हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे....-रामदास भटकळ

माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांच्या जयंतीनिमित्त(१० मे ) त्यांना आदरांजली !!श्री रामदास भटकळ यांनी फेब्रुवारी २०१२ मध्ये ग्रेस यांच्या विषयी लिहिलेला  युनिक फीचर्सच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध झालेला हा भावपूर्ण तितकाच उत्कट लेख  



_________________________________________________________________________________

ग्रेस .  मराठी साहित्य विश्वाततले एक महत्त्वाचे कवी. संवेदनांनी ओतप्रोत भरलेली त्यांची कविता मानवी मनाच्या तळाशी असलेल्या दु:खाच्या मुळांचा शोध घेते.असा हा प्रतिभावंत कवी नुकताच ‘साहित्य अकादमी पुरस्कारा’ने सन्मानित झाला, शिवाय ‘युनिक फीचर्स’ आयोजित यंदाच्या ‘दुस-या मराठी ई-साहित्य संमेलनां’चं (२०१२) अध्यक्षपद भूषवित आहे. यानिमित्ताने त्यांच्या निकटच्या स्नेह्याने लिहिलेला लेख.

कवी ग्रेस यांच्याशी माझी भेट माणिक गोडघाटे यांच्या आधी झाली ही माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची घटना आहे. प्रकाशकाकडे पोचायला ओळखीपाळखी लागतात अशी अनेकांची समजूत आहे. कदाचित ते काहींच्या अनुभवाला धरून असेलही; पण पॉप्युलर याला अपवाद आहे याचा मला अभिमान आहे. ग्रेसची कविता ‘छंद’च्या अंकात प्रसिद्ध झाली, त्यातून त्यांची मुंबईकरांना ओळख झाली. तेव्हा ग्रेस नागपूरचे, या पलीकडे वैयक्तिक परिचय नव्हता. गमतीने सांगायचं तर ग्रेस हा कवी की कवयित्री याबद्दल काहीसा संभ्रम होता.
यावरून संगीताच्या क्षेत्रातील एका गोष्टीची आठवण येते. एक तरुण होतकरू गायक एका बुजुर्ग उस्तादांचे आशीर्वाद घ्यायला गेला होता. त्या उस्तादांना वार्धक्यात अंधत्व आलं होतं. ते या तरुणाला म्हणाले, ‘बेटा, अपनी सूरत तो दिखाओे|’ हा गायक बुचकळ्यात पडला. उस्तादांना अंदाज आला. ते म्हणाले, ‘गवैयेकी सूरत उसके गले में होती है| कुछ गा के दिखाओ|’ तशी ग्रेस ह्या कवीची ओळख त्यांच्या कवितेतून व्हावी हे योग्यच झालं.
त्यानंतर त्यांच्या पत्रांतून त्यांचं अक्षर, पत्र लिहिण्याची ढब, त्या पत्राची कागदावरची रचना- मग ते कार्ड असो, आंतर्देशीय पत्र असो, मोठा कागद असो, सारं काही विलक्षण. सही ग्रेसची असली तरी वर पत्ता सुरुवातीला : माणिक गोडघाटे, द्वारा लीला गुणवर्धिनी. सारं काही गूढ वाटावं असं. मग प्रत्यक्ष भेट एकदा नागपूरला, ते विद्यापीठात शिकत असताना प्रा. द. भि.कुलकर्णी यांनी आपल्या वर्गातला कवी म्हणून घालून दिलेली आणि मुंबईत आम्हा दोघांचीही मैत्रीण निर्मला देशपांडे यांच्या शिवाजी पार्कच्या घरी झालेली.
त्यांच्या कवितांचा संग्रह काढायचं ठरलं.. मला वाटतं, १९६४च्या सुमारास. त्यांनी कविता लिहायला सात-आठ वर्षांपूर्वीच सुरुवात केली होती असं नंतर जयंत परांजपे यांच्या लेखनावरून कळलं, पण आमच्या दृष्टीने ते एक तेव्हा ताजे कवी आम्ही शोधून काढले होते. त्यातूनच पुढे ‘नवे कवी : नवी कविता’ ह्या मालिकेची कल्पना निघाली आणि ते मराठी काव्य प्रकाशनाच्या इतिहासात एक छोटंसं पण बहारदार प्रकरण ठरलं.
इतक्या वर्षांनी मागे वळून पाहता इनग्रीड बर्गमनबद्दलची कथा ही काल्पनिक वाटते, पण तेव्हा खरोखर तसं झालं होतं. वर्ष १९६५. माणिक हा चित्रपटवेडा, बरेवाईट सगळे सिनेमे नियमितपणे पाहणारा. त्यातून तो इनग्रीड बर्गमन या नटीच्या प्रेमात पडला. कोणावरही विशेष प्रभाव पडावा अशी तिच्या अभिनयाची ताकद होती. ती काम करते तेव्हा तो सिनेमा चांगलाच असणार, असा विश्वास वाटावा अशी तिची ख्याती. तिच्या गाजलेल्या भूमिकांपैकी एक ग्रेस ह्या पात्राची. या कवीला आपलं नाव सापडलं आणि तेव्हापासून हा आणि पुढे याची मुलंदेखील ग्रेस हेच नाव वापरू लागली. त्याचा पहिला कवितासंग्रह ‘संध्याकाळच्या कविता’ हा इनग्रीडला अर्पण करायचा हे ठरलंच होतं. तितक्यात मी अमेरिकेला जायला निघालो. त्या दिवसांत ऊठसूठ कोणी अमेरिकेला जात नसे. तेव्हा त्या निमित्ताने माझ्यावर ‘ललित’’मध्ये लेख आला. तो वाचून ग्रेसचं मला नेहमीच्या सुंदर अक्षरातलं पत्र आलं : ‘तुम्ही अमेरिकेला जातच आहात तर इनग्रीड बर्गमनला भेटून तिची ह्या अर्पणपत्रिकेला संमती घ्यावी.’ पत्र वाचून विसरून जावं अशी ही विनंती होती. त्यातून रोझेलिनीशी विवाह झाल्यापासून इनग्रीड अमेरिकेपासून तुटली आहे हे कळलं आणि मी निर्धास्त झालो. परतताना लंडनला एक-दोन दिवस मुक्काम होता. पेपर पाहतो तो ती एका नाटकात काम करत होती. तिला कसं गाठावं याचा विचार करण्याइतपत माझ्या हाती दिवस नव्हते. मला फँकफर्टला ग्रंथजत्रेसाठी जायचं होतं. जर्मनीत असताना मला सारखी चुटपूट लागली, की मी आता हे काम करू शकतो, तेव्हा ते केलं पाहिजे. मी मुंबईला परतण्यापूर्वी पुन्हा लंडनला जायचं ठरवलं. इनग्रीड बर्गमनला त्या थिएटरच्या पत्त्यावर पत्र पाठवलं माझ्या बाळबोध अक्षरांत. लंडनला माझी मैत्रीण तारा वनारसे राहत होती. तिला कार्बन कॉपी पाठवली. आणि चक्क इनग्रीडला भेटून ग्रेसचा प्रतिनिधी म्हणून बोलून आलो.
आज ही परीकथा वाटते; पण ग्रेसना हे सारं मला सांगावंसं वाटणं आणि मी वाट वाकडी करून ते करणं यात आमच्या जवळिकीचं मर्म आहे. जवळजवळ पन्नास वर्षं आमच्यातील भावबंध जुळलेले आहेत यामागे ही विशिष्ट घटना नसेल, पण त्यामागील भावना हे एक महत्त्वाचं कारण आहे.
यथावकाश हे पुस्तक प्रसिद्ध झालं. ‘नवे कवी : नवी कविता’ ह्या मालिकेची कल्पना मला कधी सुचली नेमकं सांगता येत नाही, पण त्यासाठी प्रा. वा.ल. कुलकर्णी, मंगेश पाडगावकर आणि शिरीष पै यांनी सल्लागार म्हणून मदत करायचं ठरवलं. दुसरं पुष्प ना.धों. महानोर या त्या वेळी अनोळखी वाटणा-या कवीचा संग्रह ‘रानातल्या कविता’ हे ठरलं. ह्या दोघा कवीनी पुढे साठोत्तरी म्हणून ओळखल्या गेलेल्या प्रवाहातील दोन महत्त्वाच्या वाटा दाखवून ‘नवी कविता’ हे बिरूद सार्थ ठरवलं.
‘संध्याकाळच्या कविता’ हे नाव ह्या संग्रहाचं खरं, पण एकूणच ग्रेसच्या कवितांचा आणि पुढे ललितबंधांचा विचार करताना समीक्षक आणि स्वत: ग्रेस ह्या संध्याकाळच्या कातरवेळेला चिकटले. वास्तविक अनेक कवींना संध्याकाळचं आकर्षण वाटलं आहे. संध्याकाळ- दिवसाचा शेवट जवळ येतो तो काळ- कृतार्थतेची भावना देऊ शकतो तशीच व्यर्थतेचीही. ही जाणीव अनेक कवींना प्रौढपणी येते. कुसुमाग्रजांची मारवा ह्या शेवटच्या संग्रहातील कविता वाचताना ही जाणीव प्रकर्षाने होते. मारवा हा पुन्हा संधिप्रकाशाशी संलग्न असा राग. त्याची स्वररचना काहीशी कललेली. परंतु ग्रेस यांचं संध्याकाळचं आकर्षण त्यांच्या ऐन तरुणपणातील. ते आतापर्यंत तसंच कायम राहिलेलं. ह्या आकर्षणाचं कारण काय?
ग्रेस आणि महानोर यांच्या ह्या पहिल्यावहिल्या संग्रहांचं भरपूर कौतुक झालं आणि त्या निमित्ताने ‘पॉप्युलर’चंही. त्या दोन वर्षांत ‘ललित’ मासिकातर्फे पुरस्कार दिले गेले. त्यात एक पुरस्कार प्रकाशकासाठी होता. ह्या मालिकेच्या निमित्ताने ‘पॉप्युलर’ला हे पारितोषिक मिळालं. ह्या दोन्ही संग्रहांना स्वतंत्रपणे राज्य शासनाचा पहिला पुरस्कार मिळाला. एक कवी नागपूरचे तर दुसरे मराठवाड्यातले. बक्षीस समारंभासाठी ते मुंबईत आले. समारंभाच्या रात्री मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने एक मेजवानी दिली जायची. तिथे सर्वांनी आग्रह केला, की हे बाहेरगावचे कवी आले आहेत तर त्यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम व्हायला हवा. त्या रात्रीच सारं ठरवलं गेलं. कार्यक्रमाबद्दलची सूचना वर्तमानपत्रांत स्थानिक कार्यक्रमांत दिली, आणि फक्त तेवढ्या प्रसिद्धीवर दुसर्याा दिवशी साहित्य संघातील वरचा हॉल तुडुंब भरला. ग्रेस, महानोर आणि जोडीला नारायण सुर्वे यांच्या काव्यवाचनाने त्यांच्या आणि मराठी वाचकांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं.
त्या आसपास- आत्ता साल आठवत नाही- ग्रेसना नागपुरात अपघात झाला. मी पुन्हा परदेशी निघालो होतो, म्हणून फार काही करू शकलो नव्हतो. माझे थोरले बंधू सदानंद यांच्यावर सारं सोपवलं आणि त्यांनी मुंबईहून करण्यासारखं सगळं केलं. ग्रेसच्या पायांना जखम झाली होती. ह्या दुख-या पायांनी ग्रेसना बराच त्रास दिला. तो पुढे कित्येक वर्षं चालू होता. १९६८ नंतर आम्ही नागपूरला पॉप्युलर बुक डेपोची शाखा उघडली. त्या निमित्ताने माझ्या नागपूरच्या भेटी वाढल्या. ग्रेसना भेटणं हा खरा हेतू. ग्रेसना लंगडताना पाहून मी कासावीस होत असे. आमची एक भाबडी समजूत असते, की एखादी गोष्ट नागपूरला शक्य नसेल तर ती मुंबईत जमू शकेल, आणि तेही नसेल तर लंडनला. मी नागपूरच्या डॉक्टरांकडे चौकशी केली- या दुखण्यावर काही उपाय आहे का?
त्या सर्जनने मला मनापासून सांगितलं की जे काही करता येण्यासारखं आहे ते केलं आहे. हळूहळू सारं ठीक होईल. परंतु त्याहून त्यांनी जे सांगितलं ते अधिक महत्त्वाचं होतं. ते म्हणाले, की ह्या दुखण्यातून जर कवी निराश, हताश झाले असते तर ती काळजी करण्यासारखी स्थिती होती. परंतु तसं काही नाही. ह्या दुखण्याचा त्यांच्या व्यक्तित्वाला आधारच आहे. इतरांना अडचण वाटली असती अशा ह्या गोष्टीचा आपल्या सृजनशीलतेला चालना देणारा असा प्रेरणात्मक उपयोग करून घेण्याची ताकद ग्रेसमध्ये आहे. तुम्ही काळजी करू नका. त्यांच्यावर इतरत्र कुठे उपचार करण्याची शक्यता दिसल्यास मी आपणहून तुम्हाला सांगीन.
मला हे त्या वेळी पटलं नाही, पण दुसरा काही उपायही दिसेना तेव्हा मी गप्प बसलो. पण त्या डॉक्टरनी मला जे दुखण्याविषयी सांगितलं ते त्यांच्या दु:खाविषयीदेखील लागू आहे, हे हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं. ग्रेस कवीचं संध्याकाळविषयीचं आकर्षण हे दु:खाशी निगडित आहे. आता इतक्या वर्षांनंतर त्यांच्यावर नागभूषण, विदर्भभूषण आणि साहित्य अकादमी पुरस्कार असे सन्मानाचे वर्षाव होत आहेत. ते ‘युनिक फीचर्स’ आयोजित दुसर्यार मराठी ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या मुलाखती येत आहेत. त्यातूनही त्यांनी आपण दु:खाचा कवी असल्याचं स्वत: सांगितलं आहे.
परंतु, दु:ख आणि शोक यांत फरक आहे. ग्रेस यांच्या कवितेत दु:खाची भावना अनुस्यूत आहे हे उघड आहे, पण ती शोकात्म आहे असं मी मानत नाही. सुखदु:खं ही जीवनाची अंगं आहेत- एकाच नाण्याच्या दोन बाजू. ह्या दोन्ही बाजूंची जाण असल्याशिवाय जीवनाकडे पाहताच येत नाही. अनेक तत्त्वज्ञांनी आपल्या विचारधारेत मानवी दु:खाला केंद्रस्थानी मानलं आहे. महत्त्वाच्या धर्मांतही - कधी स्थितप्रज्ञ वृत्तीने तर कधी करुणेच्या संदर्भात - दु:खाचं स्थान गृहीत धरलं आहे.
ग्रेस यांच्या सृजनशीलतेने तत्त्वज्ञाचा आव आणलेला नाही, तरीही त्यांची दु:खाकूलता शोकाचं रूप धारण करत नाही. ते वासनेचा स्वीकार करतात तसाच वेदनेचाही. ते दु:खाला कुरवाळून बसत नाहीत. ह्या दु:खामुळे दयेची अपेक्षा करत नाहीत. दु:खाचं भान हे त्यांच्या सृजनशक्तीचं बलस्थान त्यांनी बनवलं आहे.
ग्रेस जवळजवळ अर्धशतकाहून अधिक काळ लिहीत आहेत. इतका काळ दु:ख कवटाळून निर्मिती करणं कठीण, आणि वाचकांना त्यांच्या कवितेची ओढ वाटत राहणं त्याहूनही कठीण. इतका दीर्घकाळ सातत्याने लिहिल्या गेलेल्या कवितेबद्दल दोन-चार वाक्यांत शेरेबाजी करणे हे निरर्थक आहे. फक्त काही वैशिष्ट्यांचा उल्लेख करावासा वाटतो.
अगदी सुरुवातीपासून ग्रेसच्या कवितांचा त्यातील प्रतिमांसाठी उल्लेख होऊ लागला. ते प्रतिमांची आतषबाजी आवश्यकतेपेक्षा जास्त करतात, अशी टीकाही होऊ लागली. त्यांच्या प्रतिमांची काही वैशिष्ट्यं लक्षात घेतली पाहिजेत. ह्या प्रतिमा कधी जाणीवपूर्वक तयार केलेल्या वाटत नाहीत. त्यात उत्स्फूर्तता आहे. मला वाटतं, की जी.ए. कुलकर्णी आणि ग्रेस यांच्या सृजनशीलतेचा हा एक समान गुण लक्षात घेण्यासारखा आहे. सैनिक चालत असताना त्याला ऐकू येणारे सूर वेगळे असले की त्याची पावलं इतरांपेक्षा वेगळी पडतात. तसंच ह्या दोघांचं आहे. त्यांच्या लेखनात जो वेगळेपणा येतो त्यामुळे त्यांना पूर्वसूरीही सापडत नाहीत आणि अनुयायीही मिळत नाहीत.
कथाकाराच्या कथनामध्ये एक प्रकारची सूत्रबद्धता लागते. कवी त्यापासून मुक्त असतो- असू शकतो. ग्रेसच्या कवितेला बर्यातच वेळेला कोलाजचं रूप असतं. निरनिराळ्या संवेदनांना ते आवाहन करतं. त्यातून वाचकांना तरून जायचं असतं. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना त्या कलाकृतीच्या जनकाप्रमाणे आस्वादकाचाही भाग असतो असं मानलं जातं. याचं उत्तम उदाहरण ग्रेस वाचताना आढळतं. वाचकाची मनोभूमिका संवेदना स्वीकारायला योग्य नसली तर त्याला फक्त छापलेली अक्षरं दिसतील; पण त्यातून निर्माण होणार्या दृश्य, श्राव्य, भावनिक आणि वैचारिक संवेदनादेखील झेलण्याची त्याची तयारी नसेल तर हे कष्ट वृथा आहेत.
‘संध्याकाळच्या कविता’तील सुरुवातीचं निवेदन घेऊ या. पहिल्या दोन ओळी साध्या-सरळ वाटतात.
क्षितिज जसे दिसते
तशी म्हणावी गाणी
आणि ह्या गाण्याच्या आनंदाला लाभलेलं दूरपणाचं तरीही आकर्षून घेणारं मोकळेपण लक्षात येईतो
देहावरची त्वचा आंधळी
छिलून घ्यावी कोणी
ह्या ओळींनी वाचकाला भानावर यावं लागतं. पुढील कडवं तर वाचकाला चिरविचारात नेऊन सोडतं.
गाय जशी हंबरते
तसेच व्याकुळ व्हावे
बुडता बुडता सांजप्रवाही
अलगद भरुनी यावे...
त्यात ज्या अनेक प्रतिमा समोर येतात त्यातून वाचकाला आपला काव्यानुभव घ्यायचा आहे. या कवितेवर निश्चित भाष्य कोणी करू नये. प्रत्येकाने आपापल्या तात्कालिक भाववृत्तीप्रमाणे ह्या कवितेचा आस्वाद घ्यावा. उत्तम पेंटिग किंवा उत्तम सिंफनी यांचा अर्थ शब्दांत शोधू नये. तसाच काहीसा परिणाम ग्रेस यांची कविता साधत असतो.
ग्रेस यांच्या प्रतिमा उत्स्फूर्त आहेत. एक वैयक्तिक अनुभव सांगण्यासारखा आहे. दूरदर्शन नुकतंच सुरू झालं होतं. ग्रेसची मुलाखत आरती प्रभू आणि हृदयनाथ मंगेशकर घेत होते. एक तालीम माझ्या घरी ठरली. ग्रेस क्षणाक्षणाला वेगळ्या शब्दांत आपले विचार मांडत होते. हे सारं येतं कुठून, असं सारखं वाटत होतं. प्रत्यक्ष स्टुडियोत हाच अनुभव.
त्यांना शब्दांचा आणि प्रतिमांचा सोस असेलही- परंतु तो केवळ शब्दमाधुर्य, गोडवा अशा दिखाऊ गुणविशेषांवर आधारित नाही. त्यांना ज्या अर्थछटा सुचवायच्या आहेत- सांगायच्या नव्हे तर सुचवायच्या आहेत- त्यासाठी ते ते शब्द आवश्यक असतात. जरूर वाटल्यास ते नवीन शब्द तयार करतात. सुरुवातीच्या कवितांत हे फार कमी प्रमाणात दिसतं- पहिल्या संग्रहात ‘शिल्पउदास व्याकुळता’, ‘प्राक्तनगंधी मोती’ असे अधूनमधून वेगळे शब्दप्रयोग आढळतात, तर नुकत्याच निघालेल्या ‘ओल्या वेळूची बासरी’ या ललितबंधांच्या संग्रहात तर ते ठायी ठायी येतात. त्यासाठी इंग्रजी, उर्दू, प्राचीन मराठीतील शब्द वापरावं लागले तरी ते नि:संकोच वापरतात, कारण त्याशिवाय त्यांच्यातील कवीला गत्यंतर नसावं.
ग्रेसच्या बहुतेक लिखाणातील मला जाणवणा-या एका विशेषाचा उल्लेख मुद्दाम करतो. कवितेने वाचकावर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. आमच्या विद्यार्थिदशेत वाचलेल्या काही कविता काही तरी थेट सांगायच्या- काही हृदयाला भिडायच्यासुद्धा. यशवंतांची ‘आई’ ही त्यापैकी एक. अनेकांनी मातृत्व, वात्सल्य, कारुण्य ह्या एकूणच भावनांना साद घालणार्यां आणि नावाजलेल्या कविता लिहिल्या आहेत. कवी ग्रेसनी आईविषयी बरंच लिहिलं आहे. त्यांच्या कविता अगदी वेगळ्या आहेत. खरं तर काही ठोसपणे सांगणं ही या कवीची प्रकृतीच नाही. त्यांची कविता- आपल्याला ती भोगायला मोकळं सोडते, ती काही तरी सुचवते आणि आपण ते घेऊन आपापल्या विश्वात विहार करू शकतो. काही कविता मार्ग आखून देतात. त्यातून आडवाटा, पळवाटा काढणं कठीण असतं. ग्रेसच्या कवितेला ठरलेल्या मार्गाचं बंधन नाही. वाट पुसायला मैलाचे दगड नाहीत. आपण निर्भय होऊन उड्डाण करायचं. ग्रेसच्या कवितेवर दुर्बोधतेचा आरोप होतो तो त्याच कारणाने, आणि ती पुन:पुन्हा वाचावीशी वाटते तेही त्याच कारणाने.
ग्रेसच्या कवितांच्या आस्वादासंबंधी मला आलेले (त्यांचा मित्र म्हणून) दोन गमतीचे अनुभव. माझ्या परिचयाचे प्राध्यापक, ज्यांना ग्रेस शिकवावे लागतात- ते मला गळ घालतात, की जरा तुमच्या मित्राला विचारांना की त्यांची कविता कशी शिकवायची? ग्रेसनी गद्यलेखन काही नियतकालिकांसाठी मुद्दाम केलं आहे, पण त्यांनी कोणासाठीही मुद्दाम गीतं लिहिल्याचं मला तरी माहीत नाही, तरी त्यांच्या कविता स्वयंस्फूर्तीने संगीतबद्ध केलेल्या संगीतकारांची संख्या प्रचंड आहे. ही कविता दुर्बोध, मग त्या संगीतकारांना ती भुरळ का पाडते?
आमच्या प्रदीर्घ मैत्रीच्या काळातील अनेक गोष्टी सांगता येतील. मध्यंतरी आम्ही ‘संदर्भ’ ह्या नियतकालिकाच्या प्रकाशनाची खटपट केली. त्यात संयोजक म्हणून महत्त्वाचा सहभाग मनोहर पिंपळापुरे यांचा होता; तरी ग्रेस यांचं संपादकीय कर्तृत्व मी पाहत होतो. ते दर अंकातून लेखकांना विषय सुचवत असत. सहज आठवणारा एक- ‘डॉ. झिवागो सिनेमातील बर्फ. ते विषय वाचले तरी त्यांना वेगळीच धून कशी ऐकू येत होती हे कळत होतं. त्यांच्या लेखनात, विशेषत: गद्यलेखनात अनेक साहित्यकृतींचा उल्लेख येतो. त्यात रिल्के, सार्त्र , गालिब अशी निरनिराळ्या साहित्यप्रवाहांतील थोरांचा उल्लेख असतो. ह्या सा-यांचा खोलवर अभ्यास करणं सहसा शक्य नाही आणि ग्रेसची तशी वृत्तीही नाही. पण ज्ञान ग्रहण करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यापैकी एकाला मी गमतीने रेडिएशन असं म्हणतो. ग्रेसमध्ये ही विलक्षण ताकद आहे. जे जे त्यांच्या दृष्टीस किंवा कानावर पडेल ते आत्मसात करून त्यावर भाष्य करण्याची त्यांना खोड आहे, असं म्हणायला हरकत नाही. गेली दहा वर्षं मी गांधींविषयी वाचन करतो आहे. तेव्हा निदान अभ्यासापुरते गांधी माझे आहेत, अशी माझी फुशारकी. परंतु ग्रेस यांच्या ह्या उडत्या व्यासंगातून गांधीबाबाही सुटले नाहीत. ते गांधींविषयी मधूनच असे काही मौलिक विचार मांडतात की मी चमकून जातो आणि पुन्हा विचार करू लागतो.
ग्रेसविषयी खूप काही सांगण्यासारखं आहे. ते बरीच वर्षं मराठीचे प्राध्यापक होते आणि पुढे सौंदर्यशास्त्रावर व्याख्याने देऊ लागले. ही व्याख्यानं ऐकण्याची संधी मला मिळाली नाही, पण त्यांच्या विद्यार्थ्यांकडून जे कळलं त्यावरून आपण त्यांच्या वर्गात बसायला हवं होतं असं वाटण्यासारखं आहे.
अलीकडे ते आणि हृदयनाथ मंगेशकर जाहीर कार्यक्रम करतात. त्या कार्यक्रमाला मुलाखतही म्हणता येत नाही. परंतु पंडितजींच्या गाण्याइतके ग्रेस यांच्या व्याख्यानांना (बडबडीला म्हणायलाही हरकत नाही) श्रोते आतुर असतात हे मी अनुभवले आहे.
ग्रेस यांना कवी, लेखक म्हणून आज सर्व ओळखतात. त्यांच्या लेखनातील दुर्बोधतेला घाबरणारे त्यांचं लेखन वाचत नसतील, तरीही त्यांना ग्रेसबद्दल अबोध अशी ओढ आहे. तसा त्यांचा परिवारही मोठा असतो. पण तो सारखा बदलत असतो. त्यांच्या जवळ राहण्याची दीर्घकाळ संधी मिळालेला असा मी आहे, आणि याचं मला फार मोठं समाधान आहे. आमच्यात समान दुवा कोणता हे मला कधी उमगलं नाही. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा हॉस्पिटलमध्ये मी मजेत होतो. काळजी करायची ती माझी शुश्रूषा करणा-यांनी. गेले काही महिने ग्रेस पुण्यात उपचार घेत आहेत, पण तेही मजेत, उत्तम कविता लिहीत आणि मधूनच कार्यक्रम करत. कदाचित जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहता पाहता स्वत: विरक्त राहणे हा एक समानशीलतेचा पैलू असू शकेल. पण त्याचीही अभिव्यक्ती फार वेगळ्या प्रकारे घडत असते.
एक खरं, की त्यांच्या वैयक्तिक परिवारात शिरण्याची संधी मला मिळाली. ग्रेस यांच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच चढउतार आले. जे काही करायचं ते पराकोटीने, ह्या स्वभावानुसार त्यांना काही काळ व्यसनांनी घेरलं होतं. त्याचा त्यांच्या कौटुंबिक आयुष्यावर परिणाम झाला. त्यांना लीलाबाईंपासून दूर व्हावं लागलं. ह्या बिकट काळातदेखील बाईंचा माझ्यावर विश्वास कायम राहिला. ग्रेसची मुलं मला आपला मानतात. ग्रेस ह्या कवीचा मी प्रकाशक आहे याचा मला अर्थातच अभिमान आहे. पण त्याहून अधिक मी गोडघाटे कुटुंबापैकी एक आहे याचा आहे.

_________________________________________________________________________________
ग्रेस यांची एक कविता
 मर्म … 
ज्याचे त्याने घ्यावे
ओंजळीत पाणी
कुणासाठी कोणी
थांबू नये!
…असे उणे नभ
ज्यात तुझा धर्म
माझे मीही मर्म
स्पर्शू नये
– चंद्रमाधवीचे प्रदेश, ग्रेस

_________________________________________________________________________
संदर्भ:
१) मूळ  लेख हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे....-रामदास भटकळ-फेब्रुवारी २०१२ -(http://uniquefeatures.in/anubhav)

२) ग्रेस यांचे  छायाचित्र -http://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Grace

३)कविता "मर्म" -  https://marathikavitaa.wordpress.com/category/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/page/2/
- http://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Grace


Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण