आपलाही देश बेपत्ता? - डॉ. गिरीश पिंपळे

३० वर्षांपूर्वी ज्यांची गणना मध्यम किंवा कनिष्ठ मध्यमवर्गात होत असे असा वर्ग आज उच्च मध्यम किंवा श्रीमंत वर्गात प्रविष्ट झाला आहे. ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु बदलत्या काळानुसार त्याची बदललेली जीवनशैली आणि मूल्ये मात्र विचारी मनांना चिंताग्रस्त करणारी आहे. या बदलत्या समाजघटकाच्या स्थिती-गतीचा परामर्श..
‘आपण’ म्हणजे कोण? तर- सुमारे ३० वर्षांपूर्वी ज्यांची गणना मध्यमवर्गात किंवा कनिष्ठ मध्यमवर्गात होत असे असा भारतीय समाजाचा घटक! गेल्या ३० वर्षांत या वर्गाचं रूपांतर उच्च मध्यम किंवा श्रीमंत वर्गात झालं आणि त्याची जीवनशैली पार बदलून गेली. पूर्वी एखाद्या वाडय़ामध्ये दोन खोल्यांत भाडेकरू म्हणून कसंबसं आयुष्य घालवणारा हा मध्यमवर्गीय माणूस आता दोन बेडरूमच्या स्वत:च्या प्रशस्त फ्लॅटमध्ये राहायला गेला आहे. गेल्या ३० वर्षांत पती आणि पत्नी- दोघांनी नोकरी करण्याचं प्रमाण वाढलं. दोन सायकली किंवा एखादी मोपेड याऐवजी आता एक किंवा दोन चारचाकी वाहनं खरेदी करण्याइतका पैसा त्याच्या हातात खुळखुळू लागला. कुटुंबीयांच्या सोयीसाठी दोन-दोन टीव्ही संच घेणे त्याला सहज परवडू लागलं. घरातल्या प्रत्येकाकडं महागडा स्मार्ट फोन असणं हा जणू अलिखित नियमच बनून केला. पूर्वी केवळ हिंदी चित्रपटात पाहिलेली अमेरिका तो आता प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहू लागला. आपल्या मुलांना तिथे शिक्षणासाठी पाठवणं ही आज सामान्य बाब बनलीय. नंतर मुलानं तिथे स्थायिक होणं, आई-वडिलांनी वर्षांआड अमेरिकेला जाणं, मुलीच्या/ सुनेच्या बाळंतपणासाठी आईनं/सासूनं तिथे जाऊन सहा महिने राहणं याही गोष्टी नवलाईच्या राहिल्या नाहीत. या नव्या उच्च मध्यमवर्गामुळे पर्यटन व्यवसाय फोफावला. महागडय़ा ट्रॅव्हल कंपनीमार्फत युरोपची सहल करण्यात त्याला अप्रूप राहिले नाही..म्हणजे केवळ भौतिक सुखाचा आणि साधनांचा विचार केला तर आपण खूपच प्रगती केली आहे.परंतु या साधारण ३० वर्षांच्या काळातच आपल्यात इतरही अनेक बदल झाले आहेत. या बदलांचे परिणाम विघातक आणि दूरगामी आहेत.

१९८० च्या दशकात दूरचित्रवाणीच्या अनेक वाहिन्यांचं आगमन झालं आणि आपलं कौटुंबिक आणि सामाजिक जीवन ढवळून निघालं. दूरचित्रवाणी हे दृक्श्राव्य माध्यम असल्यानं त्याचा प्रभाव जबरदस्त असतो. हे माध्यम भल्याभल्यांची मती पाहता पाहता गुंग करतं. नेमकी हीच गोष्ट पुन्हा प्रत्ययाला आली. पूर्वी हिंदी चित्रपटांमुळं नजरेला पडणारी श्रीमंती आपल्या दिवाणखान्यापर्यंत येऊन रोज आपल्या दृष्टीला दिपवू लागली. विविध वस्तूंच्या अतिशय प्रभावीरीत्या केलेल्या जाहिराती आपल्या कानांवर आणि डोळ्यांवर आदळू लागल्या. याच सुमारास जागतिक सौंदर्यस्पर्धामध्ये भारतीय तरुणी (अचानकपणे) यशस्वी ठरू लागल्या. आपल्याला वाटलं की, खरोखरच भारतीय युवती (अचानकपणे?) सुंदर दिसू लागल्या आहेत!  परंतु हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा एक मोठा डाव होता असं बऱ्याच निरीक्षकांचं म्हणणं आहे. या विश्वसुंदरींच्या मार्फत आपल्या उत्पादनांची जाहिरात केली की १०० कोटी लोकसंख्येची भारतीय बाजारपेठ आपल्याला सहज उपलब्ध होईल, हा त्या कंपन्यांचा हिशेब होता. आणि पुढे तो खराही ठरला. या जाहिरातींनी अनेक वस्तूंच्या कृत्रिम गरजा निर्माण केल्या. कृत्रिम, दिखाऊ आणि भपकेबाज मालिकांनी श्रीमंतीचे संस्कार (?) आपल्यावर केले. ‘साधी राहणी व उच्च विचारसरणी’ असलेल्या व्यक्ती अल्पसंख्य बनल्या, कालबाह्य़ झाल्या आणि व्यवहारात बावळट ठरू लागल्या. त्याऐवजी ‘साधी विचारसरणी आणि उच्च राहणी’ असलेल्या व्यक्तींना प्रतिष्ठा मिळाली. या मालिकांमुळं प्रेक्षक महिलांच्या वेशभूषेत आमूलाग्र बदल झाला. डिझायनर ब्लाऊज आले, डिझायनर साडय़ा आल्या. ‘चमको’गिरी वाढली. ही वेशभूषा अतिशय महागडी होती, हे ओघानं आलंच.
पूर्वी आपण (कधीतरी) चित्रपटाला जायचो. पण आता चित्रपट आपल्याकडे (रोज) यायला लागला. दूरचित्रवाणीच्या केवळ चित्रपटांना वाहिलेल्या वाहिन्या सुरू झाल्या. त्यामुळं रोजच अनेक चित्रपट आपल्या दिवाणखान्यात घुसू लागले. याशिवाय सीडी, डीव्हीडी, पेनड्राइव्ह ही साधनंही होतीच; ज्यामुळं कोणताही चित्रपट केव्हाही व कितीही वेळा पाहण्याची सोय उपलब्ध झाली. हे चित्रपट दिवाणखान्यातून सहजपणे आमच्या जीवनात शिरले. त्यांतला बेगडीपणा, दिखाऊपणा आमच्या जीवनात प्रवेश करता झाला. एखादी खोटी, भासमान गोष्ट वारंवार ऐकली वा पाहिली की ती खरी वाटू लागते. चित्रपटांतल्या गोष्टींबाबत हेच घडू लागलं. चित्रपटांतले लग्नसोहळे पाहून त्यांचं अंधानुकरण सुरू झालं. पूर्वी लग्न झाल्यावर मधुचंद्र साजरा करण्यासाठी बंगलोर, सिमला, उटी अशा गावांची निवड व्हायची. आता आपल्या मुलांना मधुचंद्रासाठी भारत तोकडा वाटू लागला. त्यामुळं बाली बेटं, सेशल्स बेटं अशी नवनवीन ठिकाणं शोधून काढली गेली. मधुचंद्राचा मूळ उद्देश म्हणजे नूतन पती-पत्नीनं एकमेकांना समजून घेणं. तो मागे पडला. मधुचंद्र कसा झाला, यापेक्षा कुठं झाला, यालाच महत्त्व प्राप्त झालं. मधुचंद्र जेवढा महागडा, तेवढी प्रतिष्ठा जास्त.
लग्न समारंभांमध्ये श्रीमंतीचं ओंगळ प्रदर्शन सुरू झालं. स्वागत समारंभात नुसत्या स्टेजवरच्या सजावटीसाठी लाखो रुपये उधळले जाऊ लागले. ‘पॅकेज’ हा परवलीचा शब्द बनला. नवरा-नवरीची ने-आण करण्यासाठी बीएमडब्ल्यू गाडी उपलब्ध करून देणारी पॅकेजेस् घेणं प्रतिष्ठेचं लक्षण बनलं. जेवणामध्ये असंख्य पदार्थ उपलब्ध करून देऊन वारेमाप खर्च सुरू झाला. त्यातून होणाऱ्या अन्नाच्या नासाडीकडं सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येऊ लागलं. स्वत:ला खूपच आधुनिक आणि उच्चवर्गीय समजणाऱ्या कुटुंबांतील स्वागत समारंभाच्या वेळी विदेशी दारूचा गुत्ताही उपलब्ध करून देण्यात येऊ लागला. लग्नाचे, स्वागत समारंभाचे क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करून ठेवण्यासाठी ड्रोन विमानांचा वापर करून त्यावर लाखो रुपये खर्च करणं ही फॅशन आता रूढ होत आहे.
लहान मूल जसं शेजारच्या घरातल्या मुलाचं नवीन खेळणं बघितल्यावर तशाच खेळण्याचा हट्ट धरतं तसंच मोठय़ा माणसांचंही होऊ लागलं. दुसऱ्याच्या श्रीमंती जीवनशैलीचं अंधानुकरण सुरू झालं. मध्यमवर्गाला चंगळवादानं जबरदस्त विळखा घातला. या चंगळवादासाठी आणि श्रीमंती जीवनशैलीसाठी साहजिकपणे अधिकाधिक पैशांची जरूर होती. त्यासाठी मग मध्यमवर्गीय ऊर फुटेपर्यंत धावू लागला.
आता कुणी म्हणेल की, अधिक पैसा मिळवणं, श्रीमंत होण्याची अपेक्षा बाळगणं गैर आहे का? नक्कीच नाही. पण त्यात तारतम्य हवं. पैसा प्रामाणिकपणं मिळवलेला हवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘कुठे थांबायचं’ याचं भान हवं. मध्यमवर्गाचं नेमकं हेच भान आणि तारतम्य सुटलं आहे. कुसुमाग्रज एका लेखात म्हणतात, ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही, ती रुपयाच्या नाण्याभोवती फिरते.’ त्यांच्या या विधानाचा विदारक प्रत्यय ठायी ठायी येतो आहे. त्यातून वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात फार मोठे ताण निर्माण झाले आहेत.
पूर्वी नोकरीची वेळ ठरावीक असे. ताणही तुलनेनं कमी असे. त्याकाळी नोकरी व्यक्तीसाठी होती. आता व्यक्ती नोकरीसाठी झाली आहे. व्यक्तीचं स्वातंत्र्य, कौटुंबिक जीवन, फुरसतीचा वेळ, छंद या सगळ्या गोष्टी पार आक्रसून गेल्या आहेत. आयटी उद्योगांमध्ये धो-धो पैसा मिळत असल्यानं सगळ्या तरुणांना तिथेच जायचं आहे. ‘पॅकेज’ हा या तरुणाईचा केंद्रबिंदू झाला आहे. मग कामाचे तास किती का असेनात. व्यक्तिगत आवड-निवड, कौटुंबिक स्वास्थ्य, शारीरिक/ मानसिक क्षमता या कशाचाही विचार न करता केवळ अधिकाधिक पॅकेज मिळवणं हेच आजच्या तरुण पिढीचं जीवनध्येय बनलं आहे. माणसाचं रूपांतर यंत्रमानवात झालं आहे. नोकरीच्या निमित्ताने १४-१४ तास लग्नाच्या जोडीदारापासून दूर राहिल्यानं आणि तेवढाच वेळ दुसऱ्या सहकारी तरुण/ तरुणीच्या सहवासात राहिल्यानं विवाहबाह्य़ संबंधांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अनेक प्रकरणं घटस्फोटापर्यंत जात आहेत. अगदी तरुण वयात मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसून येत आहेत.
प्रथम दर्जाच्या बुद्धिमान विद्यार्थ्यांना शिक्षक, प्राध्यापक, अर्थशास्त्रज्ञ, वैज्ञानिक किंवा लष्करी अधिकारी वगैरे व्हायचं नाहीए. (त्यामुळं काही अपवाद वगळता बहुतांश दुय्यम दर्जाच्या व्यक्ती या व्यवसायांकडे वळत आहेत.) भारतीय भूदलात अधिकाऱ्यांच्या हजारो जागा रिकाम्या आहेत. याचं कारण उघड आहे- या नोकऱ्यांमध्ये खोऱ्यानं पैसा ओढता येत नाही. आणि चंगळवादी जीवनशैलीत पैसा म्हणजेच परमेश्वर. अनेकदा तर हा पैसा उपभोगण्यासाठी माणसांकडे पुरेसा वेळ आणि ऊर्जाही नसते. आणि तरीही ऊर फुटेपर्यंत पैशांमागं धावणं सुरूच राहतं.
पैसा मिळवण्यासाठी माणसं अत्यंत व्यवहारी बनली आहेत. भारतीय समाजरचनेचं वैशिष्टय़ असलेली कुटुंबव्यवस्था ढासळत चालली आहे याचं हे एक प्रमुख कारण आहे. आता एकत्र कुटुंब पाहिलं तर आश्चर्य वाटतं. एकेकाळी आजी, आजोबा या केवळ कुटुंबातल्या आदरणीय व्यक्ती नव्हत्या, तर जणू संस्था होत्या. आता त्या केवळ गरजेपुरत्या वापरण्याच्या व्यक्ती बनल्या आहेत. याला अपवाद असतीलही; पण ते केवळ अपवादच आहेत.
आणखीन एक फार मोठा बदल गेल्या काही वर्षांत घडून आलेला आहे. तो आहे हिंदी चित्रपटांबाबत. पूर्वी चित्रपटात काही संकेत होते. काही पथ्यं पाळली जात असत. उदा. चित्रपटातली मुख्य अभिनेत्री कधी उत्तान नृत्य करत नसे. ते करण्याची जबाबदारी चित्रपटसृष्टीतल्या दोन-तीन ठरावीक नटय़ांपैकी एकीकडे सोपवलेली असे. कालांतरानं यात फरक पडत गेला आणि या दोन-तीन नटय़ांऐवजी मुख्य अभिनेत्रीच ही ‘कामगिरी’ बजावू लागली. ‘आयटम साँग’ नावाचा नवा प्रकार रूढ झाला. त्यानुसार चित्रपटात नसलेल्या प्रसिद्ध नटीला अशा प्रकारच्या नृत्यापुरतं निमंत्रित करण्यात येऊ लागलं. त्याची वारेमाप जाहिरात केली जाऊ लागली. साहजिकच अशा चित्रपटाचा समाजमनावर मोठय़ा प्रमाणात विपरीत परिणाम होऊ लागला.
एकूणच चित्रपटांतली अश्लीलता वाढीस लागली. नटय़ांच्या बिनधास्त मुलाखती सुरू झाल्या. त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रं प्रसिद्ध होऊ लागली. पूर्वी अशा छायाचित्रांना वाहिलेली ठरावीक नियतकालिकं असत. नंतर हा भेदाभेद नाहीसा झाला. चित्रपटांमध्ये अश्लीलता वारंवार दिसू लागल्यानं त्याची आपल्याला सवय झाली. म्हणजे यात काही गैर आहे, समाजविघातक आहे असं आपल्याला वाटेनासं झालं. अश्लीलतेच्या कल्पना फारच ढिल्या झाल्या. या संबंधातला आमचा दृष्टिकोन फारच उदार झाला. पूर्वी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचं अस्तित्व जाणवतं असे. हीरो-हीरोइनचे प्रणयप्रसंग सूचकपणे दाखवले जायचे. त्यात सौंदर्य असे. आता सगळा उघडावाघडा मामला! केवळ चित्रपटातच शोभतील अशा गैर फॅशन्सचं अनेक स्त्रिया आज अनुकरण करत आहेत. हा मध्यमवर्गात झालेला एक फार मोठा बदल आहे.
श्लील-अश्लीतेबद्दलचे आपले हे ‘औदार्य’ इतरही क्षेत्रांत दिसून येऊ लागलं आहे. उदा. क्रिकेटचे सामने. एखाद्या खेळाडूनं चौकार-षटकार ठोकला की प्रेक्षकांनी प्रचंड जल्लोष करणं ही स्वाभाविक, उत्स्फूर्त अशीच गोष्ट. परंतु त्यासाठी अल्पवस्त्रांकित ‘चीअर गर्ल्स’ कशाला हव्यात? (बदलत्या समाजानं दिलेला हा एक नवा शब्द!) पण आम्हाला या कृत्रिम आणि अश्लीलतेकडे झुकणाऱ्या प्रकाराबद्दल काहीच वाटत नाही!
याच सुमारास इंटरनेटचं आगमन झालं आणि अश्लीलतेवर कुणाचंच नियंत्रण राहिलं नाही. स्मार्ट मोबाइल फोन आल्यावर तर परिस्थिती झपाटय़ानं खालावत चालली आहे.
आता यावर कुणी म्हणेल की, आपण काळाबरोबर बदलायचं नाही का? जरूर बदलायचं. पण कशाच्या बाबतीत बदलायचं, याच तारतम्य हवं. म्हणजे तंत्रज्ञानानं दिलेल्या संगणक, फोन आदी देणग्यांचा आवश्यक वापर आपल्याला करता यायला हवा. ई-मेल करणं, इंटरनेटच्या माध्यमातून बँकेचे व्यवहार करणं या गोष्टी आल्याच पाहिजेत. दूरचित्रवाणीच्या वाहिन्या पाहताना काय पाह्य़चं आणि किती वेळ पाह्य़चं याचं भान पालकांनी ठेवलं पाहिजे. म्हणजे काळानुसार होणारे बदल पाखडून घ्यायचे. त्यातले खडे बाजूला काढून टाकायचे. तंत्रज्ञानातले बदल हे ‘पॅकेज डील’ आहे असं समाजायचं कारण नाही. पुरेशी इच्छाशक्ती व चिकाटी ठेवली तर तंत्रज्ञानाच्या बाबतीत नीरक्षीरविवेक करणं शक्य आहे.
या सगळ्या परिस्थितीचा विचार करताना पु. ल. देशपांडे यांच्या एका लेखाची तीव्रतेनं आठवण होते. त्याचं शीर्षक होतं- ‘एक बेपत्ता देश!’ १९७० च्या दशकात एका दिवाळी अंकात लिहिलेला हा अमेरिकेसंबंधीचा लेख आहे. (पुढे तो त्यांच्या ‘जावे त्यांच्या देशा’ या पुस्तकात सामाविष्ट करण्यात आला.) भौतिक सुखांचा आणि अश्लीलतेचा अतिरेक झाल्यानं अमेरिकेत किती गंभीर समस्या उभ्या राहिल्या आहेत याचं अत्यंत विदारक वर्णन पु. लं.नी त्या लेखात केलं आहे. त्या लेखात एके ठिकाणी ते म्हणतात : ‘आज अमेरिकनांचे सगळे नमस्कार डॉलरं प्रतिगच्छामि. आणि म्हणूनच यांच्या जीवनाची व्याख्या ‘डॉलर कमावण्याची संधी’ एवढीच असावी असे मला ठायी ठायी वाटत होते. आणि आयुष्यात कमावण्याचा काळ किती टिकेल, हे सांगता येत नसल्याने इथे प्रत्येक गोष्टीची घाई आहे. ‘सेल’ या मंत्राच्या जोडीला दुसरा मंत्र म्हणजे इन्स्टंट.. लगेच!’.. विकायचा माल कोणताही असेना; शेवटी (त्याच्या जाहिराती) त्याचे पर्यवसान कडाडून दिलेल्या आलिंगन-चुंबनातच झाले पाहिजे. आता ती दृश्ये पाहून पाहून त्यातून येणाऱ्या झिणझिण्या बोथट होऊन गेल्या. म्हणून मग रंगमंचावर संपूर्ण नग्नावस्थेतला धिंगाडा!’ याच लेखात ते पुढे म्हणतात- ‘सेल (विका) हा इथला मूलमंत्र आहे! वस्तू विका. बुद्धी विका. कला विका. कौमार्य विका. तारुण्य विका. विकण्यासारखे उरत नाही फक्त वार्धक्य! म्हणूनच ते निरुपयोगी होते. कुणालाच ते नको असते. ‘विक्री’ हा ज्या संस्कृतीचा युगधर्म होतो, तिथे वार्धक्याचे निर्माल्य होत नाही; पाचोळा होतो!’ अमेरिकेतल्या तरुण पिढीबाबत पु. ल. जे लिहितात ते तर डोळ्यांत अंजन घालणारं आहे- ‘वयाचे पंधरावे वर्ष उलटण्याच्या आत शरीराचे सगळे भोग कुठल्याही जबाबदारीचे घोंगडे गळ्यात अडकवून न घेता भोगून झाले की पुढे कसलेतरी कृत्रिम उत्तेजन मिळाल्याखेरीज जगणेच अशक्य! त्यातून मग त्या उत्तेजनासाठी मोटारसायकलवरून भन्नाट भटकणे सुरू होते. दिशाहीन भ्रमंती चालू होते. अनोळखी तरुण-तरुणींची भरमसाटशय्यासोबत घडायला लागते. आणि या साऱ्याच्या अतिरेकाने ती झिंगही भराभरा ओसरायला लागते. मग ती जोरदार करण्यासाठी विद्युतदीपांच्या घेरी आणणाऱ्या प्रकाशात आणि कानठळ्या बसविणाऱ्या संगीतात बेहोशीचा शोध सुरू होतो. आणि शेवटी साऱ्या संवेदनांचा मेंदूत ठेचून ठेचून भरलेला चिखल मात्र उरतो!’
या सगळ्या वर्णनातला काही भाग आपल्या देशाच्या आजच्या स्थितीलाही लागू होतो, या विधानाशी तुम्हीही सहमत व्हाल. उरलेला भाग म्हणजे भविष्यातला भारत कसा असू शकेल याची भयसूचक घंटाचं आहे. भारताची स्थिती अमेरिकेपेक्षाही वाईट होण्याची शक्यता आहे. कारण आपल्यावर अमेरिकेचा प्रभाव आहे तो तिथल्या वाईट गोष्टींचाच. तिथे असलेली शिस्त, कार्यसंस्कृती, प्रामाणिकपणा या गोष्टींचं आपण अनुकरण करावं असं भारतीयांना वाटत नाही. आपल्या देशाची अतिप्रचंड लोकसंख्या, प्रचंड दारिद्य्र , निरक्षरता, भ्रष्टाचारात बुडालेले ऱ्हस्व दृष्टीचे (बहुतेक.. सर्व नव्हे!) राजकारणी अशा अनेक कारणांमुळे आपली अवस्था अधिकाधिक वाईट होत जाण्याचीच शक्यता अधिक आहे.
_____________________________________________________________________
संदर्भ : मूळ लेख- आपलाही देश बेपत्ता? - डॉ. गिरीश पिंपळे-December 4, 2016 -  http://www.loksatta.com/lekha-news/middle-class-gradually-changing-its-ways-of-lifestyle-1353903/

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण