आपली राष्ट्रीय दांभिकता-मंदार भारदे

विचार हे वाईनसारखे असतात. ते जितके जुने होत जातात तितके अधिक किमती आणि मौल्यवान होत जातात, असे मीच मागे एकदा प्रचंड मोठय़ा जाहीर सभेत जनसमुदायाबरोबर कोपऱ्यात बसलेलो असताना मनातल्या मनात म्हणालो होतो. मी दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी जन्माला आलो असतो आणि वाचाळही असतो तर माझ्या विचारांना आज फार महत्त्व आले असते. मी सध्याच्या काळात जन्माला आलो याची मला खूप रुखरुख आहे आणि त्यामुळे माझ्या विचारांना कोणीच सध्या महत्त्वाचे मानत नाही याची खंतही आहे. तर ते असो.
अशाच एका जुन्या माणसाने म्हणून ठेवले आहे की, प्रत्येकाला त्याच्या लायकीप्रमाणे सरकार मिळते. हे मांडणारा माणूस जुना असला तरी मी त्याच्या मताशी सहमत नाही. माझ्या मते, आपल्या देशाच्या बाबतीत हे विधान अगदीच खोटे आहे. आपल्या देशातील जनतेला नेहमीच तिच्या लायकीपेक्षा जास्त चांगले सरकार मिळत आलेले आहे. आपले नागरिक जितके बोगस आहेत, तितके जर आपले लोकप्रतिनिधीही बोगस असते तर काय झाले असते, याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. मी असे वाचले आहे की, कोणत्यातरी देशाचा राष्ट्रप्रमुख हा जेवणात तोच तोपणा यायला लागला की मधून मधून मेजवानी म्हणून माणूस खायचा. आपण इतके भाग्यशाली आहोत, की आपल्या एकाही राष्ट्रप्रमुखाला कधीही चवबदल करावासा वाटला नाही. आपल्या राष्ट्रप्रमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, कामचुकारपणाचे किंवा अरेरावीचे आरोप झाले; पण माणूस खाण्याचे मात्र आजवर कधीही आरोप झालेले नाहीत. आता हे भाग्य आपल्याच वाटय़ाला का यावे? की आपण बेचव नागरिक आहोत? – हा एक विचार करण्याजोगा मुद्दा आहे.
मला नेहमीच सरकार बिचारे आणि लोकच लबाड किंवा बनेल आहेत असे वाटते. लोकांचे नेमके उलटे असते. त्यांना सरकार चोर आणि लोक खूप चांगले, भोळेभाबडे आहेत असे वाटत असते. आधुनिक काळामध्ये कोणाच्याही गुणवत्तेचे मापन करायचे असेल तर ६० वष्रे आणि ३ वष्रे या एककातच करावे लागते. काजळलेली ६० वष्रे आणि उजळलेली ३ वष्रे, किंवा काहीजण उजळलेली ६० वष्रे आणि काजळलेली ३ वष्रे असेही मापन करतात. राज्यकर्त्यांच्या गुणवत्तेवर देशाच्या प्रगतीचे मापन करणे ही एक मागास पद्धत आहे असे माझे स्पष्ट मत आहे. हे म्हणजे चीअर लीडरने चांगला ठुमका मारला नाही म्हणून क्रिकेटची मॅच हातातून गेली असे म्हणण्यासारखे आहे. देशाच्या प्रगतीचे मापन करायचे असेल तर नागरिक काय लायकीचे होते आणि आता काय लायकीचे झाले, या निकषावर करायला हवे. आणि याबाबतीत आपला प्रवास खड्डय़ाकडून गत्रेकडे सुरू आहे. याबाबतीत ६० वष्रेवाल्यांना ३ वर्षांच्या मागे, किंवा ३ वष्रेवाल्यांना ६० वर्षांच्या मागे लपता येणार नाही. हा हिशोब ६० अधिक ३ असाच सोडवावा लागेल. आणि ६३ वर्षे सातत्याने ढासळत जाणारा नागरिकांचा दर्जा हा राष्ट्रीय काळजीचा विषय असायला हवा. पण आपण मात्र राजकारण्यांच्या गुणवत्तेबद्दल बोलतो आहोत आणि वेळ मारून नेतो आहोत, हे आपल्या वैशिष्टय़पूर्ण राष्ट्रीय दांभिकतेला साजेसेच आहे.
बोगीतील संडासातल्या टमरेलला साखळी बांधण्याची आयडिया ज्या कुठल्या कल्पक अधिकाऱ्याला सुचली असेल, त्याला शोधून काढून रेल्वे बोर्डाचे चेअरमन करायला हवे. भारतीय नागरिकांचे त्याचे आकलन हे श्रेष्ठ दर्जाचे आहे. ‘तेजस’ या आधुनिक, वेगवान रेल्वेत सुंदर बाकडी, एलईडी, छान वातानुकूलित व्यवस्था आणि असे बरेच काही असावे, ही कल्पना ज्याने मांडली त्याचे भारतीय नागरिकांचे आकलन कमी आहे, या कारणावरून निलंबनच करायला हवे. हातगाडीवर बसवून न्यायच्या लायकीच्या लोकांना त्याने पालखीत बसवून रुबाबात न्यायचे स्वप्न पाहण्याचा प्रमाद केला आहे.
बाळासाहेब ठाकरे एक किस्सा त्यांच्या शैलीत नेहमी सांगायचे.. ‘लोक इथल्या हॉटेलमधले चमचे चोरून नेतात. अगदी रोज नेतात. अरे, चोरी करायची ठरवलेच आहेस तर निदान मोठा दरोडा तरी टाक. चमचे काय चोरतोस?’ आपल्या लोकांचा आपण अभिमान बाळगला पाहिजे याबद्दल सगळेच आग्रही आहेत. पण ज्यांचा अभिमान बाळगायला सांगितले जातेय ते डोळ्यासमोर आले की अंगावर काटाच येतो. परंपरांचा अभिमान बाळगा, पूर्वजांचा आणि त्यांनी गतकाळात केलेल्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगा, असे जे हल्ली सांगितले जातेय, ते अगदी योग्यच आहे. एकदा भूतकाळाचा आधार घ्यायची संधी मिळाली की मग कितीही मागचा सोयीचा काळ आणि त्या काळातल्या लोकांचा अभिमान बाळगता येतो आणि त्यांच्याशी नाते सांगायची सोय होते. म्हणजे कृष्ण, आदि शंकराचार्य, बुद्ध, शिवाजी महाराज, बाबासाहेब असे वेगवेगळ्या काळाच्या तुकडय़ांत जन्माला आलेल्यांना निवडायचे आणि सांगायचे, की ही आमची महान परंपरा आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. हे फारच सोपे आहे. एकदा जुन्या काळाच्या अभिमानाच्या मोडवर स्वतला सेट केले, की मग आजूबाजूच्या वर्तमानाची लाज वाटायची गरजच राहत नाही.
कुठेतरी बातमी वाचली की, प्राणिसंग्रहालयातल्या वाघाला लोक बाहेरून सहज गंमत म्हणून खडे मारतात. त्यामुळे डिवचलेला पिंजऱ्यातला वाघ पिंजऱ्याच्या भिंतीला धडका घेऊन जखमी होतो. एका श्रेष्ठ भारतीय नागरिकाने पिंजऱ्यातले माकड जाळीजवळ आल्यावर त्याच्या अंगाला खाजखुजली लावली होती आणि माकड खाजवून खाजवून वेडेपिसे झाल्याचा व्हिडीओ फेसबुकवर टाकला होता. रात्री दोन वाजता ढिनच्यॅक ढिनच्यॅक संगीत गाडीत वाजवत गल्ल्यांतून फिरणारे, गाडीचा दरवाजा उघडून ओकल्यासारखे तंबाखू थुंकणारे, ऐतिहासिक इमारतींवर स्वतचे आणि स्वतच्या टिनपाट मत्रिणीचे नाव कोरणारे, कोणी बघत नाही म्हणून सार्वजनिक शौचालयाचा वापर करून पाणी न टाकता निघून जाणारे, शाळेतल्या लहान मुलांना वाटायला आणलेल्या खिचडीचा तांदूळ बाजारात नेऊन विकणारे, रस्त्यावरची बाकडी- रोड डिव्हायडर- फरशा चोरून नेऊन विकणारे, एसटी किंवा रेल्वेचे सीट कव्हर सहज विरंगुळा म्हणून फाडणारे.. हीच आपली ओळख आहे. या ओळखीबद्दल काय बोलणार? वर्तमान लाजीरवाणा आणि भिकारडा असला की गतकाळातल्या फुशारक्या मारण्याशिवाय आपल्या हातात दुसरे काय उरते? एका महाभागाने पोस्टाची पेटी उखडून नेली होती आणि स्वतच्या बंगल्यात चांगली दिसते म्हणून नेऊन लावली होती. त्यामुळे आपल्याला खूपच चांगले नेते मिळाले आहेत, आणि ज्या लायकीचे नेते आपल्याला मिळायला हवेत त्यापेक्षा ते फारच वरच्या दर्जाचे आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
सरकार बदलून खूप प्रयोग करून झाले. त्याने काही फरक पडत नाही. आता जनताच बदलायला पाहिजे. या देशात जर सुधारणा घडवून आणायच्या असतील, तर आपले नागरिक देशातून हाकलवून देऊन बाहेरच्या देशांतले चकचकीत लोक आयात करणे अतिशय आवश्यक आहे. इंपोर्टेड गोष्टींचे आपल्याकडे नाही तरी नेहमीच फार महत्त्व राहिले आहे. आपल्या देशातले तमाम सारे भंगार लोक मोडीत काढून नवेकोरे नागरिक इम्पोर्ट करणे, हे आपल्या देशासाठी अतिशय गरजेचे आहे. आणि तसे जर करायचे नसेल, आणि आपल्याच नागरिकांना जाब विचारायचा असेल तर मग मागच्या ६३ वर्षांत तुम्ही अजूनही टुकार नागरिकच का आहात, असा प्रश्न विचारायला हवा!
सरकार काय, मतदानाने कधीही बदलता येईल. जे कधीच बदलत नाहीत आणि दिवसेंदिवस अधिकच भिकार दर्जाचे बनत चाललेत, त्या नागरिकांचे काय करायचे?
मंदार भारदे mandarbharde@gmail.com
(मूळ लेख स्रोत :  #आपली राष्ट्रीय दांभिकता-#मंदार भारदे -http://www.loksatta.com/baghaychi-bhumika-news/author-mandar-bharde-article-on-typical-mentality-of-indian-people-1485481/)

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण