कोण कोणाला मारित भोंगा? श्री.ज्ञानेश्वर मुळे

श्री . ज्ञानेश्वर मुळे(Consul General of India, New York, USA ) यांचा एक विचार करायला लावणारा लेख:
_______________________________________________________________________________
कोण कोणाला मारित भोंगा?
सातेक वर्षांच्या परदेशातील वास्तव्यानंतर परतल्यानंतर तीव्रतेने जाणवलेली एक गोष्ट कोणती, असे कुणी विचारले तर मी म्हणेन "आवाज.‘ चोहोबाजूंनी येणारा . प्रत्येक दिशेने येणाऱ्या या सगळ्या आवाजांचा एक सामूहिक जीवघेणा आवाज जणु पाठलाग करतोय. वाटते की आपल्यापुढे एकच पर्याय आहे. या सर्व आवाजांना चिरत जाणारा आपला एक आवाज उठवावा किंवा उंच आकाशात उडवावा आणि सांगावे, "बंद करो सब आवाजें हमेशा के लिए‘ 
दिल्लीतील आवाजांची विविधता आणि तीव्रता लक्षणीय आहे. इथली कबुतरे आणि कावळेसुद्धा जोरजोरात शक्तिप्रदर्शन करताना दिसतात. वाहनचालक सहज "हमरीतुमरी‘वर येतात, तेव्हा "हमरीतुमरी‘चा अर्थ कळतो. बुद्धिवंतांच्या आवाजाची वेगळीच गोष्ट. वृत्तपत्रांतील सर्व बातम्यांचा एकसंध गदारोळ उडून आपली भंबेरी उडतेय की काय, असा भास होतो. त्या सर्व लेखांना आणि बातम्यांना, मुद्रित-लिखित शब्दांऐवजी आवाज प्राप्त झाला तर काय होईल, या भीतीने पोटात गोळा उठतो. 

संध्याकाळचा दूरचित्रवाणीचा पडदा इतक्‍या जवळ येतो, की त्याचे "दुर्वाणी‘ असे नामकरण करायला हवे. इतकी सगळी सुबुद्ध माणसे इतक्‍या चांगल्या माध्यमाचा उपयोग "किंचाळ स्पर्धा‘ जिंकण्यासाठी का करतात? त्यात विचारवंत, तज्ज्ञ, नेते, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार रोज संध्याकाळी उरस्फोड करत असतात आणि लाखो लोक हा देखावा (दिखावा?) पाहतात. यात आपल्या स्वातंत्र्याने धारण केलेले अक्राळविक्राळ स्वरूप लक्षात येते. लोकशाही म्हणजे फक्त "आवाज‘ की काय, असे वाटू लागते. 

जे दिल्लीत तेच गल्लीत. मी कोल्हापूरचा. तिथल्या आजच्या मुख्य बातम्या पाहाव्यात. कॉ. पानसरे खून प्रकरण, मोटार जळीत प्रकरण तपास, विद्यार्थ्यांच्या केंद्रबदलाने गोंधळ, जिल्हा बॅंक नुकसान सुनावणी आदी. या प्रत्येक बातमीच्या पोटात आपल्या सामाजिक, राजकीय,आर्थिक तणावाचे कानठळ्या बसवणारे आवाज दडलेले आहेत. हे आवाज टीव्हीतून येणाऱ्या बौद्धिक कोलाहलाचे "वडीलबंधू‘ आहेत. विसंवादाचे अनेक पदर त्यात दिसतात. 
हा प्रश्‍न फक्त कर्कशतेचा नाही. हा प्रगती साधणारा विचारकलह नाही. लोकशाहीत अभिप्रेत असणारी वैचारिक विविधताही त्यात नाही. तिथे फक्त अहंमन्यता, मलाच सत्य सापडले आहे आणि तेच एकमेव हा अट्टहास. संवाद संपल्यानंतरचा उरलेला प्रदूषित धुरळा. 

यावर उपाय काय? मुनी तपश्‍चर्या करायचे. गांधी, विनोबा मौन पाळायचे. आपण प्रत्येक विषयावरचे विशेषतज्ज्ञ झालो आहोत. "व्हॉट्‌सऍप‘पासून "फेसबुक‘पर्यंत दिसेल त्या माध्यमातून समोर येणाऱ्या प्रत्येक विषयावर सल्ला दिला जातोय. त्यात "भारताने काय करावे, इथपासून पंतप्रधान, मंत्री, सरकार प्रत्येकाने काय करणे आवश्‍यक आहे,‘ यावर ठासून मते मांडली जाताहेत. हे सर्व एका विशिष्ट मर्यादेपर्यंत निरोगी लोकशाहीचे लक्षण मानता येईल. पण त्यानंतर त्याचे विषारी झाड होते आणि सावली किंवा फळे, पाने किंवा मुळे सगळेच आसमंतात पुन्हा विषाची पखरण करतात. माती, हवा व आसमंत सगळीकडे प्रदूषण माजते. 
प्रत्येकाने पूर्ण जबाबदारीने स्वतःचे काम करणे हा यावर एकमेव उपाय आहे. स्वतःचे शेजार, गाव किंवा शहर यांचा परिसर विकसित करण्यासाठी काही करणे शक्‍य असेल तर करावे आणि तेही शक्‍य नसेल तरी कॅलरीज व्यर्थ घालवू नयेत. गप्प बसावे, चिंतन करावे, कार्य करावे. गाजावाजा नको. जनतेने स्वतःची आणि राज्यकर्त्यांनी स्वतःची कामे करावीत. विद्यार्थ्यांनी विद्यार्जनाचे काम करावे. कायदे करणाऱ्यांनी चांगले कायदे कसे करता येतील ते पाहावे. नसेल तर शांत बसावे. 
हे शक्‍य होणार नसेल तर हा आवाज आणि हे विवाद देशाला घातक वळणावर नेऊन सोडतील. तिथून ना पुढे जाता येईल, ना मागे वळता येईल. पूर्वी "वादे वादे जायते तत्त्वबोधः‘ वादामधून तत्त्वबोध होतो असा समज होता. आता मात्र "वादे वादे जायते शीर्षभंग:‘ (वादांमधून फक्त डोकी फोडली जातात) अशी बिकट परिस्थिती झाली आहे. 
गाण्यामध्ये दोन स्वरांच्या जागेला महत्त्व आहे. लिखाणामध्ये दोन शब्दांमध्ये किंवा ओळींमध्ये दडलेला अर्थ महत्त्वाचा असतो. जपानी संस्कारात "कमी म्हणजे खूप अधिक‘ असा विचार असल्याने मोकळ्या अवकाशाचे, विरामाचे, विनम्रतेचे, झेनचे साधेपणाचे मोल प्रचंड मानले जाते. त्यामुळे तिथल्या घरांच्या भितींवर संपूर्ण खोलीत एखादेच चित्र खूप विचार करून त्या त्या ऋतूतील रागानुसार कलाकृतीसारखे लावले जाते. माणसांनीच नव्हे, तर सभोवतालच्या वस्तूंनीसुद्धा अनावश्‍यक "आवाज‘ काढू नयेत असा त्यामागचा विचार असावा. 

माझ्या दिल्लीतील अनुभवावरची कविता पुन्हा आठवली. 
अजून मनाला कळले नाही 
कोण कुणाला मारित भोंगा 
या शहराच्या पारावरती 
हाही नंगा तोही नंगा. 
आज ही परिस्थिती बदललीय काय? नाही! पुढे बदलेल काय? माहीत नाही! 
-ज्ञानेश्वर मुळे
___________________________________________________________________________________________
संदर्भ : www.esakal.com -शनिवार, 19 मार्च 2016 - 01:00 AM IST

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण