पाटील, खलनायक नव्हे नायकच !(प्रकाश पाटील)

कसं, काय पाटील बरं हाय का ? काल काय म्हणाला ते खरं हाय का ? हे अजरामर गाणं ते आज गाजत असलेले "" बाई, वाड्यावर चला,'' हे गाणं असो. पाटील हा नेहमीच करमणुकीचा आणि चेष्टेचा विषय बनला. त्याची ही एकच बाजू पुढे आली. दुसरी बाजू कधीच पुढे आली नाही. त्याला नेहमीच खलनायकाच्या पिंजऱ्यात उभे केले. मात्र तो खलनायक नव्हे तर नायक आहे ही प्रतिमा कधीच पुढे आली नाही. पाटलांवरील पाचंट विनोद करण्यातच आनंद लुटला जातो.
कसं काय पाटील हे गाण तर त्याच्या कपाळावर चिकटवले गेले ते कदापी पुसणार नाही. या गाण्यानेच नव्हे तर मराठी चित्रपटांत पाटलाला नेहमीच रंगेल, कटकारस्थानी, धूर्त, रांगडा, वैगेरे वैगेरे जे काही वाईट तो म्हणजे पाटील. नुकताच एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो तेथेही पाटलांचे नाव घेतल्याशिवाय पान पुढे सरकलेच नाही. व्हॉटसअप असू द्या, व्यंगचित्र, किंवा नाटक-सिनेमा पाटील हा सर्वांचाच आवडता विषय.

होय, पाटील अगदी चित्रपटात उभा करतात तसाच रांगडा, घरंदाज, करारी, गावचं नेतृत्व करणार पुढारी, अकडबाज मिशा, टोपी-धोतर, पायात कर्रकर्र वाजणाऱ्या चामड्याच्या चपला असे त्याचे व्यक्तिमत्त्व. पण तो नशाबाज, स्त्रीलंपट(अगदी निळू फुले हातात दारूची बाटली घेऊन स्त्रीला गोंजारणार किंवा कवेत घेणारा) कदापि नव्हता. याला काही अपवाद असूही शकतात. असले शोक करण्यासाठी गर्भश्रीमंती असावी लागते ती प्रत्येक पाटलांकडे होती का ? समाजातील बहुसंख्य पाटील शेतात घाम गाळत होते.शेतात हाडाची काडं करीत होते. गावचा कारभार सांभाळणारा एखादा पाटील असेलही.. याचा अर्थ सर्वच पाटील गावपाटीलकी करीत होते असा काढायचा का ? पाटील हे शोषणकर्ते आणि लबाड होते हे कदापी मान्य करता येणार नाही. त्याची एकच बाजू रंगविण्यात साहित्यिकांनी आपली लेखणी झिजविली.
गावचा कारभार तर कुळकर्णी-पाटील पाहत होते. कुलकर्णींचा आदेश तो मानत असे. काहीवेळा गावगाडा हाकताना न्याय-अन्याय होत असे. पण कुळकर्णी राहिले बाजूला पण पाटलाच्या वाटेलाच बदनामी आली. शेवटी ऍक्‍शन घेण्याचे काम त्यालाच करावे लागत असे. त्यामुळे त्याच्याकडून लोक दुखावले जात.
त्र्यंबक नारायण आत्रे यांच्या गावगाडा पुस्तकात पाटलांवर कोणती जबाबदारी होती आणि गावचा शासक म्हणून तो कसा कारभार चालवत असे याची खूप चांगली दिली आहे. आत्रे म्हणतात, "" गावची चाकणी, लावणी उगवणी वैगेरे जे सरकारचे काम पडते ते तो करीत असे. रयतेचा विचाराने काळीचा आकार ठरविणे. गावचे सरकारकार देणे, मुक्रूर करणे. ते वसूल करून तहसिलात पाठविणे. सरकारच्या हुकमांची रयतेला समज देणे व त्याची अंमलबजावणी करणे. गावातर्फे सरकारने दिलेला कौल घेणे.मामलेदाराकडून रयतेला तगाई मंजूर करवून घेणे. व फेडीचा जिम्मा आपण घेणे. रयतेचे हक्क, तक्रारी, सूट तहकुबी आदीबाबत सरकारला दाद लावणे. गावच्या संरक्षणासाठी जरूर ती तजवीज लावणे.जागल्यामार्फत आल्यागेल्याची खबर घेणे. गुन्ह्याचा तपास करणे, ज्यावर गुन्ह्याचा आळ बसत असेल तर त्याला पकडणे. गुन्हेगारांना कैद करणे. जातप्रकरणी अगर सावकारी तंटे स्वत: अथवा पंच बोलावून मिटविणे.
""एकंदर पाटील हा जितका सरकारचा अधिकारी तितकाच तो रयतेचा कैवारी होता. रयतेला मदत मिळवून तिच्याकडून काळीची मशागत उत्तम होईल . तिच्यावर सरकार देण्याचा जास्तीभार पडणार नाही व तिला चोरचिलटांचा उपद्रव लागणार नाही या खटपटी पाटील करी असे.''
हे चित्र काही वर्षापूर्वी होते. काळाच्या ओघात गावगाडा ही बदलत गेला. पाटिलकी फक्त नावापुरतीच राहिली. बदलत्या राजकारणात सर्वच समाज जागृत झाला. प्रत्येकाला कायद्याने अधिकार प्राप्त झाला. पण, आजही गाव म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो तो पाटीलच. आजही गावात पाटलाचेच चालते असे बोलले जाते. वास्तविक ते अर्धसत्य आहे. आता सरपंच, आमदार, खासदारांचे शागीर्द, सभापतींचे कार्यकर्तेच गावचा कारभार चालवतात. आज जरी सरकारने नियुक्त केलेला पाटील असला तरी त्याला तुलनेने अधिकार खूपच कमी आहेत.
एककाळ असा होता की पाटलाचा गावात दबदबा होता. गावचा कारभारी होता. जुन्या काळी मनोरंजनाचे साधन म्हणजे तमाशा असे. तसे पाहिले तर तमाशा संपूर्ण गावाचे किंवा पंचक्रोशीचेच मनोरंजनाचे साधन होते. तमाशाबरोबरच कुस्तीचे फड, बैलगाड्यांच्या शर्यती, लेझीम खेळले जात.
तमाशात पहिल्या रांगेत बसण्याचा मान अर्थात पाटलाला असे. त्यांच्याबरोबर इतर लोकही असत. तमाशातील बाई आवडली की तो तिला वाड्यावर नेत असे, दमदाटी करीत असे. सत्तेचा गैरवापर करीत असे हे जे मांडले जाते ते पूर्ण सत्य नाही. पूर्वीचे किंवा आजचे आधुनिक पाटीलही तसेच असे जे चित्र रंगविले जाते हे चुकीचे वाटते. आजच्या राजकर्त्यांचा विचार केल्यास त्यांचे धंदे आणि चारित्र्य तपासले तर त्यांच्या व्याखेत पाटील कुठेच बसत नाही. तरीही पाटील बाईल वेडा, पाटलांचा नाद करायचा नाय, पाटील रंगेल किंवा खलनायक असे जे चित्र पिढ्यान्‌पिढ्या रंगविले जात आहे ते पूर्णता असत्य आहे. मराठी चित्रपटातील प्रस्थापितांची त्याला खलनायक कोणत्या आधारावर बनविले याचे पुरावे सापडत नाही. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांनी रंगविलेला पाटील हाच लोकांच्या स्मरणात राहिला..पाटील म्हटले की लगेच त्याचे नाते बाईशी सहज जोडले जाते.
समाजात आज सर्वजाती धर्मात पाटील हे आडनाव असते. कोणी लिंगायत पाटील, धनगर पाटील, ब्राम्हण पाटील, जैन पाटील असतात. तसा मराठा पाटीलही. आज पाटलाची पोर-पोरी शिकली सवरली ती देशातच नव्हे तर परदेशात गेली. उच्चशिक्षित झाली. नांगराऐवजी त्यांच्या हाता अँड्रोइड मोबाईल आला. शेतीबरोबरच सर्वत्र क्षेत्रात त्याने संचार केला. उंच भरारी घेतली. मात्र आजही त्याची पाटील म्हणून होणारी बदनामी थांबली नाही. व्हॉट्‌सअप पाहिले तर एकतरी विनोद पाटलांवर होतो. मात्र पाटीलही ते विनोदाने घेतो. आमची बदनामी होते म्हणून तो रडत बसत नाही किंवा जातीवादी बोलता म्हणून चिडत नाही.
पाटील हा शेतात राबत होत. तो पंढरपूरच्या विठ्ठलाचा वारकरी होता आणि आहे. इतर जातिधर्मांना बरोबर घेऊन चालत होता. हे चित्र न रंगविण्याऐवजी त्याला रंगेल, लबाड ठरविले. पाटलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही बदलला नाही असे म्हणावे लागेल.
_____________________
संदर्भ:मूळ लेख :पाटील, खलनायक नव्हे नायकच-प्रकाश पाटील http://beta1.esakal.com/maharashtra/patil-not-hero-19829

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण