कबीरवाणी-अरविंद दोडे

कबीर हे एक सार्वकालिक नाव. त्याला बंधनं नाहीतच ना. ना भाषेची,ना प्रांताची, ना काळाची. कबीराने शेकडो वर्षापूर्वी जे सांगून ठेवलंय त्याचे दाखले आजही दिले जातात. त्याचे सहज सोपे दृष्टांत कोणत्याही पिढीपर्यंत विनासायास पोहोचतात. म्हणूनच कबीराचे दोहे भजन स्वरुपात सादर झाले तरी, किंवा पॉप म्युझिकचा साज लेवून अवतरले तरीही मनाला भिडतातच! सकाळ वर्धापनदिनानिमित्त खारघर येथील सेट्रल पार्क (ऍम्फी थिएटर) मध्ये शनिवारी कबीर कॅफे सजणार आहे. या निमित्ताने अमृतमयी कबीरवाणीवर एक नजर...  
प्रेम छिपाया ना छिपे... 
शब्दांचे संवेदनात्मक किंवा नादरूप अंग हे त्याच्या अर्थात्मक अंगाचे प्रतीक असते. हाताळण्याला सोपे असे अर्थाचे एक वाहक म्हणूनच त्याचा उपयोग केला जातो. शब्दाच्या या दोन अंगांचा संयोग हा प्रत्येक मर्यादाबद्ध संघशक्तीला वरदानरूप ठरतो; पण तोच शापरूप ठरला तर? प्रतीक आणि अर्थ यांचा परस्पर भेद आणि संगम करण्याची जादू संतवाणीत दिसून येते. भारतीय संतांमध्ये पहिला बंडखोर संतकवी म्हणून कबीराचे नाव आदराने घेतले जाते. त्याच्या जीवनाची आणि तत्त्वज्ञानाची ही एक झलक...

कबीर! 
झुंजार वृत्तीचे बंडखोर संतश्रेष्ठ! ईश्‍वरभक्तीसाठी त्यांना फार झुंजावे लागले नाही. परमेश्‍वर आपल्याला भेटेलच, असा त्यांना पूर्ण आत्मविश्‍वास होता. एवढेच नाही; तर नामस्मरणाने त्याला आपण इतके वेड लावू की, तोच आपले नाव घेत पाठीमागे लागेल, अशीही खात्री होती. त्यांनी म्हटले आहे, ज्याची रोजच सुळावर आहे, विष हेच ज्याचे भोजन आहे, त्याला मरणाचा धाक वाटत नाही. त्यापैकीच मी एक आहे. मला परदेशात मरण यावे तेही कसे? अनाथासारखे! माझ्या मृतदेहाच्या मांसावर अनेक जीवजंतूंना भोजन करता यावे. त्यांनी महोत्सव साजरा करावा. एकेका क्षणाला मी शंभर मरणे मरायला तयार आहे...' अशा या जगावेगळ्या संतराजाची जन्मकथाही जगावेगळीच आहे. त्यांच्या जन्माविषयीच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत. 
जन्मकथा :  
कबीरांच्या जन्मतारखेबाबत मतभिन्नता आहे, तरीही ठोबळ मानाने असे मानले जाते की, ते बनारस या तीर्थक्षेत्री इसवी सन 1399 मध्ये जन्मले असावेत. ठोस पुरावे नाहीत. तशीच त्यांच्या माता-पित्यांबाबतही एकमताने निश्‍चय न झाल्याने जी एक सर्वश्रुत कथा आहे, तिच्या आधारे इतकेच सांगता येते की, एक विधवा स्त्री होती. तिने एका साधूला नमस्कार केला. त्याने तिच्याकडे न बघता आशीर्वाद दला, "पुत्रवती भव.' सिद्धसाधूंचा शब्द फोल ठरत नाही.
त्या स्त्रीला पुत्र झाला. तिनं तो लोकलाजेस्तव काशीच्या गंगाघाटावरील गवतावर एका झाडाखाली कापडात गुंडाळून ठेवून दिला. निरू आणि निमा या वीणकर दाम्पत्याला तो दिसला. त्याला भगवान शंकराचा प्रसाद म्हणून सांभाळला. त्याचा नामकरणविधी केला ः कबीर हे नाव ठेवले.
तत्कालीन इतिहास राजकीयदृष्ट्या फार भयानक आहे. बनारसमधील असंख्य देवळांची मोगलांनी तोडफोड केली. त्या काळात काशी हे ज्ञानपीठ होते. जितके ज्ञानार्थी होते, तितकेच विद्यार्थीसुद्धा होते, परंतु त्यांच्यापेक्षा अधिक पोटार्थी पुजारी आणि पंडे होते. बाबा-बुवांचे मठ होते. वाया गेलेल्या शास्त्री-पंडितांचे अत्यंत घृणास्पद अनुभव कबीरांना बालपणापासूनच आले. विषमता हेच कटू विष असते, तेच माणुसकीला मारून टाकते. विषमता कायम टिकवण्यासाठी राजसत्ता आणि धर्मसत्ता कशा एकत्र येऊन शासन करतात, हे वेगळे सांगायला नकोच. धर्म श्रीमंतांनी सांगावा आणि गरिबांनी तो पाळावा! धर्माच्या दलालांनी न्यायनिवाडा करावा, ही जागतिक परंपरा या देशात हजारो वर्षांपासून होती. आताही आहे.
माता-पित्यांचा व्यवसाय मुलगा करतो, तसा तो कबीरांनी केला. वीणकाम करताना कुणी पीर-फकीर त्यांच्या दारी आले की, सत्संग लाभायचा. त्यामुळे त्यांनी भरपूर भक्ती केली. भक्ताने आध्यात्मिक बडबड करण्यापेक्षा थोरा-मोठ्यांच्या पायाशी बसून मनोभावे "ऐकावे' हा आदर्श कबीरांच्या चरित्रातून मिळतो. दुसरे असे की, जे हरिनामाचा गजर करतात, त्यांच्या ऐहिक शिलकेस काहीच उरत नाही! अशा बुडीत खात्याचा व्यवहार सुखाचा संसार करत नाही. आपला सुपुत्र काम कमी आणि नाम अधिक घेतो, धंदा करणार कसा? संन्यास घेतला तर? या काळजीने त्यांनी कबीरजींचे लग्न लावून दिले. 
संसारकथा : 
कबीर संसार करू लागले. एक मुलगा झाला, त्याचे नाव कमाल ठेवले. दुसरी मुलगी झाली, तिचे नाव कमाली ठेवले. कमाल कालांतराने तीर्थयात्रा करीत पंढरीनाथाच्या दर्शनास पंढरपूरला आले होते, असे त्यांच्या काव्यावरून सांगितले जाते. कबीरांना माता-पिता लाभले, ते मुसलमान. त्यांच्यावर बालपणी संस्कार झाले ते मुस्लिम धर्माचे. हिंदू काय, मुसलमान काय, मुल्ला-मौलवी काय, शास्त्री-पंडित काय, बाह्यउपचारांतील कृत्रिमता ही भलतीच दांभिक होती. खोटेपणाने कळस गाठला होता. ऐन तारुण्यात उच्चार, विचार आणि आचार यांच्यातील तफावत पाहून ते चक्रावून गेले. त्यांच्या काव्यात जो विद्रोही सूर आहे, तो अनुभवांच्या गंगाघाटावरून आलेला आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक गैरव्यवहार हा सामान्य जनतेची पिळवणूक करणारा दिसून आल्यावर त्यांना काव्यस्फूर्ती झाली. अत्यंत हलाखीत दिवस काढताना, दुर्दैवाशी दोन हात करताना, संसाराचा गाडा मोठ्या मुश्‍किलीने रेटताना साधुसंत दारी येत असत. त्यांना देण्यासाठी गंगाजल असायचे; पण अन्न नसायचे. ते दिवस त्यांनी कसे काढले असतील? त्यांचे मुलांशी खटके उडायचे.
चित्तशुद्धी कशाने होते? गुरू भेटल्याने! त्या सद्‌गुरुला शोधायचे कुठे नि कसे? 
सद्‌गुरुस्पर्श : 
असे म्हणतात की, स्वामी रामानंद हे पहाटेच्या काळोखात नित्य स्नानास गंगाघाटावर जात असत. त्यांचा त्या काळात एक साक्षात्कारी संन्यासी म्हणून फार बोलबाला होता. त्यांचा आश्रम होता. काही निवासी शिष्य होते. कबीरासारख्या मुसलमानाला ते गुरुमंत्र देतील का, हा प्रश्‍नच होता. म्हणून मग एक दिवस पहाटे ते गंगाघाटावर गेले. रामानंदांच्या जाण्या-येण्याच्या ठिकाणी एका पायरीवर पडून राहिले. स्वामीजी आले. घाट उतरताना कबीरांना त्यांचा पाय लागला. ते थबकून "राम राम' सवयीने म्हणाले. कुणीतरी पायरीवर असल्याचे लक्षात आले; पण काळोखात नाही दिसले.
कबीरजी निघून गेले. "राम' नामाचा मंत्र आपल्याला मिळाला, या आनंदात ते गाऊ लागले. गावात चर्चा होणारच. काही दिवसांत स्वामींपर्यंत ही वार्ता गेली. "एक मुसलमान रामनाम घेतो' याचा राग हिंदूंना तर आलाच, मुसलमानही भडकले. स्वामींनी कबीरजींना बोलावून घेतले. त्यांनी स्वामींना घडलेला प्रसंग सांगितला. त्यांची अनन्य भक्ती पाहून स्वामी मनोमन प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना शिष्यत्व बहाल केले.
कबीरांनी गुरुकृपेला अभ्यासाची जोड दिली. कर्म आणि धर्म (व्यवसाय) यांचा समन्वय साधून भक्ती केली. ती करताना, आत्मज्ञान आणि साक्षात्कार यांचा विचार करताना त्यांच्या काव्याचे संदर्भ पाहता नाथपंथाच्या हटयोगातील विविध शब्द-परिभाषा आपल्या साक्षात्काराबाबत त्यांनी वापरलेली दिसते. ते म्हणतात, "भगवंतावरील प्रेम भक्ताला लपवता येत नाही!
कुणी परंपरेविरुद्ध आवाज उठवला की, झापडबंद समाज अशा विद्रोही व्यक्तीचा मानसिक आणि शारीरिक छळ करतोच. कबीरांना वाळीत टाकायचे असे पंडितांनी ठरवले; पण ते होते मुसलमान! मुल्लामौलवींनी फतवा काढला (असेल!) "मशिदीत प्रवेश नाही.'
कबीरांची एक बकरी होती. ती राजकारण्यांप्रमाणे कुठेही चरत फिरायची. देवळात जाऊन फुले, पाने-फळे खायची. पुजारी वैतागले. काही कबीरांकडे आले. एक म्हणाला, "तुझी बकरी देवशात येते.'
"जनावर आहे. तिला काय कळतंय? कुठंबी जाते. देऊळ म्हणजे काय हे माहीत नाहीए. मी कधी गेलोय देवळात?' कबीरांनी उलट सवाल केला.
यातील गहन अर्थ त्या विद्वानांना कळला असेल का? तळागाळातील क्षुद्र लोकांनी मान वर करून, नजरेस नजर भिडवून असे बोलण्याचा तो काळ नव्हता; पण रामनामाने निर्भयता दिल्यावर रामाच्या ठेकेदारांना ते कधीही शरण गेले नाहीत. महाराष्ट्रातही "संन्याशा'ची मुले बंडखोर निघाली होती. त्यांचाही छळ झाला. त्याच पोरांना संतशिरोमणी यांनी "परब्रह्मीचे ठसे' म्हणून आदराने गौरविले आहे. दुसरे विद्रोही संत जगद्‌गुरू तुकाराम महाराज! कबीरांनी म्हटले आहे,
जाति न पुछो साधु की
पुढी लिजिए शान।
मोल करो तलवार का
पडा रहन दो म्यान।।
थोरा-मोठ्यांचे ज्ञान पाहावे, जाती-धर्मावरून काय श्रेष्ठत्व उमजते होय? तलवारीला महत्त्व आहे, म्यानाचे महत्त्व काय? तिची किंमत तलवारीपुढे काय होय? 
बिन सूरज उजियारा... 
मानसिक जीवनाचे घटित या दृष्टीने संतसाहित्याची दोन अंगे असतात. एक ज्ञानात्मक आणि दुसरे भावात्मक. अर्थात यात निःसंदिग्ध असा भेद नाही, हे खरे आहे. दुसरा एखादा युक्तिवाद करता आला नाही, तर दुसरा भेद म्हणजे भक्तिभावाचा सांगता येतो. बुद्धिप्रधान अमृतानुभव आणि भावनाप्रधान अनुभवामृत यांच्या सीमारेषेवर सौंदर्यभाव काव्यात्मक होतो. कबीराच्या जीवनात आणि तत्त्वज्ञानात याची प्रचीती येते. आचार आणि विचार यांच्यातील अभेद भाव हा उच्च-नीचतेच्या भेदभावापलीकडे नेतो... 
कबीर! कबीरविषयक ग्रंथ पुष्कळ आहेत. त्यांचे विचार काही शिष्यांनी लिहून काढले आहेत, त्या संग्रहास म्हणतात: बीजक. गुप्तधनाचा खजिना शोधण्याचा नकाशा म्हणजे बीजक. आपल्या अंतरात असलेल्या आत्मधनाचा शोध घ्यायचा म्हणजे "बीजक' हवाच! पारमार्थिक गुप्त धनाचा शोध घेण्यासाठी गर्दी कधीच नसते. काण "या' गुप्तधनाचा लाभ व्हावा म्हणून "अहंकारा'चा बळी द्यावा लागतो, त्याशिवाय ओंकाराचे दर्शन अशक्‍यच असते.
कबीर निर्गुणभक्तीचे उपासक होते. मूर्तिपूजा त्यांनी कधी केली नाही. धर्मातीत तत्त्वज्ञानाचा गाभा राम असला तरी तो अंतर्याम आहे. या दृष्टीने आदिग्रंथ, साखीसंग्रह, कबीर ग्रंथावली आणि शिखांच्या गुरूग्रंथ साहेबमधील दोहे आदी साहित्य अधिकृत मानले जाते. 
कबीरांचे साहित्य : 
कबीरजींच्या साहित्यातील तत्त्वज्ञान, वेद, उपनिषदे आणि पुराणे यांच्यातील असले तरी त्याची व्यापकता सुफियाना दृष्टिकोनापेक्षाही मोठी आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या रूपकांप्रमाणे त्यांचे "उलट बॉंसियां'मधून कूटकाव्याचा परिचय होतो. रहस्यवादी संतकवी म्हणून कबीर हे ख्यातकीर्त आहेत, ते इतरही काही कारणांमुळे. नामस्मरण, समाधिसुख, माया, आत्मानुभूती, गुरुभक्ती, संपूर्ण शरणागती आणि शृंगारभक्ती त्यांच्या काव्याचे मुख्य विषय आणि विशेष आहेत. "हंडी स्वादही, भात टाकला। बकऱ्यापुढे देव कापला।।' अशा नाथ भारूडांचा गूढार्थ गुरुमुखातून समजला तर साधनेचे सार्थक होते. कबीरांच्या साखी अन्‌ भजनांतून असा प्रभाव पडतो अन्‌ आपल्याला कसलेच ज्ञान नाही, याचे प्रथम ज्ञान होते.
ईश्‍वर हा कबीरांचा प्रियकर आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्या "विरहिणी / विराणीं'प्रमाणे कबीरांची कविता प्रेमाच्या अभिव्यक्तीतील स्पष्टपणा आणि उत्तानपणा टाळून शालीनतेने आपल्यासमोर येते. मर्यादशील पतिव्रतेचे लोभस मांगल्य तिच्यात आहे. ते सांगतात -
हरी रुढे सब होत है।
गुरू रूठे सब खोय।। 
वेदव्यासकृत "श्रीगुरुगीते'त भगवान शंकर देवी पार्वतीला "गुरुतत्त्वा'ची महती सांगताना पटवून देतात की, "हे देवी! ईश्‍वर रागवला तर गुरू रक्षण करतो; पण गुरू रागवला तर मात्र ईश्‍वरसुद्धा वाचवू शकत नाही.' म्हणून गुरुसेवा करावी. गुरुप्रसाद मिळतो गुरुसंगतीने! कबीर गातात,
संगति से सुख उपजै,
कुसंगति से दुख होय।
कहै कबीर तहॅं जाईए,
साधुसंग जहॅं होय।।
गुरु-शिष्याची आदर्श जोडी अशी असावी की,
सिष तो ऐसा चाहिए,
गुरु को सब कुछ देय।
गुरु तो ऐसा चाहिए,
सिष से कछू न लेय।।
अर्थात ही जोडी जमणे फार दुर्मिळ असते. सध्याचे "पंचतारांकित' सद्‌गुरू पाहिले की, सद्‌भक्त चक्रावून जातात. गुरुध्यासाने विरही प्रेमीसारखी बिकट मनःस्थिती होते. 
वियोगव्यथेत भक्त प्रतीक्षा करताना जणू अग्निदाह अनुभवतो; परंतु त्याच अग्नीत तावून-सुलाखून भक्ताच्या आयुष्याचे सोने आणखी उजळ होते. शुद्ध होते. स्वतःला समर्पित करण्याच्या किमयेमुळे प्रेमरसाचा आस्वाद घेता येतो. मग सुन्या सुन्या महालात नौबत झडते. वाद्ये वाजतात वादकांशिवाय! मेघमंडल नसते; पण विजा कडाडतात. सूर्य नसूनही आसमंत प्रकाशाने भरून जाते -
बिन बादर जब बिजुरी चमकै,
बिन सूरज उजियारा...
प्रेमाभक्तीची दिव्य आत्मानुभूती कबीरांच्या काव्यात कळस गाठते असे लक्षात येते.
प्रीतम को पतियॉं लिखू
जो कहूँ होय विदेस,
तन में, मन में, नैन में
ता को कहॉं संदेस? 
हा विशिष्ट अद्वैतवाद उच्च दर्जाच्या प्रीतीचा आहे. भजन, कीर्तन, श्रवण, वाचन, प्रवचन करूनच ती भक्ती सिद्ध होते असे नाही. अंतरंगात श्रीरंग असेल तर मौनानेसुद्धा प्रीती सफल होते. आत्मप्रतीती येते, ही प्रीती विषयरहित असते. विकारशून्य असते.
कबीरांच्या काव्यतत्त्वाचा आणखी एक उजळ पैलू म्हणजे दांभिकतेवर त्यांनी केलेले प्रहार. मूर्तिपूजेतील अंधश्रद्धा, भक्तीच्या वाटेवरील अनाचार, पंडित आणि मौलवींच्या वागण्या-बोलण्यातील प्रचंड विसंगती यांवर त्यांनी घाव घातले.
मो को कहॉं ढूढो बंदे
मैं तो तेरे पास में।
ना मैं देवल, ना मैं मसजिद
ना काबे, कैलास में।। 
अनन्यभावाने भगवंताला शरण गेल्यास तो क्षणात प्राप्त होतो, इतका तो जवळ आहे, तरीही भक्तगण तीर्थयात्रा करतात. व्रतवैकल्ये करून खर्चिक सोहळे पार पाडतात. क्षुद्र देवदेवतांपुढे मुक्‍या प्राण्यांचा बळी देतात.
कबीरांची अमृतवाणी लोकप्रिय असण्याची अनेक कारणे आहेत. ओघवती शैली, लोकाभिमुख विचार, सरळ आणि परखड मते, पाल्हाळ न लावता दोनोळीं (दोहा) मध्ये महान तत्त्वांचे सार सांगतात. लोकभाषेतील सहजता हाही एक खास गुण त्यांच्या काव्याचा सांगितला जातो. तत्कालीन व्यवहार आणि जीवनातील दृष्टान्त दिल्यामुळे सामान्य माणूस अध्यात्मविद्या किंवा भक्तिशास्त्र समजू शकतो. 
त्यांचे भांडवल म्हणजे बहुश्रुतता. "ऐकणे' आणि लक्षात ठेवणे. जनमानसात मिसळणे. स्वानुभवांनी डोळस आणि समंजस होणे. विद्रोही वृत्ती, कलात्मक शैली अन्‌ निर्गुणाचा छंद यांच्या बळावर त्यांनी काव्यस्फूर्तीची पूजा केली. गतीची विविधता आमि मतीची प्रवाहितता यांना त्यांनी रागदारीची जोड दिल्याने वाद्य, सूर, नूपुर आदींचा त्यांचा अभ्यास लक्षात घ्यावा लागतो. तालबद्ध शब्दरचना, स्वरसंगती काव्यात आल्याने कलाकुसरी काव्य त्यांचे नसले तरीही अनुभवांचा सागर सर्वांसाठी आहे. शांत रसाचा हा सागर विचाररत्नांनी भरलेला आहे. त्यासाठी घेणाऱ्याने मात्र "लघुता में प्रभुता मिलै।' हे कायम लक्षात ठेवावे. 
काशीक्षेत्री मृत्यू आल्यास मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे. या श्रद्धेवर मात करण्यासाठी कबीरजी काशीपासून जवळच असलेल्या मगहर या गावी जाऊन राहिले. जो खरा भक्त असतो, तो कुठेही राहिला तरी मोक्षपद प्राप्त करून घेऊ शकतो. या विचाराने ते काशीपासून दूर गेले. अखेरपर्यंत ते बंडखोरच राहिले. असंख्य शिष्य लाभले, अनुयायी मिळाले, पण मठ, आश्रम बांधून त्यांनी हातमागाचे कारखाने नाही काढले.
कबीरजींचे काव्य म्हणजे भक्ताच्या अंतरात "चमके बिन सूरज उजियारा' हेच खरे. आपल्या नैराश्‍याच्या काळोखात असा उजेडाचा एक तरी कवडसा पडावा ही प्रभुचरणी प्रार्थना! 
कह्‌त कबीर... 
झीनी झीनी बीनी चदरिया,
काहै कै ताना, काहै कै भरनी,
कौन तार से बीनी चदरिया.
इंगला-पिंगला ताना भरनी,
सुसमन तार से बीनी चदरिया.
आठ कॅंवल, दस चरखा डोलै,
पाच तत्त गुन, तीनी चदरिया.
साई को सियत मास दस लागै,
ठोक ठोक के बीनी चदरिया.
सो चादर सुर-नर-मुनि ओढिन,
ओढिके मैली कीनी चदरिया.
दास कबीर जतन से ओढिन,
ज्यों की त्यों धर दीनी चदरिया।
जे साधूसंत पंचतत्त्वांची मूर्ती असतात, जे ईश्‍वराच्या खेळण्याचे एक साधन असतात, त्या मूर्तीत ईश्‍वराचा निवास असतो. चराचरात ते हाच भाव पाहतात. सगुण-निर्गुणाच्या पलीकडे त्यांना "विश्‍वाचे आर्त' कळलेले असते. तेच त्यांच्या अंतरातून काव्यरूपाने प्रकट होते. तो दिव्यत्वाचा साक्षात्कार असतो. तो प्रतिभेचा चमत्कार असतो. ते काव्य विलक्षण प्रभावी असते. प्रासादिक आणि शैली सहज असते. याशिवाय विचारांत सडेतोडपणा असतो. कमीत कमी शब्दांत अधिकाधिक व्यापक अर्थ असतो. "गागर में सागर' असेच कबीरांच्या रचनांचे स्वरूप आहे. पदावली आणि दोहावली दोन्ही असेच "दाना दाना दमदार' आहे. दृष्टान्तांनी भरलेले असून एकूणच बोली लोकांची आहे. लोकभाषेचा बाज त्यांच्या अवघ्या विचारांत आहे. चिंतन, मनन आणि कवनांत आहे. भजनांत आहे.
"झीनी झीनी'चा अर्थ लावताना याचा प्रत्य येतो. एक विणकर आपल्या व्यवसायातील शब्दांचा, दैनंदिन कामाचा आध्यात्मिकदृष्ट्या कसा भक्तिभाव व्यक्त करतो पाहा शेला विणला जातो जरीचा. जरीच्या तारा असतात. रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द या पाच विषयांसह सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांनी युक्त आठ पाकळ्यांचे कमळ उभ्या-आडव्या धाग्यांनी देहाचा "शेला' तयार होतो. त्यावर डाग पडू नये, त्यास कलंक लागू नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते. भ्रष्टाचार, अत्याचार, अनाचारादी पापांपासून माणसाने दूर राहावे अन्‌ आयुष्याचे सार्थक व्हावे म्हणून सज्जनांचा संग धरावा. लोकांचे शेले आणि संतांचे शेले यांच्यात किती फरक असतो, हे इथे स्पष्ट दिसून येते. निर्मळ, निरागस मन आणि धुतल्या तांदळासारखे जीवन परमेश्‍वराला आवडते. भक्तीच्या वाटेवर ही शुद्धता लाभते ती शुद्ध आचरणाने.
मंगेश पाडगावकरांनी अतिशय समर्पक अनुवाद केला आहे.
"इडा-पिंगला ताणाभरणी,
सुषुम्न-दोरा विणली चादर.
स्वामी घे दस मास विणाया,
ठोकठोकूनी विणली चादर.'
भल्या भल्या साधुबैराग्यांनाही देहाची ही "चादर' स्वच्छ, सुंदर राखता येत नाही. बाह्य उपचारांनी (अंगाला राख फासून) देह विद्रूप करतात; पण कबीर तसे नाहीत. त्यांनी जसा ईश्‍वराने दिला होता, तसाच परत निष्कलंक शेला परत दिला आहे. या देहाचा स्वामी तो आहे. त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी चित्त शुद्ध असावेच लागते. ते नामजपाने होते. गुरुकृपेने होते. तनामनाचा शेला चुकून कलंकित झाला, तरी जपयज्ञाच्या शक्तिज्वालांनी तो शुद्ध होतो. डाग निघून जातात. भक्तीच्या मुशीत भक्त तावून-सुलाखून निघतो. त्या योगाच्या अग्नीत भक्त उजळून निघतो. सतेज चेहरा, नितळ अंगकांती, प्रसन्न चेहरा आणि बोलण्यात गोडवा ही सारी सात्त्विक लक्षणे चित्तशुद्धीची आहेत. 
----------
संदर्भ : 
१) मूळ लेख -कबीरवाणी-अरविंद दोडे- www.esakal.com dated 27.01.2017- 10.30 am
२) कबीर प्रतिमा - http://isha.sadhguru.org/blog/lifestyle/music/sunta-hai-by-kabir-sounds-of-ishas-latest/

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण