अट्टल- किशोर पाठक
परवापरवाची गोष्ट. संक्रांतीला विदांना एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मुंबईत गेलो. फक्त ब्याण्णव वर्षांचे तृप्त विदा. कायम स्वत:त मग्न नजर. तळाचा वेध घेत जाणारी. खास कोकणी तुकतुकीत रंग. वय उतरत गेलेलं तरीही चेहऱ्यावर, शरीरावर दुधावरच्या घट्ट सायीसारखी घनदाट कांती. पांढरी बंडी, गोल ढोपरावर सरकलेला लेंगा आणि थकलेला धीरगंभीर अनुनासिक स्वर ! पहिला प्रश्न, 'जेवलात?' नंतर पाणी. तब्येतीमुळे कार्यक्रमास येण्यास नम्र नकार. नंतर म्हणाले, 'तीळगूळ घेऊन जा.' संथ चालीत स्वत: चालत विदा आत गेले. तीळगुळाचा लाडू हातावर ठेवला. मी नमस्कार केला. म्हणाले, 'नमस्कार करू नका.' म्हटलं, 'का? असे पाय आता कमी आहेत ज्यांच्यावर डोकं टेकावं.' तसे म्हणाले, 'सांगतो. डोकं टेकावं अशी माणसं तीनच ! एक साने गुरुजी, दुसरे सेनापती बापट, तिसरे बाबा आमटे !' नंतर क्षणभर थांबले आणि म्हणाले, 'बाकीचे आहेत पण नमस्कार केल्यावर हात धुवून घ्यावे लागतात...' हा खास विदांचा स्पर्श, रोखठोक, शब्दांना खरबरीत करणारा, भावनांना कोरडेपणा नाही तर नेमकेपणाने धार देणारा, खमक्या आणि अट्टल...