नातं भांड्यांशी - गाळणी, चाळणी, रोळी, खिसणी! - चित्कला कुलकर्णी

माझी आई घरातल्या विविध भांडयांकडे अगदी कुटुंबातील सदस्यच असल्याप्रमाणे लक्ष देत असे आणि त्यावेळी फ्लॅट संस्कृतीचा अभाव असल्यामुळे जेव्हा केव्हा शेजारी काही खाद्य-पदार्थ , धान्य दही वगैरे वस्तूंची खुलेपणाने देवाण-घेवाण होत असे त्यावेळी जर चुकून एखाद्या शेजारणीला दिलेले विशिष्ट भांडे परत आले की नाही याकडे तिचे अगदी काटेकोर लक्ष असायचे म्हणजे अगदी आपण कार्यालयात ऑडिट करतांना स्टॉक-कीपिंग तत्व वापरतो त्याचप्रमाणे. आता  हा उल्लेख  काही मंडळींना अतिशोयक्त वाटेलही कदाचित पण तत्कालीन स्त्री भावविश्वाचा विचार करून बघायचा प्रयत्न केल्यास त्यात खूपसे तथ्य आहे हे लक्षात आल्यावाचून राहत नाही . एवढे सर्व विचार इथे मांडायचे कारण म्हणजे या संदर्भातच दैनिक सकाळमध्ये  वाचनात आलेला "नातं भांड्यांशी - गाळणी, चाळणी, रोळी, खिसणी! " हा चित्कला कुलकर्णी यांचा  अगदी समर्पक लेख जो खालील प्रमाणे: 


प्रत्येक भांड्याचं दैनंदिन व्यवहारातलं महत्त्वाचं स्थान पाहिलं की, वाटतं ते भांडं काही ना काही सुचवतं. आपल्या अस्तित्वातून शब्दांशिवाय संवाद साधतं. छानसं बोलू लागतं अन्‌ बोलतंही करतं. भांडी म्हणजे उपयोगी, पण निर्जिव वस्तू इतक्‍या कोरड्या भावनेनं, दृष्टीनं जर कुणी बघत असेल तर ते एका समृद्ध भावविश्वाला स्वतःपासून दूर ठेवत आहेत, असं वाटून जातं. अशा लोकांच्या घरातली बिचारी भांडी अबोलपणे ठेवल्या ठिकाणी निपचित पडून राहत असतील किंवा मूकपणानं काम करत असतील, अनाथालयातल्या पोरक्‍या मुलांसारखे अथवा वृद्धाश्रमात आणून सोडलेल्या केविलवाण्या वृद्धांसारखा! जीवनासक्त व्यक्ती, विचारवंत प्रत्येक वस्तूत गुण, भाव, तसंच त्यामागचा विचार शोधतात. याचं उत्तम उदा. म्हणजे बोधनिक मानसशास्त्र (cognitive psychology) 1958 मध्ये ब्रॉडबेन्ट यांनी मांडलेला "गाळणी सिद्धांत" एका ठराविक वेळी एखादी व्यक्ती किती उद्दिपकांकडे लक्ष देऊ शकते, याचा अभ्यास करताना त्यांनी गाळणीचं उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात, गाळणीमधून पदार्थ काही प्रमाणात भांड्यात पडतात व बाकीचे गाळणीतच अडकतात. या पद्धतीनं हवी तेवढी माहिती स्वीकारली जाते आणि बाकीची अडवली जाते. या गाळणीतून गाळलेल्या माहितीचे  विश्‍लेषण होते.

गंमत आहे ना! एका छोट्या गाळणीवरून या मानसशास्त्रज्ञानं एक मोठा सिद्धांत मांडून बऱ्याच गोष्टी पटवून
दिल्या, त्यावर उपाय ही शोधले. एखादं भांडं साधन, शब्दांशिवाय बोलून जातं, बरंच काही सांगून जातं ते असं!!
स्वयंपाकघरात किंवा जिथं जिथं चहा, कॉफी, ज्यूस इ. मिळतं तिथं तिथं गाळणी असतेच. पूर्वीची पितळी एकसंध गाळणी, नंतर आलेली अगंज पोलादातली गाळणी, फिरकीत जाळी बसवलेली गाळणी, दुहेरी जाळीची चहा गाळणी, बारीक जाळीची कॉफी गाळणी, फळांच्या रसासाठी मोठी गाळणी, चिंच वगैरे कोळासाठीची गाळणी... तऱ्हेतऱ्हेच्या गाळण्या ! अगदी पूर्वी आणि आत्ताही बऱ्याच ठिकाणी , पदरी "फडकं‘ गाळणी म्हणून वापरलं जातं. अलीकडे पाणी गाळण्यासाठी नळाला जोडता येणारीही गाळणीही उपलब्ध आहेत. अगदी मेडिकेटेड सिस्टिममध्येच. फि ल्टर किंवा फिल्टर हाऊस म्हणजे तर काय ? गाळणी घर... म्हणजे गाळणीच ना ! ज्यामध्ये गाळ उरतो ती गाळणी ! स्वतःकडे गाळ ठेवून इतरांना हवं ते देणारी ही गाळणी !! गाळ उडवणारी गाळणी !!! द्रव पदार्थसाठी वापरली जाणारी गाळणी तर पीठ, धान्य इ. साठी वापरली जाते "चाळणी‘.
चाळण्याही विविध प्रकारच्या. मैदा, रवा, कणीक, भरडा, तृणधान्य, कडधान्य, पोहे, चिरमुरे, फुटाणे, शेंगदाणे या प्रत्येकासाठी वेगळी चाळणी. गिरणी, साखर कारखाने, मळणी यंत्रापासून ते थेट बांधकामावर वाळू चालण्यापर्यंत वेगवेगळ्याच रूपांत चाळणी भेटते.
प्रत्येक चाळणीची शान, ऐट निराळीच ! रोजच्या वापरातील चाळणी पडेल ते काम करणाऱ्या कामगारासारखी आणि दसरा, दिवाळी येताच या चाळण्या घरातल्या जबाबदार गृहिणीसारख्या पुढे सरसावतात, अगदी जातीनं लक्ष घालतात. चिरमुरे, फुटाणे, शेंगदाणे भाजले जाणाऱ्या भट्टीतल्या चाळण्यांचा मोकळेपणाचा झोक असतो. भट्टीत शेंगदाणे भाजणारा आपल्या हातात मोठी चाळणी घेऊन शेंगदाणे असे काही वर-खाली करतो की, पाहणाऱ्याला वाटावं जणू त्यानं आपल्या प्रियेचा हात हातात घेऊन कपल डान्सच करतोय ! प्रत्यक्ष बघताना त्यातली खरी गंमत कळते. या चाळणीमुळं शेंगदाणे एकदम मस्त खमंग, खरपूस भाजतात. घरात वापरल्या जाणाऱ्या मोठ्या चाळण्यांमध्ये तांदूळ, डाळी, भाज्या इ. धुतलं जातं. पूर्वी या गोष्टी धुण्यासाठी "रोळी‘ (रोवळी) वापरत. अर्धगोलाकार भोकाभोकाच्या या रोळ्या गृहिणींच्या हाताशी असत. मधल्या काळात रोळ्या कमी झाल्या. पण आता पुन्हा नव्या उत्साहानं, नव्या नावानं घडवल्या गेल्या. कोलिंडर ! बोया ! कोलिंडर हा शब्द ज्यानं वापरायला सुरुवात केली तो इंग्रजाळलेला असावा. "बोया‘हा परप्रांतीय शब्द !
धरायला कडी किंवा दांडी असलेल्या या रोळी पुन्हा घराघरांत दिसत आहेत. फळं ठेवण्यासाठीही त्यांचा उपयोग केला जातो.
या भांड्यांची आणखी एक साथीदार म्हणजे खिसणी ! सुकं खोबरं, गाजर, काकडी, बटाटा, भोपळा असं
कोशिंबीर, खिरीसाठी जो खीस पाडतात तो खिसणीनंच. चौकोनी, आयताकृती, अंडाकृती, गोल, पायवाल्या,बिन पायाच्या नाना तऱ्हेच्या खिसण्या. एवढंच काय .. 4/8/9 in one सुद्धा ! आणि डब्यालाच खिसणीचं झाकण असलेल्याही. जाय फळ, चीज, खिसणीचा नाजूक नखरा, काचऱ्यांच्या खिसण्या
शिस्तीच्या तर खोबरं, फळ-भाज्यांच्या खिसण्या अघळपघळ, खीस पाडताना खिसणीला घट्ट आधार द्यावा लागतो किंवा घट्ट धरावी लागते, तरच उत्तम खीस पडतो.
गाळणी, चाळणी, खिसणी ही सगळी साधनं घरकामाबरोबरच विशिष्ट गोष्टींनी माणसांशी जोडली गेली आहेत. जेव्हा भीतीनं "गाळण‘ उडते तेव्हा "सर्व‘ आणि "स्व‘सारंच गळून जातं आणि मनरूपी गाळणीत उरते फक्त भीती! दुखापतीनं शरीर, खड्ड्यांनी रस्ता आणि गरिबीमुळं (किंवा दुर्लक्ष केल्यानं) बनियन यांचीही "चाळण‘ होते. विचारांचा खीस पाडणारे तर जागोजागी भेटतात. कधी आधार घेऊन तर कधी आधाराशिवाय खीस पाडत राहतात. एकूणच काय , माणसाच्या जिभेची, पोटाची उत्तम सेवा, सोय करणारी ही साधनं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आपल्या अवतीभवती सतत असतात. आपल्या अस्तित्वातून संवाद साधतात, बोलतात आणि बोलतंही करतात !! 
_________________________________________________________________________

संदर्भ: मूळ लेख : नातं भांड्यांशी - गाळणी, चाळणी, रोळी, खिसणी! - चित्कला कुलकर्णी - www.online .esakal.com dated शुक्रवार, 23 सप्टेंबर 2016 - 08:15 AM IST




Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण