महाराष्ट्र २०१९-सदानंद मोरे
समूहाची ऐतिहासिकता आणि भविष्यदृष्टी यांचा त्याच्या वर्तमान कृतीवर प्रभाव पडत असतो. काही कृती करण्याऐवजी समूह स्मरणरंजनात व स्वप्नरंजनात दंगून जाण्याचा धोकाही संभवतो. असा समाज निष्क्रिय बनतो किंवा चुकीच्या कृती करतो. आपली अवनती होण्यामागची खरी कारणे शोधण्यासाठी आत्मपरीक्षण करण्याऐवजी तो त्याचे खापर इतरांच्या डोक्यावर फोडण्यातच समाधान मानतो. इ. स. २०२० पर्यंत भारताने महासत्ता होण्याचे स्वप्न काही धुरीणांनी पाहिले व दाखवलेदेखील आहे; पण तूर्त आपली चर्चा महाराष्ट्रापुरती मर्यादित असल्याने त्याचा विचार नको. असेच स्वप्न चीनसारखे इतर राष्ट्रसमाजही पाहात आहेत. याचा उल्लेख केला म्हणजे पुरे. या अनुरोधाने महाराष्ट्राची म्हणजे मराठी समाजाची चर्चा करायला हरकत नसावी. मराठय़ांची म्हणजेच मराठी समाजाची प्रकृती काय आहे याची सर्वात चांगली चिकित्सा राजारामशास्त्री भागवत यांनी केली. दुर्दैवाने महाराष्ट्र राजारामशास्त्रींना पूर्णपणे विसरला. राजारामशास्त्री लिहीत होते तो काळ ब्रिटिश पारतंत्र्याचा होता. म्हणजे तेव्हा संपूर्ण भारत देशच गुलामगिरीत खितपत पडला होता. अशा वेळी भागवतांनी मराठी आयडेंटिटीचा विचार केल...