एक तितली थी... (प्रवीण टोकेकर)

खरं तर ‘पॅपिआँ’ ही कादंबरी म्हणूनच लिहिण्यात आली होती; पण आत्मचरित्र म्हणून जास्त खपेल, असं प्रकाशकाचं मत पडल्यानं तिचा पोत बदलला. साहजिकच, चित्रपट बघतानाही हे सगळं एका माणसाच्या आयुष्यात घडलं असेल, यावर विश्‍वास बसणं तसं कठीण होतं.

त्याच्या छातीवर एक फुलपाखरू गोंदवलेलं होतं: पॅपिआँ (#Papillon) .
म्हणून त्याला पॅपी म्हणायचे. पेशा विचाराल तर अट्टल तिजोरीफोड्या; पण एका वेश्‍येच्या माडीवर त्यानं म्हणे एका दलालाचा गळा चिरला. धरपकड झाली. मग जन्मठेपेची शिक्षा. आता फ्रान्स विसरायचं. दूर दक्षिण अमेरिकेत फ्रेंच गयाना आहे, तिथल्या तुरुंगात कैद भोगायची. कैद भोगून झाल्यावर तिथंच, त्या बेटांवर कामधाम शोधून उरलेलं आयुष्य काढायचं. इथं फ्रान्सच्या किनाऱ्यावर परत पाऊल ठेवायचं नाही.
खुनाचा ‘खोटा’ आरोप शिरावर घेऊन पॅपी बोटीवर चढला. ही घटना २४ ऑक्‍टोबर १९३१ ची. पुढच्या चौदा वर्षांत पॅपीनं अर्धा डझन वेळा तुरुंगातून पळ काढला. दरवेळी पकडला गेला. ३० एप्रिल १९४५ रोजी त्यानं डेव्हिल्स आयलंड या बेटावरून समुद्रात पुन्हा एकवार उडी मारली. ती मात्र त्याला संपूर्ण स्वातंत्र्य देणारी ठरली. हाच पॅपी पुढं ख्यातनाम लेखक वगैरे झाला. मूळ नाव आँव्री शॅरिए (#Henri Charriere). आपल्या मुक्तिझेपेनंतर तो व्हेनेझुएलामधला एक प्रतिष्ठित हॉटेलमालक होतो. त्यानंच ही पॅपिआँची चित्तरकथा १९६९ मध्ये सगळ्या जगाला सांगितली. हे त्याचं लोकविलक्षण आत्मचरित्र भन्नाट गाजलं. त्याचं ते थरारक गुन्हेगारी आयुष्य...तुरुंगातला भयानक एकांतवास...तिथले जबरदस्त दोस्ताने...पलायनाची कारस्थानं...एक छोटासा चाकू काय काय इल्लम दाखवू शकतो, त्याचे अफलातून दाखले... अफाट समुद्राला पालाण घालणारी त्याची ती ऊर्मी...नाजूक फुलपाखरू गोंदलेल्या त्या छाताडातली दिलेरी... सत्तरीचं दशक या ताज्या दमाच्या लेखकानं गाजवलं. आजही त्याची कहाणी उत्तम खपते. मराठीमध्ये त्याचा मस्त अनुवाद रवींद्र गुर्जर यांनी केला आहे. ‘पॅपिलॉन ः हेन्‍री शॅरियर’ या मराठी उच्चारांसह! अर्थात फ्रेंच उच्चार मराठीत आणणं काहीच्या काहीच अवघड असतं. उदाहरणार्थ, हेन्‍री म्हणायचं की एन्‍री? ऑन्‍री म्हणायचं की आँव्री? चेरियर म्हणायचं की शॅरियर? की शॅव्रिये? शॅरिए? नावात काय आहे म्हणा! त्यामुळं आस्वादात काही फरक पडत नाही. म्हणूनच ‘पॅपिआँ’चं हे आत्मचरित्र आधी वाचायचं. मग त्याच्यावर बेतलेला चित्रपट बघायचा. हा चित्रपट बनूनही आता उणीपुरी ४४ वर्षं झाली आहेत; पण त्याची जादू किंचितही कमी झालेली नाही.

* * *
शेकडो गुन्हेगारांचा जो जथा बोटीवर चढवून फ्रेंच गयानाला नेण्यात आला, त्या बोटीवर पॅपिआँ होता आणि बॅंका आणि तत्सम अफरातफरींचा बादशहा असलेला लुई डेगाही होता. किरकोळ बांध्याचा, जाड भिंगांचा चष्मा लावणारा डेगा अर्थात मजबूत पैसा राखून होता. माल है तो ताल है. साहजिकच त्याला तुरुंगाच्या कर्मचाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळत असे. त्याचे काँटॅक्‍ट्‌सही चांगले होते. त्यामुळंच इतर गुन्हेगारांची त्याच्यावर करडी नजर होती. पॅपिआँनं त्याला बोटीवरच गाठून प्रस्ताव ठेवला : ‘डेगा, तुझ्याकडं पैसा आहे. तू फ्रेंच गयानाला पोचण्याआधीच खतम होण्याची शक्‍यता आहे. मी तुझं संरक्षण करतो; पण एका अटीवर...त्या तुरुंगात गेल्यावर मला बोट मिळवून देण्याची व्यवस्था तू करायचीस. डन?’ डेगानं मान डोलावली.
त्या काळी गुन्हेगार तुरुंगात पैसे वेगळ्या मार्गानं नेत किंवा सांभाळत. एक निमुळती, चपटी डबी. त्यात नोटांच्या गुंडाळ्या. त्या डबीला ‘चार्जर’ किंवा ‘प्लान’ म्हणत. ती गुदद्वारात खोल सर्कवून द्यायची. बात खतम. डेगाकडं हे अमोघ अस्त्र होतं.
‘‘ बंदीजनांनो, फ्रान्सनं तुम्हाला त्यागलेलं आहे. तुम्ही त्याला नको आहात. आता इथंच राहायचं. पळून जायचा प्रयत्न केला तर दोन वर्ष एकांतकोठडीत राहावं लागेल. दुसऱ्यांदा प्रयत्न केलात तर पाच वर्ष एकांतात. आणि तिसऱ्यांदा केलात तर...हे बघा!’’ तुरुंगाधिकाऱ्यानं यांत्रिक आवाजात सांगितलं. गिलोटिनचं पातं सरसरत खाली आलं. खाली ठेवलेल्या केळीच्या सोपाचे दोन तुकडे झाले.
‘‘कळलं? आता कपडे घाला!’’ ही शेवटची आज्ञा होती. सगळे आपापल्या बराकीत गेले. डेगानं शब्द पाळला. बोट मिळण्याची व्यवस्था झाली; पण कुणीतरी पचकलं. बोटीतून पसार होण्यापूर्वीच पॅपिआँ पकडला गेला.
एक. दोन. तीन. चार. पाच...पाच. चार. तीन. दोन. एक.
...एकांतकोठडीतलं जीवन हे एवढंच पाच पावलांचं होतं. डेगानं काही ‘चाव्या’ फिरवून पॅपीला खोबऱ्याची मलई मिळेल, अशी व्यवस्था केली; पण तीही उघडकीस आल्यानं पॅपीची अंधारकोठडीत रवानगी झाली. सूर्यप्रकाश संपला. एकवेळचं जेवण बंद झालं. सांदी-फटीतली झुरळं आणि किडे-मकोडे खाऊन पॅपीनं आपला फाटत चाललेला देह कसाबसा तगवला; पण त्यानं डेगाचं नाव सांगितलं नाही.
अंधारकोठडीची शिक्षा संपल्यावर त्याला तुरुंगाच्या इस्पितळात भरती व्हावं लागलं. तिथंच त्यानं पलायनाचा दुसरा बेत आखला...इथंही डेगाचीच मदत झाली. तुरुंगाधिकाऱ्याच्या वरिष्ठांशी संधान बांधल्यानं डेगाला अकाउंटन्सीचं हलकं काम मिळालं होतं.
‘‘डेगा, तूसुद्धा चल माझ्यासोबत’’ पॅपी म्हणाला.
‘‘माझी बायको मला केव्हाही सोडवेल ’’ डेगा.
‘‘ तिच्या दृष्टीनं तू इथंच राहिलेला बरा आहेस, हे कळतंय का तुला? तू कमावलेला सगळा पैसा तुझा आहे, तिचा नाही!’’ पॅपी म्हणाला. अखेरच्या क्षणी डेगा तयार झाला.
तुरुंगाचा डॉक्‍टर कुणी हिंदू होता. त्यानं दया येऊन त्याला फक्‍त सहा हजार फ्रॅंकची लाच घेऊन बोटीचा बंदोबस्त करून दिला. इस्पितळातला वॉर्डबॉय मॅच्युरेत हासुद्धा आला. पळताना डेगाचा पाय मोडला; पण तिघंही तुरुंग फोडून निघाले.
...इथंही नशिबानं दगा दिला. लाच देऊन मिळवलेली बोट मोडकीच होती. एका शिकाऱ्याच्या मदतीनं ते तराफ्यावरून ‘पीजन आयलंड’कडे निघाले. तिथं कुष्ठरोग्यांची वस्ती होती.
त्या वस्तीत कुणीही जात नाही. गेलेला परत येत नाही. कुष्ठरोग्यांच्या म्होरक्‍यानं पॅपीला त्याच्या गळक्‍या ओठातली सिगार ओढायला लावली. पॅपीनं थंडपणे झुरका मारल्यावर तो म्हणाला : ‘‘माझा कुष्ठरोग संसर्गजन्य नाही. बोल, तुला कुठं जायचंय?’’
एका होडीतून पॅपी, जायबंदी डेगा आणि मॅच्युरेत होंडुरासच्या दिशेनं निघाले. खायला अन्न नव्हतं. समुद्रातली कासवं पकडून खावी लागली. प्यायला पाणी नव्हतं. मग... जाऊ दे.
एका वाळूच्या किनाऱ्यावर ते उतरले खरे; पण स्पॅनिश सैनिकांनी त्यांना हटकलं. डेगाचं मुटकुळं वाळूतच टाकून पॅपी आणि मॅच्युरेत पळाले. त्या पाठलागात विषारी बाण लागलेला पॅपी पाण्यात कोसळला. त्याला जाग आली ती एका वेगळ्याच जगात.
* * *
पांढऱ्याशुभ्र रेतीपल्याड निळाशार समुद्र. नारळाच्या झाडांनी वेढलेलं गाव. नारळाच्याच झावळ्यांनी शाकारलेल्या स्वच्छ, टुमदार झोपड्या. समुद्राच्या पोटातले शिंपले वेचायचे. त्या शिंपल्याच्या पोटातले मोती मिळवायचे. हेच काम करणाऱ्या एका आदिवासी जमातीच्या गावात कसा कुणास ठाऊक पॅपी पोचला आहे. तिथं त्याला बायकोही मिळाली. सुंदर. अर्धवस्त्रा. निरागस. ...पण एके दिवशी ती जमात वस्ती उठवून निघून गेली. पॅपीसाठी काही मोती तेवढे शिल्लक होते.
पुढं शहरगावात एका चर्चमध्ये शरण गेलेला पॅपी पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मदर सुपिरिअरनं त्याला अडकवलं होतं.
पुन्हा फ्रेंच गयाना. या वेळी पाच वर्षांची अंधार कोठडी. पुन्हा एकदा. एक. दोन. तीन. चार. पाच....पाच. चार. तीन. दोन. एक.
प्रदीर्घ काळानंतर पॅपीनं पुन्हा सूर्यप्रकाश पाहिला. मॅच्युरेत मरणासन्न होता. डेगाचा पत्ताच नव्हता. अखेर बरीच वर्षं सजा भोगल्यानंतर पॅपीची रवानगी डेव्हिल्स आयलंडवरतीच; पण मोकळ्या तुरुंगात झाली. म्हणजे बेटावरच कुठंही झोपडं बांधून राहायचं. जमेल तसं पोट जाळायचं. चहूबाजूंनी उंच कडे असलेल्या या बेटावरून पळून जायला जागाच नाही. मरा इथंच.
* * *
पॅपीही आता शरीरानं बराच थकला होता; पण मन थकलं नव्हतं. एक दिवस त्याला चक्‍क डेगा दिसला. तोही झोपडी बांधून जगत होता. टोमॅटोचे वाफे लावत होता. डुकरं पाळत होता.
खूप वर्षांनी दोघं दोस्त भेटले. गप्पा मारल्या. बऱ्याच वेळानं पॅपी त्याला म्हणाला.
‘‘मला अजूनही पळून जायचंय!’’
‘‘मरशील!’’
‘‘काय फरक पडतो? पण मी प्रयत्न करणार....पुन्हा करणार!’’ पॅपी म्हणाला.
या बेटावर एका ठिकाणी घोड्याच्या नालीसारखा एक कडा आहे. खोल समुद्रात संपणारा. त्याच्या पायाशी समुद्राच्या अजस्र लाटा आदळतात. दर सातव्या लाटेवर स्वार होता आलं, तर खुल्या समुद्रात सहज जाता येईल. डेगा आला नाही.
पॅपिआँनं उंच कड्यावरून नारळाचं पोतं फेकलं. सातव्या लाटेवर स्वत: उडी घेतली.
- फुलपाखरू उडालं कायमचं.

* * *
स्टीव्ह मॅक्विन आणि डस्टिन हॉफमन या दोघांनी या चित्रपटातल्या प्रमुख भूमिका केल्या आहेत. मॅक्विनचा हा लाइफटाइम रोल ठरला. हॉफमननं साकारलेला डेगा कधीही विसरता येणार नाही असा. फ्रॅंकलिन जे. शाफनर या प्रतिभावान दिग्दर्शकानं पॅपिआँ कादंबरीतले अनेक तपशील टाळले आहेत; पण जे काही पेश केलं आहे, ते अभिजात असं आहे. जेरी गोल्डस्मिथनं दिलेलं संगीत तर केवळ लाजबाब आहे. इतकं की ‘पॅपिआँ’मधल्या थीम्स आणि सिंफनीज्‌ अजून अनेक अभिजात वाद्यवृंद आळवत असतात. याच ‘पॅपिआँ’चा रिमेक यंदाच येतोय म्हणे. म्हणजे सुरवंट तोच. फुलपाखरू नवं.
आता थोडंसं या कादंबरीबद्दल. ‘आँव्री शॅरिए याच्या कादंबरीत जेमतेम दहा टक्‍के तथ्य असेल, बाकी सगळी थापेबाजी आहे,’ अशी टीका या कादंबरीवर पहिल्यापासून होतेच. खरं तर पॅपिआँ ही कादंबरी म्हणूनच लिहिण्यात आली होती; पण आत्मचरित्र म्हणून जास्त खपेल, असं प्रकाशकाचं मत पडल्यानं तिचा पोत बदलला. साहजिकच चित्रपट बघतानाही हे सगळं एका माणसाच्या आयुष्यात घडलं असेल, यावर विश्‍वास बसणं कठीण होतं. सगळ्यात वरकडी म्हणजे सन १९३९ मध्ये रेने बेल्बनॉय नावाच्या एका कैद्याचं ‘ड्राय गिलोटिन’ नावाचं छोटेखानी आत्मवृत्त फ्रेंच भाषेत प्रसिद्ध झालं होतं. त्यात आणि ‘पॅपिआँ’च्या कहाणीत आश्‍चर्यकारक साम्य टीकाकारांना आढळून आलं! शेवटी तर गेरार्द दे विले नावाच्या एका फ्रेंच पत्रकारानं ‘फुलपाखरू : टाचणीनं टोचलेलं’ अशा अर्थाची एक समीक्षा लिहून पॅपिआँच्या चोऱ्यांचा ताळेबंदच मांडला. थोडक्‍यात काय, तर खऱ्या ‘पॅपिआँ’नं खून नसेलही केला; पण तो पेशानं चोर होता, हे सिद्धच झालं. गडी नावाला जागला म्हणायचं!
                                                           -प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
-----------------
संदर्भ : 
१)मूळ लेख :एक तितलीथी... (प्रवीण टोकेकर)- http://beta1.esakal.com/saptarang/pravin-tokekars-article-saptarang-38011
२) पॅपिआँ-मूळ कादंबरी मुखपृष्ठ : https://en.wikipedia.org/wiki/File:PapillonBook.jpg
३) पॅपिआँ सिनेमा पोस्टर :http://murderpedia.org/male.C/c/charriere-henri-photos.htm 
४)पॅपिआँ सुटकेचे मार्ग नकाशा :  http://www.infobarrel.com/Media/Route_of_Escape_by_Papillon_Source_Papillon_by_Henri_Charrire-copyrighted

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण