चल्- चलूया की! (डॉ. आशुतोष जावडेकर )

संभाजी भगत या लोकविलक्षण कलाकाराची समीक्षा नक्की कोण करणार आहे? तो लोकशाहीर आहे, म्हणून कुणी लोकसाहित्याचा अभ्यासक? तो उत्तम गातो म्हणून कुणी संगीत समीक्षक? त्याच्या विद्रोही विचारांना हेरत दलित स्टडीज्वाला कुणी नव-प्रस्थापित? का तो अति डावा आहे म्हणून ठोकण्याच्या मिषाने मैदानात उतरलेला कुणी अति उजवा लेखक किंवा समीक्षक? मला वाटतं, या साऱ्यांनीच संभाजी भगतांच्या कामावर लिहावं. त्यांच्या कामाचा, निर्मितीचा आकार आणि आवाका हा मोठा आहे. मला आज काही तशी समीक्षा करायची नाही. या सदराचा आवाका मोठा असला तरी त्याची जागा मर्यादित आहे! पण मी करेन तर संभाजी भगत हेच एक स्वतंत्र डिस्कोर्सचं एकक मानून करेन.


 आता फक्त लिखित शब्द म्हणजे साहित्य समजण्याचा काळ संपलाय. व्हॉट्सअॅपच्या दीर्घ चॅटनंतर आलेलं एखादं चिन्ह हेही कवितेसमान असू शकतं- तीही एक संहिताच (text) असते. आणि इथे तर हा कवी त्याच्या बुलंद, खणखणीत आवाजात साऱ्या प्रस्थापितांना आव्हान देत गातोय बघा. आणि मग संगीत आणि साहित्य हे दोन डिस्कोर्स एकवटत आहेत. तो म्हणतोय : हे पालखीचे भोई, यांना आईची वळख नाही जिथे जिंदगी जागते, यांची लेखणी पोचत नाही



( पालखीचे भोई : शाहीर संभाजी भगत आणि सहकारी यु ट्युब क्लिप -https://www.youtube.com/watch?v=9_tteC2yjso)
गाताना त्या लेखणीशब्दामधल्या णीचा पाय मोडत गातो आहे तो. पण त्याच्या डोळ्यात असा अंगार आहे की वाटावं, हा असा समोर येईल आणि तशा प्रस्थापित लेखकाचा पाय खराच मोडेल! पण कलेमधलं संयमाचं मूल्य या सर्जकाला ठाऊक आहे. तो सारा राग त्याच्या शब्दांत, सुरांत गच्च दाटत राहतो. मधेच तो सर्दिशी मान हलवीत चल्असं आवेशात म्हणतो आणि आपण पाठ सावरून बसतो. खरंच, जायचं याच्यासोबत? जायचं त्या वणव्यात? का हा दूर पळवतोय? याचे राजकीय विचार आणि तुझे विचार सारखे नाहीत. प्रस्थापित आणि शोषित हे याला जितके अभेद्य वर्ग वाटतात, तसे तुला वाटत नाहीत. तो पक्का टोकाचा डावा आहे, तू सेंट्रिस्ट राजकारण मानतोस. पण कला ही श्रोत्याला खेचत नेते. कुठलेच भेद त्या कलेच्या ओढय़ात टिकत नाहीत. काय गातोय हा! कवितेची सुरांसोबतची सांगड काही आजची नाही. रविकिरण मंडळामधली कवी मंडळी किती गायची! त्याच वळणाच्या कवींना आता हा ठोकतोय! राजकवी, लाजकवी..तोरा तुझा काय सांगू?’ आणि मग एकदम गद्यात शिरत तो म्हणतो.. म्हणतो कसला, गुरगुरतो, ‘लताबाई, आशाबाई.. मागे उभा मंगेश, पुढे बी उभा मंगेश.. अरे, आमी कुठे उभेय? आमचं एखादं गाणं म्हणा लताबाई?’ आणि मग पुन्हा तो लताबाईअसं म्हणतो. ते साधं म्हणणं नसतं. ती जरब असते. हुकुमत असते. अशक्य अशक्य राग असतो मनात कुठेतरी साचलेला! कुठून हा राग येत असेल? या कवीनं माणूस म्हणून काय अनुभव घेतले असतील? तशी मला माहितीआहे. मी या कवीसंबंधीच्या अनेक मुलाखती, बातम्या वाचल्या आहेत. पण ते एका तऱ्हेचंच सत्य झालं. अंतर्मनाची तडफड तर आपल्या कुणालाच चुकली नाही! संभाजी भगतांना वाटत नसलं तरी प्रस्थापितांनाही ती चुकली नाही! पण इथं हे गीत ऐकताना जी तडफड मला धुक्याआड दिसते आहे, तिचा पायरव केवढा झोंबरा आहे! गायला लागला बघा हा शाहीर ते धृ्रपद. मधेच तो रानात सांग कानात आपुले नातेपासून तेरी मांग सितारो से भर दूंगाअसं लिहिणाऱ्या तमाम कवींची बिनपाण्याने हजामत करतो आहे. प्रस्थापित विरुद्ध शोषित, सवर्ण विरुद्ध दलित, गोऱ्या चामडीचे विरुद्ध सावळे-काळे, श्रीमंत विरुद्ध गरीब अशा साऱ्या बायनरीज्- द्वंद्वे- तो गाण्यात गुंफत चालला आहे. ऐश्वर्या रायला भर उन्हात खेडय़ातल्या मैदानात पळवायला हवं- मग सौंदर्याची परीक्षा होईल, असं तो सांगतो आहे. मागे कोरस टाळ्या वाजवत राहतो. ढोलकी वाजत राहते. दोन उत्तम साथीदार उत्तम गातात. आणि मग हा ते सारं चित्र मागे ठेवत फटकारतो पुन्हा : ‘..मला कळत नाही हे लोक सुंदर कसे काय? ज्यांचे हात काळ्या पैशात बुडले आहेत. या निसर्गाशी, या समष्टीशी, या समाजाशी नातं तोडलेली माणसं सुंदर असू शकत नाहीत..माझा कान थांबतोच तिथे. सगळ्या राजकीय भूमिकेपलीकडचं, अत्यंत मूलगामी स्वरूपाचं, खोल, चिंतनशील विधान हा माणूस सहज गाता गाता त्या रागाच्या मधोमध उच्चारतो आहे! 
आठवते आहे मला टोनी मॉरीसन. कृष्णवर्णीय किशोरींची ती भग्न, चटका लावणारी दि ब्लूएस्ट आय्नावाची कहाणी कादंबरीच्या माध्यमातून लिहिणारी नोबेल पारितोषिकविजेती लेखिका. तिच्या लेखनात तर असे विद्रोहाच्या पलीकडे थांबलेले चिंतनशील तुकडे पदोपदी आहेत. त्या तुकडय़ांची मूळं विद्रोहाच्या मातीतच आहेत. पण त्यांचे देठ जिथे झेपावतात तो अवकाश अहर्निश चाललेल्या सत्तासंघर्षांच्या, वर्गविद्रोहाच्या पलीकडचा आहे. आणि मग माझं लॉजिकल मन त्या वाम्हणण्याच्या क्षणी मधेच म्हणत आहे : रानात सांग कानातलिहिणारा कवी हा त्याच्याशी प्रामाणिक असला की झालं! आणि उजाड माती हे जसं वास्तव आहे तसंच इंद्रधनुष्यही! किंवा ऐश्वर्या राय : संभाजी भगतांच्या शारीरिक श्रमांच्या कसोटीला ती किंवा अन्य हीरोइन्ससहज उतराव्यात. त्या ट्रेडमिलवर पळतात तेवढं रोज! आणि प्रस्थापित कवी म्हणजे तरी काय? राजकवी म्हणजे तरी नक्की काय? यू-टय़ूबवर नाव टाकलं तर खुद्द भगतांचे व्हिडीओचे ढीग येतात. अनेक चित्रपटगीतं, मुलाखती, सन्मान तिथे झळकत राहतात. मग भगत स्वत:ला नक्की कसे ओळखतात? प्रस्थापित की विद्रोही? की व्यापक जनसमूहापर्यंत पोचण्यासाठी तडजोड म्हणून प्रस्थापित मार्गाचा वापर करणारा विद्रोही कवी म्हणून? हे सारे प्रश्न अगदी थोडेसे गमतीत, पण पुष्कळशा गांभीर्यानेच मांडले आहेत. प्रस्थापित आणि बिन-प्रस्थापित ही दोन्ही टोकं एकमेकांकडे खेचली जाऊ शकतात. त्यांच्या अस्तित्वाची ती गरजही असते असंही मला वाटतं. पण मग मला आठवतो, एखादा भांडवलशाहीचा प्रतिनिधी. त्याचा अवाढव्य व्यापार, त्याची सत्तेची व्याप्ती, त्याची बोलण्या-चालण्यातली मग्रुरी, जग मुठीत- किंवा खरं तर खिशामध्येच टाकण्याची ती सुप्त आकांक्षा, अहंकाराचा भन्नाट वारा आणि जग विकत घेतल्याचे बोलण्यातून पदोपदी गळत राहणारे दाखले! मग ते टोक पाहिलं की अगदी झडझडून वाटतं, की सम्यक नसला, आक्रमक असला, जगाला तोंडावर घेणारा असला, तरी एक संभाजी भगत हवाच! आणि तो एखादाच असतो! म्हणतो- हे पालखीचे भोई, यांना आईची वळख नाही..’ ‘आपले रवि, आपले कवि गावोगावी शोधू चला आपली गाणी, आपली लेणी आपणच खोदू चला..मग असं म्हणताना आपण भविष्यातल्या एका नव्या घेट्टोला जन्म देतो आहोत हे सर्जकाला जाणवत असेल का? सगळे विद्रोही दाखले देताना आपल्या गाण्यांत स्त्री-प्रतिमाच येतात- बापाची वळखनाही; सोनू निगम किंवा रफी नाही, सलमान किंवा आमिर वगैरे नाहीत. वळखआईची असते, गातात लताबाई, सुंदर आणि श्रीमंत असणारी ऐश्वर्या असते- हे या माझ्या आवडलेल्या शाहिराला जाणवत असेल का? संभाजी भगत या डिस्कोर्सचं सगळ्यात मोठ्ठं श्रेय हे आहे की, ‘वाचकाच्या’ (यात श्रोते, online श्रोते सारे आले.) मनात प्रश्नांची माळ हा घालतो! तापलेल्याला दिलासा देतो; निवलेल्याला तापवतो! सुस्थिर जगण्यामागे असलेल्या अनेकांच्या आयुष्याच्या करपलेल्या भाकरीसारखा तुकडा हा शाहीर आपल्या पुढय़ात दणकन् आपटतो. मग मागाहून म्हणा तुम्ही : पटलं बुवा.. पटलं नाही बुवा. पण त्याचा तो चल्म्हणतानाचा आवेश तुम्हाला घेरत राहिला नाही असे व्हायचे नाही! मी त्याचं ते चल्म्हणणारं थोडं तिरकस, थोडं उद्धट आमंत्रण आपखुशीने, स्थिरबुद्धीने स्वीकारलं आहे!
--------------------------------------------------------------
१) मूळ लेख : वा म्हणतांना -डॉ. आशुतोष जावडेकर
http://www.loksatta.com/vah-mhantana-news/folk-singer-sambhaji-bhagat-1201932/#sthash.BTjFRU6a.dpuf
२) संभाजी भागात छायाचित्र-http://images.mid-day.com/images/2015/oct/11Sambhaji-Bhagat-l.jpg 
३) पालखीचे भोई : शाहीर संभाजी भगत आणि सहकारी यु ट्युब क्लिप -https://www.youtube.com/watch?v=9_tteC2yjso

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण