... अन् भुर्र उडून जा!
आज मला विजय पाडळकर यांची एका पोक्त बापाची लघुकथा आठवते आहे. या बापाला एक दिवस, मुलगा सातव्या वर्गात असताना त्याच्यासाठी घेतलेली टेबल टेनिसची रॅकेट आणि चेंडू सापडतात. ते दिसल्यावर त्याला तो तेव्हा मुलाबरोबर खेळत असलेला, चेंडू खाली न पाडता त्याचे टप्पे बॅटवर मारत राहण्याचा खेळही आठवतो. (त्यावेळेस या खेळात तोच नेहमी जिंकत असे) आज हे आठवल्यावर तो बाप पुन्हा एकदा तसं खेळायचा प्रयत्न करतो. पण दहा-बारा टप्प्यांच्या वर त्याला ते जमत नाही. कथेच्या शेवटी पाडळकर लिहितात, ''आजकाल तो रोज प्रॅक्टिस करतो आहे. एका महिन्यात चाळीस टप्प्यांपर्यंत मजल गेली आहे त्याची. त्याला खात्री आहे, अटलांटातला मुलगा जेव्हा पुढच्या दिवाळीला भेटायला येईल तेव्हा आपण नक्कीच त्याला हरवू शकू.'' परदेशात स्थायिक झालेल्या तरुण मुलांच्या आईबापांच्या आयुष्यातल्या पोकळीचं हृदय हेलावणारं दर्शन या छोट्याशा कथेमधून आपल्याला होतं आणि आपण चुकचुकतो. असे आयुष्य जगणारी अनेक वयस्कर जोडपी आज आपल्याला अवतीभवती दिसतात. आर्थिक समृद्धी आहे. पण मायेचं जवळ कुणीच नाही. त्यामुळे भयाण एकाकीपणा आहे, असहायता आहे आणि शिवाय मुलं, सुना,...