला आठवलं, लहानपणी माझ्या आज्जीच्या वाडय़ात
जास्वंदी नावाची बाई स्वयंपाकाला यायची. म्हणून फुलांची नावं मी आठवून पाहिली. पण
जाई, जुईपुढे माझी गाडी जायला तयार नाही. मरा- फुलांची
नावंपण आठवायला तयार नाहीत. मुंबईत फुलांचा संबंध येणार तो बुकेमधल्या डेलिया,
लिली, रोझ असल्या फुलांचा. नाहीतर
दसरा-दिवाळीला झेंडूच्या आणि मयताला त्या लाल पाकळ्यांचा. यापैकी कुठल्याच फुलांची
नावं काही स्वयंपाकीण बायकांची नावं असू शकत नाही. दुसरा चान्स गेला. टीव्हीवरच्या
बायकांची नावं आठवायला लागलो. पण तसली ग्लॅमरस नावं स्वयंपाकीण बाईची असणं शक्यच
नाही. तरी आपलं कमला, सावनी, आस्था
वगैरे एक-दोन नावं घेतलीच. शेवटी ‘मी हरलो’ असं तिला म्हणालो. त्यावर तिने जे नाव सांगितलं त्याने मात्र खरोखर माझी
उत्सुकता चाळवली गेली. ‘अरे, ‘नकोशी’
असं नाव आहे त्या बाईंचं.’ मी म्हणालो,
‘अरे वाऽऽऽ! जपानी बाई तुला स्वयंपाक करण्यासाठी मिळाली म्हणजे
भाग्यवानच आहेस तू.’ ‘जपानी नाही, फलटणला
जन्मलेली चांगली मराठी बाई आहे ती. चार मुलींनंतर परत पाचवी मुलगीच जन्मली म्हणून
तिच्या आई-बापाने ठेवलेलं नाव आहे ते.’ बापरे! केवळ नाव ‘नकोशी’ असल्यामुळे तिला कुठकुठल्या अडचणींचा सामना
करावा लागत असेल याची मी कल्पना करायला लागलो. दिवसाची सुरुवातच मुळी सकाळी उठायचं
आणि निराश व्हायचं अशी होत असावी. कारण ‘अगं नकोशी, ऊठ, सकाळ झाली..’ असं म्हणून
जर कुणी तिला झोपेतून उठवत असेल तर डोळ्यापुढे नकारात्मक अंधार घेऊनच तिची सकाळ
होत असेल. एकतर ज्या कुणाला ती आपलं नाव सांगत असेल ते लोक किती विचित्र
प्रतिक्रिया देत असतील. ते बघून ती किती दु:खी होत असेल. ‘आज
तू खूपच सुंदर दिसतेयस नकोशी!’ हे वाक्यसुद्धा किती निराशा
आणणारं आहे. वर्षांनुवर्षे स्वत:चंच नाव ऐकून ती अगदी खारवून दांडीवर वाळत
टाकलेल्या बोंबील माशासारखी दिसत असेल. ठरलं! तिच्या निराश मनावर फुंकर घालून तिचा
जीर्णोद्धार करावा असं माझ्या मनात आलं. नव्हे, नव्हे- मी
तसं ठरवलंच. धोंडो केशव कर्वे, जोतिबा फुले वगैरेंची एक-दोन
पुस्तकंपण चाळली. स्त्री-विकासाचे माझे विचार पुढे पुढे एवढे फोफावले,
की अशा बायकांसाठी एखादी समाजसेवी संस्था सुरू करावी असं मला
वाटायला लागलं. नावामुळे निराशा आलेल्या स्त्रियांसाठी असलेली संस्था! कल्पनाच
किती नावीन्यपूर्ण आणि बहारदार आहे बघा. आता मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहोचली
होती. कोण आहे तरी कोण ही व्यक्ती? माझ्या कार्याला ‘नकोशी’पासूनच सुरुवात करावी म्हणून एक दिवस मी
माझ्या त्या मैत्रिणीच्या घरी गेलो. बघतो तर काय? ‘नकोशी’
नाव असलेल्या त्या बाईंचा आकारउकार चांगला अगदी हवाहवासा वाटणारा
होता. ‘नकोशी’ नावाच्या स्वयंपाकीणबाई
आमच्याकडे काम करतात, हे सांगायलाच अभिमान वाटावा असं बाईंचं
रूपडं होतं. ‘बाई गं, तुझ्या
नवऱ्याच्या बाबतीत जरा सावध राहा बरं. ही असली बाई तू डाळ-भात शिजवायला ठेवली
आहेस. पण सोबत तुझ्या नवऱ्याचीही डाळ शिजू देऊ नकोस म्हणजे झालं.’ आम्ही असंच काहीतरी विनोदाने बोलत होतो आणि ती आमच्यासाठी कॉफी घेऊन आली.
चांगलं हसत वगैरे तिने कप पुढे केला. आपलं नाव ‘नकोशी’
आहे याची आजपर्यंत तिला काही खंत वाटली असेल अशा कुठल्याही खुणा
तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हत्या. हे बघून मी मात्र भलताच निराश झालो. माझ्या
उज्ज्वल कार्याच्या आरंभीच नकोशीने हवंहवंसं हसून माझ्या स्त्रीविकासाच्या उत्तुंग
कार्याला सुरुंग लावला होता. माझी चूक माझ्या लक्षात आली. मी ‘नकोशी’ या अर्थावर जोर देऊन विचार करत होतो.
वास्तविक तो फक्त त्या देहाचा पत्ता होता. लुच्चे वाडी किंवा डामरट चाळ असा जर
एखाद्याच्या घराचा पत्ता असेल तर आपण थोडाच त्या वाडीचा किंवा चाळीचा विकास कार्यक्रम
आखतो! एखाद्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी जसा त्या घराचा पत्ता असतो तसा त्या
व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचं नाव हे फक्त त्याच्या शरीराचा पत्ता असतो. कधी
कधी नावाच्या अगदी विरुद्ध व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्ती बघायला मिळतात.
आमच्याकडे एक
रद्दीवाला येत असे. जेमतेम पाच फूट उंचीचा, कृश
देहयष्टीचा आणि बायकी आवाज असलेल्या त्या देहाचं नाव ‘भानुप्रताप’
असं होतं. एमएटी नावाच्या ज्या दुचाकीवरून तो फिरायचा, तीपण अगदी जीर्ण झालेली होती. ती एमएटी आहे हे त्याने सांगितल्यानंतर मला
कळलं होतं. जे हाताला लागतील त्या दुचाकींचे पार्ट्स जोडून तिचा आकार तयार झाला
होता. त्या दुचाकीचे दोन बंद असलेले इंडिकेटरपण एकसारखे नव्हते. ती फक्त
भानुप्रतापला रद्दीसकट घेऊन पुढे जात असे, एवढंच दुचाकी
असल्याचं लक्षण त्यात शिल्लक होतं. कधी कधी मला त्या भानुप्रतापला म्हणावंसं
वाटायचं- ‘अरे भानुप्रताप, निदान
स्वत:च्या नावाला जागून घोडय़ावर बसून तरी रद्दी आणायला घरोघरी जात जा.’ मला असं एकदा स्वप्नदेखील पडलं होतं. असा सहा-सव्वासहा फुटी भानुप्रताप
घोडय़ावर बसून दौडत दौडत घोडय़ाच्या टापांनी धुळीचे लोळ उडवत समोर येऊन उभा राहिला
आणि रांगडय़ा आवाजात म्हणाला, ‘रद्दी’! रद्दीचं
वजन करता करता म्हणतो कसा- ‘मराठी पेपर्सची रद्दी एवढी जड का
लागतीये?’ खसकन् सात-आठ इंग्रजी पेपर बाहेर ओढत ढगांचा
गडगडाट झाल्यासारखा बोलतो- ‘मराठी रद्दीशी ही लबाडी हा
भानुप्रताप कदापि सहन करणार नाही. पुन्हा जर हे घडलं तर काही राजकीय पाटर्य़ाना
कळवून दंगल घडवून आणली जाईल. हा मराठी रद्दीच्या अस्मितेचा प्रश्न आहे. एवढी जर
इंग्रजी रद्दी मराठी रद्दीमध्ये खपवायची हाव असेल तर इंग्रजी रद्दीच्या भावात ही
मराठी रद्दी घेईल हा भानुप्रताप..’ असं म्हणून काही भरभक्कम
नोटा तोंडावर भिरकावतो आणि घोडय़ाला टांग मारून पुन्हा एकदा धुळीचे लोळ उडवत नाहीसा
होतो. आम्ही आपले थरथरत्या हातांनी नोटा उचलून खिशात घालतो. असा काहीतरी आवेश
पाहिजे भानुप्रताप नाव असलेल्या व्यक्तीचा. तो रद्दीवाला असला म्हणून काय झालं?
नावाच्या बाबतीतला हा विरोधाभास बऱ्याचदा बघायला मिळतो. माझ्या
बघण्यात असे काही लोक आहेत. ‘काळे’ आडनाव
असलेली माणसं चांगली घारी, गोरी. याउलट सावळा वर्ण असणाऱ्या
माणसाचं आडनाव ‘गोरे’ असलेलं मी बघितलं
आहे. अत्यंत दु:खीकष्टी, रडका चेहरा असलेल्या व्यक्तीचं नाव ‘आनंद’! अत्यंत कृश देह असलेल्या व्यक्तीचं नाव-
बलराम. अत्यंत बिनडोक, सुमार बुद्धी असलेली व्यक्ती ‘बुद्धिसागर’ आडनाव मिरवते. विसरभोळ्या व्यक्तीचं
आडनाव काय, तर ‘आठवले’! सतत घाबराघुबरा चेहरा असणाऱ्या माणसाचं आडनाव ‘वाघ’
असतं. पण नाव किंवा आडनाव फक्त त्या देहाचा पत्ता असतो असं जरी
गृहीत धरलं, तरी या विरोधाभासाची टिंगल करावी असं मनात
आल्यावाचून राहत नाही. एकदा दुपारी मी गाढ झोपेत असताना दारावर बेल वाजली. खारट
चेहरा करूनच मी दार उघडलं. एक अतिशय निर्बुद्ध चेहरा घेऊन कुणीतरी पिकलं पान
दरवाजात उभं होतं. कुणीतरी पत्ता चुकलेला योग्य पत्ता विचारण्यासाठी उभा आहे अशी
माझी समजूत झाली. त्यामुळे समोरून ‘मी विचारे!’ असे शब्द माझ्या कानावर पडताच ‘विचारा ना..’ मी त्वरित उत्तरलो. ‘तसं नाही, मी विचारे.’ पुन्हा तेच. मी काही विचारायचंय का?
पण फार घोळ वाढू न देता तेच म्हणाले, ‘माझं
आडनाव विचारे. तुमचा घरमालक आहे मी. तुमच्या चौकशीसाठी आलोय.’ त्यांच्या तोंडावरच मी मूर्खासारखा फस्सकन् हसलो. ‘विचारे’
आडनाव असलेला मनुष्यप्राणी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदीच बघत
होतो. चुकीचं प्रायश्चित म्हणून त्यांना घरात बोलवून चहा-बिस्किटं वगैरे असले
सोपस्कार मला करायला लागले. एकदा तर नावामुळे एखाद्यावर दात तोडून घ्यायचा प्रसंग
आलेला मी ‘याचि देही याचि डोळा’ बघितला
आहे. आम्ही काही मित्र एका बऱ्यापैकी श्रीमंत बारमध्ये बसलो होतो. संपूर्ण बार
मद्यधुंद झाला होता. मला या वातावरणात रमायला फारच आवडतं. न पिणाऱ्यांची या
वातावरणात जेवढी करमणूक होऊ शकते, तितकी इतर कुठेही होऊ शकत
नाही. रेडिओची दोन-तीन स्टेशन्स एकत्र झाल्यावर जसं होईल तसं परस्परांचं टय़ुनिंग
झालं होतं. आमच्या मागच्या टेबलावर दोघंजण बसले होते. समोरासमोर दोन झेंडे
फडफडतायत असं ते दृश्य दिसत होतं. आणि काय झालं ते कळलं नाही; पण अचानक त्यांच्या बाजूच्या टेबलावर बसलेल्यांशी त्यांची काहीतरी
बाचाबाची सुरू झाली. दोघांनी एकमेकांच्या आई, वडील, बहीण, भाऊ सर्वाचे यथेच्छ उद्धार करून झाले. त्या
बऱ्यापैकी श्रीमंत बारला गुत्त्याचं स्वरूप आलं. प्रकरण हाणामारीपर्यंत जाईल
की काय अशी काहींच्या मनात शंका, तर काहींना खात्रीच वाटायला
लागली. नक्की काय झालं ते तिथे कुणालाच विचारायची सोय नव्हती. त्यातच कुणाच्यातरी
हातून चुकून ग्लास फुटला आणि वातावरणात एक प्रकारचा जोश संचारला. शेवटी
बारमालकाच्या मध्यस्थीने प्रकरण कसंबसं आटोक्यात आलं. परत शांततेने सर्वजण
दारूकामात रुजू झाले. का कुणास ठाऊक, त्या दोघांपैकी एकाला
कुणीतरी त्याचं नाव विचारलं. आता त्याने जर त्या प्रसंगी स्वत:चं खरं नाव सांगितलं
असतं तर पुन्हा ते वातावरण पेटलं नसतं, पण याने त्याचं नाव
अमिताभ असं सांगितलं आणि परत एकदा भडका उडाला. ‘तुझं नाव
अमिताभ हाय व्हय?’ असं म्हणून त्या चार-पाच जणांनी असा
धुतलाय त्याला. अमिताभच्या अँग्री यंग मॅनच्या इमेजची अशी काही वाट लावली त्या
चार-पाच जणांनी मिळून! केवळ अमिताभ या नावामुळे त्याच्यावर एवढा भयानक प्रसंग
ओढवला. आणि शेक्सपीअर म्हणतो- ‘नावात काय आहे?’ खरं तर या इंग्रजी शब्दांनी जेवढा नावांच्या दुनियेत घोळ घालून ठेवला आहे
तेवढा घोळ आपल्या इथल्या नगरपालिकांच्या कार्यालयातसुद्धा कोणी घालत नसेल. ‘पी’पासून सुरुवात होणाऱ्या "psychology" या शब्दाचा उच्चार काय, तर म्हणे सायकॉलॉजी! "pneumonia" म्हणजे ‘न्युमोनिया’ हाही
या जातीचा शब्द. तरी हे सारखे वापरात येणारे शब्द नाहीत. सारखे वापरात येणारे शब्द
ॅ- ‘गो’, तर मग ळ- ‘टो’ का नाही? इंग्रजी
नावांच्या या अट्टहासापायी पुण्यातल्या एका बँकेत एक मजेशीर प्रसंग घडला होता.
असाच कुणीतरी सदाशिव पेठेतला चिमण गणफुले पुण्यातल्याच एका लोकल बँकेत पैसे
काढण्यासाठी गेला. त्यावेळी काही आत्तासारखी एटीएम मशीन्स अस्तित्वात नव्हती.
बँकेने ठरवून दिलेल्या वेळेत जाऊनच पैसे काढावे लागत असत. पैसे काढण्याच्या
स्लीपवर तुमचं नाव, अकाऊंट नंबर वगैरे तपशील भरून ती स्लीप
बँकेतल्या एका काऊंटरवर नेऊन द्यायची. मग बँकवाले टोकन देणार. आणि तुमचा नंबर आला
की तुम्ही स्लीपवर लिहिलेलं तुमचं नाव पुकारलं जाणार आणि तुमचे पैसे तुमच्या हवाली
करणार- अशी त्यावेळी पद्धत होती. चिमण गणफुलेने प्रथेप्रमाणे स्लीप भरून काऊंटरवर
दिली, टोकन घेतलं आणि आपलं नाव पुकारण्याची वाट बघत तिथल्याच
एका बाकडय़ावर जाऊन बसला. बराच वेळ झाला तरी त्याचं नाव काही पुकारलं जाईना.
त्याच्या मागाहून आलेले लोक पैसे घेऊन गेले. नवीन लोक आले, तेसुद्धा
पैसे घेऊन गेले. आता मात्र चिमण अस्वस्थ झाला. तो अस्वस्थपणे बँकेत येरझारा
घालायला लागला. पैसे घेऊन जाणाऱ्या लोकांकडे उगाचच रागाने बघायला लागला. एक तास
झाला, दोन तास झाले. शेवटी चिमणची रागाने कानशिलं गरम झाली
तरी काही त्याचा नंबर येईना. सरतेशेवटी सरळ त्याने कॅशियरच्या खिडकीवर जाऊन धडक
मारली. शांतपणे कॅशियरने अकाऊंट नंबर विचारला. चिमणने अकाऊंट नंबर सांगितला. आणि
काय आश्चर्य! तो कॅशियर त्याच्यावरच भडकला. ‘कधीपासून मंदार
लोडगे, मंदार लोडगे नाव घेऊन मी बोंबलतोय.. तुम्ही काही
रिस्पॉन्सच द्यायला तयार नाही.’ त्यावर चिमणला हसावं का
रडावं समजेना. ‘अहो, मंदार लॉज आहे ते
नाव.’ यावर तिथे उपस्थित असलेल्या लोकांचा एवढा मोठय़ांदी हशा
आला की त्या कॅशियरला कुठे पळावं आणि कुठे नको असं झालं. आता यात खरं तर चूक
बँकवाल्यांची नाही, सगळी चूक इंग्रजांची आहे असं माझं स्पष्ट
मत आहे. ‘लॉज’ या शब्दाचं स्पेलिंग
कुणी "Lodge"असं करतं का? मला तर नेहमी असं वाटतं की, असे सगळे इंग्रजीतले शब्द एकत्र करावेत आणि त्यांचं सरळ पुन्हा एकदा बारसं
करावं. शेक्सपीअर काहीही म्हणो, आपण तर खुल्लमखुल्ला म्हणतो-
नावात काय नाही? आपलं म्हणणं जर खोटं असेल ना, तर आपण आपलं नाव बदलायला तयार आहोत.
- निखिल रत्नपारखी
________________________________________________________________________
संदर्भ:http://www.loksatta.com/gujrati-tutari-news/what-is-in-name-1214238/#sthash.2qUjXaY1.dpuf
Comments
Post a Comment