आपली राष्ट्रीय दांभिकता-मंदार भारदे
विचार हे वाईनसारखे असतात. ते जितके जुने होत जातात तितके अधिक किमती आणि मौल्यवान होत जातात, असे मीच मागे एकदा प्रचंड मोठय़ा जाहीर सभेत जनसमुदायाबरोबर कोपऱ्यात बसलेलो असताना मनातल्या मनात म्हणालो होतो. मी दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी जन्माला आलो असतो आणि वाचाळही असतो तर माझ्या विचारांना आज फार महत्त्व आले असते. मी सध्याच्या काळात जन्माला आलो याची मला खूप रुखरुख आहे आणि त्यामुळे माझ्या विचारांना कोणीच सध्या महत्त्वाचे मानत नाही याची खंतही आहे. तर ते असो. अशाच एका जुन्या माणसाने म्हणून ठेवले आहे की, प्रत्येकाला त्याच्या लायकीप्रमाणे सरकार मिळते. हे मांडणारा माणूस जुना असला तरी मी त्याच्या मताशी सहमत नाही. माझ्या मते, आपल्या देशाच्या बाबतीत हे विधान अगदीच खोटे आहे. आपल्या देशातील जनतेला नेहमीच तिच्या लायकीपेक्षा जास्त चांगले सरकार मिळत आलेले आहे. आपले नागरिक जितके बोगस आहेत, तितके जर आपले लोकप्रतिनिधीही बोगस असते तर काय झाले असते, याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. मी असे वाचले आहे की, कोणत्यातरी देशाचा राष्ट्रप्रमुख हा जेवणात तोच तोपणा यायला लागला की मधून मधून मेजवानी म्हणून माणूस...