गुप्तहेर ही संकल्पना भारतात अगदी वैदिक काळापासून आढळते. यजुर्वेदात, ‘स्तेनानां पतये नम:’ (१६.२०) किंवा ‘स्तायूनां पतये नम:।’ (१६.२१) असे म्हटले आहे. यात ‘स्तायु’ किंवा ‘स्तेन’ या दोन्ही शब्दांचा अर्थ ‘गुप्तहेर’ असा आहे. त्यामुळे ‘हेरांच्या अधिपतीला वंदन असो’ अशी ती प्रार्थना आहे. हेरांसाठी गूढपुरुष, चर, चार, यथार्हवर्ण, स्पश असे विविध समानार्थी शब्द आहेत. या प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ आहे. गूढ म्हणजे गुप्त. गुप्तरूपात वावरतो तो गूढपुरुष. चर किंवा चार यात चालणे या अर्थाचा संस्कृत धातू आहे. बातम्या काढायच्या तर फिरणे आलेच. यथार्हवर्ण यातील ‘वर्ण’ म्हणजे वेश व ‘यथार्ह’ म्हणजे हवा तसा वेश घेणारा. कारण ज्या लोकांत जायचे त्यांच्यासारखा वेश असेल तरच त्यांच्यात मिसळणे व बातम्या काढणे शक्य होईल. स्पश यातदेखील थांबवणे, पाहणे, स्वीकारणे अशा अर्थाचा संस्कृत धातू आहे. थोडक्यात लोकांना थांबवून दिसेल त्या गोष्टीचा स्वीकार करायचा व ती प्रत्येक गोष्ट तत्परतेने राजाला कळवायची हे गुप्तहेराचे कर्तव्य. महाभारतात शांतिपर्वात, केवळ शत्रू-मित्रांच्याच नव्हे तर राजकुमारांच्याही मनोगतांची ओळख करून देणारा, अशा शब्दांत गुप्तहेराचे वर्णन केले आहे. तर रामायणात, अधर्माचा त्याग करून गुप्तहेरांकरवी सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणे व प्रजेचे धर्मानुसार रक्षण करणे, हे राजाचे कर्तव्य सांगितले आहे. राम-सुग्रीव मैत्रीची वार्ता हेरांकरवी अंगदाला कळल्याचे वर्णन आहे. चारचक्षु राजा पंच ज्ञानेंद्रियांतील नेत्र हे सर्वश्रेष्ठ इंद्रिय. संस्कृत साहित्यात हेरांचा उल्लेख वारंवार राजाचे नेत्र असा येतो. मनुस्मृतीत दुसऱ्याच्या द्रव्याचे अपहरण करणारे उघड व गुप्त असे दोन प्रकारचे चोर असतात व गुप्तहेररूपी नेत्र असलेल्या राजाने त्यांचा शोध घेतला पाहिजे, असे म्हटले आहे. द्विविधांस्तस्करान्विद्यात्परद्रव्यापहाकान्। प्रकाशांश्चाप्रकाशांश्च चारचक्षुर्महीपति:।। (मनु ९.२५६) रामायणात, राजा दूर असूनसुद्धा सर्व गोष्टी चारांमुळे पाहू शकतो, म्हणून राजांना चारचक्षु असे म्हटले आहे. यस्मात्पश्यन्ति दूरस्था: सर्वानर्थानराधिपा:। चारेण तस्मादुच्यन्ते राजानश्चारचक्षुष:।। (रामायण) तर हितोपदेशात ज्यांच्यामुळे स्व व परराष्ट्रांतील कार्य व अकार्याचे निरीक्षण करता येते असे चारचक्षू असलेला राजा अंधळा नसतो, अशा शब्दांत गुप्तहेरांचा गौरव केला आहे. भवेत्स्वपरराष्ट्राणां कार्याकार्यावलोकने। चारचक्षुर्महीभर्तुयस्य नास्त्यन्ध एव स:।। (हितोपदेश ३.३४) पण गुप्तहेरांवरील विस्तृत चर्चा आढळते ती कौटिलीय अर्थशास्त्रात. गूढपुरु षांवर कौटिल्याने जेवढा भर दिला आहे तेवढा नंतरच्या काळात फक्त शिवाजी महाराजांनी दिल्याचे जाणवते. अर्थशास्त्रातील पहिल्या विनयाधिकरणात अकरावा अध्याय हा ‘गूढपुरु षोत्पत्ति: तत्र संस्थोत्पत्ति:’ व बारावा अध्याय हा ‘गूढपुरु षोत्पत्ति: तत्र संचारोत्पत्ति:’ असा आहे. हे दोन अध्याय गूढपुरुषांची नियुक्ती, त्यांचे कार्य, वेषांतर अशा विविध विषयांची चर्चा करतात. अत्यंत तर्कशुद्ध व कार्यक्षम अशी व्यवस्था त्यांनी उभी केली होती.
गुप्तहेराचे कर्तव्य द्वैतवनात युधिष्ठिर आपले अतुल्य पराक्रमी चार भाऊ व याज्ञसेनी द्रौपदीसह बसला होता. सर्वाच्या चेहऱ्यावर समोरची व्यक्ती काय सांगणार आहे, ते जाणून घ्यायची उत्सुकता होती. ब्राह्मण वेशातील समोरच्या माणसाचा चेहरादेखील चिंताग्रस्त दिसत होता. कारण त्यांनी आणलेली बातमी पांडवांच्या दृष्टीने हितावह नक्कीच नव्हती. संभाषणाला कशी सुरुवात करावी, याचा काही क्षण विचार करून हात जोडून तो म्हणाला, ‘‘हे राजन, राजाचे डोळेच असणाऱ्या, कार्यावर नियुक्त केलेल्या गुप्तहेरांनी राजाला कधीही फसवू नये. म्हणून राजांनीसुद्धा तो जे सांगेल ते प्रिय किंवा अप्रिय असले तरी शांतपणे ऐकून घ्यावे, कारण प्रिय असूनसुद्धा हितकारक वाणी दुर्लभ असते.’’ (क्रियासु युक्तैर्नृप चारचक्षुषो न वञ्चनीया: प्रभवोऽनुजीविभि:। अतोऽर्हसि क्षन्तुमसाधु साधु वा हितं मनोहारि च दुर्लभं वच:।।) किरातार्जुनीयम् १.४ ब्राह्मणवेशातील ती व्यक्ती म्हणजे पांडवांना वनवासात पाठवल्यावर दुर्योधन राज्य कसे करत आहे, ते जाणून घेण्यासाठी पांडवांनी नियुक्त केलेला गुप्तहेर होता व त्यांनी आणलेली बातमी पांडवांसाठी निश्चितच हितकर नव्हती. म्हणूनच गुप्तचर राजाला विनंती करत होता, ‘बातमी हितकारक नसली तरी गुप्तहेरांनी मात्र जे सत्य आहे तेच सांगायला हवे, कारण गुप्तहेराच्या रूपाने राजा सर्व पाहत असतो व आपल्या योजनांची आखणी करीत असतो.’ किरातार्जुनीयम् या संस्कृत काव्यातील वरील प्रसंग गुप्तहेराची मनोवस्था नेमकेपणाने मांडतो. सत्याचा अपलाप होऊ न देता आपल्या राजाच्या विरोधातील बातमी कटू असली तरी सत्य जे असेल तेच सांगणं, हे गुप्तहेराचे कर्तव्य.
कौटिल्याची गुप्तहेर व्यवस्थाअकराव्या अध्यायाच्या सुरुवातीला पहिल्याच सूत्रात कौटिल्य म्हणतो, उपधाभि: शुद्धामात्यवर्गो गूढपुरु षानुत्पादयेत् कापटिकोदास्थितगृहपतिकवैदेहकतापसव्यञ्जनान् सत्रितीक्ष्णरसदभिक्षुकीश्च। (१.११.१). उपधा म्हणजे गुप्त कसोटय़ा. अमात्यांची निवड करताना विविध प्रकारच्या गुप्त कसोटय़ा सांगितल्या आहेत. अशा गुप्त कसोटय़ांतून पार झालेल्या अमात्यांनी गुप्तहेरांची निवड करावी. यातील कापटिक, उदास्थित, गृहपतिक, वैदेहक व तापस हे पहिले पाच गुप्तहेर एका ठिकाणी राहून कार्य करतात. यांना ‘पंचसंस्था’ असे म्हणतात. आता प्रश्न असा पडेल की, गुप्तहेराला फिरल्याशिवाय बातम्या मिळणार नाहीत. मग ही संस्था कशी काय? सगळेच फिरत राहिले तर बातम्यांचे संकलन कसे होणार? त्यामुळे संचारी गुप्तहेरांनी गोळा केलेल्या बातम्या योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवायच्या तर त्यांनी या बातम्या या संस्थांकडे द्यायच्या व तेथून त्या पुढे पाठवण्याची व्यवस्था होत असे. आता कौटिल्याच्या एकेका गुप्तहेराचा परिचय करून घेऊ या. पंचसंस्था : १. कापटिक - दुसऱ्याचे मर्म जाणणारा, अत्यंत बुद्धिमान असा जो विद्यार्थी तो कापटिक. (परमर्मज्ञ: प्रगल्भ: छात्र: कापटिक:। १.११.२). या ठिकाणी हेरगिरीसाठी लहान विद्यार्थ्यांची निवड का, असा प्रश्न सहजच मनात येतो. त्याचे उत्तर सोपे आहे. आपल्याकडील समाजव्यवस्था पाहता लहान ब्रह्मचाऱ्याशी एखादी स्त्री जेवढय़ा मोकळेपणी बोलेल तेवढा मोकळेपणा तरु ण किंवा प्रौढ ब्रह्मचाऱ्याशी असणार नाही. २. उदास्थित - संन्यास घेऊन आता त्यापासून परावृत्त झालेला व बुद्धी व शुचिता या गुणांनी युक्त तो उदास्थित(प्रव्रज्याप्रत्यवसित: प्रज्ञाशौचयुक्त उदास्थित:। १.११. ४). एखाद्याला संन्यास घेतल्यावर पुन्हा समाजात यावेसे वाटत असेल तर त्याला गुन्हेगार ठरवून शासन करण्यापेक्षा उदास्थिताच्या रूपात हेरगिरीसाठी नियुक्त करावे, असे कौटिल्य सांगतो. ३. गृहपतिकव्यंजन - ज्याचे उपजीविकेचे साधन नष्ट झाले आहे पण जो बुद्धिमान व शुद्ध आचरणाचा आहे, असा शेतकरी म्हणजे गृहपतिकाच्या वेशात काम करणारा हेर (कर्षको वृत्तिक्षीण: प्रज्ञाशौचयुक्तो गृहपतिकव्यञ्जन:। १.११.९). ४. वैदेहक - उपजीविकेचे साधन नष्ट झाले आहे पण जो बुद्धिमान व शुद्ध आचरणाचा आहे, असा व्यापारी म्हणजे वैदेहक(वाणिजको वृत्तिक्षीण: प्रज्ञाशौचयुक्तो वैदेहकव्यञ्जन:। १.११.९). ५. तापसव्यञ्जन - उपजीविकेची अभिलाषा असणारा, मुंडन केलेला किंवा जटाधारी तपस्वी हा तापसव्यंजन हेर. (मुण्डो जटिलो वा वृत्तिकामस्तापसव्यञ्जन:। १.११.१३). यातील तापसव्यंजन हेराच्या बाबतीत कौटिल्यांनी मजेशीर सूत्र दिले आहे. तो सांगतो या तपस्व्यांनी नगराच्या जवळ राहून महिन्या-दोन महिन्यांतून एकदा उघडपणे एक मूठभर अन्न किंवा भाजी खावी. कारण चमत्काराशिवाय साधू नसतो. एवढे अल्प अन्न ग्रहण करूनसुद्धा ती व्यक्ती प्रकृतीने उत्तम असेल तर स्वाभाविकपणे लोकांना त्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावर तेज वगैरे दिसायला लागते व लोक त्याच्या भजनी लागतात. पण प्रत्यक्षात असे अल्प अन्न ग्रहण करणे कोणालाही परवडण्यासारखे नसते. आणि म्हणून कौटिल्य त्याच सूत्रात पुढे गुप्तपणे पाहिजे तो आहार घेण्यास न विसरता सांगतो. (स नगराभ्याशे प्रभूतमुण्डजटिलान्तेवासी शाकं यवमुष्टिं वा मासाद्विमासानन्तरं प्रकाशमश्नियात् गूढमिष्टमाहारम्। १.११ १४).हा तपस्वी नुसता सिद्ध आहे असे म्हणून चालणार नाही तो प्रसिद्धही व्हायला हवा म्हणून या तपस्व्याच्या विद्यार्थ्यांनीच हा ‘सिद्धपुरुष समृद्धी प्राप्त करून देतो,’ अशी बतावणी करायला सुरुवात करावी. संचारी गुप्तहेर बाराव्या अध्यायात संचारी गुप्तहेरांची माहिती येते. सत्री, तीक्ष्ण, रसद व भिक्षुकी हे चार हेर संचारी या प्रकारात येतात. १. सत्री - समाजात मिसळण्यासाठी या गुप्तहेरांना किती विविध प्रकारचे ज्ञान असावे त्याची फार मोठी यादी कौटिल्याने दिली आहे. यांत सामुद्रिक शास्त्र - अंगावरील चिन्हांवरून ज्योतिष सांगणे म्हणजे सामुद्रिक शास्त्र. अंगविद्या - एखाद्याच्या शरीराला स्पर्श करून त्या स्पर्शावरून ज्योतिष सांगणे, यात वेदांगांचाही समावेश होतो. जादूटोणा, इंद्रजाल, चार आश्रमांची-धर्माची माहिती, निमित्त म्हणजे शुभचिन्ह किंवा पशू-पक्ष्यांच्या ओरडण्यावरून शकुन सांगणे. अन्तरचक्र - यांत कोल्हे व इतर प्राण्यांच्या ओरडण्यावरून भविष्यकथन किंवा वास्तुशास्त्रानुसार दिकमंडळाची बत्तीस दिशांमध्ये केलेली विभागणी या गोष्टींचा समावेश होतो. याशिवाय संसर्गविद्यांची माहिती गुप्तहेराला असावी असे कौटिल्याचे मत आहे. गुप्तहेराला विविध भाषांचे ज्ञान असावे व त्याचबरोबर ज्या समाजात जाईल तसा वेष व वर्तणूक असावी असे कौटिल्याने आवर्जून सांगितले आहे. संसर्गविद्यांमध्ये चित्रकला, संगीत, नृत्य, नाटय़, कथाकथन अशा विविध कलांचा, थोडक्यात ज्यामुळे पटकन समाज आकिर्षत होईल अशा गोष्टींचा समावेश आहे. २. तीक्ष्ण - अर्थार्जनासाठी प्राणांची पर्वा न करणारा, क्रूर जंगली श्वापदांशी लढण्याची हिंमत असलेला, अत्यंत शूर हेर म्हणजे तीक्ष्ण. ३. रसद - ‘रस’ या शब्दाचे दोन अर्थ आहेत - १. औषध २. विष. त्यामुळे ‘रसं दताति स: रसद:’ औषध किंवा विष देणारा तो रसद. हादेखील तीक्ष्णाप्रमाणे अत्यंत क्रूर, कार्य करताना नातीगोती लक्षात न ठेवणारा असा असतो. ४. भिक्षुकी - इ. स. पूर्व चवथ्या शतकात स्त्रियांचा उपयोग कौटिल्य हेरगिरीसाठी करतो. अर्थात या स्त्रियादेखील बुद्धिमान असल्या पाहिजेत असा दंडक आहेच. कारण हेरगिरी म्हणजे कुणा येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. गुप्तहेरांचे मुख्य प्रकार पाहिल्यावर आपण त्याच्या काही सूत्रांचा विचार करू या. सुरुवातीलाच गुप्तहेरांची नियुक्ती करून प्रजेचे धर्मानुसार रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य रामायणात सांगितलेले आपण पाहिले आहे. त्याला अनुसरून कौटिल्य स्वराष्ट्र, परराष्ट्र, वनं, उदासीन, मध्यम, शत्रुराष्ट्र, मित्रराष्ट्र इतकेच नव्हे तर सर्वच्या सर्व मंत्री यात अगदी राजपुत्र, राणी, पुरोहित, सेनापती, शासकीय अधिकारी अशा सर्वाचा समावेश करतो.
कौटिल्य आणि शिवाजी महाराज अर्थशास्त्राचा अभ्यास शिवाजी महाराजांनी केला होता अथवा नाही हे कळायला मार्ग नाही. पण अर्थशास्त्रातील सूत्रांचा प्रयोग त्यांनी वेळोवेळी केलेला दिसून येतो. कौटिल्याने हेरांना दीर्घरोग, उन्माद किंवा आग लावून अशा कुठल्याही प्रकारे बाहेर पडण्याची सूचना केली आहे. आग्य्राहून सुटका करून घेण्यासाठी महाराजांनी आपल्याला असाध्य रोग झाल्याची बतावणी केली. मौलवी, बैराग्यांना मिठाया, फळं वाटूनही त्यात फरक पडत नव्हता आणि एक दिवस बातमी आली, महाराज गायब झाले. अफजलखानाची बातमी आणण्यासाठी नानाजी प्रभू मुसेखोरकर हा फकिराच्याच वेशात फिरला होता. अफजलखान, शाहिस्तेखान, आग्य्राहून सुटका, सुरतेची लूट किंवा राजांची इतर कोणतीही चढाई असो, अत्यंत वेगाने बातम्या काढणाऱ्या हेरांची प्रचंड मोठी फौज कार्यरत होती हे नक्की. हेरांच्या बिनचूक माहितीमुळे लढाईत मिळालेल्या निर्विवाद यशाचे उदाहरण म्हणजे उंबरखंडीची लढाई. मुगल सरदार शाहिस्तेखान ९ मे १६६० रोजी पुण्यात पोहोचला. १६६१च्या जानेवारी महिन्यात शाहिस्तेखानाचा एक वजनदार सरदार कारतलबखानाने राजांच्या विरुद्ध मोहीम सुरू केली. त्याला पुण्याहून निघून कोकणात पाली, नागोठणे, चौल हे प्रांत जिंकत पुढे उत्तरेकडे पनवेल, कल्याण, भिवंडी हे प्रांत घ्यायचे होते. खानाने आपल्या मोहिमेचा मार्ग कोणालाही कळू नये म्हणून योग्य ती काळजी घेतली होती. प्रत्यक्षात आंबेनळी घाटातून पेण-नागोठणे प्रांतात उतरायची योजना होती पण बतावणी मात्र खान बोरघाटतून उतरणार अशी केली गेली. असं म्हणतात, राजांना खानाच्या मोहिमेच्या प्रत्येक तासाची बातमी राजगडावर पोहोचत होती. राजांनीही सैन्याची जमवाजमव पेणच्या जवळ सुरू केल्याची बातमी खानापर्यंत जाण्याची व्यवस्था केली. ३१ जानेवारी १६६१ला राजे नेताजी पालकर, मोरोपंत पिंगळे, तानाजी मालुसरे अशा लोकांसह उंबरखंडीच्या खालच्या तोंडाशी पोहोचले. १ फेब्रुवारीच्या सायंकाळपर्यंत राजांचे सर्व सैन्य उंबरखंडीत मोक्याच्या जागी लपून बसले. दुसरी एक तुकडी घाट न उतरता कुरवंडय़ाच्या पठाराच्या जंगलात लपून राहिली. खानाचे संपूर्ण सैन्य घाट सोडून खाली उतरले म्हणजे मागून त्यांची नाकेबंदी या सैन्याने करायची होती. २ फेब्रुवारी रोजी सकाळी खानाच्या सैन्याने घाट उतरायला सुरुवात केली. कुरवंडा ते चावणी या वाटेवर पाण्याचे दुर्भिक्ष. त्यातच आता सूर्य डोक्यावर तळपायला लागला. सारे सैन्य घामाघूम झाले होते आणि काय होत आहे हे कळण्यापूर्वीच ‘हर हर महादेव’च्या ललकारीबरोबर खानाच्या सैन्यावर दगड-गोटे, बाण व बंदुकांचा मारा सुरू झाला. खानाच्या सैन्याला मारा कुठून होत आहे ते कळण्याचीही उसंत नव्हती आणि जंगलात लपून बसलेले राजांचे सैन्य दिसतही नव्हते. शरण येण्याशिवाय खानापुढे पर्याय उरला नाही. खानाच्या सैन्यात स्थानिक लोकांचा भरणा जास्त होता. यांना उदरनिर्वाहाचे साधन व सन्मान मिळाला तर त्यांच्या निष्ठा बदलणे शक्य होते. सारा विचार करून राजांनी खानाच्या सैन्यातील स्थानिक सैन्याने राजांच्या सैन्यात भरती व्हावे व खानाने सर्व सरंजाम तिथेच टाकून निघून जावे या अटींवर तह केला. खानाचे सैन्य निघून गेल्यावर मराठय़ांच्या सैन्याने नगद रकमेबरोबर अनेक बंदुका, ढाली-तलवारी, तोफा, वस्त्रे, दागिने, डेरे, तंबू, धान्य अशी सारी संपत्ती खानाच्याच जनावरांवर लादून संध्याकाळपर्यंत सारा घाट मोकळा केला. अल्प सैन्यासह नैसर्गिक परिस्थितीच्या केलेल्या सुयोग्य वापराने उंबरखंडीची लढाई युद्धकलेतील उत्कृष्ट नमुना मानली जाते. पण या सगळ्यात योग्य व वेळेवर बातम्या देणाऱ्या हेरखात्याची जबाबदारी किती मोठी होती हे सांगण्याची गरज नाही.
सर्वत्र केलेली ही हेरांची नियुक्ती पाहिली म्हणजे हा कौटिल्य संशयपिशाच्चाने पछाडलेला होता व याने कुणालाच सुखाने जगू दिले नसते असे वाटते. पण ‘‘ज्याच्या बरोबर कुठल्याच हेराची तुलना होऊ शकत नाही,’’ असे ज्याच्याविषयी म्हटले जाते तो किम फिल्बी (१९१२-१९८८) हा ब्रिटिश माणूस ब्रिटिश हेरखात्यात उच्च पदावर असूनसुद्धा त्याने आयुष्यभर, म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षे हेरगिरी मात्र रशियाची केली हे कळल्यावर जगाला फार मोठा धक्का बसला होता. अशा परिस्थितीत इ.स. ३२० मध्ये कौटिल्याची सूचना अत्यंत योग्य आहे हे मान्य करावे लागते. कौटिल्याने हेरांच्या नियुक्तीसाठी ‘आवपेच्चरान्’ असा शब्दप्रयोग केला आहे. एखाद्याला कार्यासाठी ठेवायचे तर ‘नियुक्ती’ हा शब्द असताना कौटिल्याने ‘अवपेत्’ असे का म्हटले असावे यावर विचार केल्यावर जाणवले ‘वप्’ या संस्कृत धातूचा अर्थ पेरणे असा आहे. शेतात बी पेरायचे तर एखाद् दुसरे बी पेरून चालत नाही. त्यासाठी असंख्य बिया पेराव्या लागतात. त्याचप्रमाणे एवढय़ा ठिकाणी हेर नेमायचे तर त्यांची संख्या मोठी असणार व त्याच्याच सूत्रानुसार ‘‘त्रयाणामेकवाक्ये संप्रत्यय:।’’ (१.१२.१५) म्हणजे तिघांच्या सांगण्यात एकवाक्यता असेल तरच त्यावर विश्वास ठेवावा. अन्यथा चुकीच्या माहितीमुळे कुणा निरपराध्याला शिक्षा झाली तर ते धर्माला अनुसरून होणार नाही.
यापुढील सूत्रात तो सांगतो, ‘‘तेषामभिक्ष्णविनिपाते तूष्णीदण्ड:’’ (१.१२.१६) हेरांच्या सांगण्यात सातत्याने चूक होत असेल तर त्यांना नोकरीवरून काढून टाकणे किंवा अतिप्रसंगात त्यांचा वध अशी शिक्षा सांगितली आहे. बातम्या काढताना काही कारणांनी राजप्रासादातील हेरांना बाहेर येता आले नाही तर अशा प्रसंगी काय करावे त्याचीही सूचना कौटिल्याने दिली आहे. तो म्हणतो, ‘द्वास्थ परंपरा’ म्हणजे दाराबाहेर गुप्तहेरांची अशी साखळी तयार असली पाहिजे की, कुठल्याही परिस्थितीत बातमी योग्य वेळी व योग्य ठिकाणी पोहोचती झालीच पाहिजे. ही बातमी अतिशय वेगाने पोहोचवण्यासाठी ही परंपरा कशी असावी तर शीघ्र. ‘शीघ्राश्चारपरंपरा:।’ ही शीघ्राचारपरंपरा अत्यंत वेगाने बातम्या काढणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पापाराझींची आठवण करून देते. हेरांची ही परंपरा असूनसुद्धा जर राजप्रासादातील हेरांना बाहेर येता आले नाही तर त्यांनी आजार, वेड किंवा सरळ प्रासादालाच आग लावून द्यावी पण सुखरूप बाहेर पडावे, असे कौटिल्य सांगतो. गूढ पुरु षांनी कोणती रूपे घ्यावीत याची फार मोठी यादी अर्थशास्त्रात आहे. राजा किंवा मोठमोठय़ा अधिकाऱ्यांच्या मस्तकावर छत्री धरणारे, पालखीचे भोई, वाहनांचे सारथी, पाणी देणारे, अंथरुण घालणारे, जेवण देणारे व वाढणारे, स्नान घालणारे, मसाज करणारे इ. या सर्व बातम्या कोणत्याही परिस्थितीत गुप्तपणे योग्य त्या व्यक्तीकडे पोहोचवण्यासाठी गूढलेखाचा उपयोग करण्याची सूचना अर्थशास्त्रात आहे. (संज्ञालिपिभिश्चारसंचारं कुर्यु:। १.१२.११). विशाखदत्ताच्या मुद्राराक्षस या कौटिल्यावरील संस्कृत नाटकात एक सुंदर प्रसंग आहे. चाणक्य ऊर्फ कौटिल्याने नेमलेला गुप्तहेर मृत्यूनंतर यमाच्या दरबारात मिळाणाऱ्या शिक्षा दाखवण्याऱ्या यमपटदर्शकाच्या रूपात येतो. साहजिकच द्वारपाल त्याला प्रवेश नाकारतो. त्या वेळी चाणक्याच्या कानावर जाईल अशा बेताने तो एक श्लोक म्हणतो, कमलानां मनोहराणां रूपाद्विसंवदति शीलम्। संपूर्णमण्डलेऽपि यानि चन्द्रे विरु द्धानि।। (१.१९) कमळ कितीही सुंदर असले तरी त्याचे आचरण वेगळे आहे. ते संपूर्ण चंद्रमंडळाच्या विरुद्ध आहे. इथे चंद्र म्हणजे चंद्रगुप्त व संपूर्ण मंडळ म्हणजे राज्याच्या स्वामी, अमात्य, राष्ट्र, दुर्ग, कोश, सैन्य व मित्रराष्ट्र या सप्तांगांसह अत्युच्च स्थानावर बसलेला चंद्रगुप्त. पण असा चंद्रगुप्त असूनसुद्धा कुसुमपुरातील काही लोक त्याच्या विरुद्ध आहेत. हा संदेश ऐकल्यावर चाणक्याच्या मगधेची बातमी काढायला पाठवलेला गुप्तहेर आपल्याला भेटू इच्छित आहे, हे लक्षात येते व तो त्याला आत बोलावतो. ‘‘काही वेळा आपल्या राष्ट्रातून एखाद्या व्यक्तीला निष्कासन करून शत्रुराष्ट्रात हेर म्हणून नियुक्त केले जाते. अशा वेळी त्या व्यक्तीला आपल्या व शत्रुराष्ट्राकडून असा दोन्हीकडून पगार मिळतो. अशा हेराला कौटिल्य ‘उभयवेतन’ असे म्हणतो. असा उभयवेतन हेर शत्रूकडून जास्त मानधन घेऊन आपल्या राष्ट्राला फसवण्याची भीती असते. तसे होऊ नये म्हणून त्याची पत्नी व मुले ताब्यात घेऊन मग त्याला उभयवेतन म्हणून नेमावे.
खोटी पत्रे बेमालूमपणे तयार करणे, शत्रूवर खोटे आरोप करणे, शत्रुराष्ट्रातच नव्हे तर प्रसंगी आपल्याविरुद्ध असणाऱ्या आपल्याच लोकांत फूट पाडणे ही सर्व कामे हेरखात्याला करता आली पाहिजेत, असे कौटिल्याचे मत आहे. थोडक्यात खोटेपणावर आधारलेले हेरखाते हा राष्ट्ररक्षेचा फार मोठा आधार कौटिल्याने मानला होता. पण हे मत काही केवळ कौटिल्याचे नाही तर जगातल्या प्रत्येक राष्ट्राच्या हेरखात्याचे हेच ध्येय आहे.
________________________________________________________________________________
संदर्भ : मूळ लेख स्रोत : हेरगिरीचा धांडोळा : कौटिल्याची गुप्तहेर व्यवस्था(आसावरी बापट) : http://www.lokprabha.com/diwali2012/diwali0201208.htm |
Comments
Post a Comment