जातीच्या अस्मितेमुळे सामाजिक समरसता धोक्यात!

आपल्या जातीची प्रखर अस्मिता बाळगणारे, आपल्या जातीतील भ्रष्ट पुढार्‍यांच्याही समर्थनार्थ रस्त्यावर उतरणारे महाभाग मात्र गुणवान, चारित्र्यवान व्यक्ती केवळ आपल्या जातीची नाही म्हणून त्याची जराही कदर करण्यास तयार नसतात. आपल्या भारतीय समाजाच्या या दोगलेपणाचं मला केव्हा केव्हा मोठं आश्‍चर्य आणि वैषम्य वाटतं. जातीच्या नावावर आवाहन केलं की, भारतातील प्रत्येक जातीचा समाज संघटित व आक्रमक होताना दिसतो; पण अशा संघटित व आक्रमक लोकांच्या वैयक्तिक जीवनाकडे पाहिलं तर काय दिसतं? भावाभावांत, वडील-मुलात, काका-पुतण्यात वडिलोपार्जित घर, शेती, पैसा, सोने यांच्या वाटणीबाबत टोकाचे वादच नव्हे, तर कट्‌टर शत्रुत्व आहे. कोर्टकचेर्‍यांच्या वार्‍या आहेत, रोेजची भांडणं आहेत, मारामार्‍या, खुनाखुनी आहे. आपल्या वाटणीची घराची दहा फूट जागा, तोळाभर सोनं किंवा शेतीतील एक गुंठा जागा कुणी एकमेकांसाठी सोडायला तयार नाही. भावांनी भावाशी कसं वागायला पाहिजे यासाठी आम्ही रामायणाचा नव्हे, तर महाभारताचा आदर्श सहीसही आपल्या आचरणात उतरविला आहे! सर्वनाश झाला तरी चालेल, पण सुईच्या अग्रावर मावेल एवढाही वडिलोपार्जित जमिनीचा तुकडा भावाला देण्याची आमची तयारी नसते. वडील असो, भाऊ असो की अन्य नातेवाईक, यांच्यासोबतच घराचा असो, प्लॉटचा असो की शेतीचा, शेजारी असो, जातभाई असला तरी त्यांच्याशीही भांडणे, वादविवाद गावोगावी भरपूर प्रमाणात आहेत. चार-चार आणि तीही चांगली कमावती मुलं असूनही आईबापांना वार्‍यावर सोडणारी अनेक कुटुंबं आहेत. एकाच जातीतील धनदांडग्यांनी आपल्याच जातभाईचे वेगवेगळ्या प्रकारे शोषण केल्याची उदाहरणे पावलोपावली आहेत. वैयक्तिक जीवनात असे अत्यंत स्वार्थी असणारे, आपले भाऊबंद व जातभाईसाठी थोडाही त्याग करण्यास तयार नसणारे, पण आपल्या जातीच्या नावावर संघटित व आक्रमक होणारे महाभाग आपल्या जातीचं तरी कोणतं भलं करणार आहेत? आपल्या वैयक्तिक स्वार्थाचा त्याग जातीच्या भल्यासाठी करण्याची वेळ आली, तर कुणी प्रथम जातीच्या हिताला प्राधान्य देईल, असे मला वाटत नाही.
या आरक्षणाच्या सवलतीने काही लोकांचं भलं झालंही असेल, पण सध्या या सवलतीवरून समाजामध्ये जी कटुता वाढत आहे ती चिंताजनक आहे. शालेय जीवनापासून निष्पाप मुलांच्या मनात जातीचं विष भिनवलं जात आहे. पुढे हीच मुलं कट्‌टर जातीयवादी झाल्यास काय नवल? पूर्वी गावागावांत सर्व जातींमध्ये एकजुटीचे वातावरण होते. जातपात न पाहता सर्व जण एकमेकांना मदत करीत असत, सुखदु:खात सामील होत असत. आता जातीच्या अस्मिता ज्वलंत झाल्यामुळे, राजकारण्यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी जातिभेदाचं भूत जागविल्यामुळे गावागावांतील वातावरण गढूळ झालं आहे. प्रथम मानसिकदृष्ट्या व नंतर शारीरिकदृष्ट्याही एकमेकांत दुरावा येत आहे. कित्येकदा एका जातीच्या सार्वजनिक कार्यक्रमात दुसर्‍या जातीच्या लोकांना आमंत्रित केले जात नाही. कुठे जातिवाचक शिवीगाळ केली म्हणून, कुठे जातिवाचक शिवीचा खोटा आरोप लावल्यामुळे, कुठे कुणी अन्य जातीतील महापुरुष, स्त्रिया यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे, तर कुठे जाणीवपूर्वक अथवा दारूच्या नशेत महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे तणाव, दंगली, पोलिस केसेस, गावबंदीचे आवाहन… असे प्रसंग वारंवार उद्भवू लागले आहेत.
खरे तर सर्वच जाती-जमातींमध्ये अनेक संत-सत्पुरुष, महापुरुष होऊन गेलेत. या सर्वांची किती म्हणून नावे सांगावीत? या सार्‍यांचेच कार्य त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याच्या पात्रतेचे आहे. या सार्‍यांचीच शिकवण प्रेमाची, सौहार्दतेची, परस्परांबद्दल प्रेमभाव निर्माण करणारी, माणुसकीची, समानतेची आहे; पण जातीच्या अतिरेकी अभिनिवेशापायी आम्ही या सर्व संत-सत्पुरुषांची, महापुरुषांची जातवार विभागणी करण्याचे महापाप करून त्यांना संकुचित करून टाकले आहे. एका जातीतल्या संत-सत्पुरुषाची, महापुरुषाची पुण्यतिथी असो, जयंती असो, त्याच जातीतील लोकं ती साजरी करणार! एकतर अशा प्रसंगी आयोजकांकडून अन्य जातीतील लोकांना निमंत्रित केले जात नाही; अनेकदा निमंत्रण देऊनही अन्य जातीतील लोकांकडून ते टाळलं जातं. जातपात, धर्म, भाषा, प्रांत, वेष यावर तर माणसांची विभागणी आम्ही केलीच, पण सर्वांसाठी निसर्गाने निर्माण केलेल्या रंगांचीही वाटणी करून घेण्यास कमी केले नाही! भगवा, हिरवा, निळा, पिवळा असे अनेक रंग प्रत्येक जातिधर्माने वाटून घेतले आहेत.
जेव्हा ‘गुणवंता’पेक्षा ‘जातिवंता’ला डोक्यावर घेतले जाते तेव्हा खुशाल समजावे की, देशाची वाटचाल अध:पतनाकडे सुरू झाली आहे! आज कुणी कोणत्याही जातीचा असो, त्याच्याकडून उठताबसता, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले जाते. नेत्यांचे तर ही दोन नावे घेतल्याशिवाय पानही हलत नाही! पण, त्याच वेळेस हे सोयिस्करपणे विसरले जाते की, छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करूनच स्वराज्याची निर्मिती केली. प्रामाणिक, समर्पित व स्वदेश, स्वधर्माशी एकनिष्ठ मावळा- मग तो कोणत्याही जातिधर्माचा असो- महाराजांनी त्यांना जवळ केलं; तर अप्रामाणिक, स्वार्थी व गद्दार- मग तो कोणत्याही जातिधर्माचा असो- त्यांना शासन केलं. केवळ आपल्याच जातीचं भलं करणं आणि आपल्याच जातीतल्या लोकांना, लायकी नसली तरी पदप्रतिष्ठा देण्याचा विचार महाराजांच्या मनाला कधीच शिवला नाही. डॉ. बाबासाहेबांनी धर्मांतर करताना असो, की देशाची घटना बनविताना असो, राष्ट्रवादाला व राष्ट्रीय एकात्मतेला सामर्थ्य मिळेल, या देशाच्या प्राचीन संस्कृती व सभ्यता यांना तडे जाणार नाहीत, सर्वांना समान न्याय मिळेल, सामाजिक समरसता वाढेल, याचेच कायम भान ठेवले; पण या दोघांचे नाव घेताना या वस्तुस्थितीचे भान जातीय नेत्यांकडून ठेवले जात नाही. उलट, वैयक्तिक स्वार्थ व मोठेपणा प्राप्त करण्यासाठी जातीय नेत्यांकडून, या दोन महान राष्ट्रपुरुषांनी आसेतूहिमालयापर्यंत निर्माण केलेल्या सामाजिक समरसतेचा, राष्ट्रीय ऐक्याचा निर्घृणपणे मुडदा पाडला जातो.
समाजातील वंचित व्यक्तीला, घटकाला आरक्षण जरूर मिळावं, हे वंचित समाज सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वरच्या पातळीवर यावेत, यातच देशाचं व पर्यायानं आपल्या समाजाचं भलं आहे. पण, यासाठी समाजातील सर्वच जातीतील, सर्व दृष्टीने संपन्न असलेल्या लोकांनी थोडी त्यागाची तयारी ठेवावी. समंजसपणाची भूमिका घ्यावी. समाजातील सर्वच जातीतील विचारवंतांनी, सर्वच राजकीय पक्षाच्या पुढार्‍यांनी पक्षभेद, वैचारिक भेद, स्वार्थ बाजूला सारत एकत्र येऊन, सर्वच जातीतील वंचितांना आरक्षणाचा लाभ कसा मिळेल, आरक्षणाच्या समस्येमुळे सामाजिक समरसतेला तडे जाणार नाहीत, यासाठी विचारमंथन करावं आणि या विचारमंथनातून सामाजिक व राष्ट्रीय ऐक्याचं अमृत बाहेर पडावं.
शंकर गो. पांडे 
---------------------------------------------
संदर्भ : मूळ लेख -जातीच्या अस्मितेमुळे सामाजिक समरसता धोक्यात! http://tarunbharat.net/archives/13563

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण