मुंबईला खऱ्या अर्थाने श्रीमंत करणाऱ्या नाना शंकरशेठ यांची कहाणी
मुंबईने ज्यांना श्रीमंत केले असे लक्षावधी लोक आपल्याला भेटतील, पण आपल्या कर्तृत्त्वाने आणि दातृत्वाने ज्यांनी मुंबईला श्रीमंत केले असे अगदीच मोजके. नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ हे त्यातील अग्रगण्य नाव. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत, नानांनी या मुंबईत चोख व्यापार केला. उदंड पैसे कमाविले आणि कमाविलेल्या या पैशाचे फक्त उंच इमले न बांधता त्यातून समाज घडविणाऱ्या संस्था उभ्या केल्या. नानांनी उभारलेल्या संस्था पाहिल्या की आजही आवाक् व्हायला होते. आज नानांच्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांच्या या खऱ्याखुऱ्या श्रीमंतेचे मॉडेल समजून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.
नानांचा काळ (१८०३-१८६५) हा इंग्रजाविरुद्ध सुरू झालेल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या आधीचा काळ. मुंबई हे शहर म्हणून आकाराला येण्याचा हा कालावधी. समुद्री व्यापारामळे हे शहर घडत होते आणि रोजगाराची संधी शोधण्यासाठी लोक या शहरात येत होते. नानांचे कुटुंब या अशा मुंबईत येणाऱ्या लोकामधील अगदी सुरुवातीला आलेल्यामधले लोक म्हणायला हवे. नानांचे पूर्वज बाबूलशेठ मुरकुटे अठराव्या शतकात कोकणातून मुंबईत आले. मुंबईच्या आघाडीच्या व्यापाऱ्यांमध्ये त्यांची गणना होत असे.
नानांचे वडील शंकरशेठजी ईस्ट इंडिया कंपनी व इंग्रजांचेही सावकार होते. सन १८०० मध्ये त्यांची एकूण संपत्ती १८ लाख रुपयांच्या घरात होती, असे संदर्भ सापडतात. नानांची आई लहानपणीच गेली. त्यामुळे वडिलांनीच त्यांना मोठे केले. त्यावेळच्या पद्धतीनुसार घरीच मास्तर येऊन नानांना भारतीय आणि इंग्रजी असे दोन्ही पद्धतीचे शिक्षण मिळाले. त्यामुळे मराठी, संस्कृत आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांवर नानांचे प्रभुत्व होते. या ज्ञानाचा उपयोग करून नानांनी आपला व्यापार यशाच्या शिखरावर पोहचविला.
ज्या शिक्षणाने आपण घडलो ते शिक्षण आज सर्वांना सहज उपलब्ध नाही, हे नानांनी जाणले होते. त्यासाठीच शिक्षण सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न नानांनी सुरू केले. देशातील मुलांना उत्तम शिक्षण मिळायला हवे यासाठी सुरू झालेल्या ‘नेटिव्ह स्कूल सोसायटी’ नावाच्या पश्चिम भारतातील पहिल्यावहिल्या शिक्षणसंस्थेचे नाना संस्थापक होते. याच संस्थेने पुढे मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरला. अर्थातच त्यावेळी त्याला सनातनी लोकांकडून विरोध झाला. नानांनी हा आपल्या अधिकाराने हा विरोध मोडून काढत आपल्या घरात मुलींची शाळा सुरू केली. आजही नानांची ही शाळा ‘स्टुडंट्स लिटररी अॅण्ड सायंटिफिक सोसायटी’च्या रुपाने गिरगावात आपले अस्तित्व टिकवून उभी आहे.
एखादा समाज किंवा शहर उभे राहते ते संस्थांच्या जोरावर. समाजातील संस्था जेवढ्या ताकदीच्या, तेवढा तो समाज बलवत्तर म्हणून ओळखला जातो. ऑक्सफर्डसारखे शहर तिथल्या विद्यापीठामुळे ओळखले जाते, तर न्यूयॉर्कमधला शेअर बाजार जगातील सर्वात मोठा ठरतो. या अशा संस्था शहरे घडवित असतात. हे नानांमधल्या दूरदृष्टीच्या शिल्पकाराने जाणले होते. म्हणूनच मुंबईच्या जडणघडणीच्या काळात नानांनी दीर्घकाळ टिकतील, समाजाला समृद्ध करतील अशा संस्थांच्या उभारणीकडे याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. नानांचे हे संस्थाकारण आज पुन्हा एकदा समजून घ्यायची वेळ आली आहे.
१८१९ मध्ये माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर झाले. नानांची आणि एलफिस्टन यांची ओळख झाली. एलफिस्टन यांच्या शिक्षणविषयक कामांमध्ये नानांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले. या दोघांच्या प्रयत्नातून १८२२ मध्ये ‘मुंबईची हैंदशाळा आणि शाळापुस्तक मंडळी’ची स्थापना झाली. सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण न्यायचे असेल, तर ते मातृभाषेतून दिले जावे याबद्दल दोघांचेही एकमत होते. त्यामुळेच मराठी, गुजराती व हिंदी भाषांमध्ये प्रथमच क्रमिक पाठय़पुस्तके छापली गेली.
१८२७ मध्ये एल्फिन्स्टन इंग्लंडला परत जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या सत्कारासाठी जो निधी गोळा केला गेला, त्यातून एल्फिन्स्टन कॉलेज सुरू झाले. याच एल्फिन्स्टन महाविद्यालयामधून दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे यासारख्या विद्वानांची पहिली पिढी तयार झाली. याच पिढीने नवे शिक्षण घेऊन समाजात नवा विचार रुजविला. या नव्या विचाराने पुढे काँग्रेसची स्थापना झाली आणि देशाचा स्वातंत्र्यलढा उभारला गेला. त्यामुळे आजच्या आधुनिक भारताची मुळे शिक्षणाच्या प्रसारात आणि नानांसारख्यांच्या दूरदृष्टीत आहे, हे विसरून चालणार नाही.
महिलांच्या शिक्षणाप्रमाणेच सतीच्या अमानुष प्रथेविरोधातही नानांनी आपला विरोध नोंदविला. सतीबंदीसाठी १८२३ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटकडे जो अर्ज करण्यात आला होता, त्यावर राजा राममोहन रॉय आणि जगन्नाथ शंकरशेठ यांच्या प्रमुख सह्या होत्या. या सतीबंदीमुळे मुंबई इलाख्यात सनातन्यांकडून काही प्रतिक्रिया उमटली तर नाना ते सांभाळून घेतील, यावर इंग्रजांचा विश्वास होता. म्हणूनच डिसेंबर १८२९ मध्ये लॉर्ड बेंटिकने सतीबंदीच्या कायद्यावर सही केली आणि हजारो वर्षांच्या क्रूर प्रथेचे उच्चाटन झाले. फक्त लोकानुनय करून नव्हे तर, प्रसंगी कटू वाटतील पण भविष्यवेधी असतील असे ठोस निर्णय समाजाच्या नेत्याला घ्यावे लागतात, हेच नानांच्या सतीबंदीच्या वेळच्या वागण्यातून स्पष्ट झाले.
१८४५ मध्ये एतद्देशीयांच्या भागीदारीने पश्चिम भारतात वाफेच्या बोटींचा पाया घालणारी ‘द बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनी’ उभारण्यात नानांचा पुढाकार होता. त्याच वर्षी जे. जे. रुग्णालय आणि ग्रँट मेडिकल महाविद्यालय, १८५१ मध्ये संस्कृतचे शिक्षण सर्वांसाठी खुले करणारे ‘पूना संस्कृत कॉलेज’ (आजचे डेक्कन कॉलेज), १८५५ मध्ये पहिले कायदा महाविद्यालय, १८५७ मध्ये मुंबई विद्यापीठ (बॉम्बे युनिव्हर्सिटी) आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, १८६२ मध्ये व्हिक्टोरिया गार्डन (आजची राणीची बाग) अशा महाकाय संस्थांच्या स्थापनेत नानांनी आपला सिंहाचा वाटा उचलला. याव्यतिरिक्त शासकीय मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय, मर्कटाइल बँक, सेंट्रल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया सारख्या बँकांच्या उभारणीतही नानांनी प्रयत्न केले. एकंदरित या कालावधीत मुंबईत झालेल्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, आर्थिक बदलावर नानांनी आपला ठसा उमटविला.
१६ एप्रिल १८५३ रोजी आशियातील पहिली रेल्वे बोरिबंदर ते ठाणे अशी धावली. या रेल्वेसाठी नानांचे प्रयत्न महत्वाचे होते. म्हणूनच या पहिल्या रेल्वेप्रवासात जे काही मोजके मान्यवर होते, त्यात नानांचाही समावेश होता. एवढेच नव्हे तर बोरिबंदर स्थानकाच्या इमारतीवर (आजचे सीएसएमटी) आजही ज्या एकमेव भारतीयाचा पुतळा आहे, तो नानांचा. रेल्वेमुळे मुंबईत आधुनिकता धावू लागली आणि या शहराचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला, हे कोणीच नाकारू शकत नाही.
भारतीयांच्या समस्या इंग्लंडपर्यंत पोहाचाव्या यासाठी १८५१ मध्ये ‘बॉम्बे असोसिएशन’ नावाची पश्चिम भारतातील पहिली राजकीय संस्था स्थापन झाली. या संस्थेचे ‘प्रतिष्ठित’ अध्यक्ष म्हणून जमशेठजी जेजीभाई, तर अध्यक्ष म्हणून जगन्नाथ शंकरशेठ यांना निवडले गेले. या संस्थेतर्फे ब्रिटिश पार्लमेंटकडे सुधारणांसाठीचे अर्ज केले गेले आणि ते मंजूरही झाले. १८५७ च्या उठावात क्रांतिकारकांना मदत केल्याचा आरोप नानांवर झाला. त्यात नानांची चौकशीही झाली. पण काही पुरावे न आढळल्याने त्यांच्यावर कारवाई मात्र झाली नाही.
पुढे १८६१ साली लेजिस्लेटीव कौन्सिलमध्ये एतद्देशीय स्थान देण्याचे ठरले तेव्हा या परिषदेचा पहिले सदस्यत्व नानांनाच मिळाले आणि नाना अधिकृतरित्या भारतीयांचे प्रतिनिधी झाले. याच बॉम्बे असोसिएशनचे रूपांतर १८८५ मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये झाले. पुढे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या सभासदांनीच गोवालिया टँक येथे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली आणि स्वातंत्र्यलढ्याला अधिकृतरित्या सुरुवात झाली.
नानांच्या मालकीची प्रचंड मोठी जमीन मुंबईत होती. असे म्हणतात की आजच्या मरिन लाइन्स ते मलबार हिल परिसरात ही जमीन होती. नानांनी ही जमीन शहराच्या उभारणीसाठी दिली. त्यावेळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची योग्य ती व्यवस्था शहरात नव्हती. नानांनी स्वतःची जमीन त्यासाठी दिली, अंत्यविधीसाठी लागणारी व्यवस्था तेथे लावून दिली. आजही त्याच नानांच्या मालकीच्या जागेवर मरिन लाइन येथील जग्गनाथ शंकरशेठ स्मशानभूमी उभी आहे.
नानांनी उभारलेले हे काम पाहिले की आपल्याला यासाठी एक जन्म पुरणार नाही असे वाटत राहते. पण नानांनी आपल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा आणि श्रीमंतीचा उपयोग समाजासाठी केला. जेवढे या शहराकडून घेतले, त्याच्या कैकपटीने या शहराला, समाजाला परत दिले. म्हणूनच नानांच्या या श्रीमंतीचा थोडा तरी अंश प्रत्येकाने घेतला तरी समाज म्हणून आपण खूप श्रीमंत होऊ.
(या लेखाचे लेखक नीलेश बने हे मुंबईतील ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन येथे रिसर्च फेलो आहेत. हा मूळ लेख ३१ जुलै २०१८ रोजी प्रकाशित झाला होता)
Comments
Post a Comment