अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाइल-निखिल रत्नपारखी
निखिल रत्नपारखी यांचा हळुवारपणे हास्यकारंजे फुलविणारा आणखी एक खुसखुसीत लेख ______________________________________________________________
अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत आणि अत्यावश्यक गरजा आहेत असं आपण शाळेत शिकलो. त्यानंतर आजूबाजूला दिवसेंदिवस वाढणाऱ्या धकाधकीच्या परिस्थितीमुळे टेन्शन्सही वाढली आणि असुरक्षितताही. त्यामुळे मन दुसरीकडे रमवण्यासाठी इतरेतर करमणूक ही एक महत्त्वाची गरज झाली. प्रत्येक वेळी जनसामान्यांना नाटक-सिनेमा ही परवडणारी करमणूक नव्हती. त्यामुळे मग साहजिकच सहजसाध्य, तंगडय़ा पसरून कितीही वेळ मन रमवता येईल असा टीव्ही- अर्थात असंख्य चॅनेल्सवरील करमणूक ही मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक होऊन बसली. माझ्या लहानपणीही टीव्ही होता. पण संध्याकाळी सहा ते रात्री दहा एवढी लिमिटेडच करमणूक त्यावेळी टीव्हीवर उपलब्ध होती. शिवाय तुमच्या घरी टीव्ही असणं हे अपार श्रीमंतीचं लक्षण समजलं जाई. त्यामुळे टीव्हीवरील करमणूक ही बऱ्याच कुटुंबांसाठी दुसऱ्यावर अवलंबून असे. तीही आतासारखी रंगीबेरंगी करमणूक नव्हती, तर ब्लॅक अॅन्ड व्हाइट होती. तीसुद्धा टीव्हीचा अॅन्टेना योग्य प्रकारे बसवला असेल तर! नाहीतर त्या दोन रंगात असंख्य मुंग्यांसारखं काहीतरी दिसत असे. टीव्ही हा रिमोटने सुरू होतो, ही गोष्ट ‘मी भूत प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं आहे’ एवढी अविश्वसनीय होती. ही माहिती पुरवणाऱ्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असे त्याच्याकडे लोक बघत, किंवा ती व्यक्ती मनमुराद चेष्टेचा विषय तरी बने. त्यामुळे चारचौघांत कुणी असली खुळचट माहिती पुरवण्याच्या भानगडीत पडत नसे.
आता नजीकच्या काळात रिमोटविषयीचं नावीन्य तर पार धुळीला मिळालं आहेच; पण टीव्हीच्या बदलत जाणाऱ्या आकारांविषयीचं अप्रूपही संपलेलं आहे. यूएसबी पोर्ट फॅसिलिटी, थ्रीडी स्क्रीन, होम थिएटरसारख्या अनेक आधुनिक तंत्रज्ञानामुळे चित्रपटगृहात सिनेमा बघण्याची मजा बऱ्याच प्रमाणात टीव्हीवर घरच्या घरीच मिळू लागली.
टीव्हीविषयीचं अप्रूप व नावीन्य संपतंय- न संपतंय तोच इंटरनेटने धुव्वा उडवून दिला. परदेशी राहणारा मित्र हाकेच्या अंतरावर आहे असं वाटू लागलं. (पण प्रत्यक्षात हाकेच्या अंतरावर असणारा मित्र परदेशी स्थायिक झाल्यासारखा वाटू लागला.) परदेशातून आलेली मेल काही क्षणांत आपण कॉम्प्युटरवर बघू शकतो- ही कथासुद्धा सुरुवातीच्या काळात रिमोटसारखीच अविश्वसनीय वाटत होती.
यानंतर सर्व तंत्रज्ञानाला वाकुल्या दाखवत, चिडवत आणि उज्ज्वल भविष्यावर स्वार होत आला तो- मोबाइल. एक अविश्वसनीय तंत्रज्ञान. पूर्वी कुणाच्या घरी साधा टेलिफोन असणं हेसुद्धा टीव्हीप्रमाणेच उदंड श्रीमंतीचं लक्षण मानलं जात असे. तुमच्या शेजाऱ्याकडे असलेल्या फोनचा नंबर कुणालाही सांगणं हे तुमच्या व शेजाऱ्यांच्या तत्कालीन संबंधांवर अवलंबून असे. त्यामुळे शेजारी कितीही खवीस आणि कुजकट असला तरीही टेलिफोनकरता त्याच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव करायलाच लागत असे. समजा, एवढं करूनही जर फोनवरून तुमच्या अनुपस्थितीत त्याला तुमचा एखादा निरोप घ्यायला लागलाच तर- कुण्या राजाला पोस्टमनचे कपडे घालून उन्हातान्हात, पावसात दारोदार फिरायला लागल्याच्या आविर्भावात तो निरोप तुमच्यापर्यंत पोहोचत असे. आणि ‘उगाच सर्वाना नंबर देत जाऊ नकोस हां..’ अशी सूचनाही केली जात असे. त्यातून शेजाऱ्यांच्या जेवणाच्या वेळी जर तुमच्यासाठी कुणाचा फोन आला, तर फोनवर बोलताना जेलरच्या कडक देखरेखीखाली आपल्या नातेवाईकांशी बोलताना तुरुंगातल्या कैद्याच्या मनात जी भावना येत असेल, तीच भावना इथंही मनात येत असे. समाधिस्थ अवस्थेत चघळत असलेलं हाडूक जबरदस्तीने कुणी ओढून घ्यायला लागल्यावर कुत्रं ज्याप्रमाणे गुरगुरतं, तसाच तो शेजारी भासत असे. तुम्हाला जर त्यांच्या घरून कुणाला फोन करावा लागला, तर दुपारी झोपेच्या वेळी दिवाळी मागायला आलेल्या कामचुकार कचरा कामगाराप्रमाणे तुम्हाला वागणूक मिळणार, हे गृहीत धरूनच त्यांच्या घरात प्रवेश करावा लागे. आणि फोनच्या दोन रुपयांसाठी फार मोठ्ठं कर्ज वसूल केल्यासारखी मागणी होत असे. घरी परतल्यावर नरकातून फेरफटका मारून आल्यासारखं वाटे. त्यामुळे या आयुधाबद्दल कित्येक दिवस माझ्या मनात एक आदरयुक्त भीती बसली होती. या मोबाइलच्या जमान्यात कधी कधी मोबाइलची रिंग वाजली तरी छातीचा ठोका चुकल्यासारखा वाटतो, ते का, हे आता मला यथावकाश समजलं आहे.
ही सर्व प्रस्तावना करण्याचं कारण की- या मोबाइलमुळे कित्येकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. माझा जन्म खरं तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा. पण ब्रिटिशांच्या काळात पारतंत्र्याची जाणीव एवढी का बळावली होती, आणि ती जाणीव नक्की कशी असेल, याचा नेमका अनुभव फोनमालक शेजाऱ्यांमुळे मला नंतरच्या काळात आला. मोबाइलने सर्वार्थाने मानवाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या मूलभूत गरजेची जागा घेतली. अन्नपाणी, वस्त्र, निवारा याशिवाय एक वेळ राहू, पण मोबाइलशिवाय जगणं अशक्य आहे, हे सिग्नलवर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आजपासून फारच थोडी र्वष मागे बघितलं तरी आजचा हा मोबाइल स्वप्नवत वाटतो. त्याचा वापर करणाऱ्यांकडे बघून नाही, तर त्याच्यात घडत गेलेले बदल बघून. पूर्वी आमच्या मित्राने ‘तुम्ही जिथे असाल त्या जागेचं लोकेशन मोबाइलमध्ये दिसतं,’ असं सांगितल्यावर त्याची आम्ही एवढी चेष्ट केली होती, ‘उद्या म्हणशील- मी स्वत:ला मोबाइलमध्ये बघू शकतो..’ वगैरे. आणि काही वर्षांतच ही गोष्ट खरीही झाली. आज तर मनात येईल ती गोष्ट तुम्ही मोबाइलवरून सहज साध्य करू शकता. आता फक्त मोबाइलमध्ये वॉशिंग मशिन दिलं की झालं. मग तुम्ही मोबाइलशी लग्नदेखील करू शकाल. आणि फक्त एवढंच नाही, तर लग्नानंतर समाधानाने म्हणूही शकाल की- ‘माझ्यासारखा सुखी माणूस अवघ्या जगात नसेल.’ अलीकडेच माझ्या एका चतुर मित्राने मोबाइल आणि बायको यांची तुलना करून त्याच्या भयंकर कल्पनाशक्तीची चुणूक दाखवून दिली. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, ‘आपल्याला पाहिजे तेव्हा मोबाइल म्यूट करता येतो किंवा व्हॉल्यूम कंट्रोल करता येतो. हा मोबाइलचा सर्वश्रेष्ठ गुण आहे. ही मन:शांतीची सुविधा बायकोच्या बाबतीत शक्य आहे? आपण बायकोचं म्हणणं पूर्ण लक्ष देऊन ऐकतो आहे असं कितीही नाटक केलं, तरी आपलं किती लक्ष आहे, हे ती मधेच एखादा चतुर प्रश्न विचारून पडताळून बघतेच. आणि जर तुम्ही दुर्लक्ष केलं असं जर तिच्या लक्षात आलं, तर नंतरची परिस्थिती म्हणजे व्हॉल्यूम तर तुमच्या हातात राहत नाहीच; पण ते संभाषण किती तास, दिवस, आठवडे किंवा महिने चालेल याची काहीच शाश्वती नाही. नंबर दोन- मोबाइलवर आलेला कॉल घ्यायचा की नाही, हे सर्वतोपरी तुमच्यावर अवलंबून असतं. नको असेल तर- आय अॅम इन मीटिंग, आय अॅम ड्रायव्हिंग अ कार, आय अॅम बिझी, कॉल यू इन समटाइम.. असं समोरच्याला पटेल, पण ढळढळीत खोटं विधान आपण अगदी न घाबरता सहज करू शकतो. ही सुविधापण बायकोच्या ठिकाणी फोल ठरते. एकतर एखादी गोष्ट टाळण्यासाठी कुठली कारणं बायकोला सांगायची, ती कारणं कधीच पटकन् आणि वेळच्या वेळी सुचत नाहीत.’ याचं उदाहरणासहित त्याने स्पष्टीकरण दिलं. त्याचं असं झालं- ‘एक दिवस मी आॉफिसमधून लवकर सुटलो आणि अचानक एक जुनी कॉलेजमधली मैत्रीण भेटली. म्हणून मग चार सुखदु:खाच्या गोष्टी कराव्यात म्हणून आम्ही जवळच्या एका कॉफी शॉपमध्ये गेलो. जरा खुर्चीवर रिलॅक्स झालो तर लगेच बायकोचा फोन आला. वास्तविक आपण काहीही केलेलं नसतं, पण बायकोचा फोन आलेला दिसला की जगातल्या कुठल्याही नवऱ्याच्या छातीची धडधड आपोआप वाढतेच. आवाजाचा सूर बदलतो. काहींच्या बाबतीत हात-पायसुद्धा थरथरतात म्हणे. त्याचप्रमाणे माझीही धडधड वाढली. उगाच कामामुळे टेन्शनच्या बोजाखाली दबल्याचं नाटक करत आणि तिचा फोन आल्याचा आनंद (खोटा) झाल्याचं दाखवत मी फोन उचलला. ‘कुठे आहेस?’ या तिच्या प्रश्नाने मनात जी एक प्रकारची कालवाकालव व्हायची ती झाली. आणि मी उत्तरलो, ‘कुठे आहे काय विचारतेस? कुठे असतो मी यावेळी? ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग चालू आहे,’ असं अगदी खोल आवाजात उद्गारलो. ‘तुमचं ऑफिस कॉफी शॉपमध्ये शिफ्ट झालं आहे का?’ या प्रश्नाने मला दरदरून घामच फुटला. पायाखालची जमीन सरकली. आजूबाजूला बघितलं तर माझ्या मागेच माझी अर्धागिनी बसली होती. त्यानंतर काय झालं, हे चारचौघांत सांगण्यासारखं नाही. आणखीन एक मोबाइलचा गुण म्हणजे आपल्याला हवं तेव्हा तो बदलून, आहे त्यापेक्षा नवीन सुधारित मोबाइल आपण घेऊ शकतो किंवा बदलू शकतो. एका वेळी दोन-दोन मोबाइल आपण अगदी सहज जवळ ठेवू शकतो. आपल्याला आवडणारी रिंगटोन ठेवू शकतो. आपली आवड जपणं हे बायकोच्या बाबतीत शक्य आहे? उलट, चुकून मोबाइल बायकोच्या हातात लागेल या भीतीने सुंदर बायकांशी साधी मैत्री तर सोडाच; साधं बोलणं, बघणंसुद्धा अशक्य होऊन जातं. मोबाइलमुळे अखंड तिन्हीत्रिकाळ करमणूक होत असते. पण बायकोमुळे रविवारची सुट्टीदेखील नकोशी होते; तिथे काही घटका करमणुकीचा विचारही डोक्यात येऊ शकत नाही.’ ही वक्तव्ये माझ्या चतुर मित्राने सूडबुद्धीने केली आहेत हे जरी गृहीत धरलं, तरी सगळेच मुद्दे डावलण्यासारखे नाहीत. काही पटण्यासारखेही आहेत.
मोबाइलने काही लोकांच्या जीवनात आनंदाचे मळे फुलले आहेत, हे खरंच आहे. पण जे लोक शरीराचा एक अवयव असल्यासारखाच तो वापरतात, ते बघून खूप चीड येते. मोबाइलवर बोलत गाडी चालवून स्वत:बरोबर इतरांचा जीवही धोक्यात घालणे हा तर सर्वात चीड आणणारा प्रकार. मोबाइलवर बोलताना स्थळ, काळ, वेळ यांचं भान नसणे- हा एक दुसरा प्रकार. नाटक चालू असताना इतर प्रेक्षकांची किंवा कलाकारांची पर्वा न करता मोठमोठय़ाने बोलणे- ही कुठली विकृती आहे? आपण कुठे आहोत याचंही भान काही लोक ठेवत नाहीत. कुणाची मयत झाली आहे अशा ठिकाणीसुद्धा प्रसंग, स्थळ, काळ याची पर्वा न करता त्या प्रेताच्याही कानठळ्या बसतील अशा पट्टीत काहीजण बोलत असतात. शूटिंग करताना काही सहकलाकार शॉट सुरू व्हायच्या काही क्षण आधीपर्यंत मोबाइलवर बोलत असतात किंवा त्याच्याशी खेळत तरी असतात. साहजिकच कामात लक्ष नसल्यामुळे चुका होतात आणि स्वत:च्या मूर्ख चुकांमुळे विनाकारण इतरांचा महत्त्वाचा वेळ वाया जातो, याचंसुद्धा भान या नटय़ांना नसतं. नटय़ाचं असं नाही, नटही असतीलच. पण अशा काही नटय़ांचा मला व्यक्तिश: अनुभव आहे. मी आजकाल बरीच कॉलेजमधली मुलं-मुली बघतो. रात्रंदिवस ती मोबाइलमध्ये डोकं घालून तासन् तास एका जागी बसलेली असतात. त्यांची एकूणच सर्वागीण प्रगती बघता ते मोबाइलचा ज्ञानमार्ग म्हणून उपयोग करत असतील असं वाटत नाही. मोबाइल हेही आज दारू, सिगरेटइतकंच भयंकर व्यसन होत चाललं आहे. अतिवापराने त्याचेही दुष्परिणाम होणार आहेतच. त्यांचा हा काळ आणि हे वय खूप महत्त्वाचं आहे. मोबाइल हातात धरून हा महत्त्वाचा वेळ हातातून व्यर्थ निसटू देता कामा नये. शांततेच्या काळात स्वत:ला समृद्ध करण्याकरिता जेवढा सराव कराल, तेवढं युद्धात कमी रक्त सांडावं लागेल. शेवटी काहीही झालं तरी- आपल्यासाठी मोबाइल आहे; आपण मोबाइलसाठी नाही!
____________________________________________________________
१) मूळ लेख : अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाइल-निखिल रत्नपारखी- http://www.loksatta.com/gujrati-tutari-news/food-cloth-and-mobile-1337573/
Comments
Post a Comment