येरे येरे पावसा... मला मिळतो पैसा... चंद्रहास मिरासदार

सरकारी कार्यालयात सकाळी अकरा ते बारा या दरम्यान जसं वातावरण असतं, तसंच आजही होतं. तिकडं दिल्लीत मोदी साहेब सकाळी नऊ वाजताच कार्यालयात हजर असतात, अशा बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत असल्या तरी जिल्ह्याच्या ठिकाणच्या या राज्य सरकारच्या कार्यालयात मात्र या बातमीचा अजून परिणाम झालेला नाही. परिणामी सवडीनं कार्यालयात येणं आणि सवड मिळली तरच काम करणं, या दैनंदिनीमध्ये काहीच फरक पडलेला नाही. या मंडळींसाठी बारा महिने चोवीस तास "अच्छे दिन'च असतात. असो. कार्यालयातल्या लेखनिक पदावर काम करणाऱ्या महिला वर्गाच्या "आज सकाळी कशी खूप गडबड झाली आणि त्यात भाजी करायला कसा वेळच मिळाला नाही,' अशा छापाच्या गप्पा इमानेइतबारे चालू आहेत. भाऊसाहेब, रावसाहेब मंडळींना यायला अजून वेळ आहे. भाऊसाहेब, रावसाहेबांच्या हाताखालची मंडळी टेबलावर दोन-चार फायलींचा पसारा मांडून त्याकडे पाहत बसली आहेत.

आई-वडिलांनी बळजबरीनं अभ्यासाला बसवलेला मुलगा ज्याप्रमाणे डोळ्यांसमोर पुस्तक धरून बसलेला असतो, तसंच काहीसं फायली पुढ्यात घेऊन बसलेल्या मंडळींकडे पाहून वाटू शकतं. काही मंडळींच्या उपाहारगृहात फेऱ्या चालू आहेत. काही जण "गिऱ्हाइका'ची वाट पाहत आहेत. एकूण काय, तर हे कार्यालय "मागच्या पानावरून पुढे' याप्रमाणे "चालू' आहे. बारा-सव्वा बाराच्या सुमारास भाऊसाहेब आल्याची वर्दी मिळताच त्या सुस्त वातावरणात "जान' येते. उपाहारगृहात गेलेल्या व इकडे तिकडे भटकणाऱ्या मंडळींना "अलार्म कॉल' दिला जातो. जंगलात वाघ, बिबट्या अशा प्राण्यांची चाहूल लागल्यावर माकडं, काही पक्षी ओरडून हरिण, सांबर, आदींना "अलार्म कॉल' देतात. हा कॉल ऐकल्यावर वाघ, बिबट्यांचे संभाव्य भक्ष्य त्या ठिकाणाहून लगेच पलायन करते. सरकारी कार्यालयातला "अलार्म कॉल' उलटा असतो. कार्यालयाचा वाघ म्हणजे भाऊसाहेब, रावसाहेब जो कोणी असेल तो येण्याची चाहूल लागल्यानंतर आपली अडलीनडली कामं घेऊन आलेल्या गिऱ्हाइकांना- म्हणजेच भक्ष्यांना हाकारे मारून बोलावले जाते. भाऊसाहेब आपल्या खुर्चीत स्थानापन्न होतात. त्यांचा खास लेखनिक तत्परतेनं दोन-चार मौल्यवान फाईल घेऊन त्यांच्या कक्षात जातो. तो आत गेल्याबरोबर शिपाई काय समजायचं ते समजतो. आता निदान तासभर कोणाला आत सोडायचं नाही, हे त्याला अनुभवानं ठाऊक झालेलं असतं. भाऊसाहेब आणि ते लेखनिक यांचं काम आज लवकर आटोपतं. चहा आणण्याची आज्ञा सुटते. चहा येतो, चहापान झाल्यानंतर समोरच्या पाऊचमधून दोन जुनवन पानं काढून भाऊसाहेब टेबलावर ठेवतात. पानांच्या शिरा खुडून मापात चुना लावून ते पान दाढेखाली सारलं जातं. मग वर गायछापची चिमूट अल्लद सोडली जाते. पान-तंबाखूचा बेत हायक्‍लास जमलाय असं भाऊसाहेबांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे जाणवतंय. जमलेला पान-तंबाखूचा विडा तोंडात घोळवत भाऊसाहेब दोन-पाच मिनिटं तंद्री लावून बसतात. तोंडात मुबलक रस जमा झालाय हे लक्षात आल्यावर बाहेर जाऊन तोंड मोकळं करून येतात. "पावसाची काय खबर' हातातल्या छोट्या नॅपकिननं तोंड पुशीत भाऊसाहेब विचारतात. "भोर, पानशेतकडं चालू झालाय, असं सदा ढमाले सांगत होता.' लेखनिक तत्परतेनं उत्तर देतो. 

"आता कुठं आषाढ चालू झालाय. आपल्याकडं भाद्रपदानंतरच पडतो,' एक "गिऱ्हाईक' आपला अनुभव सांगतं. 
दोन-पाच मिनिटं पावसावर गप्पा छाटून भाऊसाहेब आपल्या कक्षात परतात. त्यांच्या पाठोपाठ खास लेखनिकही मागं येतो. भाऊसाहेब पुन्हा बार लावतात. 
"पाऊस केव्हा का येईना, आपलं कुठं अडतंय त्याच्यावाचून!' लेखनिक उगाचच आपल्या मताची "पिंक' टाकतो. 
"तुझं म्हणणं खरंच. पण पाऊस मापात यायला नको. भाद्रपदात येऊ दे. अश्‍विनात येऊ दे; पण मापात पडायला नको.' 
"भाऊसाहेब, मापात नको? म्हणजे कसा पाहिजे?' लेखनिक. 
"आडमाप पाहिजे; त्याशिवाय मज्जा नाही.' 
"भाऊसाहेब, आडमाप पाऊस झाल्यावर सगळीकडं अतिवृष्टी, ओला दुष्काळ, पिकांचं नुकसान... मग पिकांचे पंचनामे करायचे... नुकसानीचे अहवाल "वरती' पाठवायचे...' भाऊसाहेबांच्या डोळ्यांपुढं पुढचं सारं चित्र उभं राहतं. तसं झालं तर आपला "सुगीचा हंगाम' दूर नाही. या विचारानं त्यांचा चेहरा आणखी सुखावतो. शेतकऱ्याला हवा तेवढाच पाऊस पडला म्हणजे पाऊस मापात पडला, तर हा "सुगीचा हंगाम' शक्‍य नाही, हे त्यांना पुरेपूर ठाऊक असतं. "आपल्या इच्छेप्रमाणे आडमाप पाऊस झाला तर...' 
या कल्पनेनं त्यांच्या चेहऱ्यावर गूढ हास्य पसरतं. 

---------------- 

कोणत्या तरी कन्स्ट्रक्‍शन कंपनीच्या कार्यालयातला "माहोल' नेहमीप्रमाणेच गडबडीचा असतो. या कंपनीचा मालक बांधकामाची किरकोळ किरकोळ कामं करता करता आता महापालिकेचा मोठा कंत्राटदार झालेला असतो. हे करताना त्यानं महापालिकेच्या "माननियांना' व्यवस्थित "प्रसन्न' केलेलं असतं. "माननियांना' प्रसन्न करण्यासाठी करावी लागणारी "तपश्‍चर्या' कशी करायची, हे या कंत्राटदाराला अनुभवानं चांगलंच ठाऊक झालेलं आहे. "पाकिटं' पोचवताना कोणते "टक्के' टोणपे खावे लागतात, याचाही अनुभव त्यानं घेतलेला असतो. म्हणूनच कोणत्याही प्रकारचे "लक्ष्मी यंत्र' घरातून न आणता "लक्ष्मी' त्याच्याकडे "यंत्रवत' चालत येते आहे. तो आणि त्याच्या कंत्राटदार "ज्ञाती' मंडळाकडं पाहून "रस्ते रस्ते पे लिखा है, खानेवालोंका नाम' ही काळाला सुसंगत अशी नवी म्हण तयार व्हायला हरकत नसावी. असो- कंत्राटदार आपल्या केबिनमध्ये कुणाशी तरी (बहुतेक एखाद्या "माननिया'शी) भ्रमणभाषवरून बोलतो आहे. ते संभाषण पुढीलप्रमाणे होते. 
"उद्याच काम सुरू करतो साहेब. आपली मशिनरी पलीकडच्या गल्लीतच आहे.' 
"उद्या नको सुरू करू. तू घोळ करून ठेवला आहेस; तो निस्तरला पाहिजे आधी' 
"बोललो की मी त्यांच्याशी. "नो प्रॉब्लेम्र म्हणाले ते.' 

"तुला तोंडावर कोण बोलणार. या कामासाठी मी सेटिंग केलंय हे कळल्यावर त्याचा पापड मोडलाय. त्यानं "जीबी'त प्रश्‍न टाळायची तयारी चालू केलीय. या प्रभागामुळे असले प्रॉब्लेम फार येतात. माझा मी एकटा असतो तर तुला केव्हाच काम सुरू करायला सांगितलं असतं,' असे संवाद बराच वेळ चालतात. "माननियां'शी झालेलं बोलणं संपवून कंत्राटदार इमारतीच्या गच्चीवर जातात. गच्चीवर जात असतानाच ते आपल्या सहायकाला पाठीमागून येण्याची खूण करतात. त्याप्रमाणे सहायकही गच्चीवर जातात. कॉफीच्या घोटाबरोबर सिगारेटचे झुरके मारताना कंत्राटदाराची मुद्रा विचारमग्न होऊन जाते. थोड्या वेळापूर्वी "माननियां'शी झालेल्या बोलण्यावरून पाटील रस्त्याचं आणि फुटपाथचं काम मिळण्याची शक्‍यता कमी झालीय, हे कंत्राटदाराच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळेच त्यांची मुद्रा विचारमग्न झाली असावी. सिगारेट संपता संपता मात्र त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी दूर झालेली दिसते. झुरके मारत असतानाच गच्च आभाळ दाटून येतं आणि जोराचा पाऊस सुरू होतो. कंत्राटदाराचा सहायक लगेचच जिथं जिथं कामं चालू आहेत, तिथं तिथं फोन करून सुपरवायझर लोकांना सिमेंट झाकून ठेवण्याची व्यवस्था करायला सांगतो. पावसाचा वेग वाढल्यानं आडोशाला उभे असलेले ते दोघे खाली येतात. 
केबिनमध्ये आल्यावर कंत्राटदार आणखी कुणातरी "माननीया'ला भ्रमणभाषवरूनच गाठतो. दोघांत बराच वेळ बोलणं चालू असतं. बोलणं झाल्यानंतर कंत्राटदाराची स्वारी चांगलीच खुशीत येते. बेल वाजवून सहायकाला बोलावून घेतलं जातं. 

"माणकेश्‍वर, या पाच रस्त्यांवरचे आणि बाजूच्या गल्लीबोळातल्या रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याचं एस्टिमेट तयार करा,' असं म्हणत कंत्राटदार माणकेश्‍वरांकडे रस्त्यांची नावं लिहिलेला कागद सोपवतो. तो कागद घेऊन माणकेश्‍वर लगेचच एस्टिमेंट तयार करण्याच्या कामाला स्वतःला जुंपून घेतात. 
असाच पाऊस आणखी चार-पाच दिवस राहिला तर सगळ्या शहरातले रस्ते खड्ड्यांनी भरून जाणार, हे कंत्राटदाराला ठाऊक असतं. कारण रस्त्यांची "कुंडली' त्याच्यासारखाच कंत्राटदारांनी तयार केलेली असतं. रस्ते खड्ड्यांनी भरून गेल्यावर पेपरवाले कावकाव करणार, चॅनेलवाले बोंबाबोंब करणार, हेही त्याला अनुभवानं ठाऊक झालेलं असतं. तसं झालं की युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याची घोषणा महापौर आणि आयुक्त करणार... आणि ही घोषणा पूर्ण करायची झाली तर आपल्यासारखा तयारीचाच कंत्राटदार हवा... खड्डे बुजवण्याची कामे आपल्याकडं चालून येणार... हे भविष्यातलं चित्र त्याच्या नजरेसमोर तरळत राहतं. पावसानं आता दांडी मारू नये, अशी प्रार्थना करत कंत्राटदार पुढच्या तयारीला लागतो. मजूर गोळा करणं, डांबराची, सिमेंटची ऑर्डर देणं, खडी मागवणं ही कामं फटाफट उरकल्यावर कंत्राटदाराच्या चेहऱ्यावर समाधान विलसत असतं. 
__________________________________
संदर्भ: मूळ लेख : येरे येरे पावसा... मला मिळतो पैसा...  http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20140628/5282516220187421413.htm 

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण