समस्त मराठी जनांना #जागतिक मराठी भाषा दिवसाच्या' हार्दिक शुभेच्छा!

माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन ,स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान.......असे प्रतिपादन करणारे महान कविवर्य #कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस. हाच दिवस आपण #जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो.तेव्हा समस्त मराठी जनांना 'जागतिक मराठी भाषा दिवसाच्या' हार्दिक शुभेच्छा!
कुसुमाग्रज यांची एक नितांत सुंदर आणि आजही समयोचित असलेली अर्थपूर्ण कविता........
                                                                                                                                                                                                                             दर्शनाला आलात? या..

पण या देवालयात, सध्या देव नाही
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.

सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर
त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,
पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.

- कुसुमाग्रज


Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण