अन्नपूर्णाची खाद्य चॅनेल्स-शुभा प्रभू-साटम

आधुनिक माध्यमातल्या, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या या अन्नपूर्णा. सगळ्या जणींना खरं तर स्वयंपाकाची, खाऊ घालण्याची आवड, यातून बिनभांडवली व्यवसाय सुरू झाला, खाद्य चॅनेल्सचा. ‘यू-टय़ूब’वर एक असतं, एकदा का लाइक्स् मिळायला लागले आणि सबस्क्रायबर वाढायला लागले की ‘स्काय इज द लिमिट’. कुठला पदार्थ कोणाला, कुठे, कसा आणि का आवडेल हे सांगताही येत नाही. रूपाच्या सोलकढीला कॉकटेल्स म्हणून अनेक जण सव्‍‌र्ह करतात. मधुराच्या वांग्याच्या भाजीवर मध्यपूर्वेवरून पंसती मिळाली आहे. अर्चनाच्या पाककृती करून त्याचे फोटो आवर्जून तिला पाठवणारे अनेक जण आहेत. कल्पनालाही पाठारे प्रभू समाजातूनच पोचपावती मिळालीय. शुभांगी कीरने दाखवलेली अंडय़ाची भुर्जी असंख्य एकटय़ा राहणाऱ्या पुरुषांच्या मदतीला धावून आलेली आहे.. खाद्यचॅनेल्स आणि आधुनिक माध्यमातल्या या अन्नपूर्णाविषयी..
१) अर्चना अर्ते २) कल्पना तळपदे ३) स्मिता मयेकर ४) रुपा नाबर ५) मधुरा बाचल  ६) शुभांगी कीर


स्वयंपाकाची संथा.. फार आधी ती घरातून मिळायची. आजी, आई, काकूकडून नंतर सासूकडून. बाईला स्वयंपाक आलाच पाहिजे ही विचारसरणी त्याचा मुख्य आधार. त्यासाठी आधी करायला लागते उमेदवारी. लसूण सोल, दाणे सोल, शेंगा निवड या शिशू वर्गातल्या यत्ता पार करत हळूहळू मग पुरणावरणाचा स्वयंपाक, मोदक, चिरोटे, बिर्याणी अशा पदव्युत्तर शिक्षणापर्यंत दरमजल व्हायची.. आता स्वरूप पालटलेय. ना आईला वेळ मिळतो, ना लेकीला. प्राधान्य बदललेय. त्यात गर अजिबात नाही. पण गंमत म्हणजे भूक मात्र तीच लागते.. तश्शीच.. आणि त्यासाठी मग आली स्वयंपाक पुस्तके.
लक्ष्मीबाई धुरंधरापासून कमलाबाई ओगले, मंगला बर्वे, उषा पुरोहित या आणि अशा अनेक अन्नपूर्णानी असंख्य जठराग्नी शांत केलेत. अनेकांना स्वयंपाकाचा श्री गणेशा दिला. पाकशास्त्राच्या पुस्तकांचा खप हा दर वर्षी वाढतोच वाढतो. पण कधी कधी होते काय त्यालाही मर्यादा असतात. म्हणजे समजा केक करायचाय आणि त्यासाठी ‘फोल्ड’ पद्धतीने पीठ भिजवायचेय तर कसे भिजवायचे? ‘ड्रॉप सूप’ करायचेय तर अंडे हळूहळू कसे सोडायचे? कानवले करायचेत तर साटा पसरवून लाटय़ा कशा करायच्या? बिर्याणीचा थर किती लावायचा? यासाठी जर प्रात्यक्षिक मिळाले तर समजणे किती सोपे जाते. पण त्यासाठी क्लास हवा. तो जमतोच असे नाही. अशा वेळी मदतीला धावतात त्या ‘इलेक्ट्रॉनिक अन्नपूर्णा’. ‘यू-टय़ूब’वरच्या कांदा कापण्यापासून ते साठवणीचा मसाला करण्यापर्यंत काहीही सादर करणाऱ्या आधुनिक माध्यमातल्या शेफज्..
‘यू-टय़ूब’वर खूपच फूड चॅनेल्स आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे अनेक मराठी स्त्रियांची ‘चॅनेल्स’ प्रचंड लोकप्रिय आहेत. फक्त भारतीय प्रेक्षकांतच नव्हे तर सातासमुद्रापलीकडेसुद्धा. मुख्य म्हणजे ही चॅनेल्स शुद्ध मराठीत आहेत. त्यामुळे जी कम्फर्ट लेव्हल, जो आपलेपणा निर्माण होतो तो महत्त्वाचा ठरतो. वाचून अवघड वाटणारा पदार्थ समोर तयार होताना बघून एक आत्मविश्वास येतो, की हे आपल्यालाही सहज जमू शकते.
या सगळ्या जणींची एक आपली अशी शैली आहे. संवादाची शैली, कृतीची, सांगण्याची हातोटी.. ते करताना दिल्या जाणाऱ्या टिप्स. प्रेक्षकांना एकदम घरगुती वाटतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे शुभांगी कीर, मूळच्या रत्नागिरीच्या शुभांगी कीर यांच्या खाद्यचॅनेल्सची सुरुवात मुलीच्या आग्रहावरून झाली. एकदा शुभांगीताई खूप आजारी पडल्या आणि त्यांनी मुलीला स्वयंपाकासाठी सूचना सुरू केल्या. त्या सांगायच्या तशी तयारी त्यांची लेक प्रियांका करायची आणि मग त्यांच्या सूचनेबरहुकूम एकेक स्टेप (पायरी) सिद्ध व्हायची. आईच्या सूचना कायम लक्षात राहाव्या, पदार्थाची तयारी करणे ते पदार्थ तयार करणे लक्षात राहावे म्हणून तिने त्याचे व्हिडीयो तयार केले आणि ते ‘यू-टय़ूब’वर टाकले. काही काळानंतर सहज म्हणून पाहिले तर चक्क अमेरिकेतून पोचपावती आली होती, पदार्थ आवडल्याची आणि यातून निर्माण झाले ‘शुभांगी कीर शिरवडकर फूड चॅनेल’.
सुरुवातीला ५० ते ६० सबस्क्रायबर होते. तो आकडा आता दोन वर्षांत जवळपास ५० हजारांच्या वर गेलाय. कोकणी चिकन, सुकट चटणी, अंडाकरी पासून ते पार ब्रेड पिझ्झा आणि हाका नूडल्सपर्यंत शुभांगीताईंनी पदार्थ पोस्ट केलेत आणि ते अफलातून लोकप्रिय झालेत. कुठलाही भपका नाही, सेट नाही. कॅमेरामन नाही, की स्क्रिप्ट नाही. शुभांगीताईंचे छोटे किचन आणि मोबाइलवर होणारे चित्रीकरण प्रेक्षकांना प्रचंड भावते. मग ते दही कसे विरजावे याचे मार्गदर्शन असो वा मसाला कसा टिकवावा हे असो. आपली आई, मामी कशी सांगेल तशा अगदी साध्या शैलीत कृती सांगणे आणि ते सांगताना टिप्स देणे यामुळे त्यांचा चाहता वर्ग वाढतोच आहे इतका की या वर्षी ‘यू-टय़ूब’तर्फे त्यांना पंचतारांकित हॉटेलात मस्त ट्रीट मिळाली.
याच ‘यू-टय़ूब’वर आणखी एक ताई आघाडीवर आहेत त्या म्हणजे अर्चना अर्ते. वयाने लहान असूनही त्यांना अनेक सुना-लेकी मिळाल्या आहेत. या ‘यू-टय़ूब’वरच्या सासूकडून पुरणपोळी शिकून खऱ्या सासूला अनेक सुनांनी चकित केले आहे. गेले पंचवीस वष्रे अर्चना या क्षेत्रात आहे. कुकिंग क्लासेस ज्यांच्याकडे केले त्या बाईंची सहाय्यक म्हणून ती दूरचित्रवाहिनीवर गेली. नंतर त्याच कार्यक्रमात अनेक नामवंत शेफबरोबर साहाय्यक म्हणून काम केले आणि इंडिया फूड नेटवर्कवर ‘अर्चनाज् किचन’ म्हणून चॅनेल सुरू झाले. नंतर ‘रुचकर मेजवानी’ म्हणून दुसरे आणि आता ‘संजीव कपूर खजाना’मध्येसुद्धा ती येत आहे. आपल्या घरात जे साहित्य उपलब्ध असते. त्यातून कसा पदार्थ करायचा हे अर्चना अगदी सहज शिकवते. तिने दाखवलेली बालूशाही असो वा भाकरीझ्झा. बघणाऱ्याला सहज समजतो. मोदक, करंज्या, शंकरपाळ्या, पाकातल्या पुऱ्या, लागची टोयपासून तो पास्ता पिझ्झा. हजारोंनी पदार्थ ती शिकवते आणि लाखो जणींना पारंगत करते. अर्चनाच्या पाककृतीमध्ये एक महत्त्वाचे आहे ते म्हणजे तिची सांगायची पद्धत. इतके सोपे करून सांगते की पदार्थ करणे अजिबात अवघड वाटत नाही, ती आधी कुकींग क्लासेस घेत असल्याने शिकवण्याचे तंत्र तिला उत्तम अवगत झालेय. ‘यू टय़ूबवर मुख्य असतो तो वेळ, लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि पाच ते दहा मिनिटात ती पाककृती व्यवस्थित सांगण्यासाठी कसब  लागते. अर्चनाने हे आर्वजून सांगितले. तिचे हे चॅनेल मध्य पूर्वेत लोकप्रिय झालय.
असेच हसत खेळत शिकवणारी आणखी एक रूपा नाबर.. जिच्या पाककृतींचा चाहता आहे दस्तुरखुद्द संजीव कपूर. रूपा प्रथम आंतरराष्ट्रीय पदार्थ, मॉकटेल्स, कॉकटेल्स करायची पण आता तिने पारंपरिक गोवन, सारस्वत, मालवणी, पाककृती सादर करण्याचे ठरवले आहे. रूपा तरुण वर्गात प्रंचड लोकप्रिय झालीय. तिची सोलकढी ही िपककढी म्हणून प्रसिद्ध पावलीय. लहान लहान टिप्स आणि सोपी पद्धत ही रूपाचे वैशिष्टय़े.
असेच पारंपरिक स्वयंपाक शिकवणाऱ्या आहेत, कल्पना तळपदे. नोसीलमधून उच्चपदावरून निवृत्त झाल्यावर युरोपातल्या लेकीसाठी कल्पना यांनी स्वयंपाकाचं शूटिंग करायला सुरुवात केली. आपल्या छोटय़ाशा स्वयंपाकघरात मोठय़ा डब्यावर मोबाइल ठेवून कल्पना पाककृती सिद्ध करतात. रोज जे पदार्थ त्या स्वयंपाकात करतात, तेच पदार्थ त्या दाखवतात.  एकदम मनमोकळी आणि अनौपचारिक शैली आणि अगदी सहज कृती हा कल्पना यांचा यूएसपी. त्यांचे पारंपरिक पाठारे प्रभू, पाककृतींचे पुनरुज्जीवन प्रचंड लोकप्रिय झाले आहे. कल्पना यांचे हे व्हिडियो अगदी अनौपचारिक वाटावेत असे आहेत. इतके वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यामुळे वेगळा आत्मविश्वास त्यांच्याकडे आला आहे. पाठारे प्रभू समाजातील ‘पाव’ हा लुप्त होत चाललेला प्रकार त्यांनी दाखवला आणि त्याला अन्य भाषिक समाजाकडूनही पसंतीची पावती आली. कल्पना स्वत: शूट करतात आणि एडिटिंगही. त्यांच्या मते यू टय़ूबवर असे चॅनेल उघडणे सोपे आहे पण त्यात एक सातत्य हवे. येथे सबक्रायबर मिळतात पटकन पण ते टिकवावे लागतात.
पुण्याच्या मधुरा बाचलने हे पारंपरिक महाराष्ट्रीय पदार्थ लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी चॅनेल सुरू केले. मधुराने भर दिलाय तो महाराष्ट्रीय ब्राह्मणी स्वयंपाकावर. अगदी साधे वरण, बटाटा भाजी, अळूची भाजी, भरली वांगी, दिवाळीचा फराळ असे पदार्थ ती दाखवते. आपल्याच स्वयंपाकघरात स्वत:च शूट करून ती स्वत:च एडिटिंग करते. भारतातच नव्हे तर परदेशातही ती लोकप्रिय झालीय. ‘अंडय़ाचा कलाकंद’ ही तिची रेसिपी लोकप्रिय झालीय. २०१० मध्ये मधुराने सुरुवात केली. सध्या तिचे दोन चॅनेल्स् आहेत. एक मराठी, एक इंग्रजी आणि दोघांचे लाखांवर सबस्क्रायबर आहेत. हल्ली मात्र तिने मदतनीस ठेवलेत. मधुराचे आधीचे इंग्रजी चॅनेल होते ते हौसेखातर सुरू केले होते. त्याला भरभरून पोचपावत्या आल्या आणि आज तिचे मराठी चॅनेलसुद्धा आहे. मांसाहारी, शाकाहारी असे दोन्ही प्रकार ती दाखवते. लोकांना परंपरांगत पाककृती हव्या असतात पण त्या झटपट त्यामुळे शूट करताना तुम्हाला वेळेचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे असते.  मधुराच्या मते कोणाला कुठलीही पाककृती आवडू शकते. आपले महाराष्ट्रीय साधे वरण अमराठी प्रेक्षकांना प्रचंड भावले असे तिने सांगितले. आपल्या छोटय़ाशा स्वंयपाकघरात सुरू केलेले मधुराचे चॅनेल आता सुसज्ज स्टुडियोत शूट होते.
याच अन्नपूर्णाच्या पंगतीमधली आणखी एक नाव म्हणजे स्मिता मयेकर. ती महाराष्ट्राबाहेर राहते पण पाककृती मात्र अस्सल महाराष्ट्रीय. मनापासूनची स्वयंपाकाची आवड आणि नवऱ्याचा पाठिंबा यामुळे तिने चॅनेल सुरू केले. तिच्या रेसिपीमधील लोकप्रिय म्हणजे मांसाहारी पदार्थाच्या कृती. अस्सल देशी, पारंपरिक पाककृती रोजच्या स्वंयपाकात कसे साधे रुचकर बदल करता येतात हे ती ‘काली मिर्च’ या चॅनेलद्वारे जगभरातल्या खवय्यांना शिकवत असते.
स्मिताला खरं म्हणजे आधी अजिबात स्वंयपाक येत नव्हता. पण खाण्याच्या आवडीमुळे तिने गुगल, यूटय़ूब सर्च करायला सुरुवात केली आणि स्वत:चे चॅनेल सुरू करण्याची आयडिया क्लिक झाली. स्मिताच्या मते पारंपरिक पाककृती लोकांसमोर आणणे आवश्यक आहे. हे कोणाला आवडणार , ़असं म्हणणं योग्य नाही. स्मिताची बांगडा करी अनेकांनी करून बघितली आहे आणि फोटो ही पाठवले आहे.
अशा या आधुनिक माध्यमातल्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या या अन्नपूर्णा. या सगळ्या जणींनी खरं तर स्वयंपाकाची हौस, खाऊ घालण्याची आवड, यातून हा बिनभांडवली व्यवसाय सुरू केला. ‘यू-टय़ूब’वर एक असतं, एकदा का लाइक्स मिळायला लागले आणि सबस्क्रायबर वाढायला लागले की स्काय इज द लिमिट. कुठला पदार्थ कोणाला, कुठे, कसा आणि का आवडेल हे सांगताही येत नाही. रूपाने सांगितलं की, तिच्या सोलकढीला कॉकटेल्स म्हणून अनेक जण सव्‍‌र्ह करतात. मधुराच्या वांग्याच्या भाजीला मध्यपूर्वेवरून पंसती मिळाली आहे. आणि शुभांगी कीरचे कोकणी चिकन अमेरिकेत लोकप्रिय आहे. रूपा म्हणाली, ‘‘यू-टय़ूबवर थोडय़ा वेळात मोजक्या शब्दांत तुम्हाला पदार्थ करून दाखवणे अपेक्षित असते. त्यामुळे प्रेझेन्स ऑफ टाइम अ‍ॅन्ड स्किल इज मस्ट! सध्या जग हे एका क्लिकवरनं आपल्या मुठीत आलेलं आहे आणि रोज त्याचा व्याप आणि आवाका वाढतच आहे.
‘‘नव्या तंत्रज्ञानाशी आपल्या कौशल्याची सांगड घालून आपला चाहता वर्ग निर्माण करणाऱ्या आणि त्यातून चक्क उत्पन्न मिळवणाऱ्या. या सगळ्या जणींचा हा प्रवास सोपा नव्हता. काही काळ जावा लागला. अनेक अनुभव मिळाले. धडे मिळाले. पण त्यातूनही खरे टिकले ते चाहत्यांशी जुळलेले नाते. अर्चनाच्या पाककृती करून त्याचे फोटे आवर्जून तिला पाठवणाऱ्या आणि तिला धन्यवाद देणाऱ्या अनेक जणी आणि अनेक जणही आहेत. कल्पनालाही पाठारे प्रभू समाजातून पोचपावती मिळालीच. तिचे काही सोपे पदार्थ अनेक पुरुष करायला लागले. शुभांगी कीरने दाखवलेली अंडय़ाची भुर्जी असंख्य एकटय़ा राहणाऱ्या पुरुषांच्या मदतीला धावून गेलेली आहे. पण इथे फक्त चाहतेच मिळतात असे ही नाही, नकारात्मक प्रतिक्रिया जाणूबुजून वाईट शेरेबाजी सर्रास आहे.
अर्चना म्हणाली की, सुरुवातीला तिला खूप त्रास व्हायचा पण लक्ष दिलं नाही की, आपोआप ती थंडावते आणि अनेकदा होतं काय की आपले चाहते या टीकाकारांवर तुटून पडतात. शुभांगी ताईच्या मते, हे होणारच. सगळी माणसं कुठं सारखी असतात. आपण आपलं काम करत राहायचं. अर्थात बरेचदा चाहत्यांकडूनही काही सूचना येतात आणि त्याचा फायदा आपल्याला होतो, असं मधुराने नमूद केलं. कुठलाही सण असो की, अर्चनाला परत एकदा फराळाच्या या या कृती टाका अशी प्रेमळ धमकी मिळते.
सोशल मीडिया हा आपल्या स्वंयपाक घरात पोहचला आणि प्रेक्षकांनमधूनच अनेक सुगरण-सुगरणी अवतीर्ण होत आहेत.  कितीतरी जणींच्या-जणांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला आहे. यात आपले पसे घालावे लागत नाही. हा सगळ्यात मोठा फायदा आणि आता तर स्मार्ट फोनमुळे आणखी सोपे झाले. अर्थात त्यामागे कष्ट, मेहनत आहे हे नाकारता येणार नाही.
या सगळ्या जणी नेहमी काही ना काही नवीन, सोपे, चवदार असे सादर करतात. सप्तखंडातून कुठूनही कुणी तरी ते पाहते. करून बघते. आणि मग कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगितेल्या कृतीप्रमाणे पदार्थ केला, छान झाला अशी पावती मिळाली की या सगळ्या भरून पावतात आणि उद्या काय सादर करायचे याच्या तयारीला लागातात. गेटसेट-कॅमेरा-अ‍ॅक्शन..
शुभा प्रभू-साटम shubhaprabhusatam@gmail.com
__________________________________________________________________
(मूळ लेख दुवा :http://www.loksatta.com/khau-anandey-news/cooking-channel-on-social-media-for-foodies-1452880/)

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण