पडलेल्या पावसाचे होते काय? (बॉन निंबकर)

पाऊस किती पडतो त्यावरून पीक किती येणार ते ठरते. मात्र पीक चांगले येण्यासाठी पाऊस कधी पडतो, किती जोरात पडतो आणि पडलेल्या पावसाचे नेमके काय होते हे पाहणेही महत्त्वाचे आहे. त्यावरच किती पीक येणार, येणार की नाही हे ठरते. याबद्दल नारायण कानिटकर यांनी केलेला अभ्यास काय सांगतो, ते पाहू- बॉन निंबकर 

पाऊस पडल्यानंतर पाण्याचा निचरा प्रामुख्याने तीन प्रकारे होतो. 
  • पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाते, 
  • मातीत मुरते किंवा 
  • मातीत मुरण्यापूर्वीच त्याचे बाष्पीभवन होते. 


पावसाचे पाणी 
जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूप होते. जमिनीचा उतार मंद असेल, तर त्यावरील माती एकसमान निघून जाते व मातीतील दगड तसेच राहिलेले दिसतात. हे म्हणजे स्तर अपक्षरण (Sheet Erosion). स्तर अपक्षरणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते होताना साध्या डोळ्यांना दिसत नाही. मात्र त्यामुळे होणारी मातीची धूप प्रचंड असते. दुसरे म्हणजे घळी अपक्षरण (Gully Erosion). घळी अपरक्षण चिकण मातीत अधिक प्रमाणात दिसते. चिकण माती सुकून तयार झालेल्या भेगामध्ये पाणी साचून ३० सें.मी. पेक्षा खोल घळ तयार होते आणि त्यातून पाणी अतिशय वेगाने वाहून जाते.
पावसाचे जे पाणी मातीत मुरते त्याचे पुढे काय होते? काही अंशी मुरलेले पाणीही मातीतून बाष्पीभवनाने निघून जाते. बाकीचे पाणी जमिनीत खोलवर जाते व त्याचा वनस्पतीला काहीच उपयोग होत नाही. यातून उरलेले जे पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात. त्यातील काही पानांतून बाष्पीभवन होऊन निघून जाते. शिवाय मातीतील कलील पाणी धरून ठेवतात आणि ते पाणी वनस्पतींना उपलब्ध होत नाही. म्हणजेच पडलेल्या पाण्यापैकी अतिशय थोडे पाणी प्रत्यक्षात वनस्पतीला मिळते. 

कोरडवाहून शेती संशोधनात १९३४ ते १९४१ या सात वर्षांत भारतात जेथे जेथे अभ्यास झाला तेथील सरासरी वार्षिक पर्जन्यमान १८.८ ते २४.७ इंच होते. जेथे रब्बी ज्वारीचे पीक घेतले होते, अशा ठिकाणी एकंदर सरासरी ४.२ इंच पाऊस दर वर्षी वाहून वाया गेला. मुसळधार पाऊस पडला, तर वर्षाला जास्तीत जास्त ७.५ इंच इतका पाऊस वाया गेला. 

कानिटकर यांच्या संशोधनात असेही दिसले, की पावसाचे पाणी नेहमीच वाहून जाते असे नाही. दिवसाला २ इंचापेक्षा जास्त पाऊस पडला, तर पाणी ८० टक्क्यांपेक्षा अधिक वेळा वाहून जाते. १/२ ते १ इंच पावसाचे पाणी सुमारे ३५ टक्के प्रसंगात वाहून जाते आणि अर्ध्या इंचापेक्षा कमी पावसात सहसा पाणी वाहून जात नाही. पाणी वाहून गेले तर प्रामुख्याने मातीतील चुना निघून जातो. 

पाणी वाहून जाण्याला केवळ पावसाचे प्रमाण व जोरच कारणीभूत असतात असे नाही. जमिनीत कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत तसेच मातीचा प्रकार कोणता आणि शेतातील मशागतीची पद्धत यावरही किती पाणी वाहून जाणार हे ठरते. सोलापूरला रब्बी ज्वारी लावलेल्या प्लॉटमधून सात वर्षांत प्रत्येक वर्षी सरासरी एकरी ४४ टन माती वाहून गेली. याउलट नैसर्गिकरीत्या उगवलेल्या गवताच्या प्लॉटमधून वर्षाला एकरी फक्त ०.६ टन माती वाहून गेली. ज्वारीमध्ये आंतरपीक म्हणून भुईमूग लावला असता हेच प्रमाण वर्षाला सरासरी ०.९ टन इतके कमी झाले. ज्या जमिनीत पीक नाही तिथे खोल नांगरट करून शेत मोकळे ठेवले तर वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण पीक असलेल्या जमिनीच्या तुलनेत कितीतरी जास्त असते असे लक्षात आले.
माती किती पाणी शोषून घेऊ शकते आणि टिकवून ठेवू शकते हे तिच्यातील रासायनिक घटकांवर अवलंबून असते. वालुकामय माती व चिकणमाती यात १५.६ ते ४० टक्के इतका फरक पडू शकतो. निरीक्षणातून असे दिसून आले आहे, की कोरड्या प्रदेशामध्ये २४ तासांत १ इंच पाऊस पडला तर चिकणमातीचा फक्त २ इंच थरच भिजतो, तर वालुकामय मातीत पाऊस ६ ते ८ इंच खोल जातो. मुसळधार पावसाने चिकणमातीत जमिनीचे घनीकरण होऊन पाणी मुरायला अडथळा निर्माण होतो. 

कोरडवाहू क्षेत्रातील मातीतून पाणी निघून जाण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे बाष्पीभवन. केवळ उष्ण व कोरड्या हंगामातच नाही, तर पावसाळ्यातसुद्धा हे बाष्पीभवन चालू असते. कारण पावसाळ्याच्या महिन्यांमध्येही कोरड्या, उष्ण आणि पाऊस नसल्या दिवसांचे प्रमाण बरेच असते. पावसाच्या दिवसांच्या ३ ते ४ पट असे कोरडे दिवसच असतात. कानिटकरांच्या संशोधनात असे दिसले, की जानेवारी ते मार्च दरम्यान कमी बाष्पीभवन झाले, एप्रिल-मे मध्ये वाढले, जूनमध्ये पुन्हा कमी झाले, मात्र जुलै ते नोव्हेंबर या काळात सर्वांत जास्त म्हणजे वर्षभरात गमावलेल्या पाण्याच्या ७५ टक्के पाणी निघून गेले. याचे मुख्य कारण म्हणजे आधीच्या महिन्यात माती कोरडी झाल्याने जूनच्या पावसाचे पाणी मातीने शोषून घेतले. मात्र पावसानंतर माती संतृप्त झाल्यामुळे पुढच्या महिन्यात बाष्पीभवन अधिक झाले. वनस्पतीचे आवरण नसलेल्या मातीतून एकूण पर्जन्याच्या दोन तृतीयांश पाणी बाष्पीभवनामुळे वाया गेले. बाष्पीभवनाचा दर मातीत किती आर्द्रता आहे त्यावर अवलंबून असतो, त्यामुळे जितका जास्त पाऊस तितकेच जास्त बाष्पीभवन. 

वनस्पतींना पाणी उपलब्ध न होण्याचे आणखी एक कारण म्हणजे पाणी झिरपून खोल जमिनीत जाणे. खोलवर गेल्यामुळे ते मुळांना उपलब्ध होत नाही. उथळ जमिनीमध्ये मातीचा वरचा थर पाण्याने लवकर संतृत्प होतो. त्यामुळे खालच्या मुरमाच्या थरातून पाणी झिरपून जाते. जिथे पाणी झिरपून जाते तेथील मातीतील नत्र, चुना अशी पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणात निघून जातात. दख्खनच्या पठारावरच्या ४० टक्के जमिनीत मातीची खोली ९ इंचांपेक्षा कमी आहे, त्यामुळे पाणी झिरपून त्यातील पोषक तत्त्वे निघून जाण्याचे प्रमाण गंभीर आहे. 

म्हणूनच ज्या पिकांना नियमित पाण्याची गरज असते अशी पिके उथळ जमिनीत घेणे उपयोगाचे नाही. कारण तेवढे पाणीच उपलब्ध होणार नाही. मग अशा जमिनीमध्ये नेमके काय व कसे घ्यायचे याबद्दल कानिटकरांनी काय सुचवले आहे ते पुढच्या भागात पाहू... 

बॉन निंबकर-०२१६६-२६२१०६
(लेखक निंबकर कृषी संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.) 
______________________________________________________________________
संदर्भ : १) मूळ लेख :पडलेल्या पावसाचे होते काय? ऍग्रोवन -Friday, November 18, 2016
http://www.agrowon.com/Agrowon/20161118/5552188287705473088.htm

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण